अजूनकाही
ब्रिटिश नाटककार विल्यम शेक्सपियर या जागतिक कीर्तीच्या नाटककाराची नाटकं करण्याची इच्छा प्रत्येक रंगकर्मीला असतेच. शेक्सपियरनं जशा शोकांतिका लिहिल्या तशाच, सुखांतिकाही लिहिल्या. किंग लियर, ऑथेल्लो, मॅकबेथ वगैरे त्याच्या शोकांतिका आहेत. त्याची गाजलेली सुखांतिका म्हणजे ‘टवेल्थ नाईट’. पाश्चात्य जगतात शोकांतिका तसंच सुखांतिकांचे सतत प्रयोग होत असतात. त्यामानानं आपल्याकडे शेक्सपियरच्या शोकांतिका करण्याकडे कल दिसतो.
‘टेवल्थ नाईट’ या सुखांतिकेचे भरपूर प्रयोग झालेले आहेत, होत असतात. शिवाय यावर आधारित चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाले आहेत. आता मुंबईच्या ‘द कंपनी थिएटर’ (स्थापना-१९९३) या नाटयसंस्थेनं ‘टवेल्थ नाईट’चं ‘पिया बहुरूपिया’ हे हिंदी भाषांतर (रूपांतर नव्हे) सादर केलं आहे.
शेक्सपियरच्या या नाटकाचं भाषांतर अमितोष नागपाल यांनी केलं असून ते या नाटकात ‘सेबेस्टीयन’ची छोटीशी भूमिकासुद्धा करतात. त्यांनी जरी शेक्सपियरच्या मूळ नाटकातील पात्रांची नावं तशीच ठेवली असली तरी या नाटकाला बेमालूमपणे भारतीय बाज चढवला आहे. परिणामी प्रेक्षकांना क्षणभरही आपण एक परदेशी नाटक, तेसुद्धा सतराव्या शतकात लिहिलेलं, बघत आहोत असं वाटत नाही.
शेक्सपियरचं हे नाटक म्हणजे कॉमेडी व रोमान्स यांचं मिश्रण आहे. आजच्या आधुनिक भाषेत याला (Romance + comedy = romedy) ‘रॉमेडी’ असे म्हणतात. नाटकाच्या सुरुवातीला एक जहाज फुटतं व त्यावर असलेले जुळे भाऊ (सेबेस्टियन) व बहिण (व्हायोला) यांची ताटातूट होते. आपला भाऊ मेला असं वाटून व्हायोला पुरुषाचं (सिझारीयो) रूप धारण करते आणि एका उमरावाकडे, ड्यूक ओर्सिनो यांच्याकडे नोकरी करते. व्हायोला (ऊर्फ सिझारीयो) ड्यूक ओर्सिनोच्या प्रेमात पडते, पण तो लेडी ओलेव्हियाच्या प्रेमात असतो. ओलेव्हिया तिचे वडील व भावाच्या मुत्यूच्या दुःखात चूर असते. तिला प्रेमात पडण्याची, विवाह करण्याची इच्छाच नसते.
ड्यूक ओर्सिनोकडे पुरुषाच्या वेशात नोकरी करणाऱ्या सिझारीयोला ओर्सिनो हुकूम देतो की, त्यानं जावं व लेडी व्हायोलाला त्याच्या प्रेमाबद्दल सांगावं. या कामासाठी आलेल्या सिझारीयोच्या प्रेमात लेडी व्हायोला पडते. अशा प्रकारे हा तिच्या, तर ती भलत्याच्या प्रेमात; अशी स्थिती निर्माण होते. शेवट अर्थात सुखान्त होतो, कारण सेबेस्टियन समोर येतो व बहिणभाऊ भेटतात. ही ’पिया बहरूपिया’ची ढोबळ मानानं गोष्ट.
दिग्दर्शक अतुल कुमार यांनी प्रयोग फारच नेटका व प्रेक्षणीय बसवला आहे. या नाटकाला एक विलक्षण गती आहे. ज्यामुळे सुमारे अडीच तास चालणाऱ्या या प्रयोगात प्रेक्षक क्षणभरही कंटाळत नाही, हे मोठं यश आहे.
अतुल कुमार यांनी नाटकासाठी वेगळं नेपथ्य बनवलं नाही. रंगमंचाच्या जरा मागे एक मोठा ओटा आहे. ज्यावर सर्व कलाकार, गायक व वादक बसलेले असतात. यातील नटमंडळी जेव्हा त्यांची एंट्री असेल तेव्हा समोर येतात. तोपर्यंत ते मागे बसून गात असतात व नाटकात सहभागी होत असतात. हे नाटक संगीतिका आहे व यातील बरीच गाणी समूहगीतं आहेत. अर्थात काही प्रसंगांत पात्र विंगेतही जातात, पण मागे असलेला मोठा ओटा बहुउद्देशीय ठरतो. रंगमंचाच्या अगदी मागे शेक्सपियरचं मोठं चित्र आहे, पण त्याला भारतीय पेहराव दिलेला आहे. यामुळे हे नाटक भारतीय मातीतलं आहे, हे अधोरेखित होतं.
‘पिया बहरूपिया’चा आत्मा उत्तर भारतातील ‘नौटंकी’ या लोकनाट्य या कलाप्रकारावर आधारित आहे. यातील पात्रं जरी बहुतेक वेळा हिंदी बोलत असली तरी प्रसंगी कधी मराठीत तर इंग्रजीतही बोलत असतात. परिणामी शेक्सपियरचं सतराव्या शतकातील हे नाटक आजही आस्वाद्य ठरतं.
या नाटकासाठी अतुल कुमार यांनी नाटकाचे सर्व घटक सर्व शक्तीनिशी वापरले आहेत. यातील वेशभूषा नाटकाला साजेशी आहे. अनेक पात्रांना उत्तर भारतीय पोशाख आहे तर काही पात्रांना पाश्चात्य पोशाख आहे. यामुळे हे नाटक परदेशी आहे याचं भान प्रेक्षक सतत बाळगतात. ‘पिया बहुरूपिया’तील पार्श्वसंगीताचा खास उल्लेख करावा लागेल. यावर उत्तर भारतीय संगीताचा ठसा स्पष्ट जाणवतो. या नाटकात प्रकाशयोजना फारशी नाही, पण जी आहे ती नाटकाचा परिणाम ठळक करते. उदाहरणार्थ जेव्हा सेबेस्टीयन प्रेक्षकांशी संवाद साधतो व तक्रार करतो की या नाटकात दिग्दर्शकानं त्याच्या भूमिकेत खूप काटछाट केली आहे. आपण दिग्दर्शकाबद्दल जाहीर तक्रारी करत आहोत हे लक्षात आल्यावर तो सावरून म्हणतो- ‘हो. आता जपून बोललं पाहिजे. नाही तर हा पठ्ठ्या पुढच्या नाटकात मला भूमिकाच देणार नाही’. या संवादावर नाट्यगृहात एकदम अंधार होतो. या प्रसंगाला प्रेक्षक प्रचंड हसतात.
हे नाटक तसं समूह नाटक आहे. यातील प्रत्येक पात्रानं त्याच्या त्याच्या भूमिकेला न्याय दिला आहे. तरीही खास उल्लेख करावा लागेल तो गीतांजली कुळकर्णी यांचा. त्यांनी सिझारीयो व व्हायोला या दोन भूमिका केल्या आहेत. सिझारीयोच्या वेशातील व्हायोलाला जेव्हा समजतं की, तिचं ज्याच्यावर प्रेम आहे त्या ड्युक ओर्सिनोचं मात्र लेडी ओलेव्हीयावर प्रेम आहे, तेव्हा तिला फार दुःख होतं. एवढंच नव्हे तर ओर्सिनो त्यालाच ओलेव्हीयाकडे प्रेमाची भीक मागायला पाठवतो, तेव्हा तर कहरच. या प्रसंगी गीतांजली कुळकर्णी यांनी अप्रतिम अभिनय केला आहे. आपल्याला प्रेम व्यक्त करता येत नाही, आपलं ज्याच्यावर प्रेम आहे तो दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात आहे, आपल्या प्रेमाला काही भविष्य आहे की नाही वगैरे निरनिराळ्या भावना गीतांजली कुळकर्णींनी समर्थपणे व्यक्त केल्या आहेत़. या सुखांतिकेतील हा एकमेव दुःखद प्रसंग, जो गीतांजली कुळकर्णी यांनी अतिशय उत्कटतेनं सादर केला आहे.
गीतांजली कुळकर्णी यांच्याप्रमाणे अमितोष नागपाल (सेबेस्टीयन), सागर देशमुख (ड्यूक ओर्सिनो), मानसी मुलतानी (लेडी व्हायोला), तृप्ती खामकर (लेडी व्हायोलाची नोकराणी), मंत्रमुग्ध वगैरे नटांनी या नाटकाचा परिणाम कमालीचा वाढवला आहे. मानसी मुलतानींनी तर काही प्रसंगात अफलातून अभिनय केला आहे. त्यांना गायनाचं अंग आहे, जे या भूमिकेसाठी गरजेचं आहे. विदूषक झालेल्या नेहा सराफांची देहबोली व संवादाची फेक केवळ अफलातून.
दिग्दर्शक अतुल कुमार यांनी पात्रांच्या हालचाली एवढ्या गतिमान ठेवल्या आहेत की, नाटकाला एक भन्नाट गती प्राप्त होते. नाटकात एक क्षणभरही प्रेक्षक मनातल्या मनात नाट्यगृहाच्या बाहेर जात नाही. शेक्सपियरच्या नाटकाला अतुल कुमार यांनी दिलेला नौटंकीचा (मराठीतील लोकनाट्यासारखा प्रकार) बाज वगैरेमुळे ‘पिया बहुरूपिया’ निख्खळ आनंद देणारा अनुभव ठरतो.
आमची पिढी लहान होती, तेव्हा दादा कोंडके यांचे ‘विच्छा माझी पुरी करा’ हे लोकनाट्य गाजत होतं. तेव्हा या नाटकाची लोकप्रियता गगनाला भिडली होती. मराठी रंगभूमीवरील चमत्कार असं ‘विच्छा’च्या प्रयोगांचं वर्णन केलं जात असे. ‘विच्छा’चे प्रयोग तुफान गर्दी खेचत. त्यासारख्या चैत्यनशील व पक्की संहिता नसलेल्या नाटकाचं समीक्षण करताना, तेव्हा नाट्यसमीक्षकांची कशी तारांबळ उडाली असेल, याची कल्पना मला ‘पिया बहुरूपिया’चं हे परीक्षण करताना आली. ‘पिया’च्या प्रयोगात एवढं चैतन्य भरलं आहे, त्यात प्रेक्षक न्हाऊन निघतो व तृप्त मनानं घरी जातो. याला शेक्सपियरची जबरदस्त संहिता जशी कारणीभूत आहे, तसंच दिग्दर्शक अतुल कुमार यांचं कल्पक दिग्दर्शनही कारणीभूत आहे. त्यांना त्यांच्या संघानं अप्रतिम साथ दिली आहे. नेहमी असं म्हटलं जातं की, जेव्हा एखादा दागिना छान दिसतो, तेव्हा पन्नास टक्के श्रेय सोन्याचं असतं, पण उरलेलं पन्नास टक्के श्रेय सोनाराचं असतं. सुमारे अडीच तास चालणारा हा प्रयोग कधी संपूच नये असं वाटत राहतं.
.............................................................................................................................................
‘मध्यमवर्ग- उभा, आडवा, तिरपा’ या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299
.............................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment