टायगर जिंदा है : क्या फर्क पडता है!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार 
  • ‘टायगर जिंदा है’ची पोस्टर्स
  • Sat , 23 December 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie टायगर जिंदा है Tiger Zinda Hai सलमान खान Salman Khan कतरिना कैफ Katrina Kaif

कुठल्याही मॉबला किंवा आणखी स्पष्टपणे आणि विषयाला अनुसरून बोलायचं झाल्यास बॉलिवुडच्या 'मास ऑडिएन्स'ला आणि त्यांच्या मेंदूला कंट्रोल करणं तसं पाहिलं तर फार सोपं आहे. कारण याचा साधा सोपा मार्ग म्हणजे त्यांना भावनिक आवाहन करणं, त्यांच्यामध्ये एखादी भावना वाढीस नेणं. आणि हा किमान प्रकार बॉलिवुडमधील कुणाच्या लक्षात येणार नाही, असं नाही. त्यामुळेच अली अब्बास जफर दिग्दर्शित 'टायगर जिंदा है' प्रेक्षकांना भुरळ पाडत, त्यांना टाळ्या वाजवायला भाग पाडतो. 

'टायगर जिंदा है' हा २०१२ मधील ब्लॉकबस्टर 'एक था टायगर'चा सीक्वेल आहे. आणि त्यातील 'रॉ' एजंट 'टायगर (सलमान खान) आणि 'आयएसआय' एजंट’ झोयाची (कतरिना कैफ) प्रेमकहाणी तर आपल्या ओळखीची आहेच. आता हीच गोष्ट पुढे नेत लेखक-दिग्दर्शक आपल्या समोर आले आहेत. 

गेल्या भागात पळून गेलेले टायगर आणि झोया यांना जाऊन आता आठ वर्षे झाली आहेत. त्यांना एक मुलगा आहे (ज्याला चित्रपटभर केवळ ज्युनिअर म्हणून संबोधलं जातं), आणि ते अजूनही 'रॉ'पासून लपून राहत आहेत. पण तब्बल आठ वर्षांनंतर 'रॉ'ला एका मिशनसाठी टायगरची गरज भासते. आणि त्यासाठी ते टायगरकडे आले आहेत. 

एकीकडे 'आयएसआय' या आतंकवादी संघटनेचा प्रमुख 'अबु उस्मान'ला गोळी लागते. मग तो इराकमधील एका हॉस्पिटलमध्ये आपलं बस्तान बसवतो. तर दुसरीकडे अमेरिकेला त्यापूर्वी त्यानं केलेल्या अमेरिकन पत्रकार आणि एजंटसच्या हत्येची कारवाई करण्यासाठी एक कारण हवं असतं. अबुचा या तळावर हल्ला करून त्याला मारण्याची संधी त्याच्या या कृत्यानं अमेरिकेला मिळते. 

पण याच हॉस्पिटलमध्ये काही भारतीय नर्सेस असल्यानं त्यांना सोडवणं भारतासाठी गरजेचं असतं. ज्यासाठी 'शिनॉय' (गिरीश कार्नाड) अमेरिकेला हा हल्ला पुढे ढकलण्याची विनंती करतो. जी मान्य होते. पण आता त्याला फक्त सात दिवसात हे मिशन पूर्ण करायचं आहे, ज्यासाठी टायगरची मदत घेण्यात येते. 

ही गोष्ट आता कागदावर जरी उत्तम आणि ग्रिपी वाटत असली तरी पडद्यावर मात्र तसं होत नाही. आणि इथंच खरं तर टायगर फसतो. कारण जी गोष्ट दीड-पावणेदोन तासांत, योग्य पकड ठेवून आणि कदाचित आपल्याला खिळवून ठेवत संपवता आली असती तीच गोष्ट सुमारे पावणेतीन तास समोर चालू राहते, प्रसंगी ताणली जाते. आणि त्यातही अनेक अतर्क्य आणि अशक्यप्राय घटना आपल्यासमोर घडतात (पक्षी घडवून आणल्या जातात) की, लेखकाला पटकथेशी आणि चित्रपटाशी काहीच घेणंदेणं राहत नाही. त्यामुळे टायगरचं जिवंत असणं या गोष्टीशी चित्रपटातील पात्रं वगळता बाकी कुणालाच इतिकर्तव्य उरत नाही. 

चित्रपटात भारत-पाक संबंध आणि दोन्ही देशांनी एकत्र काम करणं वगैरे गोष्टी दाखवणं, खरं तर या काळात, नक्कीच कौतुकास्पद आहे. कारण जागतिक पातळीवर स्वतःच्या फायद्याकरिता परस्परांना चिथावणी देणारं वातावरण असताना, हे समजावणीचं भाष्य जरासं दिलासा देतं. पण चित्रपटात याही गोष्टीचा अतिरेक असल्यानं हा मुद्दाही जरासा झाकोळला जातो. 

चित्रपट यापूर्वी 'आयसिस'नं अशाच एका हॉस्पिटलवर मांडलेला तळ आणि अतिरेकी संघटनांनी यापूर्वी केलेल्या पत्रकारांच्या हत्या या घटनांच्या संदर्भाचा आधार घेतो. पण इथं त्यातील नाट्य वरवरच्या लिखाणात विरून जातं. 

या चित्रपटात कुणी लॉजिक शोधण्याची गरज नाही. कारण ते बहुतांशी वेळा सापडणार नाहीच. अगदी सुरुवातीच्या सीनपासून ते शेवटपर्यंत लॉजिकचा काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे गेली आठ वर्षं रॉ किंवा आयएसआयला या दोघांची अजिबातच गरज भासली नाही का, किंवा हिरोला एकही गोळी का लागत नाही, स्विफ्ट हवेत उडवताना गुरुत्वार्षणाचे नियम कुठे जातात, वगैरे प्रश्न आपल्याला पडण्याची गरज नाही. कारण तशीही त्यांची उत्तरं मिळणार नाहीत. 

बाकी चित्रपट अॅक्शन पॅक्ड आहे. काही सीन्स उत्तमरीत्या कोरिओग्राफ केले आहेत. काही ठिकाणी अॅक्शन सीन्समध्ये कोरिओग्राफीबाबत 'जेसन बॉर्न' (अमेरिकन स्पाय चित्रपट मालिकेतील एक पात्र) वगैरेची आठवण  येते, पण तितकंच. 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

.............................................................................................................................................

बाकी सलमान अभिनयाचा प्रयत्न करत नाही. तो फक्त एक कुल 'लार्जर दॅन लाइफ' नायक म्हणून समोर वावरत राहतो. जे त्याला शोभतं. कतरिनाही अभिनय आणि तिचा अॅक्सेंट सुधारणं या दोन्हीला फाट्यावर मारतं आणि बऱ्याच चांगल्या रीतीनं प्लॅन केलेल्या अॅक्शन सीन्समध्येच समाधान मानते. 'सज्जाद देल्फ्रूझ'चा अबु उस्मान हा खलनायक त्यातल्या त्यात उत्तम म्हणता येईल. 

अशा चित्रपटात एक जरासा वयस्कर एजंट असणं (जो घाऊकमध्ये दोन-चार विनोदी सीन्समध्ये कामाला येईल) दिग्दर्शक लेखकाला गरजेचं वाटतं. त्यामुळेच कदाचित यात राकेश (कुमुद मिश्रा) आणि फिरदौस (परेश रावल) ही पात्रं दिसून येतात.

विशाल-शेखरचं संगीत इतर वेळी ठीकठाक. मात्र अॅक्शन सीन्स आणि आधीच नकोसे वाटणारे इमोशनल सीन्स यामध्ये लाउड वाटतं, आणि चित्रपटात उगाचच अति नाट्यमयता आणतं, जी उथळ संवादामध्ये नकोशी वाटते. 

शिवाय चित्रपट अलीकडे वाढलेल्या जाहीर देशप्रेमाच्या मुद्द्याचाही वापर करून घेत प्रेक्षकांना भुरळ पाडतो. राष्ट्रध्वजाचे सीन्स किंवा 'रॉ' आणि 'आयएसआय' एजंटमधील संवाद यांसारख्या टाळ्याखाऊ गोष्टी करतो. जे सीन्स फारच क्लिशं झाल्याने आता नकोसे वाटतात. 

थोडक्यात या सर्व गोष्टी दुर्लक्षित करून, केवळ काही अॅक्शन सीन्स आणि काही विनोदी दृश्यं असणं याला जर तुम्ही एका मनोरंजक चित्रपटाची व्याख्या मानत असाल, तर आणि तरच हा चित्रपट मनोरंजक आहे. नसता नको तितका लांबलेला हा चित्रपट पाहून निराशाच पदरी पडण्याची शक्यता जास्त आहे. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख