अजूनकाही
१. अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेनं नव्या सूर्यमालेचा शोध लावला आहे. ‘केप्लर स्पेस’ टेलिस्कोपद्वारे हा शोध घेण्यात आला आहे. नासाचं हे मोठं यश मानलं जात आहे. सध्या नासा गूगलसोबत ‘एलियन वर्ल्ड’चा शोध घेत आहे. केप्लर स्पेस टेलिस्कोपद्वारे या नव्या सूर्यमालेचा शोध लावण्यात आला आहे. या सूर्यमालेत आठ ग्रह आहेत. नवी सूर्यमाला पृथ्वीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी मोठी आहे.
या सूर्यमालेत उदयाला आलेलं विश्वनेतृत्व इतकं मोठं आहे की, त्याला सध्याची सूर्यमाला लहानच पडणार आहे. त्यामुळे ३० टक्के मोठ्या सूर्यमालेचा शोध लागणं स्वाभाविकच होतं. नस्त्रादेमऋषींनी तशी भविष्यवाणीच केली होती. नासाला हा शोध आत्ता लागला. आपल्या पुरातन ऋषीमुनींनी वेदांमध्ये आधीच या सूर्यमालेचं वर्णन लिहून ठेवलेलं आहे. बात्रा किंवा पात्रा यांच्यातला जो कोणी आधी मोकळा होईल, तो देईलच शोधून सगळे संदर्भ.
.............................................................................................................................................
२. राज्यातील सत्तेत शिवसेना विरोधक नसली तरी सत्तेची पहारेकरी आहे. या वर्षभरात शिवसेना सत्तेला लाथ मारू शकेल. त्यानंतर आम्ही स्वबळावर सत्तेत येऊ. मात्र, याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. सरकारमधून बाहेर पडण्याचा मुहूर्त निश्चित झाल्यानंतर सगळ्यांनी एकजुटीनं काम करण्याची गरज आहे. अपेक्षित परिवर्तन घडवण्यासाठी शिवसेनेला एकहाती सत्ता द्या, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. वर्षभरात राज्यातील सत्तेतून बाहेर पडू, या आदित्य यांच्या वक्तव्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेना सध्या राज्यातील सत्तेत वाटेकरी असली तरी सरकार मात्र आमचं नाही, अशी भावना यावेळी राऊत यांनी बोलून दाखवली.
अरे अरे, आता आमदारांना पुन्हा राजीनामे लॅमिनेट करून घेण्याचा खर्च येणार. वर्षभर ते खिशात चांगल्या अवस्थेत ठेवायचे, तर पर्यायही नाही ना दुसरा. लाथ मारण्याचा मुहूर्त टिळक पंचांगानुसार काढणार की दाते पंचांगानुसार. काशीहून गागाभट्ट वगैरेही बोलवून ठेवा. आम्हीही सुवर्णाक्षरांचं पेन सज्ज ठेवतो... त्याचीही शाई वाळून चाललीये नुसती गेली तीन वर्षं.
.............................................................................................................................................
३. १८२ विधानसभा जागांच्या गुजरातमध्ये भाजपने केवळ ११ तर काँग्रेसनं १० जागांवर महिलांना उमेदवारी दिली होती. यावेळीही विधानसभेत महिलांचं प्रतिनिधित्व दहा टक्केही नसेल, हे स्पष्ट झालं आहे.
महिलांची खरी जागा चुलीपाशीच आहे आणि खरं काम मुलांना जन्म देण्याचंच आहे, असं गर्वानं वगैरे मानणाऱ्या विचारधारेचं सरकार असताना महिलांना बरोबरीचं स्थान मिळण्याची शक्यताच नाही. त्यांना १० टक्के प्रतिनिधित्व मिळतंय हेच खूप आहे. देशाला महिला पंतप्रधान देणाऱ्या आणि महिला अध्यक्ष असलेल्या काँग्रेसलाही महिला उमेदवार सापडू नयेत, हे मात्र मोठं दुर्भाग्य आहे!
.............................................................................................................................................
४. शेतकरी कर्जमाफीतील अनागोंदीचा कारभार सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेच्याच एका आमदारानंच उघड केला आहे. आमदार प्रकाश आबीटकर यांनी अर्ज न करताही खात्यात कर्जमाफीचे २५ हजार रुपये जमा झाले आहेत. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना शेतकऱ्यालाच लाभ मिळावा, बोगस शेतकरी दाखवून कुणाला गैरफायदा घेता येऊ नये, यासाठी अर्ज स्वीकारण्यापासून ते कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. मात्र, लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे समोर आले आहे. आपल्याबरोबरच शिक्षक आणि सरकारी अधिकाऱ्यांनाही कर्जमाफी मिळाली, असा आरोप आबीटकर यांनी केला.
आबीटकर हे कर्जमाफीला पात्र आहेत, हे कोणत्याही कागदपत्राविना, आपोआप सिद्ध झालं आणि पैसे जमा झाले, याचा खरं तर त्यांना आनंद व्हायला हवा होता. कसलीही उस्तवार न करता सरकारकडून एक छदाम तरी सुटतो का कधी? इथं हे सरकार केवढ्या वेगानं काम करतंय, ऑनलाइनच्याही पुढे चाललंय, ऑफलाइनही पात्रता ओळखतंय आणि सरकारमधल्याच एका आमदाराला त्याचं कौतुक नसावं? ‘अर्ज न करताच मला कर्जमाफी मिळाली, मी लाभार्थी, हे माझं सरकार’ असं खरंतर त्यांनी कौतुकाने म्हणायला हवं होतं.
.............................................................................................................................................
५. येत्या २६ जानेवारीपासून मुंबईतील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये पोलिसांना आठ तासांची पाळी सुरू करण्यात येणार आहे. देवनार पोलीस ठाण्यात दीड वर्षांपूर्वी हा प्रयोग राबवल्यानंतर शहरातील ४९ पोलीस ठाण्यांचा कारभार तीन पाळ्यांमध्ये यशस्वीपणे सुरू करण्यात आला. गुरुवारी त्यात आणखी १५ पोलीस ठाण्यांची भर पडली. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या पुढाकारानं या प्रयोगाला सुरुवात करण्यात आली. नेहमीच्या कामकाजासोबत महापालिका निवडणूक, बकरी ईदसह मोठे सण, महापुरुषांची जयंती या धावपळीच्या काळातही देवनार पोलिसांनी उपलब्ध मनुष्यबळाचे अचूक नियोजन करून आठ तासांच्या तीन पाळयांमध्ये यशस्वीरीत्या काम करून दाखवलं. सध्या ६४ पोलीस ठाण्यांचे काम तीन पाळय़ांमध्ये सुरू आहे. तूर्तास ही कार्यपद्धती पोलीस ठाण्यांमध्ये नेमणूक असलेल्या पोलीस शिपाई ते साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित आहे. भविष्यात पोलीस मुख्यालय, सशस्त्र विभागासह अन्य शाखांमध्येही ही कार्यपद्धती सुरू करता येईल का, यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
कोणतीही शोबाजी न करता आयुक्त पडसलगीकरांनी पोलिसांचं व्यक्तिगत आयुष्य त्यांना बहाल करण्याच्या दिशेने उचललेलं हे पाऊल कौतुकास्पद आहे. हळूहळू पोलिसांची राज्यभरातली वेठबिगारी संपुष्टात आणली पाहिजे. पोलिस दल सक्षम राहायचं असेल, तर पोलिसांचं व्यक्तिगत शारीरिक मानसिक आरोग्यही जपायला हवं. अर्थात, यातून उपलब्ध होणारा वेळ पोलिसांनी सत्कारणी लावायला हवा, खात्याशी संबंधित एक्स्ट्राकरिक्युलर उपक्रमांमध्ये ते रमले, तर मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाईल.
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sat , 16 December 2017
टिक्कोजीराव, मला एक सांगा की, तुम्ही स्त्रियांचा इतका द्वेष का करता? महिलांनी घर सांभाळलं आणि मुलाबाळांवर संस्कार केले तर तुमच्या पोटात का दुखतं? भाजप वा मोदी वा संघाच्या कुठल्या घोषणेत बायकांचा तुच्छ उल्लेख केला आहे? निर्मला सीतारामन आणि सुषमा स्वराज या पूर्ण बायका असून हिजडे निश्चितंच नाहीत. शासनातली महत्त्वाची पदं भूषवतांना या बायकांना कसलीही अडचण आली नाही. तुम्हाला कसलं दुखणं सतावतंय मग? आपला नम्र, -गामा पैलवान