अजूनकाही
माणसाची 'स्वओळख' हे एक गुंतागुंतीचं प्रकरण आहे. वैयक्तिक आयुष्य, ऑफिसमधलं बॉसच्या नजरेसमोरचं तुमचं स्थान, तुमच्या लाईफ पार्टनरला तुमच्याबद्दल असणाऱ्या भावना, मित्रांच्या ग्रुपमधली तुमची ओळख, अशा अनेक घटकांनी तुमची स्वओळख कशी असणार हे ठरत असतं. तरी स्वओळखीचा हा गुंता या सगळ्या घटकांना दशांगुळे व्यापून उरतोच. माझं अस्तित्व आहे म्हणजे नेमकं काय आहे असा प्रश्न ज्याला पडत नाही असा मनुष्यप्राणी विरळाच. दिग्दर्शक, लेखक, अभिनेता रजत कपूरला अस्तित्ववाद म्हणजे काय, सत्य नेमकं कशाला म्हणायचं, असे बरेच मूलभूत प्रश्न नेहमी पडत असावेत. कारण तो जो सिनेमा करतो, त्या प्रकारच्या सिनेमात हे प्रश्न वारंवार आपल्यासमोर प्लेटमध्ये सजवून एखादी डिश समोर यावी तसे येतात आणि प्रेक्षक म्हणून विचार करायला मजबूर करतात.
त्याच्या 'रघु रोमिओ' सिनेमातलं मुख्य पात्र रघु (विजय राज) हा एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेला असतो आणि एका भ्रामक जगात राहत असतो. 'आंखो देखी'मधला बाऊजी (संजय मिश्रा) जोपर्यंत प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत नाही आणि अनुभूती घेत नाही, तोपर्यंत एखादी गोष्ट सत्य आहे असं मानत नाही. रजतच्या सिनेमातल्या मुख्य पात्रांचा शेवट अनेकदा आपल्या सिनेमाच्या 'हॅपी एंडिंग' संस्कृतीमध्ये बसत नाही. एक देश म्हणून, एक समाज म्हणून आपल्याला आपल्या 'साचेबद्ध' पणाचा उत्सव करायला आवडतं. आपली फिल्म इंडस्ट्रीही त्याला अपवाद नाहीच. अशा इंडस्ट्रीत रजत कपूर सातत्यानं एका मागे एक वेगळ्या फिल्म्स करत जातो, पण तेच तेच पाहण्याची सवय लागलेला प्रेक्षक त्याच्याकडे काहीस दुर्लक्ष करतो. 'मिथ्या' ही सत्य नेमकं काय असतं, स्वओळख म्हणजे काय असतं, या प्रश्नांचा वेध घेणारी पाथब्रेकिंग फिल्म आपल्याकडे दुर्लक्षित राहिली, यात आश्चर्यकारक वाटण्यासारखं काही नाही.
अमिताभ बच्चनच्या गाजलेल्या 'डॉन' या चित्रपटाच्या कथेच्या जर्मवर रजतने 'मिथ्या' बनवला. 'मिथ्या' हा गँगस्टर जॉनरमधला अत्युकृष्ट असून दुर्लक्षिलेला गेलेला चित्रपट आहे. थोडं विषयांतर म्हणून सांगायचं तर याच थीमवर बनलेला यशराजचा 'औरंगजेब' हाही एक उत्कृष्ट सिनेमा आहे. एक कायमस्वरूपी बॉलिवुड स्ट्रगलर एकदम त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉनची जागा घेतो, अशी वन लाइनर या चित्रपटाची सांगता येईल.
चित्रपटाचा ओपनिंग सीन एका धुरकट अंधाऱ्या बारमध्ये सुरू होतो. वातावरणात धूर गच्च भरून राहिलाय. अतिशय फिकट पिवळसर मंद प्रकाश . बारगर्ल्स नाचत आहेत. कुठलंतरी आयटम साँग दणक्यात वाजत आहे. अचानक काही गुंड बारमध्ये शिरतात. हिरोसारखा दिसणारा माणूस आत शिरतो आणि बारच्या काउंटरवर बसलेल्या माणसाच्या डोक्यात गोळी घालतो. प्रेक्षक सरसावून बसतो. आणि जोरात आवाज घुमतो, 'कट’. आणि प्रेक्षकांना कळत की, अरेच्या हे तर शूटिंग चालू आहे. हा तर सिनेमातला सिनेमा. प्रेक्षक उत्सुकतेने त्या हिरोसारख्या माणसाला बघायला लागतात. हाच सिनेमाचा हिरो असणार. पण इथं प्रेक्षकांचा अंदाज चुकतो. कॅमेरा पॅन होतो आणि काउंटरवर गोळी खाऊन निपचित पडलेल्या माणसाचा अभिनय करणाऱ्या अभिनेत्यावर जाऊन स्थिर होतो. हा आपला हिरो. वीरेंद्र अगरवाल उर्फ वीरेंद्र कुमार उर्फ विके (रणवीर शौरी). सिनेमाच्या पहिल्या सिनमध्येच प्रेक्षकांचा अंदाज दोनदा चुकतो. 'मिथ्या' हे नाव पहिल्याच सीनमध्ये सार्थक होतं.
पण ही तर फक्त चुणूक आहे. विके हा नखंशिखांत स्ट्रगलर आहे. एका सेट वरून दुसऱ्या सेटवर धक्के खात फिरणारा. प्रोड्युसर लोकांच्या शिव्या खाणारा. पोट भरण्यासाठी डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करणारा. वाईनशॉपमधून ज्या स्वस्त दारूच्या ब्रँडसोबत ग्लास मोफत मिळतो, ती दारू घेऊन नरिमन पॉइंटवर बसून एकटाच पिणारा. विके आयुष्यात यशस्वी नाही. विकेला कुणी मित्र नाहीत. विके प्रचंड एकटा आहे.
अशाच एका निराश रात्री बीचवर बसून रमचे घुटके घेणाऱ्या विकेच्या आयुष्यात अघटित घडतं. असं काही तरी की त्याचं आणि त्याच्यासोबत अनेकांचं आयुष्य बदलून टाकणारं. त्या रात्री विके एका अंडरवर्ल्ड गॅंगवॉरचा साक्षीदार बनतो. त्याच्या डोळ्यासमोर काही गुंड दुसऱ्या टोळीच्या गुंडाचा खात्मा करतात. या घटनेचा एकमेव साक्षीदार असणारा विके पोलिसांकडे जाऊन घटनेची माहिती देतो. अपराध्यांची ओळख पटवण्यासाठी विकेपुढे संशयितांची ओळख परेड होते.
रजत कपूरच्या सिनेमातला ह्युमर किती जबरदस्त असतो, याची चुणूक या ओळख परेडच्या सीनमध्ये मिळते. सगळ्या संशयितांकडे विके निरखून बघतो आणि बाजूला उभा असणाऱ्या पोलीस हवालदाराच्या कानात जाऊन सांगतो, "साहेब तो पांढरा रंगाचा शर्ट घातलेला मग्रूर माणूस आहे ना तोच होता त्या रात्री. "पोलीस हवालदार चिडून उत्तर देतो, "तोंड सांभाळून बोल मूर्खा, ते आमचे साहेब आहेत."
या सगळ्या प्रकरणात विके एका अंडरवर्ल्ड टोळीच्या नजरेत भरतो. शहरात वर्चस्वासाठी दोन टोळ्यांमध्ये लढाई चालू असते. पहिली टोळी असते गावडे आणि शेट्टीची टोळी (नसिरुद्दीन शाह आणि सौरभ शुक्ला). त्यादिवशी विकेने बीचवर बघितलेलं हत्याकांड यांनीच घडवलेलं असतं. दुसरी टोळी असते राजेभाईची. विके गावडे आणि शेट्टीच्या नजरेत भरण्याचं एक कारण असतं. विके हा डिट्टो राजेभाईसारखा दिसत असतो. राजेभाई आणि गावडे-शेट्टीमध्ये छत्तीसचा आकडा असतो. टोळीचा ब्रेन असणाऱ्या गावडेच्या डोक्यात एक सुपीक कल्पना जन्माला येते. राजेभाईची हत्या करायची आणि अगदी त्याच्यासारख्या दिसणाऱ्या विकेला त्याच्या जागी प्लॅन्ट करायचं. म्हणजे राजेभाईच्या आजूबाजूच्या वर्तुळाला थोडा पण संशय येणार नाही. म्हणजे दोन्ही टोळ्यांवर आपलंच वर्चस्व. चीत भी मेरी, पट भी मेरी. मग विकेला आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेण्यासाठी साम, दाम, दंड, भेद प्रयत्न चालू होतात. हे प्रयत्न पडद्यावर पाहूनच मनसोक्त हसावेत इतके विनोदी जमून आले आहेत.
गावडेची माणसं असणारी राम आणि श्याम (विनय पाठक आणि ब्रिजेंदर काला) हे विकेचं अपहरण करतात आणि त्याचा शारीरिक-मानसिक छळ करून त्याला प्लॅनमध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न करतात. विके बधत नाही म्हटल्यावर पैशांची लालूच दाखवली जाते. तरी विके ऐकत नाही म्हटल्यावर गावडे आपलं ठेवणीतलं अस्त्र बाहेर काढतो. सोनम (नेहा धुपिया). सोनमला विकेचा विश्वास जिंकून घेण्यासाठी आणि त्याला प्लॅनमध्ये सामील करून घेण्यासाठी गावडे पुढे करतो. प्लॅन अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी होतो. सोनमच्या प्रेमात पडलेला विके एका पायावर तयार होतो.विके आणि सोनममध्ये बरीच साम्यं असतात. सोनमही विकेप्रमाणेच छोटी-मोठी कामं करणारी अभिनेत्री असते. गावडेच्या शिफारशीच्या तुकड्यांवर जगत असते. विकेप्रमाणेच काही अपरिहार्य कारणांमुळे ती पण गावडेच्या हातच प्यादं बनलेली असते. सोनममध्ये आणि विकेमध्ये चांगली केमिस्ट्री जमते. काही अव्यक्त गोष्टी जन्माला येतात. ठरल्याप्रमाणे गावडे टोळी राजेभाईची हत्या करून विकेला त्याच्या जागी प्लॅन्ट करते. विकेचा राजेभाईच्या घरात प्रवेश होतो. एक सुंदर बायको (इरावती हर्षे), दोन गोंडस मुलं, प्रेमळ आई (सुहासिनी मुळे) आणि लक्ष्मणासारखा पाठीराखा भाऊ (हर्ष छाया) यांच्या प्रेमानं राजेचा मुखवटा घेऊन घरात घुसलेला विके गुदमरून आणि बावचळून जातो. शिवाय बोलण्या-चालण्यातल्या साध्या चुकीनं जरी आपलं गुपित फुटलं तर आपला एक क्रूर शेवट ठरलेला आहे, याची त्याला पुरेपूर जाणीव असते. हाडाचा अभिनेता असणारा विके हा अभिनय करताना मात्र भेदरून जातो.
अशाच एका प्रसंगी आधार शोधायला तो सोनमकडे जातो. घटना विचित्र घडायला लागतात आणि एका अपघातात विकेच्या मेंदूला मार लागतो. त्याची समरणशक्ती जाते. शुद्धीवर आलेला विके स्वतःला राजेभाईच समजायला लागतो. तो राजेभाईच्या बायका मुलांमध्ये प्रचंड गुंततो. शेक्सपियरचे लंबेचौडे डॉयलॉग मारून धंद्यातल्या 'डील' करायला लागतो. रजत कपूरच्या सिनेमात नेहमी येणारे सत्य काय असतं, 'स्वओळख' काय असते, हे प्रश्न इथं पण ऐरणीवर येतात. पण हे सगळं गावडेला परवडण्यासारखं नसतं. तो विकेचं रहस्य राजेभाईच्या परिवारासमोर येईल याची व्यवस्था करतो. एका अटळ शोकांतिकेकडे वाटचाल चालू होते. पुढं काय होतं, ते स्क्रीनवर बघण्यात आणि अनुभवण्यात मजा आहे.
ट्रॅजी कॉमेडी हा जॉनर आपल्याकडे फारसा हाताळला गेलेला नाही. चटकन आठवणारं एक उदाहरण म्हणजे 'जाने भी दो यारो'. त्यानंतर मला आठवतो 'मिथ्या'च. 'मिथ्या' फक्त अंडरवर्ल्ड टोळ्या आणि त्यांच्यातल्या स्पर्धा यावर आधारित सिनेमा आहे, असा समज अनेकांचा होऊ शकतो. तो तसा अर्थातच नाहीये. माझं मत विचाराल तर, ती स्वप्नांचा अपयशी पाठलाग करणाऱ्या एकाकी माणसाची अपरिहार्य शोकांतिका आहे. त्याचबरोबर ती एक अतिशय हळवी आणि मनाला पाझर फोडणारी विके आणि सोनमची प्रेमकथा आहे. या अपारंपरिक प्रेमकथेला सुरुवात, मध्य, शेवट असा काही एक साचा नाहीये. ती पाण्यावर प्लॅस्टिकची पिशवी तरंगते, तशी चित्रपटभर तरंगत राहते. विके आणि सोनम गाणी गात नाहीत, झुडपाच्या आजूबाजूला नाचत नाहीत. पण ही प्रेमकथा गेल्या दशकात येऊन गेलेल्या अनेक प्रेमकथांपेक्षा अनेक पटीनं ताकदवान आहे. हा सिनेमा मुळात एक प्रेमकथाही आहे, याचा साक्षात्कार सिनेमाच्या शेवटी होतो.
'मिथ्या'चा क्लायमॅक्स ही त्या सिनेमाची सगळ्यात मोठी ताकद आहे. सिनेमाचा एंडिंग सीन तर पुन्हा पुन्हा पाहण्यासारखा. चित्रपट पाहू इच्छिणाऱ्यांचा रसभंग होईल म्हणून त्याबद्दल लिहिता येत नाही. या सगळ्यांचं श्रेय लेखक-दिग्दर्शक म्हणून रजत कपूरला.
कुठल्याही चांगल्या सिनेमात भन्नाट म्हणता येईल असे तीन-चार प्रसंग असतात. तसे ते 'मिथ्या'मध्येही आहेत. स्ट्रगलर म्हणून विकेला हिडीसफिडीस करणारा निर्माता (टिनू आनंद) राजेभाईच्या दारी मदतीसाठी येतो तो प्रसंग असाच भन्नाट. राजेभाईच्या जागी आलेला विके त्या निर्मात्याला बघून हरखून जातो आणि चढवलेला डॉनचा मुखवटा बाजूला करून त्याचं लांगुलचालन करायला लागतो, तो प्रसंग तर अजरामर आहे.
विकेच्या भूमिकेसाठी रजतने सैफ अली खान आणि शाहरुख खानला विचारलं होतं. त्या दोघांनी स्वाभाविक कारणामुळे नकार दिला. पण विकेचा रोल रणवीर शौरीनं ज्या उंचीवर नेऊन ठेवला आहे, तिथं शाहरुख किंवा सैफला जाता आला असतं का याबद्दल शंका आहेत. रजत कपूरनं रणवीर शौरीला काही अजरामर रोल दिले आहेत. ‘मिक्स्ड डबल्स’ सिनेमातला रोल असाच जबरदस्त. सध्याच्या अभिनेत्यांमध्ये रणवीर शौरी सर्वोत्तम का आहे हे 'मिथ्या' पाहिल्यावर कळतं. त्याचा समावेश अभिनय क्षमता या निकषावर इरफान, नवाज, मनोज वाजपेयी यांच्यासोबत व्हायला हवा.
रजतचा अभिनेत्यांचा एक ठरलेला सेट आहे. तो त्यांच्यासोबतच काम करतो. रणवीर, संजय मिश्रा, विनय पाठक, ब्रिजेंदर काला, नसिरुद्दीन शाह आणि सौरभ शुक्ला हे नट आलटून पालटून त्याच्या सिनेमात दिसतात. यातले अनेकजण 'मिथ्या'मध्ये आहेत. त्यांनी चांगला अभिनय केला आहे, यात काही नावीन्य नाही. पण नेहा धुपिया या सिनेमातलं सरप्राईज पॅकेज आहे. तिने सोनमच्या भूमिकेत जीव ओतला आहे. दुर्दैवाने नेहा धुपिया म्हटलं की प्रेक्षकांना बिकिनी, हॉट सीन्स आणि आयटम साँग्ज आठवायला लागतात. पण काही प्रायोगिक सिनेमांमध्ये नेहानं अतिशय सुंदर भूमिका केलेल्या आहेत. पण त्या नेहमीच दुर्लक्षित राहिल्या. 'तुम्हारी सुलु'मधून नेहा पुन्हा प्रेक्षकांच्या नजरेत भरली ही चांगली गोष्ट आहे.
चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी अतिशय छान आहे. रफी मेहमूदनं आतापर्यंत रजतच्या सर्व सिनेमांमध्ये कॅमेरा सांभाळला आहे. कागदावर लिहून काढलेला सिनेमा प्रत्यक्षात उतरवण्यामध्ये सिनेमॅटोग्राफरचा मोठा वाटा असतो. दिग्दर्शकाला सिनेमा समजला आहे या इतकंच, सिनेमॅटोग्राफरला सिनेमा समजला आहे का, हेही महत्त्वाचं असतं. रफी आणि रजत शूटिंग सुरू होण्यापूर्वी शॉट डिव्हिजन कधीच करत नाहीत, ही त्यांच्या कामाची खासियत. लोकेशनवरच कॅमेरा कुठे लावायचा आणि अँगल्स कसे घ्यायचे हे ते ठरवतात. यासाठी दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफरमध्ये जे अंडरस्टॅण्डिंग लागतं ते रफी-रजतमध्ये आहे.
'मिथ्या'मध्ये सुरुवातीला मुंबईमधले फिल्म स्टुडियो, अंधाऱ्या गल्ल्या, शूटिंग लोकेशन्स, अलिबागचे बीच आणि गोव्याची नेत्रदीपक व्हिजुल्स रफीच्या कॅमेऱ्यानं सुंदर आणि विषयाच्या गरजेनुसार टिपली आहेत. सिनेमामध्ये थोडा ताणल्यासारखा वाटतो. सिनेमाची लांबी थोडी कमी केली असती, तर सिनेमाच्या परिणामकारकतेत भर पडली असती असं वाटतं.
आपल्या चित्रपटांसाठी पैसे उभारण्यासाठी रजत काय काय उचापत्या करतो, हा थिसिसचा विषय आहे. ‘रघु रोमियो’साठी लागणारा पैसा त्यानं आपल्या सर्व मित्रांना मेल करून उभारले होते. ‘आंखो देखी’साठी लागणारा पैसा त्यानं ट्विटरवर लोकांना आवाहन करून उभारला होता. 'मिथ्या'ही असेच आर्थिक द्राविडी प्राणायाम करून बनलेला सिनेमा आहे. चित्रपटांची वेगळ्या प्रकारे हाताळणी करणाऱ्या रजतसारख्या माणसामागे कुठलाही निर्माता आणि स्टुडियो उभा राहत नाही, हे पुरेसं बोलकं आहे. खरं तर एखाद्या स्टारच्या चित्रपटांच्या गाण्यावर किंवा आयटम साँगवर जेवढा खर्च होतो, तेवढ्या खर्चात रजतचा अख्खा चित्रपट बनवून होईल. 'मिथ्या' आणि 'आंखो देखी'सारखे आशयघन पाथब्रेकिंग सिनेमे देऊनही रजतच्या पुढच्या सिनेमासाठी निर्माता मिळत नाहीये. आता पुढचा चित्रपट क्राउड फंडिंगवर बनवण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. रजतसारखी अनेक माणसं चटकन हार मानत नाहीत हे भारी आहे. पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार अशा गोष्टी आपल्यासारख्या लोकांसाठी 'मिथ्या' आहेत, हे त्याला फार लवकर आकळलं असावं!
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299
.............................................................................................................................................
लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment