अजूनकाही
गुजरात विधानसभा निवडणूक सर्व बाजूंनी राष्ट्रीय आस्थेचा विषय बनली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसारमाध्यमांचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. गुजरातमध्ये नेमकी कुणाची सरशी होणार, का होणार, सध्याचं गुजरातमधील वातावरण कुणाला अनुकूल आहे, का आहे, अशा विविध प्रश्नांविषयी निरीक्षणं मांडणारी ही खास लेखमालिका... फक्त ‘अक्षरनामा’वर.
..............................................................................................................................................
गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या ८८ जागांसाठी जवळपास ७० टक्के मतदान झाल्यानं वाढलेलं तरुण मतदान आपल्या विरोधात गेलं की काय, या भीतीनं गुजरात भाजप भेदरून गेली आहे. या भेदरलेपणातून गुजरातचा प्रचार भावनिक मुद्द्यांवर नेण्याची कसरत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. काँग्रेस नेते अहमद पटेल यांना पाकिस्तान सेनेचे पूर्व महानिर्देशक सरदार अशरद रफिक हे ‘गुजरातचा मुख्यमंत्री’ करायच्या गुप्त कारवाया करत आहेत आणि ही बैठक बडतर्फ काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांच्या घरी झाली. त्या बैठकीला भारताचे पूर्व पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे उपस्थित होते, असा आरोप मोदींनी केल्यानं गुजरातमध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोचला असतानाच खळबळ माजली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी गुजरातमध्ये फिरत आहेत. त्यांनी मोदी ‘रडीचा डाव’ खेळत असून त्यांना गुजरात विकासाच्या मुद्द्यांवरून प्रचार भरकटवायचाय, असा आरोप केला आहे. वडोदऱ्यात मनिष पेटल हे काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणाले, “नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोन्ही नेते भावनिक प्रचारात माहीर आहेत. त्यांनी गुजरात निवडणुकीत ‘पाकिस्तानचा हात’ हे प्रकरण मुद्दाम उभं केलेलं आहे. त्यांना माहीत आहे, पाकिस्तानची भीती दाखवली की, गुजरात मतदार घाबरून भाजपला मतदान करतो. अहमद पटेल यांचं भूत उभं करणं, काँग्रेस जिंकली की पाकिस्तान जिंकेल असं म्हणणं, पाकमध्ये काँग्रेस विजयानं फटाके फुटतील अशी आवई उठवणं, ही अमित शहा यांची गुजरातमधील नेहमीची नाटकं आहेत. ही नाटकं रंगवण्यात त्यांचं नेतृत्व खूप बहाद्दर आहे. या त्यांच्या नौटंकीला आम्ही ‘अमित शहांच्या नेतृत्वाचे रंग-ढंग’ असं म्हणतो. आम्हाला हे नवं नाही. बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांच्या विरोधात त्यांनी ही शैली वापरून पराभव पाहिला आहे. यावेळी गुजरातची जनताही या रंग-ढंगांना भूलणार नाही.”
काँग्रेसचे कार्यकर्ते नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या विरोधात बोलणं स्वाभाविक आहे. या निवडणुकीत भावनिक मुद्दे मोदी-शहा यांनी पेरले आहेतच. त्यांना गुजराती जनता किती प्रतिसाद देते, हे येत्या १८ तारखेच्या निकालातून कळेलच. शहा यांनी स्वत:ची जी नेतृत्वशैली तयार केली, त्याची चर्चा भाजप कार्यकर्तेही करतात. भाजपला अत्यंत वाईट परिस्थितीत पुढे नेण्याची किमया शहा यांच्या नेतृत्वात आहे, असं सर्वच भाजप कार्यकर्त्यांना मनोमन वाटतं. अहमदाबादचे भाजप कार्यकर्ते राकेश मेहता सांगतात, “तुम्ही अमितभाईंना काहीही म्हणा, त्यांच्यात प्रचंड ‘किलर इन्स्टिंक्ट’ आहे. संकटाचं संधीत रूपातर करावं तर त्यांनीच. ते नरेंद्र मोदी यांच्या विचार आणि कृतीची सावली आहेत. नरेंद्रभाई आणि अमितभाई हे दोन नेते एकमेकांची सावली आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गुजरात भाजपचं संघटन त्यांनी अत्यंत हुशारीनं वाढवलं आहे. गावागावात भाजपचा माणूस त्यांनी तयार केला. त्याला कामाला लावलं. आजचा गुजरातचा भाजप हा अडवाणी-केशभाई पटेल-अटल बिहारी वाजपेयी यांच्या खांद्यावर उभा केलेला, नरेंद्रभाई-अमितभाईंचा भाजप आहे.”
एक भाजप कार्यकर्ता अमित शहा यांचं महात्म्य सांगत होता. सध्या गुजरातमध्ये भाजपच्या विरोधात काँग्रेसनं कितीही आव्हान उभं करू देत, ती परतवून लावायची जादू अमित शहा यांच्यात आहे. इलेक्शन मॅनेजर म्हणून त्यांचा हात कुणी धरू शकत नाही, हे भाजप कार्यकर्ते छाती ठोकून सांगतात. हे सर्व ऐकताना अमित शहा नावाची जादू उलगडत जाते.
त्यामुळे कुतूहल म्हणून अमित शहा यांचा राजकीय प्रवास पाहण्यासारखा आहे.
अमित शहा गुजराती बनिया कुटुंबातले. आता वय ५२. त्यांचे वडील अनिलचंद्र शहा हे उद्योजक. मनसा इथं त्यांचा पीव्हीसी पाइपचा धंदा होता. अहमदाबादेत अमित शहा यांनी बायो केमिस्ट्रीत बी.एससी. ही पदवी घेतली. नंतर वडिलांच्या धंद्यात लक्ष घालू लागले. दरम्यान त्यांनी एका सहकारी बँकेत काम केलं. काही काळ स्टॉक ब्रोकर म्हणूनही नशीव अजमावलं. करिअर सुरू असताना ते अखिल भारतीय विद्याथी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय होते. संघ स्वयंसेवक म्हणून १९८२मध्ये नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेट घेतली. अहमदाबादच्या संघवर्तुळात दोघांची गट्टी जमली. तेव्हा मोदी संघ प्रचारक होते. तरुणांच्या उपक्रमांचे गुजरातमधले प्रमुख होते.
पुढे १९८७ मध्ये शहा भारतीय जनता युवा मोर्चाचं काम करू लागले. वॉर्ड सचिव म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि अल्पावधीतच ते जनरल सेक्रेटरी झाले. १९९१मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या गांधीनगर लोकसभा निवडणुकीचे कॅम्पेनर म्हणून शहा यांची कामगिरी सर्वांच्या डोळ्यात भरली. आणि त्यांचा पक्षातला उत्कर्ष वाढीस लागला.
१९९५ मध्ये भाजपचं केशुभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेल आलं. केशुभाई मुख्यमंत्री झाले. पण तेव्हा भाजप हा शहरी पक्ष होता. ‘पांढरपेशांचा पक्ष’ म्हणून काँग्रेसवाले हेटाळणी करत. ग्रामीण भागात भाजप ‘नहीं के बराबर’ होता, काँग्रेस मात्र भलतीच मजबूत होती. हा कच्चा दुवा मोदी-शहा जोडगोळीनं हेरला आणि ग्रामीण भागात त्यांनी भाजप नेण्यासाठी कंबर कसली. त्यांची व्यूहरचना अशी होती की, प्रत्येक खेड्यात काँग्रेसच्या प्रभावी माणसाला दुसरा तेवढाच प्रभावी माणूस शोधून पर्याय उभा करायचा. त्याला भाजपमध्ये आणायचा. या पद्धतीनं मोदी-शहा यांनी आठ हजार प्रभावी ग्रामीण गाव-नेते पक्षसंघटनेत तयार केले. हे नेते निवडणूक हरलेले होते. काही काँग्रेस नेत्यांच्या घरातले, नातेवाईकही होते. यातल्या अनेकांना सत्तेची लालसा होती, म्हणून ते यांच्या गळाला लागले. ते काही असो, पण त्यामुळे भाजप गुजरातच्या ग्रामीण भागात बळकट झाला.
नंतर शहा यांनी काँग्रेसच्या प्रभावाखालील सहकार लॉबी फोडण्यावर लक्ष दिलं. १९९९ मध्ये ते अहमदाबाद जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन म्हणून निवडून आले. त्यानंतर सहकार, बँकिंग, उद्योगक्षेत्रातले ताकदवान नेते बनले. तोपर्यंत गुजरातच्या सहकार लॉबीवर पटेल, क्षत्रिय, गडेरिया या जातीतल्या नेत्यांचं वर्चस्व होतं. म्हणजे आपल्याकडे साखर कारखान्याचा चेअरमन किंवा जिल्हा बँकेचा अध्यक्ष मराठेतर जातीतला माणूस होणं कठीण जातं, तसं गुजरातमध्ये होतं. शहा यांनी नाना हिकमती लढवून हे समीकरण तोडलं. बनिया समाजातले शहा सहकारातले नेते बनले.
पुढे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले. आणि मग शहा यांनी मागे वळून पाहिलंच नाही. ते गुजरातच्या क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष झाले. बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष झाले. मोदी दिल्लीत गेले तरी ‘मोदींची सावली’ म्हणून ते गुजरातमध्ये वावरत होते.
२५ जुलै २०१० रोजी सोहराबुद्दीन केसमध्ये शहा यांना खून, अपहरण, खंडणी या गुन्ह्यांत अटक झाली. तीन महिने त्यांना तुरुंगवास झाला. गुजरातमधून त्यांना तडीपार केलं गेलं. त्यांना दिल्लीत आपलं बस्तान हलवावं लागलं. पण अरिष्ट काळातून ते पुढे जात राहिले. उत्तर प्रदेशात २०१४मध्ये लोकसभेच्या ८० पैकी ७३ जागा जिंकून त्यांनी भाजपमध्ये मध्यवर्ती स्थान मिळवलं. आणि पक्षाचे पाहता पाहता राष्ट्रीय अध्यक्ष झाले.
मोदी-शहा यांची ही ‘वाल्या-वाल्मिकी थिअरी’ महाराष्ट्रातही दिसते. किंबहुना ती गुजरातमधूनच आयात केलेली आहे. ते भाजपचं ‘गुजरात मॉडेल’ आहे. हेच मॉडेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे पुढे नेत आहेत हे लक्षात येतं.
शहा यांच्या नेतृत्वाची शैली पाहिली की, ती गुजरातचे सरदार वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई, केशुभाई पेटल यांच्यापेक्षा वेगळ्या धर्तीची आहे, हे लक्षात येतं. मध्यंतरी शहा महात्मा गांधींना ‘चतुर बनिया’ म्हणाले होते. ते म्हणताना त्यांच्या डोक्यात काय अर्थ होता, गांधी खरोखर चतुर बनिया होते की नाही, यावर चर्चा, मतभेद होऊ शकतील. पण शहा हे मात्र ‘खरोखर चतुर बनिया’ आहे. हे त्यांच्या हिकमती राजकीय प्रवासातून दिसतं.
शहा यांच्या नेतृत्वशैलीची एवढी चर्चा करण्याचं कारण काय? तर हा काही एका व्यक्तीचा राजकीय प्रवास नाही. तर ते गुजरात भाजपचे कार्यकर्ते, नेते यांच्या समोरचं ‘रोल मॉडेल’ आहे. आज गुजरातमध्ये शहा यांच्या पावलावर पाऊल टाकत तालुक्या तालुक्यात, वॉर्डावॉर्डात छोटे छोटे अमित शहा कार्यरत आहेत. ते सर्वजण सार्वजनिक आयुष्यात साम, दाम, दंड, भेद वापरून भाजप वाढवत आहेत, मोदी यांना ताकद देत आहेत. हे छोट्या छोट्या अनेक अमित शहांचं जाळं म्हणजे गुजरातचा नवा भाजप आहे.
या नव्या भाजपला जातीचं राजकारण कसं हाताळायचं, दंगली कशा घडवायच्या, थांबवायच्या, धर्मांध राजकारणाची कोणकोणती भूतं उभी करायची, बुथ पातळीवर पक्ष कसा बळकट करायचा, अशा सगळ्या कसरती अवगत आहेत. या नव्या भाजपच्या साथीला विश्व हिंदू, परिषद, बजरंग दल, रा.स्व.संघ, वनवासी कल्याण आश्रम असं संघटनांचं जाळं आहे.
या कार्यकर्त्यांच्या जाळ्याच्या जोरावर गुजरातमध्ये भाजप मजबूत झालाय. त्याला सत्तेवरून खाली खेचण्याचं आव्हान काँग्रेसला या निवडणुकीत पेलायचंय. काँग्रेस ते आव्हान पेलणार की नाही, हे येत्या १८ तारखेला कळेलच, पण जर पुन्हा २२ वर्षांची भाजपची सत्ता पाच वर्षांसाठी गुजराती जनतेनं पसंत केली तर तो शहा यांच्या नेतृत्वशैलीचा मोठा विजय मानला जाईल!
.............................................................................................................................................
लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment