अजूनकाही
संपादक-पत्रकार राजा कांदळकर यांचं ‘सत्तावर्तन’ हे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रांतील राजकारणाचा वेध घेणारं साप्ताहिक सदर या वर्षीही असेल.
.............................................................................................................................................
भीमा कोरेगावच्या हिंसाचाराचे सूत्रधार म्हणून मनोहर उर्फ संभाजी भिंडे (वय - ८५) आणि मिलिंद एकबोटे (वय - ५६) यांची नावं प्रकाश आंबेडकरांनी घेतली आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केलीय. राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त करायचा म्हणून आज महाराष्ट्र बंद आहे.
वढू (जिं. पुणे)मध्ये दलित आयकॉन गोविंद गायकवाड यांची समाधी २९ डिसेंबर २०१७ला उदध्वस्त करणं आणि १ जानेवारी २०१८ रोजी १५०० लोक एकत्र करणं, त्यात भिडेंचं शिवराज प्रतिष्ठान आणि एकबोटेंची हिंदू एकता आघाडी पुढे असणं, याच माणसांनी नंतर भीमा कोरेगावला विजयस्तंभाकडे येणाऱ्यांवर दगडफेक करणं, या घटना सुनियोजित दिसतात.
वढूची गोविंद गायकवाडांची समाधी उदध्वस्त करणाऱ्यांमध्ये ४९ जण आरोपी आहेत. त्यात ९ जणांना अटक झाली. गोविंद गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार केले, म्हणून त्यांची वढूमध्ये समाधी बांधण्यात आलीय. भिडे-एकबोटे यांना गोविंद गायकवाडांनी संभाजी महाराजांवर अंत्यविधी केले हे मान्य नाही. त्यांच्या मते मराठा समाजातील लोकांनी अंत्यसंस्कार केले. म्हणून त्यांची गोविंद गायकवाडांच्या समाधीवर वक्रदृष्टी गेली. त्यातून या गावात तणाव निर्माण झाला. दलित विरुद्ध मराठा असं आता या तणावाचं स्वरूप आहे.
वढू बुद्रुक हे गाव छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींशी जोडलं गेल्यानं त्या भूमीशी महाराष्ट्राचं आस्थेचं नातं आहे. हे गाव वादभूमी व्हावं हा काही समाजविघातक शक्तींचा खूप जुना आवडता उद्योग आहे. त्या उद्योगाला एकबोटे-भिडे यांनी सुनियोजित रूप दिलं आहे. औरंगजेबानं संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं. वडू इथं टाकलं. हे स्मरण करत एकबोटे-भिडे यांनी ते गाव म्हणजे मुस्लिम द्वेष फैलावण्याची प्रयोगशाळा बनवली, हे आता लपून राहिलेलं नाही. गोविंद गायकवाडांची समाधी उदध्वस्त करून भिडे-एकबोटे यांनी दलित-मुस्लिम या दोघांना एकत्रित टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. संभाजी महाराजांचं प्रेरणादायी प्रतीक वापरून समाज पुढे नेण्याऐवजी मागे नेण्याचा हा डाव दिसतो.
गेल्या काही वर्षांत पश्चिम महाराष्ट्रात भिडे-एकबोटे यांचं संघटन वाढत गेलंय. भिडे हे न्यूक्लिअर फिजिक्स या विषयाचे विद्यार्थी. फर्गसन महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते असं सांगितलं जातं. १९८०पासून ते शिवराज प्रतिष्ठान चालवतात. सायकल, बसमधून फिरतात. भाषणं ठोकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या छायाचित्रं प्रसिद्ध झाली आहेत. संघ परिवाराला भिडे यांचं कौतुक आहे.
एकबोटे हे पुणे महानगरपालिकेत भाजपचे नगरसेवक होते. शिवसेनेच्या तिकिटावरही त्यांनी निवडणुका लढवल्यात. एकबोटे यांचं नाव पहिल्यांदा सासवड (जि. पुणे) येथील दंगलीत पुढे आलं होतं. त्यांच्यावर दंगल आणि हत्यारं बाळगणं अशा स्वरूपाच्या १२ गुन्हेगारी गंभीर केसेस आहेत.
भिडे यांचं नाव महाराष्ट्रभर झालं ते मिरज-सांगली पट्ट्यात २००९साली झालेल्या दंगलीच्या वेळी. त्याआधी भिडे आर्मीनं पुण्यात ‘जोधा-अकबर’ हा सिनेमा बंद पाडला होता. २००९च्या गणेश चतुर्थीच्या काळात मिरज-सांगली परिसरात भिडे आर्मीनं धुमाकूळ घातला होता. त्यानंतर २०१७च्या वारीच्या दिंडीत भिडे आर्मीचे तलवारीधारी लोक वारकऱ्यांत घुसले होते. वारी दिंडी प्रमुख राजाभाऊ चोपदार यांनी त्यांच्यावर शस्त्रं घेऊन वारीत घुसले म्हणून पोलिसात गुन्हे नोंदवले होते. ‘भिडे यांची ऑर्डर मी मानतो’ हे खुद्द नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात जाहीरपणे सांगितलं होतं.
भिडे-एकबोटे यांचा संघाशी असलेला घरोबा आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेले लागेबांधे बरंच काही सांगून जातात. संघ परिवार प्रत्येक राज्यात एक तरी द्वेषभूमी शोधत असतो. उत्तर प्रदेशात अयोध्येत राम मंदिर बांधण्याची घोषणा करून १९८०च्या दशकात संघ परिवारानं राजकारण केलं. त्यासाठी विश्व हिंदू परिषदेला पुढं करून आंदोलनाची भूमी तयार केली. अयोध्येतली बाबरी मशीद, बाबर याचा संबंध मुस्लिम नागरिकांना वेठीस धरण्यासाठी वापरला गेला. त्यानंतर बाबरी पाडून देशात हिंदू विरुद्ध मुस्लिम दुही माजवण्यात आली. त्याचा फायदा भाजपची वोट बँक मजबूत होण्यात झाला. गुजरातमध्ये सोमनाथ मंदिर हे संघ परिवारानं द्वेषभूमी बनवलं. गजनीच्या महंमदानं हे मंदिर उदध्वस्त केलं म्हणून गुजरातमध्ये मुस्लिम द्वेष वाढवला. नुकत्याच गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोमनाथ मंदिराच्या स्मृती जागवत मुस्लिम द्वेष जागा केला गेला. त्यावेळी गुजराती-हिंदू अस्मिता जागवण्यात भाजपनं पुढाकार घेतला होता.
अयोध्या, सोमनाथ नंतर आता वढू बुद्रुक ही नवी द्वेषभूमी संघ परिवार करू बघतोय की काय अशी शंका घेण्यास खूप वाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ही प्रेरणादायी प्रतीकं संघ परिवारानं मुस्लिम द्वेष वाढवण्यासाठी वेळोवेळी वापरली आहेत. पण महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि इतर संघटनांनी शिवाजी-संभाजी महाराज यांचा सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन जाणारे लोककल्याणकारी राजे अशी भूमिका मांडली. त्यात मराठा समाजातील विचारवंत, अभ्यासक, कार्यकर्ते पुढे आले आहेत. संभाजी महाराजांना पेशव्यांच्या प्रतिनिधींनी तीन वेळा ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी औरंगजेबाद्वारे पेशव्यांनी संभाजी महाराजांना हाल हाल करून ठार केलं. औरंगजेब हा मुस्लिमांमधला ब्राह्मण होता, अशी भूमिका या अभ्यासकांनी प्राच्याविद्यापंडित कॉ. शरद् पाटील यांच्या संशोधनाचा आधार घेऊन मांडणी करायला सुरुवात केलीय. ही माडंणी संघ परिवाराला अडचणीची आहे. ही मांडणी लोकांना पटली तर संघाचा द्वेष फैलावण्याचा अजेंडा अडतो.
संभाजी ब्रिगेड आणि इतर बहुजन संघटनांच्या सांस्कृतिक भूमिकांमुळे संघ परिवार गेली काही वर्षं अस्वस्थ आहे. त्या अस्वस्थतेतून नवे डाव टाकले जात आहेत. त्यातला एक डाव गोविंद गायकवाडांच्या समाधीचं उदध्वस्तीकरण हा आहे, असा आरोप बहुजन संघटना आता करत आहेत.
पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी वर्षाच्या अखेरच्या दिवशी शनवारवाड्यावर बहुजन संघटनांची एल्गार परिषद झाली. नव-पेशवाई विरोधात हा एल्गार पुकारल्याचं संयोजकांनी जाहीर केलं. या परिषदेतलं आमदार जिग्नेश मेवाणीचं भाषण संघ परिवाराला चांगलंच झोंबलं असणार.
नव-पेशवाई म्हणजे काय, हे सांगताना जिग्नेश म्हणाले, “लोकांना धर्म-जात या भांडणात गुजरातमध्ये गुंतवून ठेवलं गेलं आणि राज्यातील शेती, वीज, पाणी, पैसा आणि इतर संसाधनं अंबानी, अदानी उद्योगसमूहाच्या घशात नरेंद्र मोदींनी घातली. मूठभर उद्योगांची चंगळ आणि लोकांसाठी दंगल. हा डाव गुजरातच्या जनतेला कळला म्हणून ९९वर भाजप अडकला. १५० जागाची घमंड उतरली. मोदी, अदानी, अंबानी हे आजच्या नव-पेशवाईतले खरे ब्राह्मण आहेत.” तेव्हा टाळ्यांनी शनवारवाड्याच्या परिसर दुमदुमून गेला होता. लोकांना हे पटत होतं याची ही खूण मानावी लागेल. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या पोटावरची चरबी अंबानीच्या पैशातून वाढली, हे यांचं खरं रूप हे जिग्नेश यांनी या सभेत ठणकावून सांगितलं.
या सभेला मिळालेला प्रतिसाद आणि त्यातील वक्त्यांची भाषणं यांनी संघ परिवाराला राग येणं स्वाभाविक आहे. त्यानंतर भीमा कोरेगावचा हिंसाचार घडला. हा योगायोग मानावा काय?
संघ परिवार अरिष्टात संधी शोधण्यात माहीर आहे. हे सगळं घडत असताना वढूमध्ये नवी द्वेषभूमी सापडल्याच्या आनंदात तो असेल काय? ही द्वेषभूमी मराठा समाज विरुद्ध दलित अशी विभागणी करेल हे स्पष्ट आहे. मराठा समाजाला दलित, मुस्लिम दोघांचा द्वेष करायला शिकवायचं तेही संभाजी महाराजांचं नाव घेऊन या रणनीतीमध्ये संघ कितपत यशस्वी होईल? हे करताना संघाला मराठा समाज संभाजी ब्रिगेडपासून तोडता येईल काय? शनवारवाड्यावर एल्गार परिषदेत झालेली बहुजन संघटनांची एकी विस्कटवता येईल काय? नवी अयोध्या म्हणून वढूचं संघ परिवार कसं मार्केटिंग करेल? नवी द्वेषभूमी फुलवण्यासाठी काय भाषा, युक्त्या वापरल्या जातील, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.
लोकांना रोजगार, भाकरी, आरोग्य, शिक्षण देता येत नसेल तर धर्म, जात भावनेच्या झुल्यात झुलवा. लोकांचा सरकारवरचा राग निवळून जातो असं म्हणतात. फडणवीस सरकार या सूत्राचा वापर यापुढच्या काळात करेल? त्यासाठी भिडे-एकबोटे आर्मीचा कसा वापर होईल? महाराष्ट्र अवघड वळणावर उभा आहे. कारण त्या वळणावर नवी द्वेषभूमी साकारतेय.
.............................................................................................................................................
लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nilesh Shinde
Fri , 09 February 2018
भीमा-कोरेगाव येथे झालेल्या घटनेमध्ये जे कुणी दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि जर संभाजी भिडे ( मनोहर कुलकर्णी ) आणि मिलिंद एकबोटे हे खरे निर्दोष असतील तर त्यांना कारवाई साठी सामोरे जावे ह्यामध्ये पुरुषार्थ आहे , संभाजी भिडे ह्यांची सभा 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथे घेतली होती, अनेक धारकरी जे आहेत त्यांनी आपल्या फेसबुकवर अशा कंमेंट आणि अपडेट्स दिल्या होत्या, आज त्याची धर्म-निरपेक पडताळणी झाली पाहिजे , संभाजी भिडे ह्या व्यक्तीवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि आतापर्यंत ते वाचू शकले कारण हे एकच की मनुवादी लोक अजूनही सत्तेमध्ये आहेत आणि मनुवादीच लेकरू म्हणजे दुसरं तिसरं काही नाही ते आहे फक्त "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ"
Gamma Pailvan
Thu , 04 January 2018
कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दुर्दैवी प्रकारामध्ये शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांचे नाव नाहक गोवले आहे. या प्रकरणात त्यांचा काहीही संबंध नाही. तसेच प्रकार घडण्यापूर्वी त्यात कणभरही लक्ष घातले नाही. कोठे सभा घेतली नाही, की आवाहन केले नाही. तरीही खोडसाळपणाने त्यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करणाऱ्यांची आणि शहानिशा न करता तो दाखल करून घेणाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी आज प्रसिद्घी पत्रकाद्वारे केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत भिडे गुरूजींवर आरोप केले होते. तसेच याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हिंदुत्ववादी शक्ती या दंगलीमागे असल्याचा आरोप केला होता.पत्रकात म्हटले आहे की, शिवप्रतिष्ठानचे कार्य राज्यात जोमाने वाढत आहे. ते काही असंतुष्ट, देशविघातक शक्तींना बघवत नसल्यामुळे राजकीय हेतूने प्रेरित होऊन जाणीवपूर्वक श्री. भिडे यांचे नाव यात गोवले आहे. कोरेगाव भीमा येथे दुर्दैवी प्रकार जेव्हा घडला तेव्हा श्री. भिडे माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे सांत्वनासाठी इस्लामपूर येथे गेले होते. त्यानंतर भोर येथे सभा झाली. या सर्वांचे भक्कम पुरावे आहेत. तरीही फिर्यादींनी श्री. भिडे यांनी जाळपोळ, दगडफेक केल्याची खोटी फिर्याद दिली आहे. या प्रकरणातून जातीय तेढ निर्माण करून राज्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न कोणीतरी करत आहे. यापूर्वीही फुटकळ संघटनांनी त्यांना गुन्ह्यात अडकवण्याचे काम केले होते. त्यामुळे या प्रकरणातही खोलवर जाऊन चौकशी करावी, अशी शिवप्रतिष्ठानची मागणी आहे. (इतरत्र पूर्वप्रकाशित) -गा.पै.