अजूनकाही
तसं पाहिल्यास 'हेराफेरी'चा विषय चित्रपटांसाठी नवा नाही. किंबहुना याच विषयावरील हिंदी चित्रपटांना डोळ्यासमोर ठेवून लेखक-दिग्दर्शक संजय जाधव यांच्या 'ये रे ये रे पैसा' या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या चित्रपटातही 'हेराफेरी'चा चांगला प्लॉट आहे. मात्र कथेची मांडणी चकचकीत पण उथळ स्वरूपात करण्यात आल्यामुळे चित्रपटातील 'हेराफेरी'मध्ये आवश्यक असणारी निरागसता आपोआपच कमी झाली आहे. त्यामुळे चित्रपटात चांगलं रहस्य आणि धमाल अॅक्शन असली तरी तिचं स्वरूप केवळ मनोरंजन एवढ्यापुरतंच मर्यादित राहिलं आहे.
चित्रपटाच्या प्रारंभी स्वतः लेखक-दिग्दर्शक संजय जाधव यांनीच या चित्रपटाची कथा निवेदन स्वरूपात सांगितली आहे. त्यामुळे एकेक प्रमुख पात्रांचा परिचय होत जातो खरा, मात्र त्यामध्ये वेळ न घालवता पडद्यावर थेट कथेलाच सुरुवात केली असती तर बरं झालं असतं असं वाटून जातं.
आदित्य देसाई (उमेश कामत), सन्नी (सिद्धार्थ जाधव), बबली (तेजस्विनी पंडित) आणि अण्णा (संजय नार्वेकर) ही या कथेतील प्रमुख चार पात्रं.
आदित्य एक बेकार तरुण असतो, मात्र त्याचे 'हिरो' बनण्याचं स्वप्न आहे. लोकांना ‘उल्लू’ बनवण्याचे त्याचे आणि त्याच्या मित्रांचे सुरुवातीचे काही प्रसंग मजा आणतात. बबलीलाही हिरॉईन व्हायचं आहे, तर बबलीवर प्रेम असणाऱ्या सन्नीला कसंही करून बबलीसाठी श्रीमंत व्हायचं आहे.
थोडक्यात तिघांनाही पैशाची गरज आहे. त्यामुळे ते अर्थातच योग्य त्या संधीची वाट पाहत असतात आणि ही संधी त्या तिघांना अण्णाच्या रूपानं मिळते. अण्णा हा एका बँकेचा वसुली एजंट. त्यानं वसूल केलेले प्रत्येकी दहा कोटी रुपये अपघातानं आदित्य-सन्नी-बबलीला मिळाल्याचे त्याला समजतं. त्यामुळे तो तिघांच्याकडे त्या पैसेवसुलीसाठी तगादा लावतो. अण्णाच्या तडाख्यातून सुटण्यासाठी दहा कोटींची गरज आहे हे लक्षात आल्यानंतर आदित्य-सन्नी-बबली एका वेगळ्याच कटात सामील होऊ पाहतात. पन्नास कोटींचे हिरे मिळवण्याचा हा कट नेमका कोणाचा असतो आणि त्यामध्ये हे सारेच जण कसे सापडतात आणि हिरे शेवटी नेमके कोणाला मिळतात, त्याची सुरस कथा पडद्यावर पाहायला हवी.
चित्रपटाच्या कथेत चोरी, हेराफेरी, जादूटोणा, मंत्रतंत्र, पाठलाग, पोलीस आणि हिऱ्याचं रहस्य असा सर्व मालमसाला आहे. मात्र तो वापरताना कथेची मांडणी बटबटीत झाल्याचं सारखं जाणवत राहतं. पडद्यावर एकाच वेळी तीन-तीन दृश्ये अनेक वेळा पाहायला मिळतात. त्यामुळे कथेतील रहस्याची गंमत निघून जाते. शेवटचं धक्कातंत्रही अपेक्षित यश मिळवून देत नाही. शिवाय मनोरंजनावर अधिक भर देण्याच्या नादात तो अश्लीलतेकडे आणि पांचट विनोदाकडे झुकला आहे, याचं भान ठेवलेलं दिसत नाही. चित्रपटातील काही गोष्टी अतार्किक वाटतात.
सुरुवातीला संजय जाधव आपल्या निवेदनात ही कथा शाहरुख खान यांच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'च्या चित्रपटाच्या काळातील आहे असे सांगतात, मात्र पडद्यावर एके ठिकाणी चक्क 'सैराट'चं पोस्टर भिंतीवर पाहायला मिळतं. तसंच शेवटची नोटाबंदीची गेल्या वर्षीची घोषणाही कथेच्या दृष्टीनं गैरलागू वाटते.
मात्र प्रमुख कलाकारांनी आपल्या समर्थ अभिनयांनी हा चित्रपट तारून नेला आहे असं म्हणावं लागेल. सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर यांची जुगलबंदी चांगलीच रंगली आहे. तेजस्विनी पंडित हिनेही बबलीची बिनधास्त भूमिका चांगली रंगवली आहे. उमेश कामतच्या वाट्याला आलेली भूमिका त्याच्या व्यक्तिमत्त्वाला सूट होत नाही, मात्र तरी त्यानं आपली भूमिका चांगली वठवली आहे. मृणाल कुलकर्णी यांची 'हटके' भूमिका हे या चित्रपटाचं खास आकर्षण आहे.
थोडक्यात, 'ये रे ये रे पैसा'मधील पैसा खणखणीत नाण्यांपैकी नसला तरी मनोरंजनाच्या दृष्टीनं तो चांगला ठरला आहे.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment