अजूनकाही
गुजरातच्या निवडणुकीनंतर 'रिसर्जन्ट काँग्रेस'बद्दल भरपूर बोललं आणि लिहिलं जातंय. म्हणजे ६२ च्या ८० झालेल्या जागा कोणाच्या जीवावर झाल्या? राहुल गांधींच्या मेहनतीच्या की हार्दिक, जिग्नेश आणि अल्पेशच्या करिष्म्याच्या? कि या दोन्ही फॅक्टर्सनी एकत्र आल्यानंतरही संघटन नसल्यामुळे विजय मिळू शकला नाही? कि मोदी ऐन भरात असताना त्यांच्या होम पिचवर जाऊन आपल्या जागा वाढवणं हीच मोठी गोष्ट आहे? त्यामुळे काँग्रेसला सुगीचे दिवस यायला सुरुवात होईल. या सगळ्या चर्चा सुरू आहेत. आणि यातल्या प्रत्येक मुद्द्यात काही तथ्यसुद्धा आहे.
पण, आता धुरळा बऱ्यापैकी खाली बसलेला असल्यामुळे एका गंभीर मुद्द्याला हात घालायला हवा.
२०१४ नंतर ढेपाळलेल्या काँग्रेसला या गुजरातच्या निवडणुकीने नवीन ऊर्जा दिलीय. काँग्रेसच्या कॅम्पेनचं नाव होतं 'नवसर्जन गुजरात'. १३३ वर्षांच्या जुन्या पक्षाला स्वतःच्याच नवसर्जनासाठी गुजरातमध्ये आत्मविश्वास मिळाला ही गोष्ट नक्की आहे. पण मुळात गुजरातचा सगळा प्रचार काँग्रेसनं rhetoric वर केला. म्हणजे, राहुल गांधींच्या ट्विटर अकाऊंटवरून मोदी, शहा, जेटली यांची खिल्ली उडवणारी catchy ट्विट्स खूप आली. त्यांना रिट्वीट्स वगैरे खूप मिळाली. मुख्य माध्यमांनीसुद्धा त्याची बऱ्यापैकी चर्चा केली. प्रचाराचा हा असा रोख ठेवणं साहजिक होतं, कारण २२ वर्षांच्या सत्तेला आव्हान देताना आणि 'विकास गांडो थयो छे'सारखं कॅम्पेन हवा करत असताना काँग्रेसला याच टोनवर येण्याचा मोह होणं साहजिक होतं. पण, त्यापलीकडे जाऊन काँग्रेसच्या हातात सत्ता आली तर ‘नवा गुजरात’ कसा असेल, हे मात्र काँग्रेसला फार परिणामकारकरित्या लोकांसमोर नेता आलं नाही, हे आता लक्षात येतंय.
भाजपच्या तथाकथित विकासाच्या आणि बहुसंख्याकवादी विद्वेषाच्या मॉडेलला सक्षम 'अल्टर्नेट नॅरेटिव्ह' देणं हे यापुढे काँग्रेससमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि एक प्रकारे काँग्रेसची ...१३३ वर्षांच्या पक्षाची आणि मध्यममार्गी, उदारमतवादी भारतीय विचारधारेच्या प्रमुख प्रवाहाची ती जबाबदारीसुद्धा आहे!!
राहुल गांधी यांनी बर्कले विद्यापीठात एक भाषण केलं, नंतर प्रश्नोत्तरं झाली. (हा व्हिडीओ यु ट्यूबसार उपलब्ध आहे.) या देशाचे प्रश्न, मग ते आर्थिक असोत, स्ट्रॅटेजिक असोत, सांस्कृतिक असोत, त्यांना तोंड देऊन देश कसा उभा करायचा, त्याबद्दल त्यांच्या काय कल्पना आहेत याची एक दिशा या भाषणात मिळते. गुजरात प्रचाराच्या निमित्तानं त्यांनी सुरत, राजकोट आणि अहमदाबादमध्ये घेतलेल्या व्यापारी, शिक्षक आणि तरुणांच्या टाऊन हॉल मिटिंग्जमध्ये ते काहीसे याबद्दल बोलतात. पण, आता हे पुरेसं नाही.
म्हणजे, राहुल गांधी छोट्या आणि मध्यम उद्योजकांना ताकद देण्याबाबत बोलतात, ते देशातील दारिद्र्यरेषेखालील लोकांना मध्यमवर्गात आणण्याची भाषा बोलतात, निम्न मध्यमवर्गात असलेल्या उद्यमशीलतेला संधी दिली पाहिजे अशी भूमिका घेतात, पण त्याचा ठोस आराखडा मात्र ठेवत नाहीत. गुजरात निवडणुकीचा प्रचार हा अशा प्रकारचा ठोस आराखडा लोकांसमोर आणायची संधी होता. पण तेव्हा ती हुकली, हे काँग्रेसनं लक्षात घ्यायला हवं.
गुजरात निवडणुकीनं काय दाखवलं? ग्रामीण भागात भाजप विरोधात प्रचंड उद्रेक आहे आणि शहरी भागात मात्र आजही सहानुभूती टिकून आहे. पण, इतकं ढोबळ बोलून चालणार नाही. आर्थिक पातळ्यांवर जो गरीब, निम्न मध्यमवर्ग आहे, तो प्रचंड अस्वस्थ आहे. मग तो शहरी असो किंवा ग्रामीण. शेतकरी असो किंवा शहरांत काम करणारा मजूर. २००० नंतर देशात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या मध्यम आणि उच्च मध्यमवर्गात मात्र अजूनही काँग्रेसबद्दल नाराजी आहे. त्यामुळे, मध्यमवर्गासहित समाजाच्या या तळाच्या वर्गाला त्याच्या आर्थिक उन्नतीबद्दल ठोस मार्ग दाखवणं, ही काँग्रेसची पुढची नीती असली पाहिजे.
खरं तर नरेंद्र मोदींनी हीच 'ग्रोथ ओरिएंटेड पॉलिटिक्स'ची भाषा करत सत्ता मिळवली होती. लोकांनी काँग्रेसच्या भोंगळ कारभाराला नाकारताना निव्वळ सक्षम वगैरे नेतृत्व बघून नाही, तर मोदींची विकासाची, समृद्धीची भाषा बघून मोदींना मतदान केलं होतं. पण भाजपची गाडी आता त्या रुळावरून पूर्णपणे घसरली आहे. मोदींची प्रचारातली भाषणं, योगी आदित्यनाथ ते उर्वरित तमाम हिंदुत्ववाद्यांनी गाठलेली पातळी, माध्यमांमधल्या एका मोठ्या गटाला हाताशी धरून चालवलेला प्रचार, हा सगळा प्रकार लोकांना समजत नाही, दिसत नाही असं नाही. यापुढे पाकिस्तान, राम मंदिर आणि गोरक्षा यांच्यापलीकडे भाजपची गाडी सरकणार नाही, हे एव्हाना 'भक्तां'च्यासुद्धा लक्षात आलंय.
अशा वेळी विद्वेषाचा हा माहोल संपवण्याची भाषा, प्रेम आणि सहभावाची भाषा राहुल गांधी करत आहेत, ही सामान्य भारतीय जनतेच्या दृष्टीनं आश्वासक गोष्ट आहे. एकेकाळी लालकृष्ण अडवाणी यांचे उजवे हात असणारे सुधींद्र कुलकर्णीसुद्धा त्यांच्या 'माझा कट्टा' मुलाखतीत हेच म्हणालेत. तेव्हा, यापुढे सामाजिक सौहार्द आणि सर्वसमावेशक विकास ही नि:संदिग्ध लाईन घेऊन पुढे जाणं हे राहुल गांधी यांचं कर्तव्य आहे.
काँग्रेसला या देशात निव्वळ धर्मनिरपेक्ष नाही, तर आर्थिक स्वावलंबनाच्या राजकारणाचा जुना आणि वैभवशाली इतिहास आहे. दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, नामदार गोपाळकृष्ण गोखले, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू अशी भारतीय अर्थकारणाबद्दल स्वतंत्र आणि ठोस भूमिका असणारी टोलेजंग नेतेमंडळींचा इतिहास काँग्रेसला आहे. काँग्रेस अध्यक्ष बनल्यानंतर राहुल गांधी यांनी या इतिहासाला साजेशी भूमिका घेणं अपेक्षित आहे.
आजपासून दीड वर्षावर म्हणजे १८ महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका (वेळेत झाल्या तर) होतील. पुढच्या १२ महिन्यांत ८ राज्यांच्या निवडणुका आहेत. यातल्या कुठल्या निवडणुकांच्या वेळी राहुल गांधी त्यांच्या आर्थिक आराखड्याबद्दल स्पष्ट कल्पना देशाला देतील? (म्हणजे ते ब्ल्यू प्रिंटवालं प्रेझेंटेशनच हवं असं नाही.) मध्यप्रदेशसहित ४ राज्यांच्या निवडणुका जेव्हा होतील, तेव्हा राहुल गांधी यांना आणि त्यांच्या पक्षाला हा देश नेमका कसा घडवायचा आहे हे कळू शकेल का? आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, रोजगार, आधुनिक तंत्र आणि अर्थव्यवस्था याबद्दल राहुल आणि काँग्रेसकडे नेमका काय स्वतंत्र अजेंडा आहे ते देशाला समजू शकेल का? स्मार्ट फोनवर जगाशी जोडल्या गेलेल्या भारताला हे जाणून घ्यायचे असेल.
लोकांनी नुसत्या हवेतल्या इमल्यांवर २०१४ ला मतं दिली. पण, २०१९ ला ते पुन्हा तशी चूक करणार नाहीत. आणि याचा अर्थ असाही नाही की, 'जुमलेबाजी'ला वैतागलेत म्हणून ते तुम्हाला जवळ करतील.
आधुनिक भारताची जबाबदारी पेलायची इच्छा असेल तर या भारतासमोर आता तुमचं व्हिजन स्पष्टपणे ठेवावं लागेल. त्या व्हिजनच्या अल्टर्नेट नॅरेटिव्हला उभं करावं लागेल. ढेपाळलेल्या पक्षाला उभं करण्याइतकंच हेही महत्त्वाचे आहे. टीव्हीच्या पडद्यात न दिसणारा भारत तुम्हाला प्रश्न विचारतो आहे- मिस्टर राहुल गांधी, नेशन वाँट्स टू नो, तुमचा अजेंडा काय?
.............................................................................................................................................
लेखक अमेय तिरोडकर 'द एशियन एज' या इंग्रजी वृत्तपत्राचे विशेष प्रतिनिधी आहेत
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
??????? ??
Fri , 29 December 2017
राहूल गांधींनी गुजरात निवडणूकीत हातपाय भरपूर मारले, पण जे काही थोडेफार यश काॅंग्रेसला मिळाले आहे त्यात हार्दिक, अल्पेश व जिग्नेश या HAJ त्रिकुटाने पुरवलेल्या कुबड्यांचा मोठा वाटा आहे. राहूल गांधी समस्येकडे बोट जरूर दाखवतात पण समस्येचे निराकरण करण्याचा उपाय त्यांच्याकडे नाही. पाटीदारांना ते आरक्षण कसे देणार यावर ते काहीच बोलत नाहीत, GST काय ते रद्द करणार होते का गुजरात इलेक्शन जिंकल्यावर ? त्यामुळे त्यांवरही त्यांच्यकडे काहीच उत्तर नाही. याउलट त्यांनी गुजरातला जातीजातीत विभागण्याच काॅंग्रेसचा जुना घाणेरडा खेळ परत खेळला. अर्थात, गुजरातची जनता सावध असल्याने हा डाव यशस्वी झाला नाही. खर म्हणजे, याइलेक्शनची सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल तर काॅग्रेसने मुसलमानांबद्दल चकार शद्बही काढला नाही. इनफॅक्ट राहूलजी हे जानवेधारी ब्राम्हण आहेत हे सांगायची वेळ काॅंग्रेसवर आली. म्हणजे एकेकाळी ज्यापक्षाने, शहाबानो प्रकरणात मुसलमानांचे लांगूलचालन केले होते त्यांना आपली भूमिका सोडून हिंदूत्वावर येउन निवडणूक लढवावी लागते. माझ्यामते काॅंग्रेसचा हा ३६० अंशातून भूमिकाबदलच बिजेपीसाठी मोठा विजय आहे...... माझ्यामते काॅंग्रेसला जर सत्तेत परतायचे असेल तर त्यांनी जातीय आरक्षण, मुस्लिम तुष्टिकरण यांचे घाणेरडे राजकारण बाजूला ठेवून केवळ विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.