अजूनकाही
१. खासगी शाळांनी हिंदू विद्यार्थ्यांकडून नाताळच्या सणाची वर्गणी घेऊ नये, तसंच त्यांच्यावर हा सण साजरा करण्याची सक्ती करू नये, असा इशारा उत्तर प्रदेशातील हिंदू जनजागरण मंचानं दिला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील संघटनेचे सदस्य त्या परिसरातील खासगी शाळांमध्ये जाऊन यासंबंधीचं निवेदन संस्थाचालकांना देतील. खासगी शाळा या नाताळच्या सणाच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत असल्याचा आरोप मंचानं केला आहे. दरम्यान, सरकारनं अशा कोणत्याही आदेशाबद्दल आपल्याला माहिती नसल्याचं सांगत कानावर हात ठेवले आहेत.
हे तात्या लोक मुळात हिंदू विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या मिशनरी आणि कॉन्व्हेंट शाळांमध्ये जाताच कामा नयेत, असा फतवा का नाही काढत? ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी. त्यांनी सगळ्या हिंदू विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा काढून गो-रक्षा सप्ताह साजरा करावा आणि बैलपोळ्याची वर्गणी गोळा करावी. कारण, नाताळच्या सणात त्यातला धार्मिक भाग बटबटीत ऊग्र पद्धतीने मिरवला जात नाही, म्हणून तो अन्यधर्मीयही साजरा करतात, हे यांना समजण्याची काही शक्यताच नाही.
.............................................................................................................................................
२. पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील मालती माधव इमारतीतील दिवंगत साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला. घरात हस्तलिखितं आणि पुस्तकं सोडून काहीच नसल्यानं चोरट्यांना रिकाम्या हातीच परतावं लागलं. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी देखील पु. ल. देशपांडे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला होता. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास ७ ते ८ चोरट्यांनी कडीकोयंडा उचकटून पु. लं.च्या घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील सर्व सामानांची उलथापालथ केली. पण घरात किमती ऐवज नव्हता. पुलंनी लिहिलेली काही हस्तलिखितं व पुस्तकंच प्लॅटमध्ये होती.
मराठी समाजाच्या दारिद्र्यावर झगझगीत प्रकाश टाकणारी ही बातमी आहे. लोकप्रिय लेखकांच्या हस्तलिखितांना जगभरात लाखो रुपयांचा भाव मिळत असताना अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व आणि सुपरस्टार लेखक असलेल्या पुलंच्या घरातली ‘हस्तलिखितं आणि पुस्तकं’ हे ‘मौल्यवान ऐवज’ नाहीयेत, यातच सगळं आलं.
.............................................................................................................................................
३. गुजरातमध्ये विकासकामांमुळेच विजय झाला असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ‘जीता विकास, जीता गुजरात’ असं ट्विट मोदींनी केलं असून या विजयाचं श्रेय त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलं आहे. हिमाचल आणि गुजरातमधील निकालावरून जनतेनं सुशासन आणि विकासाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट होतं.
अगदी बरोबर आहे नरेंद्र मोदींचं. आता गेल्या वेळेपेक्षा काही जागा कमी आल्या, १५०च्या वर जागा येतील, असा विश्वास असताना शंभरीही गाठता आली नाही आणि मतांची टक्केवारीही ११ टक्क्यांनी कमी झाली असली, म्हणून काय झालं? बहुमत हे शेवटी बहुमत असतं. निवडणुकीत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा तर विकास झालाच की नाही? हेच ते ‘वेड्या विकासा’चं लक्षण आहे.
.............................................................................................................................................
४. पहिल्याच सामन्यात राहुल गांधी शून्यावरच बाद झाले, अशा शब्दांत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गुजरातमधील निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली.
पर्रीकर हे फार सचोटीचे आणि साधनशुचिता वगैरे मानणारे नेते आहेत, असा एक भ्रम जोपासला गेला आहे. ती सगळी शुचिता गुंडाळून गोव्यातल्या मतदारांनी स्वच्छपणे नाकारलेलं असताना पर्रीकर दिल्ली सोडून गल्लीच्या सत्तेवर जाऊन बसले आहेत. शून्यावर बाद झालेले असताना चिकीखाऊ अंपायरच्या साथीनं खोटेपणानं खेळपट्टीवर परतणाऱ्या खेळाडूनं किमान गप्प बसण्याची तरी शुचिता पाळायला हरकत नाही ना?
.............................................................................................................................................
५. काँग्रेसने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केल्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या, असं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा पक्ष मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
अमित शहा यांच्या तोंडून ‘प्रचाराची पातळी’ वगैरे शब्दप्रयोग आल्यानंतर झालेल्या हास्यस्फोटात १७ पत्रकारांच्या तोंडातून ढोकळ्याचा खकाणा उडाला, दोघांच्या घशात जिलबी अडकून त्यांचे प्राण कंठाशी आले, मुख्यालयाच्या उडालेल्या छपराचे काही भाग इतस्तत: कोसळले आणि अमितभाई प्रचाराच्या पातळीबद्दल बोलणार असतील, तर मी यापुढे आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाचंच अध्यापन करणार असं मुख्यालयाच्या दाराबाहेरच्या निरक्षर पानटपरीवाल्यानं जाहीर केलं, हे सगळं बिकाऊ मीडिया तुम्हाला सांगणार नाही.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Fri , 22 December 2017
नाताळच्या सणात त्यातला धार्मिक भाग बटबटीत ऊग्र पद्धतीने मिरवला जात नाही म्हणता? कार्निव्हल हे नाव कधी ऐकलंय? -गामा पैलवान