अजूनकाही
नदीवरचे 'घाट' हे सर्वसामान्य लोकांचं अनेक अर्थानं आकर्षण असतं. काही ठिकाणी हे घाट नदीला शोभा आणून तिचं सौंदर्य वाढवण्यास मदत करतात. विशेषतः धार्मिक स्थळांच्या ठिकाणी असलेल्या नदी घाटाला विशेष महत्त्व आलेलं असतं, कारण त्यावर 'पवित्र' स्नानापासून 'श्राद्धा'पर्यंत अनेक धार्मिक विधी केले जातात. अशा घाटावर गुजराण करणाऱ्या गोरगरीब नागरिकांची संख्याही खूप मोठी असते. 'घाट' हेच त्यांचं आश्रयस्थान बनलेलं असतं. अशा धार्मिक स्थळी असलेल्या नदीवरील घाटावर मिळेल त्यावर गुजराण करणाऱ्या गरिबांचं नेमकं आयुष्य असतं तर कसं, याचं अतिशय विदारक दर्शन 'घाट' या नवीन मराठी चित्रपटात पाहायला मिळतं. लेखक-दिग्दर्शक राज गोरडे यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात एका गंभीर सामाजिक विषयाला हात घालून, 'घाटा'वरील वास्तव मोठ्या पडद्यावर आणलं आहे. हे भेदक वास्तव विचारी मनाला अंतर्मुख करतं.
'घाट'मध्ये मन्या आणि पप्या या दोन जिवलग मित्रांची कहाणी आहे. ही कहाणी तशी मन्याच्या कुटुंबाचीही आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असलेला शाळकरी वयाचा मन्या, आपल्या आजारी आई व लहान बहिणीबरोबर आळंदीच्या 'घाटा'वर राहून कशीबशी गुजराण करत असतो. त्याचे वडील दारुडे असतात. ते दारूसाठी मन्याला व त्याच्या आजारी आईला सतत त्रास देतात. लहान असल्यामुळे मन्याचं त्यांच्यापुढे काही चालत नाही. पण मन्या 'स्वप्नाळू' असतो. आपले हे गरिबीचे दिवस जातील आणि चांगले येतील, या आशेवर तो व त्याचा अनाथ मित्र पप्या घाटावरचं जिणं आनंदानं जगत असतात.
आपल्या आजारी आईला बरं करण्यासाठी मन्या आणि पप्या दोघंही मिळेल ती कामं करून पैसे गोळा करत असतात. धार्मिक लोकांनी नदीच्या पात्रात टाकलेले पैसे पाण्यात बुडी मारून मिळवणं, गंध लावणं आदी कामातून ते पैसे मिळवत असतात. त्याचबरोबर घाटावर श्राद्ध करण्यासाठी आलेल्या लोकांना, पिंडाला कावळा शिवण्यासाठी फार वेळ वाट पाहायला लागू नये म्हणून स्वतः मन्यानं 'कावळ्या'ला खास बोलावण्याचं तंत्र शिकून घेतलेलं असतं. त्यातूनही त्याला पैसे मिळतात. परंतु हे सगळे पैसे त्याचा दारुडा बाप हडप करतो.
मन्याच्या आणि पप्याच्या या घाटावरच्या जीवनसंघर्षाला पुढे कसं वळण मिळतं? पिंडाला कावळा शिवण्यासाठी कावळा बोलावण्याची त्याची 'काव काव' थांबते की नाही? हे पाहण्यासाठी या 'घाटा'वर एकदा तरी जायलाच हवं.
लेखक-दिग्दर्शक राज गोरडे यांनी घाटावरच्या अशा लोकांचं जीवन जवळून पाहिलेलं दिसतं. धार्मिक रूढी आणि सामाजिक विषमता यांचं मनोज्ञ दर्शन या चित्रपटातून घडवण्यात त्यांना चांगलं यश आलं आहे. साधे व सुटसुटीत संवाद, तसंच छोट्या-छोट्या प्रसंगांतून त्यांनी घाटावरचं गोरगरिबांचं आयुष्य चांगलं उभं केलं आहे.
अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे आपला 'उघडा संसार' सावरण्यासाठी मन्या व त्याच्या आजारी आईची उडालेली तारांबळ, चोरी करताना पकडल्यामुळे आपल्या बापाला होत असलेल्या मारहाणीतून त्याला वाचवण्यासाठी गेलेला आणि बापाबरोबर स्वतःही बेदम मार खाणारा मन्या, भीक मागत फिरताना भूक लागल्यामुळे, घाटावर पिंडाला कावळा शिवल्यानंतर तशाच राहिलेल्या पत्रावळीवरील उष्टा भात खाणारी मन्याची धाकटी बहीण संगी आणि ते पाहून तिला पोटाशी घेणारा मन्या आदी प्रसंग मनाला चटका लावून जातात.
.............................................................................................................................................
‘मध्यमवर्ग- उभा, आडवा, तिरपा’ या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299
.............................................................................................................................................
घाटावरील चोरट्यांनी टोळी, तसंच टपरीवर चहा विकणाऱ्याचं फुलवालीवर असलेलं मूक प्रेम घाटावरच्या जीवनाचं अनोखं दर्शन घडवतात.
चित्रपटातील काही प्रसंग तुटक असल्याचं जाणवत असलं तरी त्यामुळे कथेची गाडी रुळावरून न घसरण्याची काळजी दिग्दर्शकानं चांगल्या प्रकारे घेतली आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण आळंदीच्या इंद्रायणीवरील घाटावर झालं आहे. त्यामुळे पार्श्वभूमीवर मृदंगाच्या साथीनं असलेच्या अभंगांमुळे या 'घाटा'ची खुमारी वाढली आहे. अमोल गोळे यांच्या उत्कृष्ट छायाचित्रणामुळे हा 'घाट' अधिक समृद्ध झाला आहे. तसंच रोहित नागभिडे यांच्या संगीतानंही त्यामध्ये भर घातली आहे.
मन्याची मध्यवर्ती भूमिका यश कुलकर्णीनं अतिशय चोखपणे पार पाडली आहे. पप्याच्या भूमिकेत दत्तात्रय धर्मे यानं त्याला चांगली साथ दिली आहे. मिता जगताप या अभिनेत्रीनं आजारी आईच्या भूमिकेत प्रभावी काम करून आपली निवड सार्थ केली आहे. उमेश जगताप यांनीही दारुडा आणि निष्ठुर बाप चांगला रंगवला आहे. रिया गवळी हिची 'संगी' आणि राज गोरडे यांचा 'चहावाला'ही चांगला लक्षात राहतो.
थोडक्यात, आळंदीच्या इंद्रायणीवरील या 'घाटा'चं दर्शन वरकरणी साधं, सरळ वाटत असलं तरी तरी सामाजिक विषमतेबाबत ते अतिशय विदारक असल्याचं या चित्रपटातून पाहायला मिळतं.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment