लोकमंगल साहित्य पुरस्कारासाठी यंदा ‘लीळा पुस्तकांच्या’, ‘इन्स्टॉलेशन्स’, ‘आषाढ बार’ या तीन पुस्तकांची आणि ‘खेळ’ या अनियतकालिकाची निवड करण्यात आली आहे. उद्या, म्हणजे शनिवारी सोलापुरात या पुरस्कारांचा सोहळा होत आहे. त्यानिमित्तानं या पुस्तकांची आणि ‘खेळ’ची ओळख करून देणारा हा विशेष लेख...
.............................................................................................................................................
लीळा पुस्तकांच्या - नीतीन रिंढे
नीतीन रिंढे यांचं ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक म्हणजे पुस्तकांवरील प्रेमाचं प्रसन्न आख्यान आहे. या प्रेमाच्या नाना परी वेगवेगळ्या या पुस्तकातील लेखांतून रिंढे उलगडतात, त्यात हरवून जायला होतं. रिंढेंच्या वाचनातल्या व्यासंगाचा प्रत्यय पानापानांत येत राहतो. रिंढे यांनी ज्या दोन मास्टरपीस कथा लिहिल्या (‘दोन कादंबऱ्या आणि तीन लेखक’, ‘पुस्तकांचे घर’), त्यातही वाचनातलं सृजन आणि पुस्तकांवरचं प्रेमच केंद्रस्थानी होतें.
‘लीळा पुस्तकांच्या’मधल्या पहिल्याच लेखात (‘पुस्तकवेड्यांचा तत्त्वज्ञ : वॉल्टर बेंजामिन’) एका लेखाचा उल्लेख आहे, ‘ब्रीफ नोट्स ऑन आर्ट अॅण्ड मॅनर ऑफ अॅरेंजिंग वन्स बुक्स’. यात एक किस्सा आहे. पुस्तकप्रेमाचा रोग बळावतो तसा अनावर गतीनं संग्रह वाढत जातो. हे जग वेड्यांचं असलं तरी त्याला जागा वास्तवातली लागते, जी मर्यादित असते. हा मित्र ठरवतो, यापुढे संग्रहात फक्त ३६१ पुस्तकं असतील. एक वाढेल तेव्हा आधीचं एक कमी करायचं. तशी वेळ येते तेव्हा मनाची उलाघाल होते. पुन्हा तोडगा. एक पुस्तक म्हणजे काय याचं सूत्र तयार करू. एकच पुस्तक अनेक भागांत असेल तर ते एकच धरायचं. काही दिवस निभतात. पुन्हा वेळ येते, सूत्र विस्तारतं, एका लेखकाची सगळी पुस्तकं म्हणजे एक पुस्तक. पुढे एका विषयावरची पुस्तकं म्हणजे… सूत्र विस्तारत राहतं, पुस्तकांचा वाढता संसार ओढगस्तीत पण सुखेनैव चालू राहतो. कारण वेडाला अंत असत नाही. पुस्तकं संग्रहातून कमी करायच्या यातना ‘जावे त्यांच्या वंशा’ तेव्हाच कळायच्या आणि पुस्तकाभोवतीचा कृतज्ञ प्रेमाचा, आठवणींचा गोतावळा… त्याचं काय करायचं?
अशा वेडाची अनेक रूपं या पुस्तकात रिंढेंनी तितक्याच प्रेमानं रेखाटली आहेत. अशी माणसं भणंग असतात ऐहिकबाबींत… त्यासाठी बांधून ठेवणाऱ्या नोकरी व्यवसायात कसलाच रस नसलेली. रिंढे ज्याला पुस्तकवेड्यांचा तत्त्वज्ञ म्हणतात, त्या वॉल्टर बेंजामिनची एक हकिकत पुस्तकात आहे. वडिलांकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशात गुजराण करणाऱ्या वॉल्टरनं असंख्य पुस्तकं आणि दुर्मिळ वस्तूंचा संग्रह केला होता. केव्हातरी अडचणींना वैतागून काही पुस्तकं विकण्यासाठी घेऊन तो विक्रेत्यांकडे गेला, परतला तेव्हा त्या पुस्तकांबरोबरच उधारीवर आणलेली आणखी काही पुस्तकं त्याच्याबरोबर होती. पुण्यातल्या म्युझियमवाल्या दिनकर केळकरांची अशीच अधिक करुण हकिकत इथं आठवायला हरकत नाही. कोणतीही वस्तू व्यावहारिक उपयोगासाठी स्वतःजवळ बाळगत नाही, तोच खरा संग्राहक हे वॉल्टर बेंजामिनचं वाक्य रिंढे उदधृत करतात, तेव्हा पटतंच ते.
नानापरींनी केंद्रस्थानी असलेली पुस्तकं, कादंबऱ्या आणि माणसं याबद्दल रिंढे आतल्या उमाळ्यानं लिहितात. जगातली सगळी महत्त्वाची पुस्तकं कधीच वाचून होणार नाहीत, हा विदीर्ण करणारा साक्षात्कार केव्हातरी नादी वाचकाला होतोच, छंदाचं वेडात रूपांतर करणारा क्षण हाच असावा. यापुढच्या प्रवासाचीही अनेक रूपं या पुस्तकात भेटीला येतात.
कधीच वाचायला मिळणार नाहीत अशा काळाच्या उदरात गडप झालेल्या पुस्तकांबद्दलचं ‘बुक ऑफ लॉस्ट बुक्स’... युरोपातल्या मुद्रित माध्यमाच्या पाच-सहाशे वर्षांतल्या वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या इतिहासाचे सर्ग… मानवजातीच्या वाचनसवयीचा इतिहास उलगडणारं ‘हिस्ट्री ऑफ रिडींग’... आयुष्यभर देशोधडीला लागल्यासारखा जगभर फिरत उभ्या केलेल्या ग्रंथसंग्रहाचा आणि त्यासंदर्भात एकंदर ग्रंथालयाचाच इतिहास मांडणारं मॅंग्वेलचं ‘लायब्ररी अॅट नाईट’... रात्रीच्या वेळी त्याच्या संग्रहातल्या पुस्तकांनी केलेली ही कुजबूज असं रिंढे म्हणतात, तेव्हा यातल्या व्यासंगाचा अंशही नसलेल्या माझ्या अंगावर शहारा येतो. स्वप्नांना शक्यतांचे पंख फुटावेत इतकी आणि अशी पुस्तकं...
महत्त्वाच्या पुस्तकांतल्या समासात वाचकांनी केलेल्या नोंदी, पुस्तकांच्या अर्पणपत्रिका, दुर्मिळ पुस्तकांच्या खरेदी विक्रीचं अदभुत जग, पुस्तकं आणि लेखक यांच्याविषयीच्या दंतकथा असा अनेकांगांनी विषय फुलत विस्तारत राहतो… वेगळ्या जगातलं हे नखशिखान्त भिजणं अतिव आनंददायक आहे....
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3383
.............................................................................................................................................
इन्स्टॉलेशन्स - गणेश मतकरी
गणेश मतकरी प्रामुख्यानं देशी-विदेशी चित्रपटांचे सजग अभ्यासक म्हणून ज्ञात आहेत. ‘फिल्ममेकर्स’, ‘चौकटीबाहेरचा सिनेमा’, ‘सिनेमॅटिक’ यांसारख्या पुस्तकांतून त्यांचा बहुमुखी व्यासंग दिसून येतो. ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’ ही ‘अनुभव’ मासिकामधून प्रकाशित झालेली कथामालिका हे त्यांचं पहिलं कथात्म लेखन असावं. महानगरातील, विशेषतः मुंबईतील समकालीन वास्तव, त्यातल्या बदलत्या, आधुनिक जगण्यातल्या ताणांना सामोरं जाताना, नाती किमान सांभाळताना करावी लागणारी कसरत ज्या बारीक, नेमक्या तपशीलांनीशी त्यात येते, त्यानं लक्ष वेधून घेतलं होतं.
‘इन्स्टॉलेशन्स’ या अन्वर्थक नावाचा त्याचा हा दुसरा कथासंग्रह या वाटेवरचं पुढचं पाऊल आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरच्या दहा प्रामुख्यानं महानगरी कथा यात आहेत. ‘मी कथा लिहायला सुरुवात केली, ती मला माझ्या आजूबाजूचं जग कसं आहे ते सांगावंसं वाटल्यानं’ असं त्यांनी या संग्रहाच्या मनोगतात म्हटलं आहेच. ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’च्या मनोगतातही मतकरी ‘आजचं जगणं स्वतःपुरतं, मर्यादित अवकाशात घडणारं आहे… कधी गरजेप्रमाणे तर क्वचित अपघातानं कुणा दुसऱ्याच्या संपर्कात येतो. (म्हणून?) आपल्या साऱ्यांची जगाकडे पाहण्याची दृष्टी अपूर्ण, एखाद्या खिडकीतून पाहात असल्यासारखी आहे, त्यापलीकडच्या बिग पिक्चरशी त्यांचा संबंध नाही...’ असं म्हणतात. (‘इन्स्टॉलेशन्स’च्या छोट्याशा मनोगतात त्यांनी एकंदरच कथेचं सामर्थ्य आणि त्याहीपेक्षा मर्यादांवर नेमकं भाष्य केलं आहे. कथेतल्या घटनेच्या फ्रेमपलीकडचं काही पकडण्याचा त्यांचा प्रयत्न या संग्रहातही जाणवतो.) या संग्रहाला मराठी कथेच्या ज्येष्ठ अभ्यासक सुधा जोशींची छोटी पण नेमकी प्रस्तावना आहे. (थोरल्या मतकरींच्या वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या कथांची जी अपवादात्मक समीक्षा झाली, तीही मुख्यतः सुधा जोशींचीच आहे हे सहज आठवलं!).
‘आय डोण्ट एक्झॅक्टली नो व्हॉट आय मीन बाय दॅट बट् आय मीन इट’ असं जे. डी. सालिंजरचं ‘कॅचर इन द राय’मधलं वाक्य संग्रहाच्या सुरुवातीला येतं. पुस्तकांचा अर्क म्हणावं इतकं नेमकं काही सापडावं हीही अपवादात्मक बाब. आपल्याला काय वाटतं, हवं आहे, याबद्दल एकाच वेळी असणारी स्पष्टता आणि संदिग्धता हा या कथांचा विशेष आहे.
‘इन्स्टॉलेशन्स’ या कथेत एक उल्लेख आहे. जिन्यातुन रोजच्यासारखं वर जाताना त्याला एक दिवस एका मजल्यावर डिसकार्डेड - टाकून दिलेल्या वस्तूंचा, पण मुद्दाम रचलेला वाटावा असा ढीग दिसतो. हवा गेलेले, फुटलेले खूप सारे रंगीत फुगे, मध्ये बंद पडलेले कॅल्क्युलेटर, बाजूला दोन फाटके हॅंडग्लोव्हज्… पुन्हा दोन-चार दिवसांनी आणखी कुठल्या मजल्यावर खूप सारे रिकामे पिझ्झा बॉक्सेस आणि एक मोठा पडदा यातून एक मानवी आकृतीसदृश आकार... एखादी अगम्य, दुर्बोध कमेंट असावी अशा या रचना… एका वेगळ्याच तणावात असताना त्याला सवयच लागते, जिन्यात दिसणाऱ्या अशा अगम्य रचनेतलं स्टेटमेंट शोधायचं… गणेश मतकरीही मुंबईतल्या ताणतणावांनी भरलेल्या आयुष्यातल्या दिसलेल्या घटना, प्रसंग, स्थळं, व्यक्ती यांची जाणीवेच्या सांध्यानं जोडत काही रचना करत त्यातून काही स्टेटमेंट करू पाहतात. अर्थात आशय, अभिव्यक्ती, पार्श्वभूमी अशा अनेकार्थानं या कथांत बहुविधताही आहे. ‘इन्स्टॉलेशन्स’, ‘घाई’, ‘रिमाईंडर’सारख्या कथा मानवी मनाचा अगम्य गुंता उलगडण्याच्या प्रयत्नात गुढतेला स्पर्श करतात. पौगंडावस्थेततले - तारुण्याच्या उंबरठ्यावरचं, उमलतं भावजीवन प्रेम ‘क्रांती’सारख्या कथांत केंद्रस्थानी आहे, तरी पार्श्वभूमीच्या सौंदर्यानं या कथा आणखी वेगळ्या होतात. ‘ट्रॉमा’सारखी मास्टरपीस कथा महानगरातल्या तथाकथित झिरझिरीत कॉस्मोपॉलिटन पडद्याआडच्या धार्मिक विद्वेषाचा जळजळीत अनुभव देते. अर्थात हेही तसं अगदी ढोबळ वर्गीकरण झालं.
गणेश मतकरींच्या दोन्ही संग्रहातल्या वीस कथा वाचल्यावर ही कथा काहीशी चौकटीत अडकतेय का, असं वाटत असतानाच नवी ‘ब्रिज’ ही कथा (कथाश्री दिवाळी, २०१७ ) वाचनात आली. मानसिक पातळीवर काहीसा गूढ अनुभव देणारी… मनातली गुंतागुंत (ही टिपिकल महानगरीच असेल असं नाही) सामोरी येताना काळाची सरमिसळ होते, तीत वाचक खेचला जातो. हे वेगळेपण गणेश मतकरींच्या कथेला समृद्ध करणारं, तिच्या पुढच्या प्रवासाचं आश्वासन आहे असं वाटतं.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4330
.............................................................................................................................................
आषाढबार - मकरंद साठे
मकरंद साठे महत्त्वाचे समकालीन प्रयोगशील लेखक आहेत. दहा नाटकं, तीन कादंबऱ्या, मराठी रंगभूमीच्या इतिहासाचं संहितेच्या संदर्भानं दस्तऐवजीकरण करणारा तीन खंडातला दोन हजार पानांचा ग्रंथ आणि ‘जागतिकीकरण आणि सांस्कृतिक अस्मिता’ ही पुस्तिका एवढा त्यांचा प्रकाशित ऐवज.
‘आषाढबार’ हे त्यांचं अलिकडचं नाटक. काळाची सरमिसळ करत आलेलं हे चर्चानाट्य अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित करतं. त्यामुळे त्याला प्रयोगनिरपेक्ष आस्वादमूल्य आहे. ‘मृच्छकटिक’सारखं राजसत्तेच्या पार्श्वभूमीवरील सामान्य माणसांच्या क्रांतीचं नाटक लिहिणारा शुद्रक, राजकीय-पौराणिक-रोमॅंटिक नाटकं लिहिणारा कविकुलगुरू कालिदास, त्याच्यावरचं ‘आषाढ का एक दिन’ हे नाटक लिहिणारा कालचा हिंदी नाटककार मोहन राकेश आणि आजचा तरुण नाटककार सिद्धार्थ ‘आषाढबार’मध्ये भेटतात. काळाचा पडदा ओलांडून वारुणीच्या साथीनं त्यांच्यात वाद-प्रतिवाद, आरोप-प्रत्यारोप होतात, त्या वादळी चर्चेचं हे नाटक. (शुद्रकाला या चर्चेत भास, अश्वघोष हे नाट्यशास्त्रीय, वैदिक परंपरा मोडणारे नाटककारही हवे होते असं वाटतं. त्यानं या चर्चेला काही वेगळं परिमाण लाभतं.)
कवी-लेखक व्यक्तिगत आयुष्यातल्या पेचांना कसे सामोरे जातात? आपल्या वाट्याला जे येतं, त्यात नियतीची काही भूमिका असते का? यश, कीर्ती, मानसन्मान यांचं स्थान काय असतं कलाकाराच्या आयुष्यात? दारिद्र्यात आयुष्याचे धिंडवडे निघालेले असताना यांचा मोह साहजिक, तरी हे सगळं मिळाल्यानंतर त्याची निर्मिती ‘त्याची’ राहते का? शेवटी निर्मितीच्या तळाशी काय असतं? या सगळ्यांची आस, हयातीनंतरही टिकून राहण्याची इच्छा, का आणखी काही?
शुद्रक एक कथा सांगतो. राजाला राजकवी निवडायचा आहे. हजार कवी कविता पाठवतात. राजा त्यातल्या शंभर कवींना निवडून त्यांना दरबारात स्वतःसमोर कविता करायला सांगतो. चाळणीत पन्नास कवी उरतात. त्यांची तुरुंगात रवानगी होते. महिनाभर तिथला छळ सोसत कविता करणारे पाच कवी पुढच्या फेरीत जातात. त्यांना महालात खाणं-पिणं-गणिका अशा सर्व ऐशोआरामात ठेवलं जातं. या परिस्थितीत एकच जण कविता करतो, तो अर्थात राजकवी होतो.
शुद्रक उरलेल्या तिघांनाही, विशेषतः कालिदास आणि सिद्धार्थला, सतत टोचत भेदक, अडचणीतले प्रश्न करत राहतो. त्यांनी अडचणीत शोधलेली उत्तरं ही प्रत्यक्षात किती स्वार्थी, भुसभुशीत तडजोडी होत्या, हे स्पष्ट करत राहतो.
कलेनं आदर्शांची मांडणी करायची का नाही? काळजाला भिडणारी, आज कृतक ठरवली जाणारी, लालित्यपूर्ण वर्णनं करायची का नाहीत? स्खलनशीलतेकडे कसं पाहायचं, उपहासानं की सहानुभूतीनं? ज्याचा त्रास होतो म्हणून नंतर विव्हळता, त्या कालची राजसत्ता आणि आजची भांडवलशाही यावर लिहायचं का नाही? का त्यांचे फक्त फायदे घ्यायचे? स्वातंत्र्य हवं हे ठीकच, पण ते वास्तव जगापासून, सामाजिकतेपासून मुक्त होण्यानं कसं मिळेल? समाजमान्यतेसाठी कलाकारानं तडजोडी कराव्यात का? अशी तडजोड न करता कलाकार म्हणून राहणं शक्य आहे का?
शेवटी शुद्रकालाही निरुत्तर करणारे प्रश्न वसंतसेना करते, त्याचेही मातीचे पाय उघडे करते. मग सूत्रधाराच्या लक्षात येतं, या सगळ्या ताणात फक्त दोन टोकं नाहीत, सगळे मध्येच कुठेतरी आहेत आणि मद्याच्या अंमलाखाली बाहेर येणारी सत्यं एका मर्यादेपलीकडे ऐकणं योग्य नाही, असं म्हणत तो यावर पडदा टाकतो.
असंख्य प्रश्न, उपप्रश्न, त्यांच्या पोटात दडलेले प्रत्यक्षात न विचारलेले प्रश्न... हे नाटक असं अस्वस्थ करणारं प्रश्नोपनिषद आहे.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4333
.............................................................................................................................................
खेळ - संपादक मंगेश नारायणराव काळे
सध्या महाराष्ट्रात सगळीकडे वाङ्मय पुरस्कारांचं जणू पेव फुटलं आहे. कुठल्याही बऱ्या पुस्तकाच्या नावावर दोन-चार पुरस्कारांची नोंद असतेच. लिहित्या हातांची वेळीच नोंद घेतली जातेय, हे चांगलंच आहे, पण जवळपास सगळेच पुरस्कार ललित, वैचारिक पुस्तकांना मिळतात. वाङ्मयव्यवहार फक्त सृजनशील लिहिणाऱ्या हातांवर तोलला जातो काय? संपादन, भाषाशास्त्र, संदर्भसाहित्य, विविध प्रकारचं कोशवाङ्मय अशा वेगवेगळ्या बाबतीत निष्ठेनं, नेटानं काम करणारे अनेक जण आहेत. त्यांचा ‘जॉब’ पूर्ण थॅंकलेस ठरवायचा का? लोकमंगल पुरस्कारासाठी झालेल्या पहिल्या बैठकीत हे मत मी आग्रहानं मांडलं होतं. यंदा तिसऱ्या वर्षी या पुरस्कारासाठी ‘खेळ’ची निवड झाली याचा आनंद वाटतोय .
२००४ च्या दिवाळी अंकाच्या रूपात ‘खेळ’चा पहिला अंक आला, तेव्हाच त्यानं लक्ष वेधून घेतलं होतं. महेश एलकुंचवार यांच्या समिक बंदोपाध्याय यांनी घेतलेल्या दीर्घ मुलाखतीचा अनुवाद त्यात होता, तर ज्येष्ठ चित्रकार भास्कर हांडे यांनी दिलीप चित्रेंच्या चित्रांतले सांस्कृतिक संदर्भ शोधले होते. या अंकाच्या संपादकियात म्हटलंय, “हा आपल्या जगण्याच्या कोलाहलात उमटणाऱ्या अभिव्यक्तीचा खेळ आहे . या खेळात कवी, चित्रकार, समीक्षक, कथा-नाटककार, लोककलावंत, संगीतकार असे सगळेच कलाव्यवहाराशी नाते असणारे सहभागी होत आहेत. ज्या कालखंडात समाज हा घटकच एकार्थी नामशेष होऊ घातला आहे तेथे एकेकाचे प्रगल्भ होणेही महत्त्वाचे…” बारा-तेरा वर्षं झाली, पण एकत्र, सर्वसमावेशक समाज म्हणून आपलं अस्तित्व पणाला लागलं आहे, अशा काळात हे अधिकच महत्त्वाचं वाटतं आहे.
‘खेळ’चा दुसरा अंकही लगेच जाफेमा २००५ म्हणत आला, पण पुढे मात्र हे नियमित काळाचं कोष्टक त्यागत हिंदी ‘पहल’च्या धर्तीवर त्याचं प्रकाशन सुरू झालं. तेरा वर्षांत सदतीस अंक. नियमितपणाचं जोखड न बाळगताही वर्षात जवळपास तीन अंक. यात मराठी, भारतीय तसंच जागतिक साहित्याचे, घडामोडींचे पडसाद आहेत. विलास सारंग, वसंत आबाजी डहाके, वसंत दत्तात्रेय गुर्जर, राजा ढाले, तुलसी परब यांच्यावरचे विशेषांक संदर्भमूल्य असलेले, तर विनोदकुमार शुक्ल, केदारनाथ सिंह, हेरॉल्ड पिंटर, अरुंधती रॉय, जुझे सारामागो, टॉमस ट्रान्सट्रोमर, व्ही. एस. नायपॉल, मार्क्वेझ, ओरहान पामुक, मार्सेल दुशाँ यांच्या मुलाखतींचे अनुवाद अभिरुचीचं भरणपोषण करणारे होते.
‘खेळ’ची लक्षणीय कामगिरी आहे ती दृककलांचा आस्वाद-आकलन सामान्य रसिकांपर्यंत घेऊन येणाऱ्या लेखनात. स्वतः मंगेश काळे आधुनिक चित्रकलेचे साक्षेपी अभ्यासक आहेत. त्यामुळे ‘इंडियन कंटेंपरी आर्ट जर्नल’चे संपादक राजेंद्र, सैय्यद हैदर रझा, जे. स्वामीनाथन, सोहन कादरी, बद्रीनारायण, भास्कर हांडे ते द. ग. गोडसे, सुहास बहुलकर, दिलीप चित्रे, गणेश विसपुते असा अफाट पैस असलेले अभिरुची समृद्ध करणारं लेखन त्यात आलं.
हा एकेकाला प्रभल्भ करण्याचा वसा बदलत्या काळातही न उतता, मातता असाच टिकून राहो, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...
.............................................................................................................................................
लेखक नीतीन वैद्य पुस्तकप्रेमी आहेत.
vaidyaneeteen@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Shashikant Shinde
Sat , 23 December 2017
नितीनजी अप्रतिम लेख. खूप छान उलगडून सांगीतलं. अभिनंदन. शुभेच्छा. -शशिकांत शिंदे. ९८६०९०९१७९