अजूनकाही
गुजरातचा निकाला लागला. सलग सहावी निवडणूक भाजप जिंकली. खरं तर हा एकतर्फी सामना होता. त्यामुळे विरोधी पक्ष किती सपाटून मार खातो एवढंच पाहायचं होतं. गुजरातच्या बरोबरीनं हिमाचल प्रदेशातही निवडणूक होती. तिथं तामिळनाडूप्रमाणे आलटूनपालटून सत्ता बदलत राहते. या वेळेस सत्तेवर यायची वेळ भाजपची होती. काँग्रेस देशभरातच विकलांग. त्यात हिमाचलमध्ये वीरभद्रांनी शरीर-मनानंच पायउतार व्हायची तयारी केली होती. पण जाता जाता स्वत: सुरक्षित मतदारसंघ निवडून आपल्या नेहमीच्या मतदारसंघात मुलाचं राज्यारोहन करून घेतलं. भाजपनं अंतर्गत भांडाभांडी मिटवत प्रेमकुमारांना थेट भावी मुख्यमंत्री जाहीर केलं. परवा निकाल लागले. त्यात अपेक्षेप्रमाणे, विजयी भाजपचे भावी मुख्यमंत्रीच पडले, हरले. हिमाचलच्या निवडणुकीचं इतकंच काय ते वृत्तांकन. तिथं नरेंद्र मोदी-राहुल गांधी गेले की नाही, काय म्हणाले, अमित शहांची रणनीती वगैरे गोष्टी होत्या, नव्हत्या, तरी सारख्याच.
सगळा रोख, प्रकाशझोत, चर्चा, वादळं, लाटा, हेलकावे, आरोप, प्रत्यारोप, दावे, प्रतिदावे, हे सगळं पाच-सहा कोटींच्या गुजरातमध्ये घडत होतं. सलग २२ वर्षं भाजप सत्तेत आहे. त्यातल्या तीन टर्म नरेंद्र मोदी व अमित शहा या दुकलीच्या. २०१४च्या मेपासून ही जोडी दिल्ली काबीज करून, राज्यामागून राज्यं जिंकत चाललीय. परवाचं हिमालय त्यातलं ताजं कोरं राज्य. देशात जवळपास २० राज्यात कमळ फुलवणारे मोदी-शहा गेला महिनाभर मात्र होम पिच गुजरातमध्ये तळ ठोकून बसले होतो.
वास्तविक ज्या गुजरात मॉडेलवर देश जिंकला, जे गेली तीन टर्म मोदीच चालवत होते, तिथं केवळ त्यांचे फोटो लावून (किंवा पादुका ठेवून) प्रचार केला असता, तरी स्पष्ट बहुमतासह १८२ पैकी (कमाल नाही!) १५० जागा कुठेच नस्त्या गेल्या, अशी सगळी पार्श्वभूमी होती. होम पिचवर कॅप्टननं सेंच्युरी मारून मॅच खिशात टाकायचा आणखी एक विक्रम नोंदवायचा एवढंच काय ते बाकी होतं.
पण यजमान संघाला त्यांच्या होमपिचवरच भिडायचं, हवामान, संघ, प्रेक्षक, खेळपट्टी यातलं अनुकूल कमी, प्रतिकूल जास्त. तरीही हरणारी लढाई शरणागत होऊन नाही तर लढून हरायची अशा ईर्ष्येनं कधी नव्हे ते गेल्या तीन वर्षांत प्रथमच काँग्रेस गुजरातमध्ये उतरली.
सामना नेहमीचाच मोदी विरुद्ध पप्पू! त्यामुळे पप्पूवरच्या नवीन विनोदांसाठी कमळवाले सरसावले होते. अमित शहा तर ‘मिशन १५०’ जाहीर करून कामाला लागले. शहांना आत्मविश्वास असा होता की, इतरांनी उर्वरीत ३२ जागेसाठीच प्रयत्न करावा व जमल्यास दोन-पाच जागा जिंकाव्यात. २०१४प्रमाणेच २०१९मध्येही पप्पूचाच पोपट करायचाय, या नुस्त्या कल्पनेनं ट्रोलिंग ब्रिगेड चेकाळली होती.
एवढ्यात अचानक हवा बदलली. नोटबंदी व विशेषत: जीएसटीमुळे हैराण बेपारी वर्ग मोदींच्या, जेटलींच्या नावं बोटं मोडू लागला. सलग काही महिने बाजारपेठा बंद ठेवल्या गेल्या. निषेधाचे फलक, सभा यांनी वातावरण तापू लागलं. ‘विकास गांडो थयो’ हा मोदींच्या जिव्हारी लागेल असा उपरोध समाजमाध्यमातून देशभर पसरला आणि मग भीड चेपावी तशी समाजमाध्यमं तीन वर्षांच्या कारभारावर मोदींवर, विकास, जीएसटी, नोटबंदी, आधार लिंक, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत, मोरीतून बोळा काढावा, तुंबलेलं मोकाट सुटावं तसं सैरावैरा धावू लागलं. त्यात श्याम रंगीला नामक तरुण स्टँड अप कॉमेडिअननं जे काही मोदी उभे केले, त्यामुळे तर पोलादी पडदाच सरकला. श्याम रंगीलाला २०१७चा ‘मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार द्यायला हरकत नाही, इतकी त्याची मिमिक्री तरुणाईच्या भाषेत सांगायचं तर ‘सही’ आहे. हा संघ-भाजपसह शहा-मोदी यांच्यासाठी मोठा झटका होता. आपलेच दात आपल्याच घशात असा अनुभव झाला त्यांना!
यात भरीस भर म्हणून आजारातून एखादं बाळ बरं होऊन आपल्या औषधपाण्यानं नव्यानं बाळसं धरून दुडूदुडू धावू लागावं, तसा राहुल गांधींमध्ये गुणात्मक बदल झाला. केवळ देहबोलीत नाही तर भाषा, आवेश, मुद्दे, त्यांची मांडणी यात आमूलाग्र बदल करत, त्याचीच पुनरावृत्ती सोशल मीडियावरही करत, त्यांनी काँग्रेससहित, माध्यमांसहित सगळ्यांनाच चकीत केलं. बदल झाला नाही तो एकाच बाबतीत. टार्गेटमध्ये! त्यांनी नेहमीप्रमाणे गावसकर, तेंडुलकर, कोहली टार्गेट असतात, तसं टार्गेट तेच ठेवताना बदललेल्या अॅप्रोचमुळे मोदींनाही आता टप्पल मारणं, टवाळी करणं कठीण झालं.
आपल्यातला व्यक्तिगत बदल, पर्यायानं पक्ष पातळीवर उतरलेली नवी ऊर्जा यांच्या जोडीला राहुल गांधींनी जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर आणि हार्दिक पटेल यांची साथ घेतली आणि त्यांना साथ दिली. हार्दिकनं आपला जनाधार पाटीदार आरक्षणाच्या निमित्तानं आधीच तयार केला होता. शहा-मोदींनी तो एकटाच भिडतोय गुजरातमध्ये. ओबीसी अल्पेश थेट काँग्रेसमध्येच गेला, तर जिग्नेश मेवानीनं आपला दलितत्वाचा निर्दलिय पर्याय राखून ठेवला. या तिघांमुळे अगदी ७७च्या निवनिर्माणासारखं वारं तयार झालं नाही, पण शहा-मोदींना सोपी, एकतर्फी, निकाली वाटणारी कुस्ती अचानक रंगतदार झाली. गुजरातची निवडणूक आता एक धक्का और दो इथपर्यंत या तिघांनी आणून ठेवली. मोदींच्या सभांची ओसरती गर्दी, हार्दिकचा वाढता प्रतिसाद, राहुल गांधी यांची संयत अचूक फेक यांनाही माध्यमात जागा मिळू लागली. ‘पप्पू’ गायब होऊन ‘वेड्या विकासा’चीच चर्चा हवा तापवू लागली.
सरळ, सोपी लढाई आता लाईटली न घेता लूज स्क्रू टाईट करण्याची वेळ आलीय, हे मोदी-शहा या दोघांना, त्यातही मोदींना अधिक लक्षात आलं. अहमद पटेलांच्या निवडणुकीच्या वेळी हा सैलपणा शहांना भोवला (की भोववला?) हे मोदी विरसले नसणारच. त्यामुळे वरकरणी त्यांनी या पोरखेळाकडे दुर्लक्ष करत आपली पाच कोटी गुजराती अस्मिता पुन्हा बाहेर काढली. कारण राहुल गांधी एलपीडब्ल्यू होत नव्हते, अल्पेश-जिग्नेश-हार्दिक आवरत नव्हते. अंकित माध्यमंही विचलित होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. राहुल गांधींच्या अध्यक्षपदावरून पुन्हा एकदा ‘मुघले आझम’ रंगवून झाला. पण परिणाम शून्य.
आणि अशातच मणिशंकर पावला. सुपारी घेतल्याप्रमाणे मणिशंकर अय्यर यांनी मोदींना ‘नीच माणूस’ म्हटले आणि मोदींनी हा कॅच वरचेवर पकडला! हा दुसऱ्या टप्प्यातला मणिशंकर टप्पाच आजच्या ९९पर्यंत घेऊन गेला. अन्यथा अजिबात नसलेली टक्कर कांटे की टक्कर झाली असती किंवा हाता-तोंडाशी आलेली सत्ता गेलीच असती!
सत्ता वाचली. विक्रम रचला. पण यासाठी काय काय करावं लागलं? पंतप्रधानपद विसरून रानोमाळ भटकावं लागलं. १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाचे पंतप्रधान पाच कोटीच्या राज्याच्या सत्तेसाठी इतके हात-पाय मारू लागले की, निवडणूक विधानसभेची की लोकसभेची हेच कळेना! नेहमीप्रमाणे अमित शहांच्या बूथ मॅनेजमेंटपासूनच्या कथा, दंतकथा, ‘जात’क कथा प्रसृत होत राहिल्या. हेलिकॉप्टरनचं नावीन्य न राहिलेल्या प्रचारात सी प्लेन उतरवलं गेलं आणि त्यातून मोदींची सफर माध्यमांनी अशी रंगवली जणू चंद्रावरच मानव उतरतोय!
मणिशंकर यांचा ‘नीच’ मोदींनी ‘नीच जाती’शी जोडला! २०१४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी हेच प्रियांका गांधींबाबत केलं होतं. ‘नीच प्रवृत्ती’ हे प्रियांका गांधींचे शब्द मोदींनी थेट ‘नीच जाती’शी जोडत, स्वत: ओबीसी, तेली असल्याचं जाहीर करून टाकलं! आणि मग तेली, ओबीसीसह पाच कोटी गुजरातींचा अपमान हे ओघानं आलंच.
यावेळीही त्यांनी हेच केलं. मणिशंकर मोदींना, पर्यायानं पंतप्रधानांना ‘नीच’ म्हणाले, त्यामुळे ते निंदनीय व पदाची प्रतिष्ठा मलिन करणारं हे निर्विवाद. त्यामुळे राहुल गांधींनी त्यांचं तत्काळ निलंबित करून पोलिटिकल करेक्टनेस दाखवला. पण अखंड भारतात कुणीही हा प्रश्न विचारला नाही की, ‘नीच प्रवृत्ती’ आणि ‘नीची जात’ यांचा परस्परसंबंध काय? खालच्या प्रतीचा आणि खालच्या जातीचा हे दोन वेगळे, स्वतंत्र विशेष आहेत. एखादा ‘नीट प्रवृत्ती’चा हा ‘नीच जाती’चा ठरत नाही. उच्चजातीयही ‘नीच’ असू शकतो! पण अय्यरांना भाषा व व्याकरण शिकवणारे सगळे मोदींना ‘भाषाकोविद’ ठरवून मोकळे झाले! या सार्वत्रिक अडाणीपणाला काय म्हणावं? मोदी अशा शब्दभ्रमकलेत माहीर आहेत.
मोदींनी दुसरा पाकिस्तान संदर्भातला आरोप करून तर सरळ सरळ त्यांनी स्वत:च पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली. खोटे तपशील, माहितीतील असत्यता आणि अत्यंत प्रच्छन्न पद्धतीनं केलेले आरोप पंतप्रधानपदाला न शोभणारे. पण हे त्यांना ऐकवणार कोण? त्याऐवजी भाटांनी विजयाचे नगारे वाजवण्यात कर्तव्यपूर्ती मानली.
पक्ष कार्यालयात, पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलताना या निवडणुकीत झालेली दमछाक त्यांच्या बोलण्यात दिसत होतीच. पण एक-दुसरा विखारही जाणवत होता. कारण सलग सहा विजयांचा विक्रम सांगताना प्रत्येक विजयात आपल्या जागा कमी होत गेल्या हे सत्य त्यांनी सांगितलं नाही! ते अपेक्षितही नव्हतं. पण पुन्हा त्यांनी आपला पराभव म्हणजे विकासाचा पराभव हे पुन्हा पुन्हा सांगितलं. ‘विकास गांडो थयो’ हे त्यांची दुखरी नस ठरलंय, हेच त्यामुळे अधोरेखित झालं.
मोदी-शहांच्या या ऐतिहासिक विजयाचं ऐतिहासिक वर्णन आणि तेही निष्पक्ष व खरंखुरं करायचं झालं तर ते पुढीलप्रमाणे करता येईल –
गड खचला, सिंह दमला!
पण शाबूत आयाळीनं पुन्हा गर्जला!
.............................................................................................................................................
संजय पवार यांच्या ‘चोख्याच्या पायरीवरून’ या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4203
.............................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sarvesh V
Thu , 21 December 2017
निष्पक्ष (?) आणि खरंखुर वर्णन (?) ...बाजारू पत्रकारांकडून आम्ही त्याची अपेक्षा करत नाही. आणि भाजपाचं जाऊ द्या हो ते २ वरून २८२ वर पोहोचलेत ...ते पण कष्टाने .. रिपब्लिकन पक्ष म्हणून एक पक्ष आहे. त्याने एवढ्या वर्षात कधी कोणती महानगरपालिका पण जिंकल्याचे एेकिवात नाही...त्यांवर लोकांचे काय मत आहे ?