अजूनकाही
१. चॉकलेट मिळवण्यासाठी मुले भांडतात, रडतात, चिडतातही. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आजही चॉकलेट इतकं प्रिय आहे की, ते मिळावं म्हणून ते दिविजा या त्यांच्या मुलीसोबत भांडतात. ‘भांडल्यानंतर ती तिच्याजवळचं चॉकलेट मला देते’, अशा गोड गप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालसाहित्य संमेलनात मुलांशी मारल्या. राजाराम सीताराम दीक्षित वाचनालय व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित बाल साहित्य संमेलनात राजाराम वाचनालयाच्या बालचमूनं मुख्यमंत्र्यांना अनेक बालसुलभ पण तितकेच पेचात टाकणारे प्रश्न विचारले. मुख्यमंत्र्यांनी खुसखुशीत उत्तरं दिल्यामुळे अनेकदा सभागृहात हशा पिकला.
संमेलनात पंकजा मुंडे (यांना चॉकलेटांऐवजी चिक्की प्रिय आहे), विनोद तावडे, एकनाथ खडसे यांच्याही मुलाखती घ्यायला हव्या होत्या. दिविजाप्रमाणे यांच्याशीही मुख्यमंत्र्यांचं चॉकलेटांवरून भांडण होत असतं. पण, ही सगळी एकसंघ वृत्तीची मुलं असल्यामुळे नागपूरच्या मिशीवाल्या काकांनी डोळे वटारले की, लगेच आपलं चॉकलेट त्यांच्या लाडक्या देवेंद्रला देऊन टाकतात!
.............................................................................................................................................
२. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या काळातच ईशान्य भारताचा विकास झाला, आता त्यांचंच काम मी पुढे नेणार आहे. आमच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी आजवर या भागाला १५० वेळा भेटी दिल्या आहेत. या भागाच्या विकासासाठी अनेक प्रकल्प त्यांनी या ठिकाणी उभारले, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी मिझोरामची राजधानी एजॉल इथं म्हणाले.
पंतप्रधानांचं अनेकवार अभिनंदन करायला हवं. एकतर ते देशातल्या देशात कुठेतरी गेले आहेत. तेही त्या राज्यात निवडणूक नसताना. देशाचा आधुनिक इतिहास आपल्यापासूनच सुरू होतो, या त्यांच्या खाक्याचा त्यांना विसर पडला आहे. आपल्याआधी, भले आपल्याच पक्षाचे का होईना, कोणीएक अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि त्यांनीही काही काम केलं होतं, असं मोदींनी म्हटलंय म्हणजे वाजपेयींनी आपल्या घराला रोषणाईच करायला हवी.
.............................................................................................................................................
३. पॉर्नजगतातून हिंदी सिनेमात आलेली अभिनेत्री सनी लिओनी हिचा बंगळुरूमध्ये वर्षअखेरीस होणार कार्यक्रम भारतीय संस्कृतीसाठी घातक आहे; ३१ डिसेंबरला बंगळुरुमध्ये सनीचा कार्यक्रम झाला तर, मोठ्या संख्येनं लोक एकत्र येऊन आत्महत्या करतील, असा इशारा ‘कन्नड रक्षक वेदिके युवा सेने’च्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. सनीनं साडी नेसून परफॉर्म केलं तर त्याला आमचा विरोध नसेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘कन्नड वेदिके’ची मंडळी आत्महत्या करण्याची खात्री देणार असतील, तर सरकारनं पोलिस संरक्षणात हा कार्यक्रम घडवून आणायला हवा. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी अन्य अनेक राज्यांमध्येही आत्महत्येच्या हमीवर हा कार्यक्रम आयोजित करायला हवा. दरम्यानच्या काळात, खजुराहोच्या मंदिराला झेड सिक्युरिटी पुरवण्याच्या दृष्टीनंही विचार करायला हवा.
.............................................................................................................................................
४. एखादा जवान कर्तव्य बजावताना कामी आला तर ‘हुतात्मा’ किंवा ‘शहीद’ असे शब्द वापरले जातात, पण आमच्या दस्तावेजांत मात्र हे दोन्ही शब्द नाहीत. त्यासाठी ‘युद्धबळी’, ‘सुरक्षा कारवाईतील बळी’ असे शब्द वापरतो, असं उत्तर संरक्षण व गृह खात्यानं केंद्रीय माहिती आयोगाला दिलं आहे.
‘शहीद’, ‘हुतात्मा’ वगैरे बिगरलष्करी गळेकाढू देशप्रेमींनी स्वस्त करून ठेवलेले शब्द आहेत. सीमेवरचा जवान असल्या भावुक बडबडबाजीमध्ये गुंतला, तर त्याची शस्त्रं भेंडी कापायच्याही योग्यतेची उरणार नाहीत. ही टोकनबाजी लष्करावर लादण्याच्या भानगडीतही पडता कामा नये.
.............................................................................................................................................
५. पाकिस्तान आणि बांगलादेशाच्या तुलनेत भारतातील अल्पसंख्याकांची स्थिती खूपच चांगली असल्याचं मत वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांनी व्यक्त केलं आहे. मातृभूमी बांगलादेशातून निर्वासित झालेल्या तस्लिमा यांना भारत घरासारखाच वाटतो. तस्लिमा म्हणाल्या, बांगलादेशात हिंदू आणि बौद्धांवर खूप अत्याचार होतात. मी पाकिस्तानला कधी गेलेले नाही, पण तिथं धार्मिक अल्पसंख्याकांचं बळजबरीने धर्मांतर आणि त्यांच्यावर अन्याय केलं जात असल्याचं वर्तमापत्रांत वाचलेलं आहे. या दोन्ही देशांच्या तुलनेत भारतात अल्पसंख्याकांची स्थिती खूपच चांगली आहे. भारताचे संविधान सर्वांसाठी सारखंच आहे, असं त्या म्हणाल्या.
बाई एका देशात जन्मल्या आहेत, दुसरीकडे गेलेल्या नाहीत, तिसरीकडे पाहुण्या आहेत; नागरिकत्व चौथीकडचंच आहेत. तरीही त्या अधिकारवाणीनं बोलू शकतात, हे छान आहे. भारतातली राज्यंसुद्धा पाकिस्तान आणि बांगलादेशापेक्षा मोठी आहेत. या देशांशी आणि तिथल्या परिस्थितीशी भारताची तुलना करणं हे या खंडप्राय देशाला कमीपणा आणणारं आहे. हे दोन्ही देश, भारतातल्या मूळ परंपरेपासून तुटून ‘अल्पसंख्याकवादा’चं भूत नाचवून जन्माला आले आहेत, तेव्हा ते वेगळे असणारच. आता चिंता करू नका. लवकरच आम्ही त्यांच्या पंक्तीला जाऊन बसण्याची सगळी तयारी केली आहे!
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 18 December 2017
टिक्कोजीराव, लष्करावर कोणीही टोकनबाजी करीत नाहीये. बातमी नागरी खात्याशी संबंधित आहे. कृपया मजकूर नीट वाचणे. असो. भारत लवकरच अल्पसंख्यवादांची भुतं नाचवणाऱ्या पाकिस्तान व बांगलादेशाच्या पंक्तीस जाऊन बसणार असं तुम्ही म्हणता. मात्र एक बाब चक्क विसरलात. भारत असा गेलाच तर तो बहुसंख्यवाद नाचवीत जाईल, अल्पसंख्यवाद नाचवीत नव्हे. अशा शाळकरी पातळीवरच्या चुका टाळाव्यात. अन्यथा तुमची वक्तव्यं वाचतांना पप्पूचा भास होईल. आपला नम्र, -गामा पैलवान