२०१७ हे वर्ष माझ्यासाठी संपूर्णपणे पुस्तकमय वर्ष होतं. वाचन आणि पुस्तकं जमवणं या दरम्यान ज्या विलक्षण अनुभवांना सामोरं गेलो, ते सगळेच्या सगळे अनुभव एकत्रित कुणासमोर मांडणं कठीणच आहे. पण तरी २०१७ मध्ये मी माझ्या असण्याची जी गुंतवणूक पुस्तकांमध्ये केलेय, त्याविषयी हे थोडं ठळकपणे.
प्रत्येक पुस्तक वाचल्यानंतर त्यावर व्यक्त होताच येतं असं नाही. आणि वाचलेल्या प्रत्येक पुस्तकावर व्यक्त व्हायलाच हवं असंही नाही. पण एखादं पुस्तक वाचत असताना एका विशिष्ट उताऱ्यात, वाक्यांत किंवा एकंदरीत पुस्तकाच्या सारांशरूपात काही मूलभूत विचार मुक्तता, नेणिवेची व्यापकता, अस्तित्वभानाची शक्यता अलगद सापडते. तर कधी पुस्तकाचं मुखपृष्ठ, पुस्तक बांधणी, कागद, छपाई, खास आवृत्ती, दुर्मिळ आवृत्ती अशा गोष्टीत ही पुस्तक केवळ वस्तू नसून सजीवता वाहणारी किमया आहे, या जाणीवेतून काही विशिष्ट आवेगात वाचता वाचता किंवा पुस्तक हाताळताना त्या पुस्तकाशी संबंधित किंवा एकूणच पुस्तकांसंदर्भात तीव्रपणे मनात कुठेतरी घुटमळत असतात. जेव्हा एखादं पुस्तक परीक्षण किंवा त्यावर समीक्षा किंवा रसग्रहणात्मक मांडणीतून विचार व्यक्त होणं कठीण जातं, तेव्हा मला शक्यतो वाचलेल्या किंवा सहज वाचनानंतर जोडविचार म्हणून आलेल्या मनातल्या गुंतागुंतीला पुस्तकांच्या नोंदींमधून मांडायला अधिक आनंद होतो. गेलं वर्षभर वाचलेल्या पुस्तकांवर व सहज सुचलेल्या काही नोंदी माझ्या डायरीत लिहीत होतो.
काही नोंदी.
१) ‘Bombay Modern : Arun kolatkar and bilingual literary culture’ हे अंजली नेर्लेकर यांचं पुस्तक दोन वेळा मधूनच उघडून एक-दोन मिनिटं जे मिळेल ते वाचून पुन्हा मिटून ठेवलं...
वाचलेलं असं... नेमका मागचा पुढचा संदर्भ माहिती नाही. वाचलं ते सरळ इथं देतोय.
Also during thise period, kolatkars interest in american jazz and blues peaked, and in 1973 he made some recordings of his own songs for avinash gupte to take to london to sell. Kolatkars passion for the blues and for bob dylan can be seen in the many songs he wrote and in poems like "Kay danger wara sutlay" ( "what a danger wind is bliwing"), which is clearly a take on dylans "blowin in the wind". The project of selling his songs did not succeed, and kolatkar never went back to this ambition again. But his interest in music continued. he had weekly 'bhajan' singing sessions with balwant bua, and he learned to play the pakhawaj from arjun shejwal. He also took several trips abroad for various festival of india events : he traveled to england, yogoslavia, germany, france, the united states and sweden between 1978 and 1987. (Page no. 137-138)
२ ) पुस्तकांचं जंगल असावं. ते असं असावं. त्यात पुस्तकांची झाडं असावीत. पुस्तकांच्या पायवाटा असाव्यात. पुस्तकांचे प्राणी-पक्षी असावेत. पुस्तकांचे झरे असावेत. पुस्तकांचा वारा असावा. पुस्तकांचे कीटक असावेत. पुस्तकांची घरटी असावीत. पुस्तकांची बीळं असावीत. पुस्तकांच्या गुहा असाव्यात. पुस्तकांची दलदल असावी. पुस्तकांची वनदेवी असावी. पुस्तकांचे जंगलात आवाज घुमावेत. त्या जंगलात पुस्तकांचा पाऊस पडावा. पुस्तकांची गाणी गाणारे आदिवासी असावेत. पुस्तकांच्या दगडावर बसून, एक गुराखी पुस्तकांचा पावा वाजवत असावा. त्याच्या खांद्यावर पुस्तकांची घोंगडी असावी. आणि या सगळ्यात एक पुस्तकांचं घर असावं. या सगळ्यांत मी भटकावं. त्यावेळी निदान मला पुस्तकांचे पाय असावेत.
.............................................................................................................................................
काही महत्त्वाच्या अशा निवडक मुलाखती वाचताना बऱ्याचदा अंतर्मुख झालो. मुलाखत हा प्रकार माझ्या आवडीचा. आवडत्या लेखकांच्या मुलाखती मी आवर्जून वाचतोच, पण कुणी अनोळखी पण जागतिक पातळीवरच्या महत्त्वाच्या लेखकाची मुलाखत सुचवली तर मी ती वाचतो. या वर्षातील वाचलेल्या मुलाखतींपैकी सर्वांत अधिक भावलेली मुलाखत म्हणजे मिलोराद पाविचची.
निखिलेश चित्रे यांच्यामुळे मला या लेखकाबद्दल कळलं. सर्बियन लेखक मिलोराद पाविच. येणारं २०१८ हे वर्ष पाविचच्या पुस्तक खरेदीनं सुरू करणार आहे. कारण निखिलेश चित्रे या लेखकाविषयी अधिक माहिती सांगताना लिहितात –“हजारो वर्षांत कादंबरीच्या लेखनप्रक्रियेत बदल होत गेले, मात्र वाचनप्रक्रिया तशीच राहिली, असं पाविचचं म्हणणं होतं. कादंबरी एखाद्या अनेक दरवाजे असलेल्या वास्तूसारखी असावी. तिच्यात वाचकाला हवा तिथून प्रवेश करता यावा आणि हवं तिथून बाहेर येता यावं असा त्याचा दृष्टिकोन होता. त्याची ‘डिक्शनरी ऑफ खजार्स’ ही कादंबरी दहाव्या शतकात काळ्या समुद्राच्या जवळ होऊन गेलेल्या खजार जमातीच्या शब्दकोशाच्या रूपात लिहिलेली आहे. तिच्या मेल आणि फीमेल अशा दोन आवृत्त्या आहेत. दोन्हींमध्ये केवळ एका परिच्छेदाचाच फरक आहे. ‘लँडस्केप पेन्टेड विथ् टी’ ही कादंबरी त्यानं शब्दकोड्याच्या फॉर्ममध्ये लिहिली. म्हणजे तिच्या प्रकरणांची नावं ‘एक आडवं’, ‘दोन उभं’ अशी आहेत. ‘युनिक आयटम’ या कादंबरीला शंभर वेगवेगळे शेवट आहेत. आणि शंभर प्रती आहेत. म्हणजे प्रत्येक वाचकाकडे खास त्याचा असा शेवट असणार.”
निखिलेश चित्रे यांच्याकडून ही अधिक माहिती मिळालीच, पण सोबत पाविचची एकमेव अशी उपलब्ध असणारी मुलाखत त्यांनी वाचण्यासाठी सुचवली. इंटरनेटवर ही मुलाखत A Conversation with Milorad Pavic By Thanassis Lallas या नावानं उपलब्ध आहे. मुलाखत वाचली तेव्हा भारावून गेलो. एका नितळ मनाच्या लेखकाची आरपार मुलाखत. कोणताही गर्व नाही. लिहिण्याचा प्रयत्न करताना स्वतःला लेखक म्हणवून घेणारे आजूबाजूला अनेक आहेत. आजकाल ‘लेखकराव’ होण्याची घाई अनेकांना असते. पण पाविचची मुलाखत वाचताना मला जाणवलं की, लेखक असणं म्हणजे नेमकं काय आणि त्यानं स्वतःला या जगासमोर कशा पद्धतीनं सादर करावं यातली गुंतागुंत फार सहजतेनं सोडवण्याजोगी नाहीये. त्यासाठी स्वतःला बाजूला ठेवता आलं पाहिजे आणि ‘सगळं’ होता आलं पाहिजे. पाविचच्या मुलाखतीमधला एक भाग इथं देतो. तो असा -
THANASSIS LALLAS : I was carefully observing you yesterday. Your reactions were like those of a child. You did not give me the impression that you are the most important Serbian writer at present.
MILORAD PAVIC´: The truth is that this is the way I feel. I try to see the world as if I see it for the first time. I try to forget all the books I’ve written in order to keep on living and writing.
TL : Do the books that you’ve written prevent you from continuing to write?
MP : If you do not forget the books you’ve already written, you cannot write new ones, because every new book is like returning to the beginning.
पाविचची मुलाखत प्रत्येक लिहित्या हातानं वाचावी. समजून घ्यावी. आणि इतरांना वाचण्यासाठी प्रवृत्त करावं. पाविच.
.............................................................................................................................................
काही पुस्तकं पीडीएफ स्वरूपात माझ्या मोबाईलमध्ये केव्हाची पडून आहेत. पीडीएफ फार महत्त्वाच्या पुस्तकांच्या आहेत. पण छापील स्वरूपात पुस्तकं वाचण्याची फार आवड आहे . पीडीएफ वाचायचा प्रयत्न केला तरी हवी तशी एकाग्रता मिळत नाही. म्हणून माझ्याकडे असणाऱ्या काही पीडीएफ स्वरूपातील पुस्तकांच्या प्रिंटस काढून, त्याला खास हार्डकव्हर बाइंडिंग करून घेतलं. बाइंडिंग करून घेण्याचं कारण हे असं असलं तरी मला भेटलेला बाइंडर अफलातून आहे. त्याची काम करण्याची कला फारच कलात्मक आहे. मी त्या बाइंडरवाल्या काकांना 'पुस्तकांचा डॉक्टर' म्हणतो. एखादं खूप महत्त्वाचं असलेलं पुस्तक सुस्थितीत नसेल म्हणजे भिजलं असेल, फाटलं असेल किंवा पूर्णपणे बांधणीच उसवलेली असेल तरी मी ते पुस्तक घेतो. अशा पुस्तकांचा कायापालट करणारा बाइंडर सापडला की, प्रत्येक पुस्तकप्रेमी निवांतपणे वाचायला मोकळा!
हार्डकव्हर पुस्तक बाइंडिंग करून घेतलेली काही पुस्तकं (पूर्वीचं रूप पीडीएफ)
कलप्पाची दुर्मिळ डायरी - संपादक : दया पवार
लोकराज्य (वाचन विशेषांक २०११)
Moment in Peking - Lin yutang
आपले वाङमय वृत्त (२०१२ ते २०१६ चे सगळे अंक)
.............................................................................................................................................
महागडी व दुर्मिळ अशी पुस्तकं स्वस्तात मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे रद्दीची दुकानं. एकवेळ शहरात भटकत असताना एखाद्या भागातील प्रसिद्ध रुचकर खाद्यपदार्थ मिळणारं दुकान टाळून पुढे जाता येईल, पण रद्दीचं दुकान मला टाळता येत नाही. ते दिसलं की आपोआप तिकडे पाय वळतात. प्रचंड घाईत असणारं शहरी मन आपोआप एखाद्या शांत गावासारखं संथ होतं. मग सुरू होते रद्दीच्या दुकानातील पुस्तकांत डोकावण्याची तळमळ. कित्येकदा काही मिळत नाही, तर एखाद्या वेळेस लवंगी फटाक्यांच्या दुकानात अणुबॉम्ब मिळावेत तसं काहीसं रोमांचक घडतं. मी साधीसुधी नोकरी करून अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करणारा पंचविशीतील विद्यार्थी. त्यामुळे खिसा बारमाही वाहता नसतो. तो वर्षांतील काही महिनेच पुस्तकांच्या दुकानासमोर वाहता ठेवता येतो. पण रद्दीची दुकानं यासाठी अपवाद असतात. खिशात एक शंभरची नोट असली तरी काम चालून जातं. कारण तिथं शंभर रुपयात ३०००-४००० हजाराचं पुस्तकं मिळून जातं. हो, तीन-चार हजाराचं, तर कधी त्याहून अधिक किमतीचं. २०१७ या वर्षात अशी काही पुस्तकं रद्दीच्या दुकानात मला मिळाली की, सहजासहजी त्यावर माझाही विश्वास बसला नाही.
Yours guru dutta - ५०४५ रुपये
The Partition Omnibus - ३९०० रुपये
Jhon osborne: Biography - ६४०० रु
Julie, or the New Heloise - ३२०० रुपये
Edgar Allan Poe Complete Tales and Poems – १३०० रुपये
वरील सर्व पुस्तकं अनुक्रमे १००, १२०, १०० आणि ८० रुपये इतक्या कमी किमतीत मिळाली. एक-दोन पुस्तकं सोडली तर बाकी सगळी नवी कोरी. आणि अजून एक धक्का असा ‘A CITY ICON – VICTORIA TERMINUS BOMBAY’ हे कॉफी टेबल आकाराचं पुस्तक दादरच्या एका रद्दीवाल्याकडे मिळालं. victoria terminus म्हणजेच सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारातील ब्रिटिशकालीन बांधकाम केलेल्या मनोहर अशा इमारती. त्यांची एकूणच आर्किटेक्चर प्रक्रिया व त्यांचे स्केच, त्यामागील मूळ संकल्पना असं सगळं या पुस्तकात आहे. अर्थातच खूपच स्वस्तात अशी महागडी दुर्मिळ पुस्तकं मिळत गेली. त्यामुळे खिशावर ताण आला नाही आणि जास्तीतजास्त पुस्तकं संग्रहात येत राहिली.
.............................................................................................................................................
२०१६ हे वर्ष संपेपर्यंत माझ्याकडे ३००- ४०० च्या आसपास काही पुस्तकं होती. पण २०१७ च्या सुरुवातीपासूनच झपाटल्यागत माझ्या बुकशेल्फमध्ये पुस्तकांची गर्दी वाढू लागली. जून महिन्यापर्यंत २००० च्या आसपास पुस्तकं जमा झाली. पुस्तकांनी दोन्ही बुकशेल्फ तुडुंब भरलेले असताना मनाच्या नाण्याच्या दोन बाजू मला भेडसावू लागल्या. एका बाजूला घरात पुस्तकांच्या येण्याला मी थांबवू शकत नव्हतो, तर दुसऱ्या बाजूला अपुऱ्या पडणाऱ्या जागेची चिंता. असं सगळं असताना त्यातून एक मार्ग काढला. गावी वाचनालय सुरू करण्याचा विचार आधीपासूनच माझ्या मनात होता, तो पुन्हा डोकावला. झालं, गावी वाचनालंय सुरू करण्याचं ठरवलं. माझ्या संग्रहातील दोनशे पुस्तकं मी गावी घेऊन गेलो. एक छोटीशी सुरुवात म्हणून, पण हीच सुरुवात मोठ्या विस्ताराने पुढे जाईल या हेतूनं. अनेक लेखक-कवी आणि पुस्तकप्रेमींनी गावच्या वाचनालयाच्या विस्तारासाठी आर्थिक व मानसिक पाठबळ दिलं. आता मला माझ्या ग्रंथसंग्रहाची काळजी नसते. कारण पुस्तकांची संख्या वाढू लागली की, काही सध्या संदर्भासाठी उपयुक्त नसलेली आणि वाचून झालेली पुस्तकं मी माझ्या गावच्या वाचनालयात विसर्जित करण्याचं ठरवलं आहे.
.............................................................................................................................................
वाचन, ते नेमकं कसं, किती व कोणत्या तऱ्हेनं झालं यावर विचार करू लागलो, तर मला Tim Parksच्या 'Where I'm Reading From' या पुस्तकाच्या नावाप्रमाणे विचार करावा लागतो. अनेकानेक गंभीर प्रश्नांना, सद्यस्थितीतील वाचनाच्या प्रक्रियांना, साहित्याच्या महत्त्वाच्या घडमोडींना आणि पुस्तकाच्या जगताला व्यापणाऱ्या कडू-गोड आठवणींना Tim Parksनं फार थेटपणे मांडलंय. या वर्षाचा शेवट या पुस्तकाच्या वाचनानं होतोय, याचा अधिक आनंद.
.............................................................................................................................................
‘आपले वाङमय वृत्त’ एप्रिल २०१६ च्या अंकातील प्रा. नीतीन रिंढे यांचा ‘पुस्तक प्रवासातल्या खाणाखुणा’ हा लेख मागच्या ऑक्टोबर महिन्यात वाचला होता. लेख प्रामुख्यानं गिरगावातल्या 'भारत बुक डेपो' (भा.बू.डे.) या पुस्तकांच्या दुकानाशी संबंधित आहे. भा.बू.डे.मध्ये मिळालेल्या काही दुर्मिळ पुस्तकांच्या आणि त्या पुस्तकांच्या संदर्भानं जोडल्या गेलेल्या इतर पुस्तकांच्या, लेखकांच्या उपयुक्त माहितीनं काठोकाठ भरलेला असा वाचनीय लेख आहे. लेख पहिल्यांदा वाचून संपवला, तेव्हा सगळी हातातील कामं सोडून भा.बू.डे.ला फेरफटका मारण्याची तीव्र इच्छा झाली होती. पुढच्या आठवड्यात... पुढच्या आठवड्यात... पुढच्या आठवड्यात... असं करत करत दोन महिन्यांनंतर या डिसेंबरच्या शेवटच्या (म्हणजे हे लिहीत असताना दोन-तीन दिवस आधीच) आठवड्यात भा.बू.डे. दुकानाच्या काऊंटरवर पोहचता आलं.
साधारण तीन वर्षांपूर्वी भा.बू.डे.त पुस्तकं चाळली होती, पण घेता आली नाहीत. तेव्हा काय घ्यायचं तेही ठाऊक नव्हतं. पण या दुसऱ्या खेपेस रिकाम्या हातानं जायचं नाही, या निर्धारानंच आलो होतो. कारण काहीतरी दुर्मिळ मिळतंच असं रिंढे यांच्या लेखामुळे मनात निर्माण झालं होतं. अर्धा- एक तास पुस्तकांचे गठ्ठे आलटून पालटून पाहिल्यावर मनासारखं एक पुस्तक सापडलं. पुस्तकाचं नाव 'संवाद’. प्रसिद्ध कन्नड साहित्यिक द. रा. बेंद्रे यांचं निवडक मराठी साहित्य (लेख आणि कविता). दा. गो. देशपांडे यांनी संपादित केलेलं हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनानं प्रथम १९६५ साली प्रकाशित केले होतं. आणि त्याच पहिल्या आवृतीचं पुस्तक माझ्यासमोर. मला फार आनंद झाला. कारण द. रा. बेंद्रे यांच्याविषयी खूप काही ऐकून होतो आणि त्यांच्या एकूणच साहित्यिक व्यक्तिमत्त्वाविषयी गेल्या तीन-चार वर्षांपासून माझ्या मनात आकर्षण वस्ती करून आहे. हे असं सगळं असूनही त्यांचं एकही पुस्तक मिळवण्याचा मी प्रयत्न केला नव्हता. हे माझं करंटेपण. असो. बेंद्रे यांनी बहुतेक लिखाण केलंय ते कन्नड भाषेतून. असं म्हटलं जातं की, मराठी भाषिकांना कानडीची (भाषेची) थोरवी द. रा.बेंद्रे यांच्यामुळेच अधिक कळाली. आणि महत्त्वाचं त्यांची मातृभाषा मराठी होती. त्यामुळे कधीकधी असाही प्रश्न सतावत असे की, बेंद्रे यांचं मातृभाषेतून त्यांनी स्वतः लिहिलेलं काही वाचायला मिळेल? आणि असं सगळं मनात असताना ‘संवाद’ हे पुस्तक माझ्या समोर.
पुस्तक चाळू लागलो. आतील पानांवर जेव्हा नजर फिरवली तेव्हा निराशच झालो. कारण कधीकाळी या पुस्तकात सिल्व्हर फिशनं वस्ती केली होती. सिल्व्हर फिशची वस्ती म्हणजे पुस्तकाची चाळणच. हा कृमि कीटक पुस्तकांच्या पानाला त्याच्या आकारमानानुसार आरपार भोक तयार करतो. असंख्य भोकं. ‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी’ या पुस्तकात अरुण टिकेकर या सिल्व्हर फिशविषयी लिहिलं आहे –“ग्रंथ ओलसर ठिकाणी राहणार नाहीत, याची खात्री करुन घ्यावी. ओल म्हणजे कृमिकीटकांना आमंत्रण. ते फार दाटीवाटीनं बुकशेल्फवर ठेवू नयेत, कारण सिल्व्हर फिशना जुना कागद फार आवडतो. एवढंच नव्हे तर कव्हरचा पुठ्ठा अन पुठ्ठ्यावरच्या कापडाला लावलेला डिंक वा सरस हे तर त्यांचं पक्वान्न. खरा वाचक जसा पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत ग्रंथ वाचतो, त्याप्रमाणं ते कव्हरपासून कव्हरपर्यंत भोक पाडत जातात. एका ग्रंथांतून दुसऱ्या ग्रंथांत शिरतात. दोन ग्रंथांमध्ये मध्ये अंतर असलं तर मात्र त्यांचं ‘वाचन’ म्हणजे भक्षण थांबतं.” (पान २६. )
दुकानाचे मालक आवटी यांना सिल्व्हर फिशच्या पराक्रमाविषयी सांगितलं, तर त्यांनी एक वेगळंच म्हणणं माझ्यासमोर ठेवलं. ते म्हणाले, ‘तुम्ही आता हे घेऊन जा. वाळवी काय किंवा या कृमि काय उष्टवलेलं खायला पुन्हा परत येत नाहीत.’ मी हे त्यांचं म्हणणं विश्वासानं ऐकलं (आणि विश्वास नसता बसला तरी ते पुस्तक घेणं भागच होतं माझ्यासाठी). पुस्तक घेऊन तिथून निघालो.
२०१७ मावळत असताना या वर्षातील माझी शेवटची पुस्तक खरिदी म्हणजे 'संवाद' हे पुस्तक.
.............................................................................................................................................
लेखक विजय बेंद्रे तरुण पुस्तक संग्राहक आहेत.
vjbendre46@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Chintamani M
Fri , 29 December 2017
काही लोकांना दिखावा करायची सवय असते. म्हणजे आपल्याकडे भरपूर पुस्तके आहेत म्हणजे आपण कोणितरी ग्रेट, हुशार असे काही लोकांना वाटते. त्यांना असे सांगावेसे वाटते की केवळ पुस्तके आणून ठेवल्याने कोणी हुशार होत नाही ( हां, लोकांवर इंप्रेशन मारता येते त्याने) तर ती पुस्तके वाचावी लागतात. कारण न वाचताच हुशारी आली असती तर सर्व रद्दीवाले भारतातील नावाजलेले स्काॅलर्स बनले असते. असो ...तर २००० पुस्तके असली कोणाकडे तर ती वाचायला निदान एका पुस्तकाला ३ दिवस या प्रमाणे ६००० दिवस तरी लागतील म्हणजे जवळजवळ १७ वर्षे.. म्हणजे कामधंदा सोडून पुस्तकच वाचणार का ?
Swati Patil
Fri , 29 December 2017
खुप सुंदर लेख.... पुस्तक वाचनासाठी अनेकानेक शुभेच्छा...