डिकोडिंग भाई 
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर 
  • सलमान खान
  • Wed , 27 December 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar सलमान खान Salman Khan

आज सलमान खानचा ५२वा वाढदिवस. सलमानबाबत कुणाची काहीही आणि कशीही मतं असली तरी त्याचे सिनेमे तुफान चालतात, त्याच्यावर भारतीय प्रेक्षक तितकंच तुफान प्रेम करतात. खरं स्टारडम भारतात कुणाच्या वाट्याला येत असेल तर ते सलमान खानच्याच. सलमान हा भारतीय सिनेजगतातला असा कल्ट आहे, ज्याचं कोडं भल्याभल्यांना उमगत नाही. त्या सलमानच्या व्यक्तिमत्त्वाचं डिकोडिंग करण्याचा हा एक प्रयत्न...

.............................................................................................................................................

पंतप्रधान मोदी आणि सलमान खान यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात बरीच साधर्म्य आहेत, असं विधान केलं तर मोदींचा ‘भक्तसंप्रदाय’ अंगावर येण्याची भरपूर शक्यता आहे. फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या अंगावर गाडी चढवणाऱ्या ‘फिल्मी’ हिरोची तुलना आमच्या लाडक्या नेत्याशी तुम्ही कशी करू शकता, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. पण असं विधान का केलं जावं, याची पुढील कारणमीमांसा त्यांनी आवर्जून वाचावी. मोदी आणि सलमान खान यांचं वैयक्तिक आयुष्य हे कायम पब्लिक स्कॅनरखाली राहिलं आहे. सलमानची विविध हाय प्रोफाइल प्रेमप्रकरणं माध्यमांमध्ये सतत झळकत असतात. मोदींचे राजकीय विरोधक कायम त्यांच्या जशोदाबेनसोबतच्या लग्नाचा विषय धगधगत ठेवून त्यांच्यावर टीका करत असतात. पण वयाच्या या टप्प्यावर वैयक्तिक आयुष्यात दोघंही एकटेच आहेत. भूतकाळात दोघांवरही अतिशय गंभीर आरोप झालेले आहेत आणि त्यातून बाहेर येण्यासाठी दोघांनाही कायदेशीर लढाई खेळावी लागली आहे. न्यायव्यवस्थेनं दोघांनाही गंभीर आरोपांतून क्लीन चिट दिली. पण दोघांच्याही समर्थकांना न्यायालयाच्या क्लीन चिटची गरज नव्हती. त्यांच्या नजरेत ते कायमच निर्दोष होते.

आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं साम्य. देशातला अभिजन वर्ग, जो स्वतःला मनातल्या मनात समाजाचा ओपिनियन मेकर मानतो आणि विकेंडला एकत्र जमून महागड्या स्कॉचचा ग्लास हातात घेऊन देशातल्या आदिवासी व दलितांच्या प्रश्नांवर ‘पोटतिडिकी’नं चर्चा करतो, त्याला मोदी आणि सलमान खान यांचं नेमकं काय करायचं हे अजून कळलेलं नाही. आपण या दोघांना तुच्छ लेखतो, टीका करतो, त्यांना हिणकस ठरवतो तरी जनमानसात यांची एवढी लोकप्रियता कशी आहे, याचं कोडं या बुद्धिजीवी लोकांना काही उलगडत नाही.

ल्यूटन्समध्ये उठबस असणाऱ्या अभिजन वर्गानं मोदी यांना, तर अगम्य सिनेमे दाखवण्यात येणाऱ्या फिल्म फेस्टिवलमध्ये राबता असणाऱ्या ‘क्राउड’नं सलमान खानला कायमच ‘आऊटसाइडर’ समजलं आहे. पण अभिजन वर्गाचा एवढा रोष असूनही मोदी निवडणुकीमागे निवडणुका जिंकत आहेत आणि सलमानचे सिनेमे दोनशे-तीनशे कोटींच्या क्लबात जाऊन बसतच आहेत. त्या अर्थानं हे दोघंही देशातल्या अभिजन वर्गाच्या सामान्य बहुसंख्य जनतेशी तुटलेल्या नाळेचं प्रतीक आहेत. सलमान आणि मोदी यांनाही या आपल्या बलस्थानांची चांगलीच जाणीव आहे. त्यामुळे या उच्चभ्रू अभिजन वर्गाला रिझवण्याचा प्रयत्न करण्यात दोघंही आपला वेळ वाया घालवत नाहीत. मोदींमधल्या चाणाक्ष राजकारण्यालाही सलमानच्या जनमानसावरच्या मोहिनीची जाणीव असावी. म्हणून सलमानवर गंभीर आरोप असूनही (त्यावेळेस त्याला क्लीन चिट मिळाली नव्हती), त्याच्यासोबत पतंग उडवण्याचा ‘कारनामा’ त्यांनी केला असावा. सलीम खान आणि सलमान खान यांचे मोदींशी अतिशय मधुर संबंध आहेतच. मोदी आणि सलमान यांच्या लोकप्रियतेला डिकोड करण्यात अपयशी ठरलेल्या बुद्धिजीवी वर्गाला सलमानच्याच सिनेमातला डॉयलॉग फिट बसतो -  ‘दिल में आते है , समझ में नहीं.’ 

नवाजुद्दीन सिद्दीकी एक बुद्धिमान नट तर आहेच, पण एक चांगला निरीक्षकपण आहे. त्यानं एका मुलाखतीमध्ये एक अतिशय चांगलं निरीक्षण मांडलं होत. तो असं म्हणाला की, ‘जगात तीन प्रकारचे नट आहेत. चांगले अभिनेते, वाईट अभिनेते आणि सलमान खान.’ ‘सलमान खान फेनॉमेना’चं इतकं चांगलं वर्णन यापूर्वी कुणी केलं नसेल! म्हणजे - एक पन्नाशीमधला नट, ज्याचा अभिनय सुमार ते बरा या दोन श्रेणींमध्ये घरंगळत असतो आणि हरणाच्या शिकारीपासून ते सदोष मनुष्यवधापर्यंत सर्व गुन्हे डोक्यावर असूनही, एरवी ‘बहिष्कारोत्सुक’ असणारा समाज त्याचे चित्रपट डोक्यावर घेतो. दस्तुरखुद्द पंतप्रधानपदाचा उमेदवार असणारा नेता सलमानसोबत पतंग उडवायला उत्सुक असतो, याचं स्पष्टीकरण एरवी कसं देता येणार?

याचं स्पष्टीकरण मिळवण्यासाठी सलमानच्या प्रचंड लोकप्रियतेचं सामाजिक-राजकीय विश्लेषण करायला हवं. त्याचा चाहतावर्ग नेमक्या कोणत्या सामाजिक वर्गातून येतो याचा धांडोळा घ्यायला हवा. मुख्य म्हणजे त्याचा पहिला सिनेमा कुठला, त्याचे हिट सिनेमे कुठले, आपटलेले सिनेमे कुठले या गुगलवर सहज उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या पुढे जाऊन त्याच्या कारकिर्दीचं विश्लेषण व्हायला हवं.

मला सलमान खानच्या लोकप्रियतेचं नेहमीच कोडं पडत आलं आहे. माझं लहानपण गेलं ते परभणीमध्ये. चित्रपटाच्या वितरणाच्या दृष्टीनं चित्रपट वितरकांनी या खंडप्राय देशाचे अकरा भाग केले आहेत. बॉम्बे सर्किट, दिल्ली सर्किट, इस्टर्न सर्किट, इस्टर्न पंजाब सर्किट, निजाम सर्किट, सी. पी. बेरार सर्किट, सेंट्रल इंडिया सर्किट, राजस्थान सर्किट, मायसोर सर्किट, तामिळनाडू सर्किट आणि आंध्र सर्किट असे ते अकरा भाग. पूर्वीच्या निजाम राजवटीचा भाग निजाम सर्किटमध्ये येतो. आमचं परभणी त्यातच येतं.

हे निजाम सर्किट म्हणजे सलमान खानचा बालेकिल्ला. म्हणजे देओल घराण्यासाठी जे महत्त्व पंजाब सर्किटला आहे, किंवा शाहरुखसाठी जे महत्त्व एनआरआय मार्केटचं आहे  तेच सलमानसाठी निजाम सर्किटचं महत्त्व आहे. या निजाम सर्किटमधल्या प्रेक्षकांमध्ये सलमान खानचं जे वेड आहे, ते शब्दांत बसण्यासारखं नाही. काही भाग वगळता अजूनही या सर्किटमध्ये मल्टिप्लेक्सचं प्रस्थ एवढं नाहीये. सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांच्या तिकीट खिडक्यांवर अजूनही त्यांच्या लाडक्या 'भाई’च्या नावानं ‘हाऊसफुल’चा बोर्ड लागतो. ‘चित्रपट बनवणं हे एक टीमवर्क आहे’, ‘चित्रपट हे समाजाभिमुख हवेत’, वगैरे नियम निजाम सर्किटच्या हद्दीबाहेरच मान टाकून पडले आहेत. ‘भाई की फिल्लम है. देखनी है. बस!’ सलमानचे उर्वरित देशात फ्लॉप झालेले चित्रपटही इथं चांगला गल्ला जमवतात. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना ‘रिकव्हरी’ होण्यास मदत होते. निर्माते खुश, प्रेक्षक खुश, भाई खुश. असा सगळा हा राजखुषीचा मामला आहे. 

सलमान खानवर बऱ्याच बाबतींमध्ये टीका होत असली तरी एका बाबतीत त्याला श्रेय द्यावं लागतं. त्यानं आणि पूर्ण खान परिवारानं आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपली आहे. खान मंडळी जिथं राहतात, त्या ‘गॅलेक्सी’ बिल्डिंगमध्ये दरवर्षी नित्यनेमानं गणपती बसवला जातो. वाजतगाजत गणपती आणला जातो. सलीम खान यांनी मागे एकदा जाहीरपणे मुस्लिमांनी ‘वंदे मातरम’ला विरोध करू नये, अशी भूमिका घेतली होती. अरबाज खान आणि सोहेल खान यांच्या पत्नी अनुक्रमे ख्रिश्चन आणि हिंदू आहेत. त्यापैकी अरबाजचा नुकताच घटस्फोट झाला. अर्पिता नावाच्या एका अनाथ हिंदू मुलीला खान घराण्यानं दत्तक घेतलं आणि तिला पोटच्या मुलीसारखं वाढवलं. पण कितीही धर्मनिरपेक्ष प्रतिमा असली तर सलमानचा जो ‘लार्जर दॅन लाईफ’ पर्सोना आहे, त्याला एक हलकासा मुस्लिम ‘अंडरकरण्ट’ आहेच.

सलमानला हल्ली सगळेच ‘भाई’ म्हणत असले तरी त्याला हे संबोधन त्याच्या घरच्यांच्या खालोखाल भारतीय मुस्लिम समुदायानं बहाल केलेलं आहे. सलमानलाही मुस्लिम समाजात असणाऱ्या आपल्या क्रेझची पुरेपूर जाणीव आहे. त्यांना खुश ठेवण्यासाठी सलमान काही प्रतीकात्मक गोष्टी सातत्यानं करत असतो. दरवर्षी ‘ईद’चा स्लॉट हा सलमानच्या चित्रपटांसाठी अलिखितपणे आरक्षित असतो. आणि त्या काळात इतर कोणताही सुपरस्टार किंवा निर्माता आपला चित्रपट प्रदर्शित करण्यास धजावत नाही. कारण भाईसमोर चित्रपट प्रदर्शित करून नुकसान कोण करून घेणार?

सलमान हातात जे ब्रेसलेट घालतो (ज्याला फिरोजा म्हणतात) त्याचं आकर्षणही मुस्लिम समाजात आहे. सलमानचं गोल जाळीदार टोपीवर सलाम करतानाचं पोस्टर मुस्लिम घराघरांत दिसतं. विशेष गोष्ट म्हणजे सलमानचा हा भारतीय मुस्लिम समाजाशी जो कनेक्ट आहे, त्यात धर्माचे ठेकेदार असणाऱ्या मुस्लिम मुल्ला-मौलवींना कुठलंही स्थान नाही. हे मुल्ला-मौलवी सतत सलमानविरुद्ध फतवे काढत असतात. तो घरी गणपती बसवतो, त्यावेळेस तर हमखास सलमान विरुद्ध फर्मान निघतात. 

मध्यंतरी मोदींसोबत सलमाननं ‘पतंगबाजी’ केली, तेव्हा त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाका, असं आव्हान मुल्ला-मौलवींनी केलं होत. पण त्यांनी कितीही आदळआपट केली तरी सर्वसामान्य मुस्लिम तितक्याच उत्साहानं सलमानच्या चित्रपटांना गर्दी करतो. पण कुठल्याही भारतीय अभिनेत्याप्रमाणे सलमान मुस्लिम समाजातल्या तिहेरी तलाकसारख्या अनिष्ट प्रथांबद्दल बोलतोय असं चित्र कधी दिसत नाही. आपण कितीही मोठे सुपरस्टार असलो तरी आपल्या मर्यादा काय आहेत, हे सलमानला कळत असावं. सुपरस्टारनं एखादे राजकीय-सामाजिक-धार्मिक मुद्द्यावर मत मांडलं तर ते पचवण्याइतका आपला समाज अजून प्रगल्भ आहे का, हाही मुद्दा आहेच. 

सलमान खान स्वतः राजकारणात सक्रिय नसला तरी सलमानचा जो ‘कल्ट’ आहे, त्याला एक राजकीय बाजूही आहे. सलमानचे मित्र सर्व राजकीय पक्षांमध्ये आहेत. सलमान आपल्या सगळ्या राजकीय मित्रांसाठी निवडणूक प्रचारही करतो. नुकतेच अर्पिताचे (सलमानची बहीण) सासरे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाले. सलमान मुंबईत जिथं राहतो, त्या भागात तो काँग्रेसच्या बाबा सिद्दिकींचा प्रचार करतो. मागच्या निवडणुकीला बाबा सिद्दिकींचा पराभव करून तिथं भाजपचे आशिष शेलार निवडून आले. राजकीय कारणांमुळे स्थानिक भाजप नेते सलमान खानवर खार खाऊन असतात. पण भाईच्या डोक्यावर दिल्लीतून दस्तुरखुद्द ‘मोटा भाई’चा हात असल्यानं त्यांना त्याविरुद्ध काही करता येत नसावं. मागे सलीम खान यांनी एका मुलाखतीमध्ये स्थानिक भाजप नेत्यांचा आमच्याविरुद्ध ‘अजेंडा’ आहे असा जाहीर आरोप करून खळबळ माजवली होती. उत्तर प्रदेशमधल्या काही जागांवर सलमाननं काँग्रेसचा तर हिमाचलमध्ये काही जागांवर भाजपचा प्रचार केला होता. 

या झाल्या सलमान कल्टच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि आर्थिक बाजू. आता माझ्या सलमान प्रेमाची वैयक्तिक बाजू सांगायला हरकत नाही. मी स्वतः डाय हार्ड सलमान फॅन आहे. मी सहसा त्याचे सिनेमे चुकवत नाही. मी चित्रपट समीक्षक असल्यानं आणि अनुराग कश्यपसोबत काम करत असल्यानं अनेक लोकांना हे विरोधाभासी वाटतं. सलमानचे सिनेमे आवडणं हे काही चांगल्या समीक्षकाचं लक्षण मानलं जात नाही. सलमानचे सिनेमे आवडतात म्हणजे या माणसाच्या आयक्यूमध्ये काहीतरी गडबड आहे, असा निष्कर्ष काढून काहीजण मोकळे होत असतील. पण मला स्वतःला कुठलाही सिनेमा किंवा स्टार हिणकस आहे, असं वैयक्तिकदृष्ट्या वाटत नाही. एखादा सिनेमा /स्टार आवडणं-न आवडणं वेगळं आणि त्याला पूर्णपणे टाकाऊ समजणं वेगळं. प्रत्येक कलाकृतीचा किंवा अभिनेत्याचा स्वतःचा एक राजकीय-सामाजिक रेलेव्हन्स असतो. आपल्या वर्तुळाच्या बाहेर असणाऱ्या समाजाच्या किंवा लोकांच्या अभिरुचीला हिणकस समजणं हे फारस योग्य नाही. आमची अभिरुची श्रेष्ठ आणि तुमची हिणकस असं समजणं बहुतेक पोस्ट मॉडर्न नवीन कपडे ल्यायलेला वर्णवाद असावा.

राहता राहिला अनुराग कश्यपचा प्रश्न. ‘गँग्ज ऑफ वासेपूर’मध्ये फैजलच्या पात्राच्या वागण्या-बोलण्यावर सत्तरच्या दशकामधल्या बच्चनचा प्रचंड प्रभाव आहे. परपेंडीक्युलरच्या पात्रावर संजय दत्तचा इन्फ्लुएन्स आहे. मोहनिसाचं फॅशन स्टेटमेंट पात्र माधुरी दीक्षितसारखं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेफिनाईटचं पात्र हूबेहूब सलमानची नक्कल मारतं. अगदी ‘तेरे नाम’ हेयर कट सकट. आय रेस्ट माय केस. 

.............................................................................................................................................

‘मध्यमवर्ग- उभा, आडवा, तिरपा’ या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

.............................................................................................................................................

लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......