स्त्रीच्या पाठीमागे उभ्या राहणाऱ्या ‘नव्या पुरुषा’च्या शोधात
पडघम - सांस्कृतिक
रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
  • धुळे येथे २२-२३ डिसेंबरला ‘सांस्कृतिक बदल व नवे पुरुषभान’ या विषयावर एक बहुविद्याशाखीय परिषद होतेय
  • Thu , 21 December 2017
  • पडघम सांस्कृतिक नवा पुरुष New Men स्त्री-पुरुष Men - Women मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अ‍ॅब्युज (मावा) Men Against Violence and Abuse MAVA

का. स. वाणी प्रगत अध्ययन संस्था (कासवा), धुळे व मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अ‍ॅब्युज (मावा), मुंबई  या संस्थांनी संयुक्तरीत्या धुळे येथे २२-२३ डिसेंबरला ‘सांस्कृतिक बदल व नवे पुरुषभान’ या विषयावर एक बहुविद्याशाखीय परिषद आयोजित केली आहे. महाराष्ट्रातील सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणात ही एक महत्त्वाची घटना आहे. कारण या निमित्ताने मराठीत (किंबहुना कोणत्याही भारतीय भाषेत) स्त्रीवादाला समांतर एक नव्या विमर्शाची - मानुषवादाची -पायाभरणी होत आहे, जिचा आधार आहे ‘नवा पुरुष.’   

‘नवा पुरुष’ कोण?

इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर असा पुरुष नक्कीच होता, जो रूढ सामाजिक संकेत, परंपरा, बंधने नाकारून स्त्रीशी निरामय नाते निर्माण करण्यासाठी धडपडत होता. तो स्त्रीवर होणाऱ्या हिंसेचा, अत्याचारांचा प्रतिकार करत त्याविषयी समाजाला जाब विचारणारा वीरपुरुष असेल, किंवा स्त्रीला ज्याबद्दल आपुलकी, जिव्हाळा वाटतो, ज्याच्या संगतीत तिला निःशंक, सुरक्षित वाटते असा तिचा सखा, मित्र असेल. स्त्री-पुरुष समतेच्या आजच्या काळातील फुटपट्ट्यांनी कालच्या काळातील पुरुषाला मोजता येणार नाही. पण त्याच्याविषयी काही सार्वकालिक निकष मात्र निश्चितच ठरवता येतील. उदा.पुरुषसत्तेने घालून दिलेले, स्त्री-पुरुष विषमतेला पुष्टी देणारे त्या त्या काळाचे रूढ सामाजिक संकेत, परंपरा, बंधने यांचा विचार व कृतीच्या पातळीवर विरोध करणे; स्त्रीला भोगदासी किंवा मालमत्ता न समजता तिला मानव समजून तिच्याशी तसा व्यवहार करणे; स्त्रीच्या अडचणींचा पुरुष म्हणून फायदा न उचलता आपुलकी, स्नेह किंवा प्रेमाच्या भावनेने तिच्या पाठीशी उभे राहणे; स्त्रीवर होणाऱ्या हिंसेचा विरोध करीत अत्याचाऱ्यांना जाब विचारणे.

म्हणजेच समाजप्रबोधनाचे, परिवर्तनाचे कार्य करणारा जसा ‘नवा पुरुष’आहे, तसाच व्यक्तिगत पातळीवर (अर्थात आपला पुरुषी अहंकार सोडून, तसेच जातीय-धार्मिक अस्मिता न बाळगता) कोणा स्त्रीच्या मागे भक्कमपणे उभा राहणारा सामान्य पुरुष हादेखील त्या काळातील ‘नवा पुरुष’च असेल.

‘नवा पुरुष’ची सांस्कृतिक परंपरा

महाराष्ट्राचे लाडके आराध्यदैवत – विठोबा – हा एक आगळा-वेगळा देव आहे. तो निःशस्त्र आहे. त्याने आपले हात आशीर्वादासाठीही उंचावलेले नाहीत, तर कमरेवर ठेवलेले आहेत. तो कोणाच्या नवसाला पावत नाही. एकूणच बलवान, वरद (म्हणजेच कर्तबगार), रिपुदमनकारी पुरुषाच्या प्रतिमेत तो चुकूनही बसत नाही. तो कुटुंबवत्सल, लेकुरवाळा आहे. त्याचे भक्त हीच त्याची लेकरे. त्यांनी तर त्याला अगदी मुठीत ठेवले आहे. कोणी त्याला एका जागेवर विटेवर निमूट उभे राहायला सांगतो, तर कोणी पाणी भरायला, जात्यावर दळायला त्याची मदत मागते. एकूण काय, तर  मायाळू, प्रेमाने वश होणारी अशी ही ‘विठूमाऊली’ आहे. ‘स्त्री-गुणांनी’ परिपूर्ण ‘नव्या पुरुषा’ची दैवी आवृत्ती ! विठूच्या लेकरांनी हीच परंपरा पुढे चालवली. मुक्ता, जनाबाई बंडखोर, तर ज्ञानोबा, नामदेव, एकनाथ लोण्याहून मऊ, प्रेमाने काठोकाठ भरलेले, सर्वांशी समतेने व्यवहार करणारे.

अनेक शतके विषमताधारित धर्म व जातीव्यवस्थेच्या बंधनात अडकलेल्या समाजात असे ‘नवे पुरुष’ अपवादस्वरूपच राहिले. पण ही बंधने ज्यांना काचत होती, त्या स्त्रियांना नक्कीच अशा ‘नव्या पुरुषा’ची आस लागून राहिली होती. त्यांच्या आसपास समाजातदेखील असे पुरुष तुरळक संख्येने का होईना, वावरत होते हे निश्चित. एरवी ‘मानलेल्या भावा’शी असणाऱ्या स्त्रियांच्या अनोख्या भावबंधाची मनोहारी रूपे आपल्याला लोकसाहित्यात, विशेषतः लोकगीतात इतक्या विपुलतेने आढळली नसती. मराठी लोकगीतात द्रौपदीचा सखा-मार्गदर्शक कृष्ण जसा ठायी-ठायी दिसतो, तसाच साध्याभोळ्या बायकांच्या हाकेला धावून येणारा (नात्याचा ना गोत्याचा) मानलेला भाऊही प्रत्यही भेटतो.

आधुनिक काळात म. फुलेंनी आपल्या विचार व कार्यातून जात-धर्माच्या पल्याड जाऊन स्त्रीच्या पाठीमागे उभा राहणाऱ्या ‘नव्या  पुरुषा’चा वस्तुपाठच उभा केला. गांधीविचारात करुणा, प्रेम व अहिंसा या मूल्यांना मध्यवर्ती स्थान असल्यामुळे त्यांच्या वैचारिक परंपरेत साने गुरुजी, एस एम जोशी यांच्यासारखे मातृहृदयी पुरुषही निर्माण झाले. त्याच परंपरेचा विकास करत दादा धर्माधिकारींनी स्त्री-पुरुष सहजीवनाची संकल्पना मांडून स्त्री व पुरुष दोघांनाही शोषक व्यवस्थेपासून कशी मुक्ती मिळवता येईल याचे सविस्तर विवेचन केले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात जातीसोबत स्त्रीदास्याचा कडवा प्रतिकार असल्यामुळे आणि त्यांनी सर्व जातीवर्गातील स्त्रियांच्या उन्नयनासाठी केलेल्या कार्यामुळे एक पुरुष स्त्री-पुरुष समतेसाठी काय करू सकतो याचा आदर्श घालून दिला. या समृद्ध वारशासोबतच धोंडो केशव कर्वे, रघुनाथ धोंडो कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, आगरकर, साने गुरुजी, विनोबा, दादा धर्माधिकारी, कॉ. शरद पाटील, आ. ह. साळुंखे अशा कितीतरी पुरुषांनी स्त्री-पुरुष समतेच्या विचारांची मशागत महाराष्ट्राच्या मनोभूमीत जाणीवपूर्वक केली आहे. मराठी मानस या सर्व पुरोगामी परंपरांमधून घडले आहे.

‘नव्या पुरुषा’ची प्रासंगिकता

भारतातील (व जगभरातील) स्त्रीचळवळ एका टप्प्यावर आल्यावर थबकली, यामागे अनेकविध कारणे  आहेत. पण या चळवळीने उंबरठ्याच्या आतील स्त्रियांना उंबरठ्याबाहेरचे विशाल जग दाखवले आणि ते व्यापण्याची प्रेरणा दिली, पण उंबरठ्याबाहेर वावरणाऱ्या पुरुषांची मुक्ती उंबरठ्याच्या आत गेल्याने होऊ शकेल हे मात्र सांगितले नाही; स्त्री-पुरुष समतेच्या लढ्यात सामील होण्यासाठी पुरुषांना सोबत घेतले नाही, हेदेखील त्यांपैकी एक कारण असू शकेल, ही मांडणी स्त्रीमुक्तीच्या समर्थकांपैकी काहींना सयुक्तिक वाटू लागली आहे. एकाच समाजाचे दोन अभिन्न घटक असणाऱ्या स्त्री व पुरुष ह्या दोघांनाही सोबत घेतल्याशिवाय समाज बदलू शकणार नाही. स्त्रियांची समस्या ही मुळात स्त्री, पुरुष (व अन्य लिंगी) यांच्या निरामय सहजीवनाची समस्या आहे. म्हणून पुरुषांना लिंगभाव समतेकडे नेणे हेच स्त्रीमुक्ती चळवळीचे पुढचे पाऊल असायला हवे, हा विचार आता हळू हळू देशात व जगभर पसरू लागला आहे. ‘नवा पुरुष’च्या निमित्ताने स्त्रीवादाला पूरक, समांतर अशा ‘मानुषवादाची’ संकल्पना मांडण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. 

या परिषदेत मराठी साहित्य, स्त्रीवाद,पुरुषत्व व लिंगभाव यांवर काम करणारे कार्यकर्ते व अभ्यासक, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक,पत्रकार, माध्यमकर्मी, कलावंत व अन्य संवेदनशील नागरिक एकत्र येतील. ते एकीकडे समाज, साहित्य, माध्यमे यांत ‘नवा पुरुष’ कुठे दिसतो याचा डोळसपणे, संवेदनशीलतेने मागोवा घेतील, तर दुसरीकडे तो ठळकपणे दिसत नसल्यास असे का घडते याची परखड समीक्षाही करतील.उदा.- गांधी, फुले, आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्या विचारप्रवाहांमधून स्त्रीदास्याचा विचार कसा हरपला याबद्दल परखड आत्ममूल्यांकन केले जाईल. निर्भयाच्या खुन्यांवर प्रसिद्धीचा झोत ओतणारी माध्यमे तिला अखेरपर्यंत साथ देणाऱ्या तिच्या मित्राबद्दल तसेच अशा मैत्रिणींची पाठराखण करताना मृत्युमुखी पडलेल्या मुंबईतील संतोष विचीवारा, किनन आणि रुबेनसारख्या तरुणांबद्दल मूक का राहिली याचाही जाबही या विचारपीठावरून विचारला जाईल.

आज सोशल मीडियाद्वारे सर्व वयोगटांच्या, सामाजिक स्तरांमधील परिचित-अपरिचित स्त्री-पुरुषांना प्रत्यक्ष न भेटता कृतक-संवादातून परस्परांच्या जवळ येण्याची संधी प्रथमच मिळाली आहे किंवा तसा भास निर्माण करण्यात ही माध्यमे यशस्वी झाली आहेत. स्त्री-पुरुषांच्या नात्यावर या ऐतिहासिकदृष्ट्या अपूर्व घटनेचा काय परिणाम झाला आहे हेदेखील या निमित्ताने तपासले जाईल. रसिकांच्या अंतर्मनाचा ठाव घेणाऱ्या नाटक, टीव्ही, चित्रपटांसारख्या माध्यमात ‘नवा पुरुष’ कितपत दिसतो; तो दिसावा, स्पष्टपणे प्रतिबिंबित व्हावा, तो लोकांना हवाहवासा वाटावा म्हणून काय प्रयत्न करावे लागतील याचाही विचार येथे होईल.

ही प्रक्रिया पुढे चालली तर पुरुषसत्तेविरुद्ध लढणारा विचारव्यूह म्हणून स्त्रीवादाच्या जोडीने ‘मानुषवादा’ची मूलभूत सैद्धांतिक मांडणी करणे व तिचे समायोजन साहित्य समीक्षा व विविध समाजशास्त्रीय विमर्शात करणे शक्य होईल. समाजात ‘नवा पुरुष’ निर्माण व्हावा म्हणून हे अभ्यासक, पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते व पुरुषांमध्ये काम करणारे गट यांना परस्परांची व या विषयातील अभ्यासकांची साथ लाभेल. कदाचित अशा सामूहिक प्रक्रियेतूनच स्त्री-पुरुष समतेचा दलदलीत अडकलेला गाडा पुन्हा गतिमान होऊ शकेल.             

कोणाला हे स्वप्नरंजन वाटू शकेल. पण कवी ‘पाश’च्या  शब्दात सांगायचे तर –

सब से खतरनाक होता है

हमारे सपनों का मर जाना ...

त्यापेक्षा स्वप्न पाहणे व त्यासाठी धडपड करणे काय वाईट?

.............................................................................................................................................

‘मध्यमवर्ग- उभा, आडवा, तिरपा’ या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

.............................................................................................................................................

लेखक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ‘आजचा सुधारक’ या मासिकाचे माजी संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.

ravindrarp@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Sarvesh V

Thu , 21 December 2017

निरूद्योगी लोक वेळ घालवण्यासाठी (टाईमपाससाठी) कोणत्याही टुकार विषयावर परिषद भरवतात. आज महिला सर्व क्षेत्रात पुरषाबरोबर काम करतात ते कोणाच्यातरी पाठिब्याशिवाय असते असे वाटते काय या लोकांना ? त्याबरोबर महिलांना विशेष सवलती मिळतात म्हणजे उशिरापर्यत यांना थांबवायचे नाही ( आणि पगार मात्र पुरूषाएवढाच) तसेच त्याच्याशी मानसिक दबाव येईल असे वागायचे नाही. महिला स्वत: इतरांना कोणालाही शिव्या देउ शकतात व मारहाण करू शकतात पण महिलांना कोणी शिव्या दिल्या किंवा चुकवून धक्का जरी लागला तर तो विनयभंग ठरतो. व त्याला लगेच अटक केली जाते. तसेच महिलेचे पुरूषाबरोबर परस्पर संमतीने शरिरसंबंध असतील व ब्रेकअप झाला तर ती महिला लगेच लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा पुरुषांवर दाखल करते व त्याला तत्परतेने जेलमध्ये पाठवले जाते. त्याचे नाव पेपरात दिले जाते व महिलेचे नाव गुप्त ठेवले जाते.पण पूरूषाला मात्र ब्रेकअप झाल्यावर काही गुन्हा वगैरे दाखल करता येत नाही. ब्रेकअपनंतर महिलेने आत्महत्या केली तर पोलिस प्रियकरालाच 'आत्महत्येस प्रवृत्त केले' म्हणून अटक करतात. त्याचे नाव जाहीर करतात. मिडिया त्याला लगेच नराधम ठरवून मोकळा होतो. पण प्रेमभंगानंतर पुरुषाने आत्महत्या केली तर मात्र पोलिस त्या मुलाच्या प्रेयसीला अटक करत नाहीत किंवा तिचे नाव जाहिर करत नाहीत. उलट आत्महत्या केलेल्या पुरूषालाच 'एकतर्फी प्रियकर'ठरवले जाते. हि सगळी उदाहरणे पेपरात आलेली आहेत कोणाच्यातरी मनातील नाहीत. हे असल सगळं आजूबाजूलाच घडत असेल तर माझ्या मते पुरूषाच्या मागेच खंबिरपणे उभेच राहणारया संघटनेची गरज आहे. विचार करा यावर


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......