अजूनकाही
१. काँग्रेसने त्यांच्या वकुबानुसार चार आणे बंद केले, आम्ही आमच्या क्षमतेनुसार पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला : पंतप्रधान नरेंद्र मोदी
काका, काँग्रेसने बंद केलेले चार आणे आठ दिवसांनी गुलाबी बनून बाहेर आले नाहीत. ते कायमचे बंद झाले. तुम्ही नोटा कायमच्या रद्द केल्या नाहीत, फक्त चलनबदल केलाय. दोन्हीत फरक असतोय. शिवाय दोन हजाराची नोट वाढलीच की हो!
..........
२. आज गरीब शांतीने झोपत असून श्रीमंत झोपेच्या गोळ्या खात आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
आपल्या अर्थव्यवस्थेत गरिबाला अर्धपोटी अवस्थेत शांतीने झोपण्यापलीकडे तसाही काही पर्याय नव्हता, त्यात चलनबदलाचा संबंध काय? आता तर बिचाऱ्यांकडे झोपेच्या गोळ्या सोडा, जहरही खायला पैसे नाहीत. यात कौतुकानं सांगण्यासारखं काही नाही.
..........
३. अमेरिकेच्या अध्यक्षपदावर नव्यानं निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण राष्ट्राध्यक्ष म्हणून वर्षाला केवळ एका डॉलरचं मानधन घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात आपण एकही सुट्टी घेणार नसल्याचंही ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे.
‘इस एक डॉलर की कीमत तुम क्या जानो ट्रम्प बाबू?’ असं अमेरिकन नागरिक धास्तावून म्हणत असतील. ट्रम्प यांनी जास्तीत जास्त सुट्या घ्याव्यात, यासाठी देशभर आंदोलनं झाली, तरी आश्चर्य वाटायला नको!
..........
४. ट्विटर आणि फेसबुक यांसारख्या समाजमाध्यमांनी अमेरिकेच्या ऐतिहासिक निवडणुकीत माझा विजय होण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे : डोनाल्ड ट्रम्प
लाखो अमेरिकन ही दोन्ही माध्यमं सोडून पळ काढू लागले असतील आणि एव्हाना अघोषित बहिष्कार घातला असेल त्यांनी स्वयंस्फूर्तीनं.
..........
५. ‘सैराट’चे हक्क करण जोहरने घेतल्याची चर्चा
एक असते आर्ची, ती एका श्रीमंत उद्योगपतीची इंग्लंडच्या पॉश कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी असते… परश्या हा भारतातल्या एका गरीब मच्छिमाराचा (फक्त तीन एकराचा बंगला, दोनशे ट्रॉलर आणि तीन हेलिकॉप्टर एवढंच असतं त्यांच्याकडे) मुलगा असतो… त्याची बंद पडलेली फरारी आर्ची किक मारून सुरू करून देते… दोघे इंटरव्हलनंतर अमेरिकेला पळून जातात… एक गरीब भारतीय स्त्री (तिचा फक्त दीडशे एकरांचाच रँच असतो आणि तिच्याकडे फक्त तीन हजारच घोडे असतात) त्यांना आसरा देते… परशा घोड्याला खरारा करण्याची नोकरी करतो… आर्ची कोकाकोलाच्या बाटल्या विसळण्यापासून सुरुवात करते आणि नंतर बाटलीबॉय कंपनीची अध्यक्ष बनते… शेवटी आर्चीचा भाऊ प्रिन्स मॅनहॅटनमधल्या तिच्या अपार्टमेंटवर हेलिकॉप्टरमधून उतरतो, इथपर्यंतचा स्क्रीनप्ले लिहून तयारही आहे म्हणे…
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment