अजूनकाही
१८ डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. देशभर या निकालाची मोठी उत्सूकता होती, सलग २२ वर्षं भाजप सत्तेत असल्यानं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्य असल्यानं आणि त्यांनी अर्धेअधिक मंत्रिमंडळ या निवडणुकीसाठी कामाला लावल्यानं. स्वत: मोदींनी गुजरातमध्ये तीसहून अधिक सभा घेतल्या. याच दिवशी हिमाचल प्रदेश विधानसभेचेही निकाल लागले. मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे साहजिकच दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ डिसेंबर रोजी देशभरातल्या सर्व लहान-मोठ्या वर्तमानपत्रांची हीच मुख्य बातमी (हेडलाइन) होती. मराठीतल्या व इंग्रजीतल्या काही वर्तमानपत्रांनी ही बातमी कशी दिली, त्याचा हा कानोसा...
.............................................................................................................................................
दै. लोकसत्ता हे मराठीतलं सर्वाधिक खपाचं वर्तमानपत्र नसलं तरी ते सर्वाधिक प्रभावशाली वर्तमानपत्रं मानलं जातं. आणि निर्भिड व तटस्थही. पण हा तटस्थपणा ‘भाजप उत्तीर्ण, काँग्रेस उत्तेजनार्थ’ या शीर्षकातून व्यक्त होत नाही. किंबहुना हे बातमीचं शीर्षक नसून ते बातमीवर केलेलं भाष्य वाटतं. शिवाय राष्ट्रीय पातळीवर प्रचंड औत्सुक्य असलेल्या आणि गेल्या २२ वर्षांत पहिल्यांदाच अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीविषयी ‘उत्तीर्ण, उत्तेजनार्थ’ हे शब्दप्रयोग शाळकरी वाटतात. आपण नेमकी कसली बातमी देतोय, याचं पुरेसं गांभीर्य या शीर्षकातून व्यक्त होत नाही. ‘लूज कमेंट’ असं ज्याला इंग्रजीत म्हणतात तसा हा प्रकार वाटतो.
‘मुंबईचे नं. १ मराठी वृत्तपत्र’ असा दावा असणाऱ्या दै. महाराष्ट्र टाइम्सचं ‘गुजरात, हिमाचल भाजपकडे’ हे शीर्षक बातमीचं जसं शीर्षक असावं असा संकेत आहे, त्यानुसार आहे. त्यात कुठलंही भाष्य नाही. पण ते यापेक्षा अधिक आकर्षक करता आलं असतं. पण किमान कल्पकता, किमान प्रयोगशीलता आणि किमान नावीन्य या गोष्टी या वर्तमानपत्राच्या एकंदर धोरणातूनच गेल्या काही वर्षांत गायब झालेल्या असल्यानं हे तसं ठीकच म्हणायचं.
दै. लोकमत हे मराठीतलं सर्वाधिक खपाचं वर्तमानपत्र मानलं जातं. काँग्रेसचे नेते राजेंद्र दर्डा यांचं हे वर्तमानपत्र असल्यामुळे त्याचा काँग्रेसचा बाजूनं असलेला कल ‘मोदी जिंकूनही राहुल बाजीगर’ या शीर्षकातून व्यक्त होतो, असं म्हणता येईलही. पण तरीही या शीर्षकात कमेंट म्हणावं असं काही नाही. उलट गेल्या २२ वर्षांत काँग्रेसनं गुजरातमध्ये पहिल्यांदा लक्षणीय जागा मिळवल्या. आणि त्यासाठी राहुल गांधी यांनी चिकाटीने प्रयत्न केले होते. त्यामुळे बातमीचं जसं शीर्षक असायला हवं तसंच हे आहे.
दै. लोकमतनंतर खप असलेलं वर्तमानपत्र म्हणजे सकाळ. या वर्तमानपत्रानं राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असूनही आपली विश्वासार्हता अजूनही बऱ्यापैकी टिकवून ठेवलेली आहे. दै. सकाळचं ‘गुजरातेत तरले, हिमाचलात जिंकले’ हे गुजरात-हिमाचल या राज्यांच्या विधानसभांचं अचूक वर्णन करणारं शीर्षक आहे. त्यात कल्पकता आहे, बातमी नेमकेपणानं सांगितली आहे आणि आकर्षकताही आहे. या तिन्हींचा मेळ घालणारी बातम्यांची शीर्षकं मराठी वर्तमानपत्रांतून अलीकडच्या काळात गायब होत गेली आहेत. तो वारसा काही प्रमाणात दै. सकाळनं टिकवून ठेवला आहे, याची प्रचिती या शीर्षकातून येते.
दै. दिव्य मराठीचं ‘घर वाचले, दाराशी काँग्रेस’ हे बातमीचं शीर्षक म्हणून ‘दिव्य’ आहे. यात भाष्य आहे आणि तेही फारसं कौतुकास्पद म्हणावं असं नाही.
दै. पुढारीचं ‘अटीतटीच्या लढतीत बाजी भाजपचीच!’ हे मुख्य शीर्षक आणि ‘गुजरातमध्ये शतक हुकले, हिमाचलमध्ये कमळ फुलले’ हे उपशीर्षकही यथायोग्य म्हणावं असंच आहे.
ग्रामीण भागात झपाट्यानं लोकप्रिय होत असलेल्या दै. पुण्यनगरीचं ‘मोदींनी गड राखला!, हिमाचलमध्येही कमळ फुलले!’ हे शीर्षकही बातमीचंच शीर्षक आहे. त्यात कल्पकता आहे आणि नेमकेपणाही. पण यातून फक्त दोन्ही राज्यात भाजपचं काय झालं, एवढंच सूचित होतं. त्यामुळे परिपूर्ण शीर्षक म्हणून ते अपुरं आहे एवढंच.
दै. प्रहारचे मालक नारायण राणे हल्लीच भाजपवासी झाले. त्याचा परिणाम ‘गुजरातमध्ये भाजपचा षटकार’ या शीर्षकातून व्यक्त होतो. ‘हिमाचलही जिंकले, राहुल गांधींची एकाकी लढत अपयशी’ या उपशीर्षकातूनही तेच दिसतं. कारण यात बातमीपेक्षा भाष्य करण्यावरच अधिक भर दिला आहे. गुजरातमध्ये भाजपनं षटकार मारलेला नाही आणि राहुल गांधींची लढत तशी एकाकी नव्हती. पण दै. प्रहार हे शेवटी नारायण राणे यांचं वर्तमानपत्र आहे. अलंकारिक भाषेत सांगायचं तर तो नारायण राणे यांचा ‘सामना’ आहे. त्यामुळे त्यांची पत्रकारिता अशीच असणार!
दै. सामना हे बोलूनचालून शिवसेनेचं मुख्यपत्र. त्यामुळे पत्रकारितेचे कोटकोर निकष ‘सामना’ला लावणंच चुकीचं. त्यामुळे ‘सामना’तल्या बातमीचं शीर्षक असंच असणार. शिवाय शिवसेना, शिवसेना नेते आणि सामनाचे पत्रकार कायम शिवकाळातच रमलेले असतात. त्यामुळे ‘गड आला पण सिंह गेला’ या एेतिहासिक वाक्प्रचारात बदल करून त्याचा वापर करणं त्यांनाच सुचू शकतं.
‘नवी आशा, नवी दिशा’ अशी टॅगलाइन असलेल्या ‘देशदूत’चं ‘भाजपचा ‘षटकार’’ हे शीर्षकही बातमीचं शीर्षक नाही. यात ठाम भाष्य नाही, पण बातमीचं शीर्षक म्हणून ते फारच अपुरं आहे.
अकोल्याहून निघणाऱ्या दै. ‘देशोन्नती’चं ‘गुजरातमा भाजप आवी गयी’ हे शीर्षक एक चांगलं शीर्षक म्हणावं लागलं. त्यात बातमी आहे, कल्पकता आहे आणि मुख्य म्हणजे भाष्य नाही. गुजरातची निवडणूक सर्वाधिक महत्त्वाची मानली गेल्यानं या शीर्षकात हिमाचलचा उल्लेख नाही. शिवाय त्या निकालाविषयी दुसरी स्वतंत्र बातमी आहे.
बेळगावहून निघणाऱ्या दै. ‘तरुण भारत’चं ‘गुजरात राखला, हिमाचल मिळवला’ हे उत्तम म्हणावं असं बातमीचं शीर्षक आहे. गुजरात निवडणूक अटीतटीची झाली असल्यानं आणि निकालात भाजप बाजी मारणार की काँग्रेस, याविषयी ठोस अंदाज येत नसल्यानं, प्रचंड औत्सुक्य निर्माण झालं होतं. गुजरातमध्ये भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचं ‘मिशन १५०’चं स्वप्न होतं, पण प्रत्यक्षात भाजपला ९९ जागा मिळाल्या आणि काँग्रेसला ८०. त्यामुळे ‘भाजप राखला’ हे शीर्षक योग्यच म्हणावं लागेल. गेली काही वर्षं हिमाचल प्रदेशात आलटूनपालटून सत्ता बदलत राहते आहे. त्यामुळे ‘हिमाचल मिळवला’ हे शीर्षकही योग्य ठरतं.
मराठी वर्तमानपत्रांच्या शीर्षकानंतर आता काही इंग्रजी वर्तमानपत्रांच्या बातम्यांची शीर्षकं पाहू.
दै. इंडियन एक्सप्रेस हे भारतीय स्तरावरील सर्वाधिक विश्वासार्ह, निर्भिड आणि तटस्थ वर्तमानपत्र मानलं जातं. आपला आब राखत बातम्यांची विविधता, विषयांची नावीन्यता आणि अनेक बाजूंचं विश्लेषण याबाबतीत ‘इंडियन एक्सप्रेस’ची ख्याती आहे. या वर्तमानपत्राची ‘मोदीज डिसेंबर स्प्रिंग’ हे शीर्षक बातमीचं शीर्षक किती कल्पक, नावीन्य असलेलं असावं याचा उत्तम नमुना आहे. मुख्य म्हणजे यात भाष्य नाही, बातमीच सांगितली आहे. पण ती कल्पकतेनं सांगितली आहे.
दै. हिंदू हे डाव्या विचारसरणीचा पुरस्कार करणारं वर्तमानपत्र मानलं जातं. तरीही बातम्या, लेख, विश्लेषण याबाबतीत हिंदू बऱ्यापैकी विश्वासार्ह मानला जातो. त्याच्या ‘बीजेपी होल्डस गुजरात, रेस्टस हिमाचल फ्रॉम काँग्रेस’ हे हेडलाइनचं शीर्षक म्हणून अतिशय नेमकं आहे. त्यातून दोन्ही राज्यांच्या निवडणूक निकालाची बातमी पूर्णपणे समजते.
‘टाइम्स’ अशा लघुनामानं ओळखलं जाणारं ‘टाइम्स ऑफ इंडिया’ हे वर्तमानपत्र. अशा प्रकारे लघुनामानं ओळखलं जाणारं हे भारतातलं बहुधा एकमेव वर्तमानपत्र आहे. सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं राहणं ही टाइम्सची खासीयत राहिली आहे. सत्तेत असलेल्या सरकारच्या चुकीच्या ध्येयधोरणांवर टीका करणं, हे वर्तमानपत्रांचं आद्य कर्तव्य मानलं जातं. पण टाइम्स त्याला फारसं गांभीर्यानं घेत नाही. तर ते असो. टाइम्सचं ‘बीजेपी हिटस 6, बट स्टॉल्स अॅट ९९ इन गुजरात’ हे बातमीचं शीर्षक म्हणून योग्यच आहे.
दै. हिंदुस्तान टाइम्सचं ‘गुजरात इज स्टिल मोदीज’ हे हेडलाइनचं शीर्षक कमीत कमी शब्दांत प्रभावी शीर्षक कसं असावं याचा एक नमुना आहे. गुजरात मोदींचा राहिल की नाही, याबाबत मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण करण्यात राहुल गांधी यशस्वी ठरले होते. पण शेवटी गुजरात राखण्यात मोदींना यश आलंच. ते या शीर्षकातून योग्य प्रकारे सूचित होतं.
कोलकात्याहून प्रकाशित होणाऱ्या दै. टेलिग्राफ या वर्तमानपत्रानं मोदी सत्तेत आल्यापासून त्यांच्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या विधानांची, ध्येयधोरणांची परखड चिकित्सा केलेली आहे, करत आहे. टेलिग्राफच्या बातम्यांची शीर्षकं अनेकदा अतिशय कल्पक, नावीन्यपूर्ण असतात आणि नेमकीही. ‘येस, ही कॅन’ हे शीर्षकही त्यापैकीच एक म्हणावं लागेल. बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी अमेरिकन जनतेला उद्देशून ‘येस, वुई कॅन’ असं म्हणाले होते. हा शब्दप्रयोग पुढे प्रचंड लोकप्रिय झाला. त्या नावाने पुस्तके लिहिली गेली, अनेक संस्था, संघटना, कंपन्या या नावाने सुरू झाल्या. हे शब्द ‘कालातीत म्हणी’सारखे झाले. टेलिग्राफने त्या शब्दांत ‘वुई’ऐवजी ‘ही’ हा बदल करून शीर्षक दिलं आहे. यातला ‘ही’ हा मोदी यांना उद्देशून नाही, हे उघड आहे. तो राहुल गांधी यांना उद्देशून आहे. अर्थात हे बातमीचं शीर्षक म्हणून समर्पक नसलं तरी त्यात भाष्य नाही. आणि म्हणून फारसं आक्षेपार्हही.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment