टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • हरिभाऊ बागडे, नरेंद्र मोदी, हंसराज अहिर आणि अनंतकुमार हेगडे
  • Wed , 27 December 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya हरिभाऊ बागडे Haribhau Bagde हंसराज अहिर Hansraj Ahir अनंतकुमार हेगडे Anant Kumar Hegde नरेंद्र मोदी Narendra Modi

१. स्वतःला सेक्युलर, धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्यांना त्यांचे आई-बाप कोण हेदेखील ठाऊक नसते, असं वक्तव्य आता केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलं आहे. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेण्यापेक्षा धर्म आणि जातीच्या आधारावरच लोकांनी स्वतःची ओळख निर्माण करावी असंही ते म्हणाले. कोप्पल जिल्ह्यातील यलबुर्गा या ठिकाणी झालेल्या ब्राह्मण परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं. अशा प्रकारे ओळख करून दिल्यानं आत्मसन्मान प्रस्थापित होतो. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवाणाऱ्या माणसांमुळेच समस्या निर्माण होतात, असाही आरोप त्यांनी केला.

सरपंचकीचाही वकूब नसलेल्यांना कधीकधी केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागते आणि मग ते आपल्या तथाकथित जाती आणि धर्माच्या ओळखीलाही लाज आणेल, अशी वक्तव्यं करतात. आपण, अमुक एका जाती आणि धर्मात जन्म घेतो, यात जिचा अभिमान बाळगावा अशी आपली नेमकी काय कर्तबगारी असते, हे हेगडे यांनाच माहीत! अभिनेता प्रकाश राज यानं हेगडे यांनी खालची पातळी गाठल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. तो मात्र तथ्यहीन आहे. हेगडे हे मुळात ज्या पातळीवर आहेत, त्याहून खालची पातळी संभवत नाही.

.............................................................................................................................................

२. मी रुग्णालयात येणार हे माहिती असूनदेखील डॉक्टर रजेवर जातात. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावं, आम्ही त्यांना गोळ्या घालून ठार मारू, असं वादग्रस्त विधान केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केलं आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरच्या सरकारी रुग्णालयात अहीर यांच्या हस्ते अमृत दीनद्याल मेडिकल स्टोअरचं उद्घाटन झालं. या दुकानात रुग्णांना २४ तास स्वस्त दरात औषधं मिळू शकतील. या दिवशी रुग्णालयातील डॉक्टर रजेवर होते. मी जनतेनं निवडून दिलेला खासदार असून मी केंद्रीय राज्यमंत्रीपदावर आहे. मी इथं येणार हे माहीत असूनही डॉक्टर रजेवर कसे जाऊ शकतात, असा सवाल त्यांनी केला.

हेही सरपंच क्रमांक दोन. लोकशाहीचे अनेक फायदे असतात, त्याचप्रमाणे काही तोटे असतात, त्यातला हा एक तोटा. हे सद्गृहस्थ हॉस्पिटलमध्ये येणार म्हणून डॉक्टर हजर राहिले नाहीत, तर त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, हे तर्कट अदभुत आहे. शिवाय, हे काका नक्षलवाद्यांना गोळ्या घालतात, म्हणजे काय, तर नक्षलवाद्यांच्याच वयाच्या जवानांना तिकडे या जोखमीच्या कामाला पाठवतात. माणूस नक्षलवादी बनतो, तेव्हा तो गोळ्या घालायला नक्षलवादी बनतो, गोळ्या खायला बनत नाही, हेही यांना माहिती नाही का? बाकी, अटलबिहारींच्या वाढदिवशी उघडल्या जाणाऱ्या दुकानालाही दीनदयाळांचंच नाव आहे, हे विलक्षण!

.............................................................................................................................................

३. पूर्वी भाजपमध्ये प्रवेश देताना खूप काळजी घेतली जात होती. आता ज्यांच्यामुळे पक्ष बदनाम होतो, अशा लोकांना पक्षात घेतलं जात आहे, अशी खंत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बोलून दाखवली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बागडे म्हणाले, पूर्वी पक्षातर्फे कोणत्याही निवडणुकीला उमेदवारी देताना किंवा पक्षात प्रवेश देताना विविध माध्यमातून चौकशी केली जात होती. काळानुरूप फार बदल होत गेले. अनेक जुने व निष्ठावान कार्यकर्ते दुर्लक्षित राहिले आहेत. भाजपचा आज वटवृक्ष झाला, मात्र ज्यांनी खतपाणी घालून तो वाढवला त्यांच्याकडे म्हणावं तेवढं लक्ष दिलं जात नाही. आता पक्षात फक्त खुनाचा गुन्हा असलेला आणि मनोरुग्ण सोडले, तर कोणालाही प्रवेश दिला जातो, असे ते म्हणाले.

अंहंहं! गैरसमज नको. मनोरुग्ण आणि खुनाचा गुन्हा असलेले नकोत, हे फक्त कोणालाही बाहेरून प्रवेश देतानाचे हे निकष आहेत. जे आधीपासून पक्षात आहेत, त्यांच्यासाठी ही पात्रता अट नाही. ते जुने आणि योग्य ठिकाणी निष्ठा वाहिलेले कार्यकर्ते असतात, हे अधिक महत्त्वाचं मानलं जातं, हे पक्षातल्या अनेकांकडे पाहून कळतंच की! शिवाय ‘बदनाम सही, सत्ता कमाने का काम तो हुआ’, हा भाजपचा सध्याचा फंडा आहे.

.............................................................................................................................................

४. नोएडामध्ये उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री आल्यास त्याची खुर्ची जाते, असा एक भ्रम आहे. पण आदित्यनाथ यांनी इथं येऊन हा भ्रमाचा भोपळा फोडला, असं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आदित्यनाथांच्या कपड्यांकडे बघून ते फार कर्मठ विचारांचे आहेत असं वाटतं. पण त्यांचे विचार आधुनिक आहेत. उत्तर प्रदेशाचा मुख्यमंत्री नोएडात येत नाही, असा एक समज तयार झाला होता. पण याला आदित्यनाथ छेद दिला, त्याद्दल त्यांचं अभिनंदन करतो, असं मोदी म्हणाले. जुनाट प्रथांमध्ये अडकणाऱ्या समाजाची प्रगती कधीच होत नाही, असंही मोदी म्हणाले.

राजकारणाची हीच खरी गंमत आहे. कोण, कशावर, काय बोलेल हे सांगता येत नाही. जुनाट प्रथांमध्ये अडकण्यावर भाजपचे पंतप्रधान भाष्य करतायत, असा सुदिन पाहण्याची कल्पनाही कधी केली नसेल या देशाच्या नागरिकांनी. आता आदित्यनाथांनी अंधश्रद्धेच्या भ्रमाचा भोपळा फोडला आहे, हा भ्रमाचा भोपळा खुद्द पंतप्रधानांनीच निर्माण केला आहे... तो तेच फोडूही शकतात, हे लक्षात ठेवलेलं बरं.

​​​​​​​.............................................................................................................................................

५. पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा पाकिस्ताननं कोठडीत छळ केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जाधव यांच्या कान आणि डोक्यावर जखमांचे व्रण दिसत असल्यानं त्यांचा छळ झाल्याची शक्यता अधिक बळावली आहे. दरम्यान, जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट परराष्ट्र मंत्रालयातील कार्यालयात झालीच नाही, एका शिपिंग कंटेनरमध्ये ही भेट घडवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कुलभूषण जाधव यांना सोमवारी त्यांच्या आई आणि पत्नी भेटल्या. ही भेट म्हणजे केवळ पाकिस्ताननं केलेला फार्स ठरला आहे. जाधव आणि त्यांच्या आई-पत्नी यांच्यात एक काचेची भिंत होती. त्यांच्यात फोनवरून संभाषण झालं. जाधव यांच्या उजव्या कानावर गडद रंगाचे व्रण दिसत आहेत. त्यांच्या डोकं आणि गळ्यावरही काही व्रण आहेत. त्यामुळे जाधव यांचा पाकिस्ताननं छळ केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जाधव यांना पाकिस्तानात हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे, याचा आपल्याकडे जबाबदार प्रसारमाध्यमांनाही विसर पडलेला दिसतो. अशा आरोपीची त्याच्या कुटुंबियांबरोबर भेट होऊ दिली गेली, हेच खूप असताना ती कुठे झाली, यावरून काथ्याकूट करणं हे अपरिपक्वतेचं लक्षण आहे. जाधव यांची सुटका करण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, तिथं हे असले भावुक फंडे उपयोगाचे नाहीत.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......