अजूनकाही
विद्याव्रती
हा दिवाळी अंक मुंबई विद्यापीठाने काढला असून त्याच्या संपादक मंडळात खुद्द कुलगुरूच आहेत. एखाद्या विद्यापीठाने आणि त्याच्या कुलगुरूने दिवाळी अंक काढावा का आणि त्यासाठी दोन-अडीच महिन्यांचा काळ घालवावा का, हा वादाचा आणि चर्चेचा मुद्दा आहे. मात्र तो इथे प्रस्तुत नाही. त्यामुळे थेट अंकाबद्दलच बोलू. या अंकाची निर्मिती अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे. संपूर्ण अंकाची छपाई आर्ट पेपरवर केली आहे. सुरुवातीच्या आणि शेवटच्या समोरासमोरच्या दोन्ही पानांवर (व मलपृष्ठावरही) विद्यापीठाचं वैभव सांगणारी छायाचित्रं छापली आहेत. ती लोभस आहेत. या अंकात एकंदर बारा विभाग असून त्यात ३९ लेखांचा समावेश आहे. ‘घेतला वसा’ या पहिल्या विभागात प्रतिमा वैद्य ते शार्दुल कदम अशा पाच चित्रकारांनी त्यांना घरातून मिळालेल्या चित्रकलेच्या वारशाविषयी लिहिलं आहे. या प्रत्येक लेखात रंगीत छायाचित्रांचा वापर केल्याने हा विभाग वेधक झाला आहे. यानंतरचा विभाग ‘प्रभाव’ या नावाचा आहे. त्यात चित्रकार प्रभाकर कोलते, शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, लेखक अच्युत गोडबोले आणि प्राध्यापक चंद्रहास देशपांडे यांचे लेख आहेत. या नामवंत व्यक्तींवर ज्या लोकांचा प्रभाव पडला, त्यांच्या विषयी या नामवंत व्यक्तींनी लिहिलं आहे. या विभागतलेही सर्व लेख पहिल्या विभागासारखेच छायाचित्रांनी नटलेले आणि आटोपशीर आहेत. त्यामुळेच वाचनीयही आहेत. त्यानंतरच्या विभागाचं नाव ‘शब्दकस्तुरी’ असून त्यात अरुणा ढेरे, नीरजा, मोनिका गजेंद्रगडकर यांनी वडिलांकडून मिळालेल्या लेखन-वारशाविषयी लिहिलं आहे. याला अपवाद आहे, तो गौतम जोगळेकर यांचा. त्यांनी स्वतःची जडणघडणच सांगितली आहे. त्यांच्या हटके अंदाजामुळे हा लेख या विभागातलाच नाही, तर संपूर्ण अंकातला 'मास्टरपिस' ठरतो! त्यानंतरच्या विभागात पंडित विद्यासागर, सिद्धार्थविनायक काणे आणि संजय देशमुख यांनी इटली व हंगेरी इथल्या त्यांच्या आवडत्या विद्यापीठांविषयी लिहिलं आहे. त्यातला काणे यांचा लेख जेमतेम पानभरही नाही. ‘माझा बिगर राजकीय गोतावळा’ या विभागातले सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड आणि प्रणिती शिंदे यांचे लेख त्यांची निदान काही प्रमाणात वेगळी ओळख करून देतात. ‘मला थक्क करणारी माणसे’, ‘माझे विद्यापीठ’, ‘अविस्मरणीय पुस्तके’, ‘मराठी समाजाचे भान’, ‘वेगळी वाट’, ‘लेख’ आणि ‘निशाचर शहरे’ या विभागात प्रत्येकी चार ते दोन लेखांचा समावेश आहे. हे विभागही साधारणपणे वाचनीयच आहेत.
सर्वोत्तम – वारशाच्या महामार्गावरून (गौतम जोगळेकर)
उत्तम मध्यम – महावृक्षांची छाया (प्रभाकर कोलते), माझी ओपन युनिव्हर्सिटी (विनय जंगले)
मध्यम मध्यम – ‘मला प्रिय असलेले परदेशी विद्यापीठ’ आणि ‘अविस्मरणीय पुस्तके’ या विभागांमधले सर्व लेख.
‘विद्याव्रती’, संपादक – संजय देशमुख, विजय तापस, वर्षा माळवदे, पाने - १९५, मूल्य – २०० रुपये.
.......................................................
शब्दस्पर्श
२०१४पासून ग्रंथसंपादन, मुद्रितशोधन, अनुवाद या प्रकाशन-व्यवसायाशी संबंधित विषयांवर कार्यशाळा घेणाऱ्या आणि इतर उपक्रम राबवणाऱ्या पुण्यातल्या 'एडिट मित्र' या संस्थेकडून ‘शब्दस्पर्श’ हा दिवाळी अंक प्रकाशित केला जातो आहे. त्यामुळे साहजिकच तो पुस्तक-प्रकाशनाशी निगडित असणार, हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. या संस्थेने पहिल्याच वर्षी ‘ग्रंथसंपादन’ या विषयावर संपूर्ण अंक काढला होता. त्यानंतरच्या वर्षी ‘पुस्तकांची मुखपृष्ठे आणि मांडणी’ हा विषय घेतला होता, तर या वर्षीचा विषय ‘संगणकीय अक्षरजुळणी आणि मुद्रितशोधन’ असा आहे. या अंकाचे एकंदर चार विभाग आहेत. पहिल्या विभागात शुद्धलेखनाविषयीचे चार लेख असून ते अरुण फडके, सत्त्वशीला सामंत (पुनर्मुद्रित लेख), यास्मिन शेख आणि दिवाकर मोहनी या मान्यवरांनी लिहिले आहेत. दुसऱ्या विभागात पाच लेख असून त्यात संगणकीय अक्षरजुळणी, टायपोग्राफी, युनिकोड यांचा उहापोह केला आहे. तिसऱ्या विभागात अविनाश पंडित, सदानंद बोरसे, अस्मिता मोहिते, स्नेहा अवसरीकर यांचे लेख आहेत. सध्या किंवा यापूर्वी प्रकाशन क्षेत्रात कार्यरत असलेल्या या मान्यवरांनी ‘संगणकीय अक्षरजुळणी आणि मुद्रितशोधन’ या विषयाशी संबंधित स्वतःचे अनुभव सांगितले आहेत. ‘अंतर्नाद’ या वाङ्मयीन मासिकाचे संपादक भानू काळे यांचा ‘तंत्रज्ञान : सोय की गैरसोय’ हा चर्चेला उद्युक्त करणारा लेखही या विभागात आहे. याच विभागात शेवटी ‘मराठी शुद्धलेखनाचे प्रचलित नियम’, ‘सूचना मुद्रितशोधनाच्या’ आणि ‘मुद्रितशोधनाच्या खुणा, त्यांचा अर्थ आणि स्पष्टीकरण’ या तीन लेखांचाही समावेश आहे. आधीचे पाचही लेख माहितीपूर्ण असले, तरी ते अजून विस्तृत असायला हवे होते. कारण संबंधित कामाच्या स्वरूपाचा आवाका आणि गाभा लेखांच्या त्रोटकपणामुळे पूर्णपणे उलगडत नाही. चौथ्या विभागात मुद्रितशोधक विजय जोशी यांनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत. दै. सकाळचे संपादक मल्हार अरणकल्ले यांनी प्रसारमाध्यमांमधल्या भाषेविषयी लिहिलं आहे. राजीव तांबे यांनी अपेक्षेप्रमाणे शुद्धलेखनातही गंमतशाळा आणली आहे, तर संदीप खरे यांनी कवितेच्या शुद्धलेखनाविषयी स्वतःचे विचार मांडले आहेत. संजय भास्कर जोशी यांनी एक लेखक व वाचक म्हणून प्रमाण लेखनाविषयी लिहिलं आहे. अंकात जागोजागी शुद्ध-अशुद्ध शब्दांविषयीच्या चौकटी दिल्या आहेत. थोडक्यात, ज्या अक्षरजुळणीवर व मुद्रितशोधनावर पुस्तकाचं रचनासौंदर्य आणि सौष्ठव अवलंबून असतं, त्याची माहिती देणारा हा अंक संग्राह्य आहे. लेखन-प्रकाशन-मुद्रण-वाचन यांच्याशी संबंधित असणाऱ्यांनी, त्यात करिअर करत असलेल्या वा इच्छिणाऱ्यांनी हा अंक सतत हाताशी ठेवावा असा आहे. मात्र हा अंक अक्षरजुळणी व मुद्रितशोधन या विषयावरची साद्यन्त माहिती देणारा परिपूर्ण अंक नाही, हेही लक्षात घ्यायला हवं. तसा तो झाला असता, तर त्याचं विशेष मोल राहिलं असतं. त्या दृष्टीने संपादक मंडळाने दक्ष प्रयत्न करण्याची नितांत गरज होती, असं वाटतं.
सर्वोत्तम – मराठी भाषेच्या लेखनाचे नियम : स्वरूप, समस्या आणि उपाय (अरुण फडके)
उत्तम मध्यम – Basics of English Proofreading (Avinash Pandit)
मध्यम मध्यम – मुद्रितशोधनातील ‘ध’चा ‘मा’ (विजय जोशी)
‘शब्दस्पर्श’, संपादक - अस्मिता साठे, पाने – १३६, मूल्य – १५० रुपये.
.......................................................
भवताल
‘भवताल’ या ‘हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा’ असलेल्या द्वैमासिकाचा हा पहिलाच दिवाळी अंक. या पहिल्याच अंकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यात टिपिकल पर्यावरणवाद्यांप्रमाणे कुठलाही शंखनाद न करता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सापडणाऱ्या खडकांचा परिचय करून दिला आहे. संपादकांनी ‘महाराष्ट्र घडवणाऱ्या दगडाची ओळख…दगडांच्या देशा’ असं या अंकाचं वर्णन केलं आहे. ‘…राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा…’ अशी महाराष्ट्राची महती सांगितली जात असली, तरी भूगर्भशास्त्राचे अभ्यासक, विद्यार्थी, प्राध्यापक वगळता इतर लोक त्याकडे फारसं गांभीर्याने पाहत नाहीत; पण हा विषय अतिशय रंजक, अदभुत आणि मजेशीर असल्याची ओळख करून देण्याचं काम हा अंक अतिशय चांगल्या प्रकारे करतो. वेगवेगळे खडक, स्फटिकं यांच्या सुंदर छायाचित्रांचा समावेश प्रत्येक लेखात करून सगळ्या अंकाचीच आर्ट पेपरवर रंगीत छपाई केल्याने हा अंक संग्राह्य झाला आहे. किंबहुना हा अंक म्हणजे 'खडक' या विषयावरच्या एका पुस्तकाचा ऐवज आहे. सर्वसाधारण वाचकांपासून पट्टीच्या वाचकांपर्यंत सर्वांना हा अंक आवडेल. यातले सर्वच लेख खूप सविस्तर आणि सखोल नाहीत. काही लेख तर जुजबीच माहिती देतात, पण मूळ विषयच अपरिचित असल्याने त्या विषयीची परिचित माहितीही दस्ताऐवजासारखी असते. शिवाय या अंकासोबत एका दगडाची कल्पक भेट संपादकांनी दिलेली आहे. त्यामुळे हा या वर्षातला सर्वांत अभिनव आणि नावीन्यपूर्ण अंक म्हणायला काहीच हरकत नाही.
म्हणूनच या अंकाच्या बाबतीत सर्वोत्तम, उत्तम मध्यम आणि मध्यम मध्यम अशी वर्गवारी करणंही फारसं उचित ठरणार नाही.
‘भवताल’, संपादक - अभिजित घोरपडे, पाने – १५२, मूल्य – २०० रुपये.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment