इथं नांदते असहिष्णुता….
पडघम - सांस्कृतिक
डॉ. मोहन देस
  • डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ निघालेला मोर्चा
  • Tue , 15 November 2016
  • सांस्कृतिक Culture दाभोलकर Dabholkar पानसरे Pansare कलबुर्गी Kalburgi अभिव्यक्ती स्वातंत्र्य Freedom of Expression Intolerance असहिष्णुता

१८, १९, २०  नोव्हेंबर दरम्यान गोव्यात ‘दक्षिणायन’ हा अभिव्यक्ती उत्सव होत आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख…

साधारणत: आत्ममग्न असणारे, आपल्याच निर्मितीमध्ये मश्गूल असणारे आणि विक्षिप्त वाटाव्या अशा एकाकीपणातच श्रेय मानणारे लेखक, कलावंत, कवी, चित्रकार इतक्या मोठ्या संख्येनं एकत्र येणं ही खरं तर एक अदभुत अविश्वसनीय कहाणीच वाटेल. पण ती ३० जानेवारी २०१६ रोजी गुजरातमधील दांडी इथं साक्षात घडली. प्रा. गणेश देवी यांनी हाक घातली आणि थोडेथोडके नाही तर सुमारे साडेपाचशेच्यावर सृजनकर्ते स्त्री-पुरुष देशाच्या कानाकोपऱ्यातून आले. त्यात तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. स्वखर्चाने, प्रचंड वेडावाकडा अवघड प्रवास करून आलेले हे लोक माझ्यासारखेच दिवसभर भारावून गेले होते. अर्थात या सोहळ्याला सामाजिक चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांची साथ होती. हे कार्यकर्तेदेखील खरं तर अनेकदा चळवळीच्या रेट्याखाली गरजेप्रमाणे लेखक, कवी, गायक होतात; कधी चित्रकारही होतात! तर कधी कधी कलावंत होतात.

कलावंत आणि आस्वादक दोघांचाही प्रश्न

एकाकी  आणि एकटं असणं ही कलानिर्मितीसाठी अत्यावश्यक अवस्था असते हे खरं आहे. एकांत आणि मग्न स्थिती असल्याशिवाय निर्मिती होतच नाही. पण या अवस्थेच्या आधी आणि नंतर, दोन्ही काळात कलावंत व्यवस्थित जागा असतो आणि तो याच जगात जगत असतो… ज्या जगात बाकीचे लोक देखील जगत असतात. लढत असतात. हताश होत असतात, पण काहीतरी मार्गही काढत असतात. खुद्द कलावंतदेखील लढत असतो, हताश होत असतो, काही मार्गही काढत असतो.

एकदा का साहित्यनिर्मिती पूर्ण झाली की ती जनतेची होते. तेव्हा ज्यां पॉल सार्त्र म्हणतात त्याप्रमाणे साहित्यिक आणि वाचक यांच्यात एक अलिखित करार केला जातो. लेखक असं म्हणतो, “बाबा रे, हे वाच. पण हा वास्तवाचा एक फक्त तुकडा आहे. संपूर्ण सत्य नाहीये हे. तेही मला उमजलेलं. तुला ही कहाणी तुझ्या, तुझ्या आसपासच्या जीवनाला, माणसांना आणि मुख्य म्हणजे तुला, तुझ्या स्वत:च्या जगण्याला ताडून बघावी लागेल. या कथेचे धागे दोरे तुला ओढून आणि प्रसंगी ताणूनही इकडे तिकडे सर्वदूर न्यावे लागतील. या धाग्यांनी संपूर्ण वास्तव तुलाच विणायचं आहे. त्यात तुझेही धागे घाल!” आणि वाचक हे करत असतो. स्वनिर्मित धागेही त्यात बेमालूम विणून करार पूर्ण करत असतो. हे करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दोघांनाही मनोभावे हवं असतं. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा केवळ कलावंतांचा नाही. तो तेवढाच आस्वादकाचाही कळीचा मुद्दा आहे. या विणकामाच्या स्वातंत्र्याला मर्यादा घातलेली दोघांनाही बिलकुल चालत नाही.

"पण दाखवा ना, कुठं आहे असहिष्णुता?"

आज आपल्या आसपास एक विशेष राजकीय सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण निर्माण झालं आहे. कोणत्याही सृजनशील आणि संवेदनशील माणसाला ते भीषण वाटतं आहे. त्याचा कोंडमारा होतो आहे आणि त्याचा तो  थेट अनुभवदेखील आहे. तो खोटा कसा म्हणावा? असहिष्णुता एखाद्या वास्तूसारखी दाखवता येईल अशी नसते किंवा एखाद्या माणसाच्या देहासारखी किंवा एखाद्या झाडासारखी. पण ती अमूर्तही नसते. ती हवेत पेरली जाते. ती जाणवते, पण सर्वांनाच नाही. ती जाणवायला सहावं इंद्रिय असावं लागतं.

या असहिष्णुतेच्या काळात मधूनमधून काही विशिष्ट लोकांचे खून होतात. गवसलेल्या काही वास्तवाची, इतिहासाची, पुराणांची त्यांनी मोकळेपणाने उकल केल्यामुळे, थेट पोटातून बोलल्यामुळे, लिहिल्यामुळे त्यांचे थेट जीवच घेतले जातात. त्यावर काही संघटना खुन्यांची सांस्कृतिकपणे बाजू घेतात. शासन मानभावीपणाने हळूच स्टेजवरून खाली उतरून प्रेक्षागृहात अंधारातली खुडबुड जागा पकडतं. मौनम् सर्वार्थ साधनम् किंवा थोडी कुज्बुजम् कुज्बुजम् करत राहतं. मग काही काळ अस्वस्थ शांतता पसरते. या शांततेच्या काळात फोनवरून संस्कृतप्रचुर धमक्या, मॉर्निंग वॉक करण्याचे आरोग्य सल्ले, आता राज्य आमचं आहे आणि ते आम्ही तुमच्याच लोकशाही मार्गानं मिळवलं आहे असं दुर्दम्य सांगणं, व्हॉटसअॅप आणि फेसबुकवर सुश्लील शिवीगाळ, कोर्टाची बदनामी केली म्हणून खिसाभरू वकिलांचे जार्गनभरले फोन्स,  वैयक्तिक बदनामी, चारित्र्य हनन… असं बरंच काही चालू  झालेलं आहे.

सतत भय पेरून ठेवायचं हवेमध्ये! त्याला पाणी आणि खत घालायचं, असं धोरणच आहे मुळी. मुख्य म्हणजे त्याला उच्च प्रतिष्ठा दिली गेली आहे. त्यालाच नीतिमान मानलं जात आहे. भयाचं एक पातळ श्रेय हवेत पसरवलं जातंय. ते दिसत नाही पण प्लास्टिकच्या पिशवीसारखं नाका-तोंडाशी घट्ट जाणवत राहतं. यात आपला कदाचित चार्वाक होईल, तुकाराम होईल किंवा दाभोलकर-पानसरे होईल किंवा  रोहित वेमुला तरी होईल की काय असं एखाद्याला वाटणं साहजिक आहे. खास करून कला व साहित्य निर्माण करताना तसं वाटणं स्वाभाविक आहे. तेव्हा माणूस अगदी एकटा असतो. स्वत: शी लढत स्वत:ला मोकळं करत असतो. जीवाची भीती सोडा. मुरुगनसारख्या लेखकाला जिवंतपणीच आपला मृत्यू जाहीर करावा लागणं, हे तेवढंच भयावह आहे.

धाडस करून काही कलावंतांनी याच्या विरोधात निषेध म्हणून फक्त पुरस्कार परत केला. असं करताना तो कुणावर फेकून इजा केली नाही, कुणाला मारहाण केली नाही की शिवी दिली नाही. पण तेही काही 'सहिष्णू' लोकांना सहन झालं नाही. त्या लेखक-कलावंतांची क्रूर आणि अश्लील टिंगलटवाळी केली गेली. आणि वर विचारले गेले, कुठे आहे असहिष्णुता?

अशा एकूण सध्याच्या अभूतपूर्व वातावरणाच्या पार्श्वभूमीवर दक्षिणायनचं एक संमेलन दांडी इथं भरलं होतं, आता ते गोव्यात होत आहे.

…तरी काही प्रश्न

सामान्य माणसांच्या लेखी एकूणच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा कितव्या नंबरवर येतो? त्यातही साहित्याच्या, कलेच्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य किती महत्त्वाचं वाटतं सामान्य लोकांना? रोजच्या जगण्याच्या लढाईनं त्यांचं जीवन एवढं व्यापून गेलेलं असतं की, या तशा दूरच्या गोष्टींबद्दल विचार करायला त्यांना फारशी उसंत नाहीये. मग या स्वातंत्र्याची गळचेपी झालीये का नाही, हेही त्याला नीट समजत नाही. दिसत नाही. अभिव्यक्तीची गळचेपी होऊ लागते, तेव्हा अगदी तळागाळातून आलेल्या कलावंतालाही जे जाणवतं, खुपतं, सलतं; ते सामान्य लोकांपर्यंत पोचतं का?  आज ते पोचत नाही हे वास्तव आहे.

विकास, भौतिक विकास, चकचकीत विकास, फ्लायओवर्स (खरं तर प्रत्येक फ्लायओवर हे विकासाच्या पराभवाचं शिल्प असतं), उसळता शेअर बाजार, मॉल्स, चमकधमक विमानतळे, हजारो टीव्हीवाहिन्या, आयटीच्या हिरव्यागार निळ्याशार काचेरथंड बिल्डिंगा, सर्वदूर मोबाइल कंपन्या आणि त्यांची मिनारशिल्पं, सर्व सोयीनी सज्ज महाग खाजगी हॉस्पिटल्स, दहा सिनेमे एकाच वेळी दाखवणारी मल्टीप्लेक्सेस,  बुलेट ट्रेन्स आणि मेट्रो आणि त्याला जोडून येणारा रोजगार, पैसा, कपडे, रोज नवे नवे पदार्थ… या विकासाचं स्वप्न दाखवलं गेलं. त्यासाठी पंतप्रधान जगभर वणवण फिरताहेत. जनतेला भुरळ पडली. मध्यम आणि उच्च मध्यमवर्गाला त्याचं अप्रूप वाटणं, हे त्यांच्या कुवतीला धरूनच होतं, पण गरिबांनाही ते आपलं वाटतं आहे. तुमची लोकशाही,  संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्त्री पुरुष समता, जातिअंत, पर्यायी विकास हे सारं सारं दूर परीघावर लोटलं गेलं. ही सारी केवळ ग्रँड प्रमेयं वाटू लागली.

या लोक मानसिकतेसोबत आज आपल्या कलावंत, साहित्यिकांना बोलायचं आहे. संवाद घडवायचा आहे आणि तो सृजनात्मक देखील असायला हवा आहे. यातच कलात्मक श्रेयदेखील गुंफायचं आहे. आता नवे तुकाराम, चार्वाक, केशवसुत, सुर्वे, हुसेन, प्रेमचंद, टागोर, साहीर, ढसाळ, दया पवार, भीष्म सहानी, अमृता प्रीतम आणि शेरगिल यायला हवेत. यांची कला आणि साहित्य साजूकनाजूक सूक्ष्म किंवा अमूर्त बिलकुल नव्हतं, पण तरी ते अतिसुंदर होतं. अभिजातही होतं. त्याने सौंदर्य समीक्षेचे नवे निकष घडवले. जुने अडगळीत गेले, हा इतिहास आहे.

लोकांच्या लढ्यांशी कलावंताने आपला कलात्मक लढा साक्षात जोडून पाहायला हवा आहे. एका बाजूला अभिजात कलानिर्मिती चालूच राहायला हवी. दुसऱ्या बाजूला सामान्य जनांच्या जगण्याचे प्रश्नदेखील कलात्मक आवाहन करत असतात. विकासाच्या महाजेसीबी खाली चिरडल्या जाणारे, विस्थापित होणारे लोक, एका परासिसिटामॉलच्या गोळीसाठी जंगलची वाट तुडवावी लागणारी बाई, एचआयव्हीसह जगणारे लोक आणि मुलं, साठ टक्के अॅनिमिया स्त्रिया, सर्व गैरसोयींनी युक्त कुपोषित आश्रमशाळा, सर्व काही गमावून बसलेला ग्रामीण तरुण, वॉचमनची नोकरी शोधणारा आदिवासी तरुण, विकासाने भकास केलेली भूमी… हे आपल्या पेंटिंगचे, इन्स्टॉलेशनचे विषय नाही का होऊ शकत?

नाट्यकर्मी असलेला माझा मित्र अतुल पेठे नेहमी म्हणतो की, ‘कलावंतांनी आरोग्याच्या,  शिक्षणाच्या, पर्यायी विकासाच्या क्षेत्रातसुद्धा थेट उतरून काम करायला हवं.’ ते अगदी बरोबर आहे. मलाही माझ्या गरिब, कष्टकरी स्त्रियांच्या आरोग्य संवादाच्या कार्यक्रमात अभिजात कलावंतांची खूप गरज असते. खरंच असं झालं तर आपलं साहित्य आणि कला लोकांच्या सन्मुख तोंड करून उभी राहील. आपली सल त्यांच्या समोर जाईल. आणि लोक त्याचा सलोत्सव नक्की साजरा करतील.

मागच्या वेळच्या दांडी यात्रेमध्ये मी भारावून गेलो होतो आणि अशा सलोत्सवाचं स्वप्नही बघत होतो. तीन दिवसांनी गोव्यात सुरू होणाऱ्या सलोत्सवातही तेच होईल!

 

लेखक पेशाने डॉक्टर असून सामाजिक कार्यकर्ते आहेत.

mohandeshpande.aabha@gmail.com

Post Comment

om jagtap

Thu , 18 May 2017

sir first of all saluting to you and your essay. your writing is impressive & clear. your absolutely right, here have intolerance, its an intangible thing that's why some political's are saying where is it? its an shameful thing that our investigation team is just investigating till this date.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......