अजूनकाही
आज बालदिन, मुलांचा दिवस. त्यानिमित्ताने ‘अक्षरनामा’चा बालदिन विशेषांक. हा अंक करताना मुलांना काहीतरी बोधपर सांगावं, आजकालच्या त्यांच्या वर्तनाबद्दल, टीव्ही पाहण्याबद्दल काही उपदेश करावा, असं काहीही करायचं नाही हे मुद्दाम ठरवलं होतं. शिवाय मुलांना आवडेल किंवा त्यांना वाचायला आवडेल असा नामांकित लेखकांचा मजकूरही द्यावयाचा नाही, हेही पक्कं ठरलेलं होतं. फार वर्षांपूर्वी प्रसिद्ध कथा-कादंबरीकार रत्नाकर मतकरी म्हणाले होते की, ‘ज्यांना मोठ्यांसाठी लिहिता येत नाही, त्यांनी लहानांसाठी लिहू नये. केवळ हौस म्हणून, छंद म्हणून लिहू नये. नवं काही सांगता येत असेल तरच लिहावं.’ थोडक्यात त्यांना असं म्हणायचं होतं की, मुलांसाठी लिहिणं ही जिकिरीची, गांभीर्याने करावयाची गोष्ट आहे. ती मराठीमध्ये फारशी केली जात नाही, ही गोष्ट वेगळी. आपला तो विषयही नाही.
हा अंक करताना मुलांपेक्षाही प्रामुख्याने त्यांचे पालक नजरेसमोर ठेवले आहेत. या अंकात सिद्धार्थ मांडके आणि तनया टेंबे या दोन मुलांचे लेख आहेत. एकाला प्राणी आवडतात तर दुसऱ्याला पुस्तकं. इयत्ता नववी व सहावीतल्या दोन मुलांचे हे लेख त्यांच्या आवडीनिवडीला त्यांच्या आई-बाबांनी कसं प्रोत्साहन दिलं, ती आवड पॅशनमध्ये कशी रूपांतरित झाली, याविषयीही सांगतील. हे लेख मुलांनी स्वत:च लिहिले आहेत. त्यामुळे ती कसा विचार करतात, घटना-घडामोडींचा कसा अन्वयार्थ लावतात, हेही समजू शकतं. इतक्या कमी वयातली मुलं आपल्या प्रत्येक कृतीविषयी कशी जागरूक असतात, त्यासाठी ती किती मेहनत घेतात, यावरही या दोन लेखांतून पुरेसा प्रकाश पडतो.
‘गोष्टींच्या गोष्टींची गोष्ट’ हा लेख सर्वार्थानं वेगळा आहे. मुलांच्या गोष्टी या बोलणाऱ्या प्राण्यांच्या, उडणाऱ्या राक्षसांच्या, सुंदर पऱ्यांच्या असतात. त्यात क्रूर राक्षस असतात, तसे चांगले लोकही असतात. पण हे सगळं गोष्टीतच असतं, असंच मुलांना सांगितलं जातं. पण यातल्या काही गोष्टी या वास्तवातही आपल्याला भेटतात. त्या जिथं घडतात ती ठिकाणं आपल्याला पाहता येतात. मुलांच्या आवडत्या गोष्टीतील पात्रं, प्रसंग शिल्पांच्या, चित्रांच्या रूपानं अमर केले जातात. अशाच काही गोष्टीतील पात्रांच्या गोष्टी या लेखात सांगितल्या आहेत. मुलांच्या भावविश्वाला असं आदराचं, अगत्याचं स्थान आपल्याकडेही मिळायला हवं.
‘मूल तुमच्या मनाप्रमाणे घडणारा मातीचा गोळा नाही!’ हा श्रीनिवास आगवणे या तरुण चित्रकाराचा आणि ‘मुलांचा भावनांक वाढवता येतो’ हा मानसोपचारतज्ज्ञ संयोगिता नाडकर्णी यांचा, हे दोन्ही लेख मुलांविषयीचे असले तरी ते पालकांसाठीचे आहेत. ते मुलांकडे पाहण्याची, त्यांना समजून घेण्याची दृष्टी देतात.
बालदिन साजरा करायचा तो याचसाठी की, या निमित्तानं आपलं मूल अधिक ‘आपलं’ कसं होईल. मूल ही एक स्वतंत्र व्यक्ती असते. त्याला त्याचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. त्यामुळे त्याला त्याच्या जागी जाऊन समजून घेता यायला हवं. मुलांच्या जवळ जायचं असेल तर त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला हवं. या विशेषांकामध्ये आम्ही आमच्या परीने तो प्रयत्न केला आहे.
हा अंक आपल्याला कसा वाटतो, याविषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nivedita Deo
Mon , 14 November 2016
Tumche baldinache sarvach lekha khoopcha chan ahet