राजकारणी, सिनेमा आणि आपले कलेक्टिव्ह अपराधगंड 
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर 
  • स्टार वॉर्स आणि राहुल गांधी
  • Sat , 23 December 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar स्टार वॉर्स Star Wars राहुल गांधी Rahul Gandhi

कम्युनिस्ट चीनमधला किस्सा. पूर्वीची अन्यायकारी व्यवस्था उलटवून माओ यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पक्षाची राजवट सुरू झाली होती. पण हा खंडप्राय देश कसा चालवावा याबाबतीत कम्युनिस्ट पक्षात मतभेद होते. चेयरमन माओ हे अतिशय आदर्शवादी कम्युनिस्ट होते. त्यांच्या मनावर असणाऱ्या आदर्शवादी कल्पनांच्या पगड्यातून अनेक सुपीक कल्पना यायच्या. अशीच एक सुपीक कल्पना म्हणजे अनवाणी फिरणारे डॉक्टर्स. तरुण डॉक्टरांनी खेड्यापाड्यात अनवाणी पायांनी फिरून तिथल्या रुग्णांची सेवा करावी अशी ही कल्पना. हे डॉक्टर काट्याकुट्यातून, जंगलातून अनवाणी फिरायचे. बऱ्याच लोकांच्या तळपायांना गंभीर जखमा व्हायच्या.

माओंच्या उलट डेंग (ज्यांनी माओनंतर चीनच नेतृत्व करून चीनचा चेहरामोहरा बदलला.) हे अतिशय व्यावहारिक मत असणारे होते. त्यांचं म्हणणं असं होत की, हे सगळं ठीक आहे पण किमान या डॉक्टरांनी बूट घालून फिरायला काय हरकत आहे? पण माओंच्या हयातीत हे काही झालं नाही. डेंग यांनी सत्तेवर आल्यावर पहिलं काम काय केलं असेल तर या डॉक्टरांना बूट मिळवून दिले.

गुजरात निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यावर राहुल गांधी 'स्टार वॉर्स' सिनेमा पाहायला गेले आणि त्यांच्यावर जो प्रचंड टीकेचा धुरळा सुरू झाला, त्यानंतर मला हा किस्सा आठवला. अतिआदर्शवादी माओंच्या भूमिकेत यावेळेस इंटरनेट आर्म चेयर जनरल होते, तर अनाठायी आदर्शवादाच्या कल्पनेला बळी पडून अनवाणी पायपीट करायला लागणाऱ्या डॉक्टरच्या भूमिकेत राहुल गांधी होते. स्वतः आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला एन्जॉय करणारे भारतीय लोक आपल्या नेत्यांनी साधं राहावं, वाईन पिऊ नये, सिनेमे बघू नयेत, भरजरी कपडे घालू नयेत अशा भाबड्या अपेक्षा बाळगून असतात. पण असा प्रकार घडणारे राहुल गांधी पहिले राजकारणी नव्हेत आणि शेवटचेही नव्हेत. 

आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींना एन्जॉय करणाऱ्या कुठल्याही राजकारण्याला याच टीकेला सामोरं जावं लागतं. राजकारण्यांना आणि विशेषतः विरोधी पक्षाच्या नेत्यांना शिव्या घालणं, हा समस्त भारतीयांचा आवडता फावल्या वेळेतला छंद आहे. एरवी राजकारणी या जमातीबद्दल कुणालाही सहानुभूती नसली तरी याबाबतीत भारतीय जनमानस राजकारण्यांवर खूप अन्याय करत, असं मानायला भरपूर वाव आहे. 

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे तालेवार नेते प्रफुल पटेल यांचा एका पार्टीतला ड्रिंक भरलेला  ग्लास हातात घेऊन असलेला फोटो वर्तमानपत्रांमध्ये झळकला होता. त्यावरून प्रफुल पटेलांना जज करणारे लोक हिरिरीने त्यांच्यावर टीका करायला सरसावले होते. पंतप्रधान मोदी यांना टापटीप राहण्याची सवय आहे. ते देशाचे पंतप्रधान आहेत. जगासमोर आपले प्रतिनिधित्व करतात. त्यांनी प्रेझेंटेबल असणं अतिशय आवश्यक आहे. पण त्यांच्या टापटीप राहण्यावर सतत टीका होत असते. गांधीजींप्रमाणे सर्वच नेत्यांनी साधं राहणं आताच्या काळात शक्य तरी आहे का?

मोदी असतील किंवा राहुल गांधी असतील किँवा प्रफुल पटेल असतील त्यांच्यावर टीका करायला अनेक राजकीय मुद्दे आहेत. त्यांच्यावर तिथं टीका होणं समजण्यासारखंही आहे. पण वैयक्तिक आयुष्यात ते काय करत आहेत, यावरून त्यांना जज करणं हे आपण राजकारणाला नको तितक्या गंभीरतेनं घेत असल्याचं लक्षण आहे. 

१४ नोव्हेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो. पण त्या दिवशी काही लोक फेसबुकवर नेहरूंचे सिगरेट शिलगावणारे, मद्याचा चषक हातात असणारे, महिलांसोबत जवळीक दाखवणारे (त्यातले बरेचसे Photo Shopped) फोटो पसरवायला सुरुवात केली. उद्देश अर्थात नेहरू कसे बदफैली होते हे सिद्ध करण्याचा होता हे उघड होते. पण लेखाचा मुख्य मुद्दा हा नाही. नेहरूंचे सिगरेट पितानाचे फोटो टाकणारे अनेक परिचित स्वतः सिगारेट ओढतात. नेहरूंचे स्त्रियांसोबत फोटो टाकणारे अनेक जण स्त्रियांबद्दल काय 'नजरिया' बाळगतात हेही माहीत होतं. पण त्यांची अपेक्षा नेहरू हे आपले पंतप्रधान होते, म्हणून त्यांनी काही गोष्टी करू नयेत, अशी बालिश होती.

राजकारणीही माणसं असतात आणि सर्वसामान्य लोकांसारखी स्खलनशील असतात, हे भारतीय जनमानस का मान्य करत नाही? धुम्रपान व मद्यपान या जगातले अनेक लोक सहज करत असणाऱ्या गोष्टी राजकारण्यांना चारचौघांत करण्याची मुभा नसावी? काही दिवसांपूर्वी प्रफुल पटेल यांचा एका पार्टीमध्ये हातात कॉकटेलचा ग्लास असणारा फोटो आल्यावर एका प्रतिष्ठित वृत्तपत्रानं त्यावर गहजब केला होता. म्हणजे वाजपेयी यांनी आजन्म ब्रम्हचारी राहिलं पाहिजे किंवा कुठल्या मोठ्या पदावरच्या माणसानं धुम्रपान करू नये, अशा भाबड्या अपेक्षांचं काय करायचं हा प्रश्न आहे.

कुठल्याही नेत्याचं मूल्यमापन करण्याचे निकष काय असावेत? वैयक्तिक चारित्र्य का तो /ती त्याचं काम किती कुशलतेनं करतो हा? देश अस्थिरतेच्या गर्तेत असताना देशाला एक स्थिर सरकार देणं असो वा अर्थव्यवस्था वाढीचा वेग वाढवणं; वाजपेयी यांचे हे कर्तृत्व ते एका महिलेसोबत राहतात यामुळे कमी होईल असं तत्कालीन भाजप नेतृत्वाला का वाटलं असावं? देशात लोकशाही रुजवणं, अनेक मूलभूत बदल घडवणं आणि स्वातंत्र्य लढ्यातलं कर्तृत्व हे नेहरूंचे 'तसले' फोटो टाकल्यानं झाकोळून जाईल, हा आत्मविश्वास त्यांच्या विरोधकांमध्ये कसा येतो?

भारतीय नेतेही आपली 'Holier than cow' अशी प्रतिमा बनावी यासाठी धडपडत करत असतात. आपण धुम्रपान/मद्यपान/ सुंदर स्त्रियांसोबतचं छायाचित्र प्रसिद्ध होऊ नये यासाठी त्यांची धडपड चालू असते. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा एखादा दिलदार नेता त्याला अपवाद. आपलं हेनिकेन बीअरचं प्रेम बाळासाहेब यांनी कधी लपवलं नाही. त्यांना सतत ओढायला पाईप लागायचा. तुमच्या आवडीनिवडीबद्दल तुम्ही unapologetic असाल, तर तुमचे अनुयायीही तुम्हाला स्वीकारतात याचं बाळासाहेब ठाकरे हे उदाहरण. पण बहुतांश नेते लोकापवादाला घाबरून राहण्यातच धन्यता मानतात.

भारतीय समाजात एकूणच श्रीमंत असणं, भौतिक सुखांचा पाठलाग करणं, याबद्दल एक अपराधगंड दिसून येतो. त्याचबरोबर आपल्या नेत्यांनी चोवीस तास राजकारणाला आणि समाजकारणाला वाहून घेतलेलं असावं, अशा काहीतरी अवास्तव अपेक्षा आपल्याला नेत्यांकडून असतात. नेत्यांना वैयक्तिक आयुष्य असू शकतं किंवा त्यांनाही आपल्यासारख्या भावभावना असू शकतात, हे आपल्याला मान्यच नसतं.

अरविंद केजरीवाल यांना सिनेमा बघायला खूप आवडतं. इतकंच नाही तर ट्विटरवर ते सिनेमांचे reviewही करतात. त्यावरूनही अनेक लोक त्यांना ट्रोल करत असतात. एका निवडणुकीत दणकून पराभव झाल्यावर श्रमपरिहारासाठी अडवाणी आणि वाजपेयी राज कपूरचा ‘फिर सुबह होगी’ बघायला गेले होते. फ्रान्समध्ये दणकून पराभव झाल्यावर चर्चिल मार्क्स बंधूंचा हास्यपट बघायला बसले होते. फ्रान्सच्या पाडावाची बातमी आली तेव्हा चर्चिल सिनेमा पाहत होते. त्यांनी सिनेमा पाहिला आणि नंतर मिटिंगला गेले.

प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते. प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असते. हे व्यक्तिपरत्वे असतं. सिनेमा हा स्ट्रेस बस्टर असतो. आपल्या राजकारण्यांनाही वैयक्तिक आयुष्य आहे आणि त्यांना हवा तेव्हा सिनेमा पाहण्याचं, चांगले कपडे घालण्याचं, ऑकेजनली एखादा वाईनचा ग्लास पिण्याचं स्वातंत्र्य तरी आपण देऊ शकतोच. सदासर्वकाळ चिकित्सेच्या मायक्रोस्कोप खाली ठेवून त्यांच्या प्रत्येक कृतीच मूल्यमापन करण्याची गरज नाही. राहुल गांधींच्या सिनेमा बघण्यावरून उडालेल्या धुरळ्याचा हाच मतितार्थ. 

.............................................................................................................................................

‘मध्यमवर्ग- उभा, आडवा, तिरपा’ या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

.............................................................................................................................................

लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......