अजूनकाही
१. अभेद्य सुरक्षाव्यवस्था भेदून मोदींना डासही चावू शकणार नाही : शिवसेनेचा टोला
शिवाय मित्रपक्षांनी आता माँ जगदंबेलाही साकडं घातलंय. आता फक्त सतत डोकं चावणाऱ्या मित्रपक्षांची डासांच्या चाव्यापेक्षा भयानक वाटणारी भुणभुण सोडली, तर मोदींना कसलाच धोका नाही, हे स्पष्टच आहे.
..........
२. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नव्याने निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी माझे चांगले सख्य आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
'आम्ही लहानपणापासूनचे घट्ट मित्र आहोत. मी अजूनही त्याला डोन्या-टोण्याच म्हणतो. मी चहा विकायचो, तेव्हा तो कप विसळायला मदत करायचा. एकाच शाखेत जायचो आम्ही. तो अमेरिकेचा अध्यक्ष बनावा, अशी माझी लहानपणापासूनची इच्छा होती…' हे भाषण मॅडिसन स्क्वेअरमध्ये ऐकायला कान आतुरले आहेत…
..........
३. केरळमधल्या एका चर्चने सर्वसामान्यांसाठी दानपेटी खुली केली असून 'दानपेटीतले सुटे पैसे घेऊन जा आणि शक्य होईल तेव्हा ते परत करा', असा उपक्रमच राबवला आहे.
देशातल्या सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांनी या चर्चचा कित्ता गिरवायला हवा. माणुसकीचा धर्म सगळ्यात मोठा असतो, याचं भान नसलेले धर्म आणि त्यांची भव्य मंदिरं यांचा भुईला भार करण्यापलीकडे उपयोग काय?
..........
४. नोटबंदीमुळे ईशान्य भारतात वस्तू विनिमय पद्धतीचं पुनरुज्जीवन, एक किलो माशांच्या बदल्यात तीन किलो डाळ.
बघा, दैनंदिन व्यवहारातही परस्परांमध्ये प्रेम वाढवण्याचा हा किती सुंदर मार्ग आहे. एकमेकां साह्य करून देश काळा पैसामुक्त करण्याचा सुपंथ धरण्याची ही केवढी मोठी संधी आहे. शिवाय आपल्या उज्ज्वल परंपरांचंही पुनरुज्जीवन होतंय. लवकरच आपण वल्कलं धारण करून कंदमुळंही खायला लागू.
..........
५. नोटबंदी जाहीर झाल्यापासून काश्मीरमध्ये एकदाही दगडफेक झालेली नाही : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर
काश्मीरमध्ये सगळे अतिरेकी आणि आंदोलक पाचशे रुपयाला दोन किलो आणि हजार रुपयांना पाच किलो रेटने दगड विकत घेत होते दगडफेकीसाठी. त्यांच्या या देशद्रोही उद्योगाला चांगलंच बूच बसलं आहे. गोवा आधी फेणीसाठी प्रसिद्ध होता, आता तर्री… सॉरी, पर्रीकरांसाठी प्रसिद्ध होणार, यात शंकाच नाही.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment