अजूनकाही
'चष्मांतरे' या महेशलीलापंडित यांच्या काव्यसंग्रहाचं आणि 'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या' या प्रसाद कुमठेकर यांच्या कादंबरीचं प्रकाशन २४ डिसेंबर रोजी मुंबईत झालं. पत्रकार जयंत पवार या प्रकाशन सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी आपलं मनोगत लिहून पाठवलं होतं. ते कार्यक्रमात वाचून दाखवण्यात आलं. या मनोगतातून या दोन्ही पुस्तकांची बलस्थानं आणि महत्त्व अधोरेखित होतं. त्याचं हे प्रथम प्रकाशन.
.............................................................................................................................................
नमस्कार,
आज महेश लीला पंडित उर्फ महेश सैंदाणेच्या 'चष्मांतरे' या कवितासंग्रहाचं आणि प्रसाद कुमठेकरच्या 'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या' या कथासंग्रहाचं किंवा गोष्टीच्या पुस्तकांचं किंवा एका लघु कादंबरीचं प्रकाशन होताना मी कबूल करूनही उपस्थित राहू शकत नसल्यामुळे मला हळहळ वाटते आहे. परंतु मी या छोट्या टिपणातून माझ्या भावना तुमच्यापर्यंत आणि लेखक-कवींपर्यंत पोचवतो आहे.
ही दोन्ही पुस्तकं आजची आहेत आणि आजच्या संदर्भात महत्त्वाची आहेत. महेशच्या कविता आणि प्रसादच्या ष्टोऱ्या या काळाच्या अशा टप्प्यावर येत आहेत, जिथं साहित्यप्रकाराबाबतचे आपले पारंपरिक निकष कोसळून पडत आहेत. वास्तविक जगण्याचे, चांगलं जगण्याचे जे निकष आपण आतापर्यंत मानले होते आणि ते पाळत कसोशीनं जगत होतो, ते निकषच कोसळून पडत आहेत. ज्या काळात देशाचे पंतप्रधान धडधडीत असत्य कुठलाही मुलाहिजा न बाळगता पेरित जातात आणि जनता ती विनातक्रार स्वीकारते किंवा विनातक्रार गप्प बसते, त्या काळात आपण जगतो आहोत. 'सत्यमेव जयते' हे जपलेलं ब्रीद कोसळून पडताना आपण बघत आहोत आणि खोटं बोलणं, खोटं वागणं हेच मूल्य म्हणून प्रस्थापित होतं आहे, अशा काळात आपण जगत आहोत. या काळात नाकासमोर जगणाऱ्या माणसाची होणारी गोची, त्यांच्या शोकांतिका होताना पाहणाऱ्यांची होणारी गोची आणि बदललेले जगण्याचे निकष/नॉर्म्स महेश लीला पंडित आणि प्रसाद कुमठेकर या दोन लिहित्या युवकांनी त्यांच्या अनवट शैलीत शब्दबद्ध केले आहेत. ही आजच्या काळाची आणि आजच्या काळात लिहिणाऱ्या लेखक-कवींची एक्सप्रेशन्स आहेत.
याची पहिली खूण म्हणजे या दोन्ही लेखकांनी प्रमाण भाषेचं जोखड पार दूर भिरकावून स्वतःच्या अटींवर आपल्या अनुभवांची, निरीक्षणांची आणि आपल्याला गवसलेल्या सत्याची मांडामांड केली आहे. महेशची कविता ही त्यानंच एका कवितेत उल्लेख केलेल्या देरिदाच्या डिकन्स्ट्रक्शन थिएरीची वाट चालणारी आहे. डिकन्स्ट्रक्शन म्हणजे आजवर जी भक्कम बांधलेली शब्दांची, अनुभव व्यक्त करण्याच्या तऱ्हेची, स्वतः एक सुरक्षित पोझिशन घेण्याची इमारत आहे तीच उद्ध्वस्त करणं. 'तू मान्य केलेल्या भाषेस। मी च्युतियाटिकली ऑर्थोडॉक्स' अशी महेशच्या एका कवितेतली ओळ आहे. भाषेच्या खांद्यावरून अंकुश ठेवणाऱ्यांचं पॉलिटिक्स तो उघड करतो. 'आहोत आम्ही फुसके, तरी संख्येने जास्त' असं ओरडून म्हणणाऱ्या सुमारांच्या जगात आपण वावरतो आहोत आणि ते आपल्या भाषेचा अंकुश आपल्यावर ठेवू इच्छित आहेत. 'मी म्हणालो अहो। ते म्हणाले रे।। मी रेची री ओढली। त्यांनी संस्कारांची'...या ओळींतून कवी आपली आणि त्यांची पोझिशन तर दाखवतोच, पण या अंकुश ठेवण्याच्या वृत्तीमुळे आपल्यात काय बदल होतोय, तेही नेमकेपणानं सांगतो. तो 'तुम्ही'ऐवजी आता 'तू' बोलू लागतो पण 'तू'च्या जागी त्याच्या तोंडून 'थू' येतो.
महेशच्या कवितेची भाषा ही शहरी, ग्रामीण बोलीची मोडतोड करून बनलेली, आंग्लाळलेली, हायब्रीड आहे आणि ती आजची बोलीच आहे. या भाषेला एक वेग आहे, आवेग आहे, ती शब्दांचं व्याकरण धुडकावते आणि अरुण कोलटकरांच्या कवितांप्रमाणे अत्यंत संवादी होत राहाते. 'कर्णजबर संभोग', 'मस्तपैकी एक हवालदार', 'आपण यांना पाहिलंत का?', 'चेंदामेंदा भरीत' या अफलातून कवितांतून त्यानं घडवलेल्या भाषेचा प्रत्यय येत राहतो. आजच्या काळाचे गुंते मांडण्यासाठी नव्या भाषेच्या शोधात असलेल्या कवींपैकी महेश लीला पंडित हा एक आहे, हे तुम्हाला 'चष्मांतरे' वाचताना जाणवल्यावाचून राहात नाही.
आता मी 'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या' या प्रसाद कुमठेकरच्या गोष्टीरूप दीर्घकथनाकडे वळतो. तो याला बारकुल्या गोष्टी म्हणत असला तरी मी ते दीर्घकथन समजतो. कारण एकीकडे मेट्रोसिटीजच्या अगडबंब महाप्रशस्त व्यवस्थेपुढे नष्ट होत चाललेल्या आणि महानगरात घुसत चाललेल्या गावखेड्याच्या आणि त्यातल्या माणसांच्या तो ज्या सुट्या सुट्या आणि छोट्या छोट्या गोष्टी सांगतो, त्या मला बारीक बारीक मण्यांची लांबलचक माळ विणणाऱ्या माणसाची कुसर वाटते. यातून त्या माळेचं जसं अस्तित्व ठळकपणे सिद्ध होत जातं, तसा हा बारक्या गोष्टींचा पैस एका लघुकादंबरीचं अस्तित्व धारण करतो, असं माझं निरीक्षण आहे. महेशच्या कविता उत्तरआधुनिक किंवा पोस्टमॉडर्न आहेत, तर प्रसादच्या गोष्टी या अस्स्ल देशी वाणाच्या गावठी दारूसारख्या आहेत. उदगीर या मराठवाड्यातल्या एका इलाख्यातली तो केवळ बोली वापरत नाही, तर त्या प्रदेशाची अवघी दृष्टी वापरतो. उदगीर हे त्याच्या वसतीचं किंवा अनुभवाचं ठिकाण नाही, तर ती त्याच्या जगण्याची वृत्ती आहे. त्यामुळेच हा उदगीऱ्या जी बोली वापरतो, छापिल भाषेतही तिच्या अस्सलतेला धस लागू देत नाही. त्यामुळे तो एका नष्ट होऊ चाललेल्या व्यवस्थेला आणि परिसरालाच जिवंतपणा देतो. त्याच्या गावातले धीऱ्या बंचर, सर्जी, शांतूकाका, मोरे गुर्जी, हेडमास्तरीण आई, पाटोळे साहेब, सद्रुद्दीन अल्लाबक्ष अर्थात सदऱ्या ही आणि अशी कैक माणसं या गोष्टींमधला परिसर आपल्या चैतन्यशील अस्तित्वानं भरून टाकतात. या माणसांना आणि त्यांच्या व्यथांना मोजक्या फटकाऱ्यात चितारण्याचं मोठंच कौशल्य प्रसाद कुमठेकरपाशी आहे. मुघलशैलीतल्या मिनिएचर पेंटिंग सारख्या या छोट्या पण अत्यंत भरीव गोष्टी आहेत. त्यातला विनोद आणि कारुण्य या दोन गोष्टी सारख्याच वजनानं येतात, ही या गद्य वेच्यांमधली कमाल आहे.
मी असं मानतो की गोष्टी सांगणारा जे नॅरेटिव्ह वापरतो, त्यावरून त्याचा आवाका आणि मोठेपणा कळतो. अलीकडच्या काळात हा गुण मला वर्जेश सोलंकीच्या 'दीडदमडीना'मध्ये दिसला आणि त्यानंतर प्रसाद कुमठेकरच्या 'बारकुल्या ष्टोऱ्यां'मध्ये. काय असतं की अनेकदा गोष्टी त्याच असतात. माणसांचं हसणं, बसणं यात काळ फरक घडवत असेल, पण गाभ्यातलं माणसांचं हरणं, खचणं, उसळी मारून येणं, नष्ट होणं, तेच असतं. गोष्टी त्याच असतात पण वेगवेगळ्या काळात त्या वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितल्या जातात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ऐकल्या जातात. त्यामुळे गोष्टी सांगणाऱ्याला ती सांगण्याची पद्धत शोधावी लागते. प्रसादला ही पद्धत त्याच्या परंपरेतून गवसली आहे. ती पद्धत तो अॅप्रॉप्रिएट करतो आणि आपल्या समोर मांडतो. त्यामुळे तो पोस्टमॉडर्न जगात मागे पडत चाललेल्या एका खेड्याची गोष्ट सांगत असला तरी ती आजची आणि विलक्षण ताजी होते.
कथाकाराकडे आणखी एक गोष्ट असली पाहिजे असं मी मानतो, ती म्हणजे जगण्याकडे मिष्किलपणे बघण्याची दृष्टी. ती प्रसादकडे आहे, एवढंच नव्हे तर त्याची भाषाही हा मिष्किलपणा अधोरेखित करताना नमुनेदार होते. एकच उदाहरण देतो. कर्तबगारीच्या व्याख्येविषयी तो बोलतो : 'ही कर्तबगारी, हुशारी, पोरगं लाथ मारीन तिथं पाणी काढील असं तवाच म्हणत्यात जवा त्येला चटोपाध्याय श्रीनी लागू व्हतीय. सातवा, आठवा, दहावा वेतन आयोगाच्या पट्टीत तेनं बसतंय.' ही दृष्टी आणि त्यातून उमलून येणारा विनोद साहित्याला श्रेष्ठतेकडे नेत असतो.
असो. या निमित्तानं मला या दोन लेखक मित्रांचं कौतुक करता आलं हेही थोडके नसे. मी महेश लीला पंडित आणि प्रसाद कुमठेकर यांना त्यांच्या लेखन वाटचालीसाठी आणि या पुस्तकांच्याही भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. महेशनं त्याच्या पार प्रकाशनतर्फे प्रसादची 'बगळा' ही कादंबरी सुरेख काढली होती. आता ही दोन पुस्तकं. पार प्रकाशनालाही माझ्या शुभेच्छा. सर्वांचे आभार.
.............................................................................................................................................
'चष्मांतरे' - महेशलीलापंडित
पार प्रकाशन, मुंबई, मूल्य - १६० रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4338
.............................................................................................................................................
'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या' - प्रसाद कुमठेकर
पार प्रकाशन, मुंबई, मूल्य - १८० रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4339
.............................................................................................................................................
लेखक जयंत पवार दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करतात.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment