अजूनकाही
निवडणूक प्रचारात आणि मतदारांचं मत बनवण्यात प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडिया हे घटक एक मोठी प्रभावी हस्तक्षेपी शक्ती म्हणून पुढे येत आहे, हे गुजरात विधानसभा निवडणुकीत दिसलं. वृत्तवाहिन्यांच्या बातम्या, मुलाखती, ग्राउंड झिरो रिपोर्ट, लाइव्ह सभा दाखवणं, निवडणूक मतदान पूर्व सर्व्हे-पोल, निवडणूक मतदानोत्तर सर्व्हे-पोल हे घटक मतदारांवर खूप मोठा प्रभाव पाडताना दिसतात. गुजरात निवडणुकीच्या प्रचाराचे मुद्दे आणि दिशा जवळपास प्रसारमाध्यमांनी नियंत्रित केली होती.
या निवडणुकीत इंग्रजी प्रसारमाध्यमं पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, ‘गुजरात मॉडेल’बद्दल चिकित्सा करत होती, तर हिंदी प्रसारमाध्यमं भाजपधार्जिणी भूमिका घेत होती. स्थानिक गुजराती भाषिक प्रसारमाध्यमांवर भाजपाईंचा कबजा आहे. त्यामुळे ती माध्यमं भाजपची जवळपास प्रचारपत्रंच बनली होती.
ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल घेणारे लोकही भाजपच्या प्रभावाखाली आले होते. सीएसडीएस ही दिल्लीची संस्था सोडली तर बाकी सर्व निवडणूक सर्व्हे करणारे लोक भाजप पक्षपाती दिसत होते. अर्थात माध्यमांचं हे असं सत्तापक्षाला शरण जाणं, हे काही फक्त आपल्या देशातच घडतं असं नाही. जगभर वेगवेगळ्या देशांत माध्यमं कुणाची ना कुणाची बाजू घेऊन काम करतात. अगदी अमेरिकेचं उदाहरण जरी घेतलं तरी तिथली माध्यमं डेमॉक्रॅटिक पक्षाची पक्षपाती आहेत, असं बोललं जातं. रिपब्लिकनांची तशी तक्रार असते. ‘माध्यमं डेमाक्रॅटिक पक्षाची बटिक आहेत’, असं रिपब्लिकन नेते प्रचार करतात. अर्थात अमेरिकेतील काही माध्यमं ही सत्तापक्षाला प्रश्न विचारायची भूमिका सोडत नाहीत. त्यासाठी किंमत मोजायलाही तयार असतात. पण जगात इतरत्र मात्र असं उदाहरण विरळाच दिसतं. आपल्या देशातही इंग्रजी माध्यमांतला एक घटक सरकारला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो. हे प्रमाण कमी, क्षीण असलं तरी आशादायक नक्कीच आहे.
इंग्रजी मीडिया गुजरात निवडणुकीत बऱ्यापैकी चिकित्सा करण्याच्या भूमिकेत होता, पण गुजरातमध्ये हिंदी, गुजराती या भाषांव्यतिरिक्त तिसरी भाषा फारशी कुणी वाचत नाही. इतर भाषेतील वृत्तवाहिन्या कुणी बघत नाही. त्यामुळे गुजराती मतदारांवर गुजराती, हिंदी वर्तमानपत्रं आणि वृत्तवाहिन्यांचा मोठा प्रभाव दिसला. आणि या दोन्ही भाषांतील माध्यमं भाजपधार्जिणी भूमिका घेताना दिसली.
गुजरात निवडणुकीत सुरुवातीपासून हिंदी, गुजराती प्रसारमाध्यमं प्रचाराचा अजेंडा ठरवण्याच्या भूमिकेत शिरली. उदा. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले. राहुलनी सोमनाथाचं दर्शन घेतलं आणि प्रसारमाध्यमांनी मंदिरातल्या रजिस्टरमध्ये राहुल यांनी स्वत:च्या धर्माची नोंद ‘अहिंदू’ अशी केली, अशी आवई उठवली. सोमनाथ मंदिरात राहुलसोबत काँग्रेस नेते अहमद पटेल हेही होते. पटेल यांनी स्वत:चा धर्म अहिंदू लिहिणं स्वाभाविक होतं. पण राहुल यांनी स्वत: काही धर्म नोंदवला नव्हता. तो मुद्दा गुजरात निवडणुकीत दोन दिवस वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रं यांनी विक्रमी वेळा चघळला. आता या एवढ्या मोठ्या प्रमाणात फोकस झालेल्या मुद्द्याला उत्तर देण्याची वेळ मजबुरीनं काँग्रेसवर आली. काँग्रेस प्रवक्ते रणजीत सुरजेवाला यांनी उत्तर दिलं की, ‘राहुल हे नुसते हिंदू नाहीत तर जाणवेधारी हिंदू आहेत.’ मग राहुल कसे काश्मिरी पंडित घराण्यातले आहेत. त्यांचे आजोबा फिरोज गांधी जरी पारसी असले तरी त्यांची आजी इंदिरा गांधी पंडित नेहरू यांची मुलगी असल्यानं काश्मिरी पंडित आहे. शिवाय काश्मिरी पंडित शंकराचे भक्त असतात. त्यामुळे राहुल हे शिवभक्त आहेत. काश्मिरी पंडितांचा शिवरात्री हा महत्त्वाचा सण, उत्सव. इंदिरा शिवरात्रीला मनोभावे पूजा करत असत वगैरे चर्चा झाली.
ही सारी चर्चा जशी वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रांत रंगली, तशी सोशल मीडियात गाजली, फिरली. त्यामुळे उलटसुलट पद्धतीनं ही निवडणूक धर्म, धर्मभावना, सोमनाथ मंदिर अशी हेलपाटत राहिली. प्रसारमाध्यमं नव्या बातम्या मिळतात, हेडलाइन्स मिळतात म्हणून खूश आणि भाजपधार्जिणा हिंदुत्ववादी अजेंडा पुढे जातोय, याचं समाधान असल्यानं मजेत होती.
राहुल गांधींनी सुरुवातीपासून ही निवडणूक विकास, गुजरात मॉडेल, लोकांचे प्रश्न या मुद्द्यांभोवती फिरवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गुजरात सरकार आणि नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरून १४ प्रश्न विचारले. त्यातल्या एकाही प्रश्नाला भाजपकडून उत्तर दिलं गेलं नाही. या प्रश्नांमध्ये नोटबंदी, जीएसटी (गब्बर सिंग टॅक्स) यामुळे जनतेला बसलेला आर्थिक फटका, कापड व्यापारी, इतर लघु उद्योग व्यापारी यांना झालेला तोटा, शेतकरी, पाटीदार, ओबीसी, दलित यांचे प्रश्न, तरुणांना बेरोजगारीची बसणारी झळ यांचा समावेश होता. पण भाजपला या मुद्द्यांवर चर्चा करायची नव्हती. तसं झालं तर आपण अडचणीत येऊ हे त्यांना पुरतं उमगलं होतं. म्हणून भाजपनं प्रसारमाध्यमांना हाताशी धरून निवडणूक प्रचारात भावनिक विषय पुढे आणले. प्रसारमाध्यमांनीही त्यासाठी इमाने-इतबारे मदत केली.
निवडणुकीत पुढे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदी यांच्याबद्दल वापरलेला ‘नीच’ हा शब्द भाजपनं बॉम्बसारखा वापरला. ‘बघा बघा मला काँग्रेसवाले ‘नीच’ जातीचा म्हणाले’, असं मोदी जाहीरसभेत बोलले. मोदी हे प्रभावी वक्ते आहेत. गुजराती लोकांना भावनिक पद्धतीनं, नाटकी भाषणशैलीत कसा मुद्दा गळी उतरवायचा, हे त्यांना चांगलंच अवगत झालंय. तो हातखंडा त्यांनी वापरला. ‘मी ओबीसी आहे म्हणून मला काँग्रेसवाले ‘नीच’ जातीचा म्हणाले. ओबीसी घरात जन्मलो म्हणून मी काय ‘नीच’ झालो काय?,’ असं भावनिक आवाहन मोदींनी केलं. आणि हा शब्द स्फोटक झाला. लोकांना तो पटला. विशेषत: त्यामुळे ओबीसी मतदारांमध्ये मोदींबद्दल सहानुभूतीची लाट उसळली. हा मुद्दा काँग्रेसवर एवढा आदळला की, त्यांना मणिशंकर अय्यर यांना पक्षातून काढावं लागलं. अय्यरांना माफी मागावी लागली. ‘माझी भाषा हिंदी नाही. त्यामुळे ही गफलत झाली. माझा उद्देश जातीवरून काही बोलण्याचा नव्हता,’ असा खुलासा त्यांना करावा लागला.
खरं तर अय्यरांनी ‘नीच’ शब्द वापरला, पण ‘नीच जाती’चा असा उल्लेख केला नव्हता. मोदींनी ‘नीच’ या शब्दापुढे ‘जातीचा’ असा उल्लेख मुद्दामहून केला. त्यामागे त्यांचा हेतू राजकारण करण्याचा होता हे उघड आहे. पण सुरुवात काँग्रेसनं केली होती. त्याचा वापर भाजपवाले करणार हे स्वाभाविक होतं. या खेळाला प्रसारमाध्यमांनी पुरेपूर जागा दिली. त्याचा गुजराती जनतेवर मोठा प्रभाव पडला. ९ डिसेंबरला मतदानाचा पहिला टप्पा होता. त्या दिवसापूर्वी हे घडत होतं.
मंदिर, मणिशंकर या मुद्द्यांसोबतच निवडणूक काळात दिल्लीत पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांसोबत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची झालेली बैठक हा मुद्दा पुढे आला. नेमकी ही बैठक मणिशंकर यांच्या घरी झाली. त्यामुळे गुजरात निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करतोय, त्याला काँग्रेस नेते उपस्थित राहतात, मोदींना हटवण्याचा हा कट आहे, अहमद पचेल या मुसलमानाला गुजरातचा मुख्यमंत्री करण्याचा हा कट आहे, अशी माहिती खुद्द मोदींनी जाहीरसभेत रंगवून सांगितली. त्यानंतर तर मंदिर, मणिशंकर आणि पाकिस्तानचा हात हेच निवडणुकीचे मुद्दे झाले.
हे वातावरण प्रसारमाध्यमांनी एवढं गडद बनवलं की, काँग्रेसचा हात म्हणजे पाकिस्तानचा हात, काँग्रेस म्हणजे पाकिस्तान एवढं विखारी वातावरण या निवडणुकीत तयार झालं. प्रत्येक काँग्रेस नेता, कार्यकर्ता याला भाजपनं पाकिस्तानच्या रूपात उभं केलं. वर्तमानपत्रांची पानंच्या पानं बातम्या, जाहिराती यामध्ये मंदिर, मणिशंकर आणि पाकचा हात या मुद्द्यांचा महापूर आला. वृत्तवाहिन्यांच्या चर्चांनी या महापुराचं रूपांतर अधिक मोठ्या संकटासारखं चितारलं.
९ डिसेंबरला मतदानाचा पहिला टप्पा झाला आणि लगेच संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी निवडणूक पोल आले. त्यात भाजप कसा पुढे आहे आणि काँग्रेस कशी पिछाडीवर गेली, याच्या चर्चा रंगल्या. या चर्चांचा प्रभाव मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यावर पडला नसता तरच नवल. प्रसारमाध्यमांना नेमकं हेच करायचं होतं. आणि ते करत त्यांनी निवडणूक प्रचाराची दिशा स्वत:च्या पद्धतीनं नियंत्रित केली, पुढे नेली.
गुजरात निवडणूक निकाल सर्व्हे, पोल यांविषयी शंका व्यक्त करण्यात आली. तसं बघितलं तर दिल्ली, बिहार विधानसभा निवडणुकीतच निवडणूक सर्व्हे चाचण्यांचा फोलपणा उघड झाला होता. त्यांच्यावरचा सत्तापक्षाचा प्रभाव जाहीर झाला होता. आता तर त्यांची विश्वासार्हता पूर्ण रसातळाला गेली आहे. या चाचण्यांचे सॅम्पल, त्यांची निवड, पद्धत याबद्दल पारदर्शकता नसते, असं योगेंद्र यादव यांनीच म्हटलं. ते बोलकं आहे.
आपल्या देशात १९८० साली निवडणूक अंदाज चाचण्या घ्यायला सुरुवात झाली. टाइम्स ऑफ इंडिया समूहानं १९८०साली लोकसभा निवडणुकीसाठी पहिली निवडणूक निकाल चाचणी करवून घेतली. एनडीटीव्हीचे प्रमुख प्रणव रॉय आणि मार्ग या मार्केट रिसर्च फर्म यांना ते काम देण्यात आलं होतं. या चाचणीत प्रणव रॉय यांनी इंदिरा गांधी दोन तृतीयांश बहुमतानं निवडून येतील असं भाकित केलं होतं. आणीबाणीनंतर जनता पक्ष सत्तेवर होता. त्या पक्षाविरोधात एवढं विक्रमी मतदान इंदिरा गांधींना होईल याची कल्पना राजकीय पंडितांना नव्हती. इंदिरा गांधी आणीबाणीत बदनाम झाल्या होत्या. त्यांना मतदार एवढ्या मोठ्या प्रमाणात कसं स्वीकारतील असं लोकांना वाटत होतं. पण हे निवडणूक अंदाज बरोबर ठरले.
तेव्हापासून आपल्याकडे निवडणूक अंदाज चाचण्या होतात. प्रणव रॉय, योगेंद्र यादव हे या क्षेत्रातील विश्वासार्ह नावं आहेत. पण त्यांच्यानंतर या चाचण्या म्हणजे एक धंदा झाला. त्यातलं शास्त्र कमी झालं आणि राजकीय पक्षांना त्याचा सत्ता मिळवण्यासाठीचं, मतदारांना प्रभावीत करण्याचं शस्त्र म्हणून वापर सुरू झाला. चाचण्या घेणाऱ्या संस्था राजकारण्यांच्या प्रभावाखाली गेल्या. त्यामुळे सध्या त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह तयार झालंय. गुजरात निवडणुकीत ते अधोरेखित झालं.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299
.............................................................................................................................................
लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment