अजूनकाही
काही व्यक्ती आपल्या जवळच्या किंवा परक्यांच्याही जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. विशेष म्हणजे आपलं हे काम गुपचूप म्हणजे स्वतःची फार प्रसिद्धी न करता करत राहणं, यातच ते आपला आनंद मानतात. 'देवा - एक अतरंगी' या नवीन मराठी चित्रपटात अशाच एका भल्या तरुणाची कहाणी सांगितली आहे. वास्तविक 'देवा... ' हा चित्रपट 'चार्ली' या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे.
'देवा...'चे दिग्दर्शक मुरली नल्लप्पा हेही एक प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक आहेत. त्यांनी हा चित्रपट मराठीत करताना योग्य खबरदारी घेऊन मराठीचा सर्व बाज पडद्यावर उतरवला आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा कॅनव्हास वरचेवर मोठा होत असताना काही दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक मराठी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहेत. यापूर्वी, 'क्लासमेट्स', 'शटर', 'वृंदावन' आदी 'रिमेक'ना मराठी प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. 'देवा...'नं ही वेगळेपण कायम टिकवताना नाविन्यता जपली आहे. मात्र असं असलं तरी 'ना सामान्य, ना फार 'ग्रेट'’ या शब्दांत या चित्रपटाचं वर्णन करावं लागेल.
'देवा...'मध्ये पाहायला मिळते ती माया जाधव नावाच्या एका लेखिकेची आणि देवदत्त (देवा) या तरुणाची कहाणी. आपल्या पहिल्याच पुस्तकामुळे प्रसिद्धी पावलेली माया जाधव ही लेखिका आपलं दुसरं पुस्तक लिहिण्यासाठी एका निवांत जागी जायचं ठरवते. मात्र त्याच वेळी तिच्या घरचे तिचं लग्न ठरवण्याची घाई करतात. लग्नाला विरोध असलेली माया घरातून कोणाला न सांगता निघून जाते आणि आपल्या मैत्रिणीच्या सल्ल्यावरून कोकणात 'देवा'च्या घरी जाऊन राहते. मात्र अनेक दिवसापासून बंद असलेल्या त्या घरात या 'देवा'चं अतरंगीपण तिला उलगडत जातं. देवा मात्र तिला प्रत्यक्ष तिथं कधीच भेटत नाही. त्याचा शोध घेण्याच्या प्रयत्नात मायाला बऱ्याच गोष्टी कळत जातात. आणि आपल्याला जे पुस्तक लिहायचं आहे, त्याची 'कथा' इथंच आहे हे तिला उमगतं.
मायाला 'देवा'चं अंतरंगीपण उलगडत जात असताना काही उपकथानकंही पाहायला मिळतात. अर्थात ते सर्व या 'देवा'चेच 'कारनामे' असतात. 'देवा' आपल्या घरात चोरी करायला आलेल्या गोट्याला तो भुकेला आहे म्हणून प्रेमानं खाऊ घालतो. एवढंच नव्हे तर त्याच्याबरोबर तो चोरी करायलाही जातो आणि तिथंच एका घरात आत्महत्या करताना एका तरुण महिला डॉक्टरला (मीरा पावसकर) वाचवतो आणि तिच्या जीवनात वेगळा प्रकाश आणतो. तनू नावाच्या शाळकरी मुलीवर वाईट कृत्य होण्यापूर्वीच तिला वाचवून आधार देतो. तसंच कर्नल कृष्णकांत आणि त्यांची प्रेयसी शालू यांची तरुणपणी झालेली ताटातूट लक्षात घेऊन शालूचा शोध घेऊन उभयतांचं पुनर्मीलन घडवून आणतो.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299
.............................................................................................................................................
अर्थात ही उपकथानकं उर्फ 'देवा'चे 'कारनामे' तो कसा 'अतरंगी' आहे, हे सांगण्यासाठी दाखवले आहेत हे उघडच आहे. त्यात 'देवा'चं उदात्तीकरण करण्यावर अधिक भर दिला आहे, असं स्पष्टपणे जाणवतं. यातील काही गोष्टी अतार्किकही वाटतात. त्यामुळे त्याचा पाहिजे तेवढा प्रभाव पडत नाही.
'देवा'चं 'अतरंगी'पण अनेक ठिकाणी अपेक्षित असंच दिसून येतं, ही या चित्रपटाच्या कथेतील मोठी उणीव आहे. त्याची कसर मात्र उत्कृष्ट छायाचित्रणानं भरून काढली आहे. विजय मिश्रा आणि भारत पार्थशास्त्री यांच्या उत्कृष्ट छायाचित्रणानं कोकणचा निसर्गरम्य परिसर नजरेत भरतो. त्यानं 'देवा'च्या बाह्य श्रीमंतीत चांगली भर घातली आहे. तसंच अमित राज यांनी स्वरबद्ध केलेली गाणीही चांगली असून कथानकाला ती उपयुक्त ठरली आहेत.
अंकुश चौधरीनं 'देवा'च्या भूमिकेत नेहमीच्या तडफेनं काम केलं आहे. 'अतरंगी'पण दाखवण्यासाठी त्यानं केलेली खास स्टाईलची वेशभूषा (आणि केशभूषा) आकर्षित करणारी ठरली आहे. तेजस्विनी पंडितनं लेखिका मायाच्या भूमिकेत चांगलं दिसण्याबरोबरच उत्कृष्ट अभिनयही केला आहे. डॉ. मीरा पावसकरच्या भूमिकेत स्पृहा जोशीनं संयत अभिनय केला आहे. मयूर पवार (गोट्या), डॉ. मोहन आगाशे (कर्नल कृष्णकांत), जयवंत वाडकर, वैभव मांगले, पंढरीनाथ कांबळे या सहकलाकारांनी आपल्या भूमिका उत्तम सादर केल्या आहेत. रिमा लागू यांचं पडद्यावरील क्षणिक दर्शन सुखावून जातं.
थोडक्यात, वेगळं कथानक आणि त्याची 'निसर्गयुक्त मांडणी' यासाठी ‘देवा’ एकदा पाहायला हरकत नाही.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment