अजूनकाही
रिमोटशी चाळा करता करता अचानक एका मराठी वृत्तवाहिनीच्या पडद्यावर पांढऱ्या शुभ्र गायी आणि भाकड गायी असा शब्द ऐकला आणि रिमोटवरचा हात थांबला. सध्या गाय, भाकड गाय म्हटलं, ऐकलं की, गोष्टीरूप गरीब गाय न आठवता राष्ट्रवादी गोरक्षक, हिंसक गोवंश संरक्षक वगैरेच आठवतात. पण इथं असलं काही नव्हतं. होतं ते प्रेरक अनुकरणीय, सुजलाम सुफलाम असं.
‘New18 लोकमत’ या वृत्तवाहिनीवरील ‘अन्नदाता’ या कार्यक्रमाबद्दल बोलतोय. ती एका कर्जग्रस्त शेतकऱ्याची, कर्जमुक्त होऊन सध्या अतिरिक्त कमाई दाखवणारी कहाणी होती. शेतकरी स्वत:च सगळं सांगत होता. वाहिनीचा कुणी वार्ताहर मुलाखत घेत नव्हता. प्रश्नोत्तरं नव्हती. फक्त दृश्यमाध्यमात ज्याला v\o म्हणजे व्हॉइस ओव्हर म्हणतात, तसा निवेदकाचा आवाज होता. पण तोही वस्तुस्थिती सांगणरा, पूरक माहिती जोडणारा. त्यात कुठेही प्रश्न, प्रतिप्रश्न, शंका, कुतूहल असं काहीच नव्हतं. संपूर्ण कार्यक्रम बघितला आणि त्या शेतकऱ्याला सलामच केला. त्याची यशोगाथा मनात रेंगाळत राहिली.
पण नंतर काही प्रश्न पडले. काही शंका मनात आल्या. यशोगाथा तुकड्या तुकड्यात आठवत होती. दिवसभर इतकी चॅनेल्स सर्फिंग करतो, त्यामुळे सुरुवातीला कुठल्या वाहिनीवर तो कार्यक्रम पाहिला तेच आठवेना. तिन्ही मराठी वृत्तवाहिन्यांची अॅप्स धुंडाळली. शेवटी ‘New18 लोकमत’ व ‘अन्नदाता’ असं धूसर आठवलं.
‘अन्नदाता’ आठवलं कारण जेव्हा ई-टीव्ही मराठी २००० साली सुरू झालं, तेव्हा त्यावर सकाळी साडेसहा वाजता ‘अन्नदाता’ हा १५-२० मिनिटांचा कार्यक्रम सादर केला जाई. शेतीविषयक हा कार्यक्रम त्यावेळी पुण्या-मुंबईच्या मालिका लेखक\दिग्दर्शकांना ज्ञानदीपसारखा वाटे. ई-टीव्हीच्या तेलुगू वाहिनीवर तो लोकप्रिय होता. ई-टीव्हीचे सर्वेसर्वा रामोजी राव यांना शेती, शेतकरी यांबद्दल आस्था. त्यामुळे ‘अन्नदाता’ चालूच राहिला.
विषयांतर बाजूला ठेवून मूळ मुद्द्याकडे परत येऊया. तर शेवटी स्मरणशक्तीला ताण देऊन ‘New18 लोकमत’ व ‘अन्नदाता’ या शब्दसमूहासह यू ट्यूबवर खोदकाम केलं आणि चक्क पूर्ण एपिसोडच हाती लागला. त्यामुळे सगळ्यालाच एक भक्कम आधार मिळाला.
‘New18 लोकमत’च्या ‘अन्नदाता’ या कार्यक्रमात १९ डिसेंबर रोजी प्रक्षेपित झालेला हा वृतान्त आता यू ट्यूबवर उपलब्ध आहे.
कार्यक्रमाची सुरुवात करतानाच निवेदक एक महत्त्वपूर्ण माहिती देतो. निवेदक सांगतो, भाकड देशी गायी या शेतकऱ्याला परवडणाऱ्या नसतात असा एक सर्वसाधारण समज आहे. आणि यामुळेच या भाकड देशी गायी कसायांना विकण्याची परवानगी शासनानं द्यावी अशी मागणी दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांनी केली होती. पण त्यांची ही मागणी कशी चुकीची आहे, हे त्यांच्याच एका कार्यकर्त्यानं सोदाहरण सिद्ध करून तो आता या भाकड देशी गायींपासून वर्षाला ५० हजारावर उत्पन्न घेत आहे.
परमेश्वर तळेकर यांच्या म्हणण्यानुसार २५ वर्षं ते रासायनिक व जैविक शेती करत होते. व त्यांच्यावर पाच लाखांचं कर्ज होतं. त्यावेळी ते शेतकरी संघटनेचंही काम करत होते. (आजही त्यांच्या छातीवर शेतकरी संघचनेता बिल्ला लावलेला असतो.) पण कर्ज फिटत नव्हतं, की उत्पन्न वाढत नव्हतं. मग त्यांनी मार्ग बदलायचं ठरवलं आणि त्यांनी नैसिर्गिक शेतीतज्ज्ञ सुभाष पाळेकर यांच्या शिबिरात प्रशिक्षण घेतलं. पाळेकरांनी परमेश्वर यांच्या छातीवरचा शेतकरी संघटनेचा बिल्ला पाहून त्यांना विचारलं होतं की, तुमचा नेता तर भाकड गायी उपयोगाच्या नाही म्हणतो. मग तुम्ही कसं काय नैसर्गिक शेतीचा अंगीकार करणार? परमेश्वर तळेकर त्यांना म्हणाले, ‘मला अनुभव नाही. अनुभव घेऊ द्या, नंतर मी यावर बोलेन.’
यानंतर परमेश्वर यांनी काही भाकड गायी विकत घेतल्या आणि त्यांच्याकडे असलेल्या साडेतीन एकरात त्यांनी नैसर्गिक शेतीचा अंगीकार करत भाकड गायींच्या शेण व गोमूत्रावर प्रथम झेंडू, मग उस व त्यानंतर ज्वारीचं पीक घेतलं. त्यातून साधारण वार्षिक लाखभराचं उत्पन्न मिळालं. याशिवाय भाजीपाला लागवडीतून रोजच्या भाजीपाल्याचा प्रश्न मिटवला.
यानंतर त्यांनी राजीव दीक्षितांची जीवन पद्धती व आयुर्वेदिक उपचार पद्धती शिकून घेतली. त्यांना स्वत:ला अॅसिडिटीचा प्रचंड त्रास होता. आणि पुढे त्यांना ब्लड कॅन्सरही झाला. मात्र दिक्षितांपासून प्रेरणा घेत गायीच्या गोमूत्रापासून त्यांनी औषधं बनवून ती घेतली. ज्यामुळे त्यांचा ब्लड कॅन्सर पूर्ण बरा झाला.
पुढे ते सांगतात ते सुहास पाटील नावाच्या गृहस्थांना भेटले. आणि देशी गोवंश जतन करून शेण व गोमूत्रापासून त्यांनी प्रथम दंतमंजन तयार केलं. त्यानंतर साबण तयार केला. आज शॅम्पूसह जवळपास १० उत्पादनं ते या शेण व गोमूत्रापासून तयार करतात. त्यांनी पंचक्रोशीतच या उत्पादनांची विक्री करायला सुरुवात केली. आज त्यांची विक्री ६०-७० हजारांची होते व २० हजार खर्च वजा जाता त्यांना ५० हजार निव्वळ नफा होतो.
हा स्वानुभव घेऊन त्यांनी शरद जोशींना उत्तर दिलं की, देशी भाकड गाय ही शेतकऱ्यावर बोजा नाही, तर ती शेतकऱ्याला दरमहा कमीत कमी १० हजार व जास्तीत जास्त ५० हजार उत्पन्न देऊ शकते.
सध्या शेतकऱ्यांचा कल हा गीर जातीच्या गायी घेऊन बक्कळ दूध मिळवण्याकडे जास्त आहे. त्यामुळे देशी खिलारी गायीला तो विसरून गेलाय, तिला भाकड समजतो.
पण परमेश्वर यांनी याच देशी खिलारी, भाकड गायींपासून साडेतीन एकरात वार्षिक चार लाख निव्वळ नफा शेती, शेण व गोमूत्रापासूनची उत्पादनं यातून मिळवलाय. अवघ्या दोन वर्षात त्यांनी त्यांचं पाच लाखांचं कर्ज फेडलंय.
आज त्यांच्याकडे १० भाकड गायी, पाच दुभत्या गायी व पाच-सहा वासरं आहेत. यातून त्यांना दररोज पाच-सात लिटर दूध, तूप आणि १० किलो शेण व पाच लिटर गोमूत्र मिळतं. महिन्याकाठी १५० किलो शेण व ५० लिटर गोमूत्र मिळतं.
पाच लाखांचं कर्ज फेडून त्यांनी आता पाच लाखांचा गोठा बांधलाय. शिवाय कुटुंबातल्या पाच-सात जणांना घरबसल्या रोजगार मिळालाय. नैसर्गिक शेतीत खर्च शून्य व उत्पन्न लाखात!
यशोगाथा इथंच संपत नाही. गायीच्या शेणापासून बनवलेल्या धूपकांडीतून जो धूर निघतो, त्यात ऑक्सिजन असतो, असा त्यांचा दावा. धूप, गोवऱ्या यांच्या धुरातून जो ऑक्सिजन तयार होतो, त्यानं दमेकऱ्यांना आराम पडतो. त्यांच्याकडे स्विर्त्झंडवरून आलेल्या एका अभ्यासकानं हा अनुभव घेतला. धुराची अॅलर्जी असलेला हा गृहस्थ गोवऱ्या जाळून त्या धुराचा वाफारा घेत तासनतास बसून राहायचा.
परमेश्वर यांच्या दंतमंजनानं दाताचे कुठलेच विकार होत नाहीत, जे असतील ते बरे होतात. त्यांनी तयार केलेल्या तेलानं जुनी सांधे, पाठ, कंबरदुखी बरी होते. साबणानं त्वचारोग बरे होतात. काळे डागही जातात. याचा अनुभव गावकरी घेतायत.
‘New18 लोकमत’च्या ‘अन्नदाता’चा हा व्हिडिओ यूट्यूबर पाहता येईल. शिवाय परमेश्वर यांचा मोबाईल नंबर आहे – ९८५०४६४७६०. त्यांनी समस्त शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी, गोवंश संवर्धनासाठी व पर्यायानं आर्थिक भरभराटीसाठी स्वत:च्या मार्गानं येण्याचं आवाहन केलंय.
आहे की नाही प्रेरणादायी कहाणी?
भारावून गेल्यावर आम्हाला काही (नेहमीप्रमाणे) प्रश्न पडले. भारतातील एक योद्धा व द्रष्टा शेतकरी नेता म्हणून ओळखल्या गेलेल्या शरद जोशींचा भाकड गायींचा सिद्धान्त किंवा मागणी खोटी ठरवून उलट त्याच्या उत्पन्नाचा पुरावा देणारा हा फॉर्म्युला एव्हान देशभर सोडा, राज्यभर कसा नाही प्रसिद्ध पावला?
आजही शेतकरी संघटनेचा बिल्ला लावणाऱ्या परमेश्वर यांनी राजू शेट्टी, पाशा पटेल, विजय जावंधिया, सदाभाऊ खोत यांना आपल्या शेतावर बोलावलं का नाही? मुख्यमंत्री, अर्थमंत्री, कृषिमंत्री यांना बोलावून कर्जमाफीसाठी करोडो रुपये देण्यापेक्षा देशी खिलारी भाकड गायींचं वाटप करा हे का नाही सांगितलं? शरद पवार आणि इतर मंडळी या प्रयोगापासून अनभिज्ञ कशी? सुभाष पाळेकर, राजीव दीक्षित, सुहास पाटील ही माणसं स्वामिनाथन यांच्यासारखी सर्वामुखी का नाही झाली? का ते सर्व प्रसिद्धी पराङमुख आहेत?
आणखी काही तांत्रिक प्रश्न मनात आले. परमेश्वर यांनी जी उत्पादनं बनवली आहेत, त्यांचा पेटंट कोणाकडे आहे? उत्पादन विक्रीचा परवाना? अन्न व औषध प्रशासनाची मान्यता? त्यांचं हे उत्पन्न शेतीप्रमाणे करमुक्त आहे? रामदेवबाबांच्या काही उत्पादनावर जीएसटी लागला म्हणून ते नाराज झाल्याचं वाचलं होतं. आमच्या या मराठी रामदेवबाबांना पंचक्रोशीतच विक्री म्हणून जीएसटी नाही? ब्लड कॅन्सर पूर्ण बरा करणारं औषध ते टाटा किंवा तत्सम कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा इस्पितळांना विकत देतील?
परमेश्वर यांच्या साडेतीन एकरात भाकड देशी गायींच्या मलमूत्रापासून झेंडू, उस, ज्वारी, भाजीपाला पिकत असेल आणि तो त्यांना जगण्याचा शाश्वत मार्ग देत असेल तर ते चांगलंच व अनुकरणीय आहे. मात्र पतंजलीप्रमाणे त्यांनी स्वत:ची म्हणून या मूलमूत्र व काही आयुर्वेदिक औषधांचा वापर करून जी औषधं किंवा सौंदर्य प्रसाधनं बनवली आहेत, त्यांच्या प्रमाणीकरणाचं काय?
‘New18 लोकमत’च्या या वृतान्तात या प्रश्नांची वा शंकांची उत्तरं मिळत नाहीत. उलट यशोगाथा संपवताना त्यांचा वार्ताहर म्हणतो, सरकारनं गोवंश हत्याबंदी कायदा केला पण त्यासंबंधीचं योग्य प्रशिक्षण दिलं नाही!
आता गोवंश म्हणजे प्रामुख्यानं बैल! कारण गोहत्या बंदी कायदा तर पूर्वीपासून आहे. मळेकरांची शेती व उत्पादनं गोमातेपासून आहेत, गोवंशपासून नाही. बैलाचं मलमूत्र उपयुक्त आहे की नाही यावर संशोधन झालेलं नाही. मात्र गोहत्येवर भाष्य करताना सावरकर म्हणतात, ‘गाय हा एक उपयुक्त पशू आहे.’ पण तो किती उपयुक्त आहे, हे परमेश्वर यांनी सिद्ध केलंय.
आता गरज आहे ती या मराठी रामदेवबाबांच्या उत्पादनांच्या प्रमाणीकरणाची, त्यांच्या दाव्यांची सत्यता पडताळण्याची आणि त्यांच्या शास्त्रीय कसोट्यांची.
आशा आहे ही मागणी देशद्रोही ठरणार नाही!
.............................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Prabhakar Nanawaty
Tue , 26 December 2017
बाकी कुणाला तरी ऐकविण्यापेक्षा या मराठी शेतकऱ्याने आपली यशोगाथा गोविज्ञान संशोधक समितीचे अध्यक्ष डॉ विजय भटकर या मराठी वैज्ञानिकाला तरी ऐकवायला हवी होती. आयुष्याचे सोने झाले असते!
Pushpak P
Tue , 26 December 2017
मराठी माणसाला मराठी मांणसाचेच यश बघवत नाही असे म्हणतात. त्यामुळे खेकडा मनोवृत्तीचे काही लोक पुढे जाणारया लोकांना खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. हे खेकडा प्रवृत्तीचा लोक स्वत: पोटापाण्यासाठी टुकार, चिल्लर लेख लिहीत असतात ( आणि स्वत:ला मोठे थोर साहित्यिक वगैरे समजात) मात्र जेव्हा एखादा उद्यमशील माणूस वेगळे प्रयोग करून कष्टाने पैसे मिळवतो तेव्हा या कुडमुड्या लेखकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते.. समाजातील अशया निरूदयोगी निरूपयोगी कुडमुडाया लेखकांकडे दुर्लक्ष केलेलेच बरे