अजूनकाही
१. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून विकासाचा मुद्दा गायब झाला असून ते आता स्वत:च्याच राज्यात हमरीतुमरीवर आले आहेत. ज्या राज्यात २२ वर्षं राज्य केलं, तिथं खालच्या पातळीवर प्रचार करण्याची वेळ भाजपवर का आली असा सवाल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. गुजरातच्या प्रचारसभातून प्रचारसभांमधून स्वत: पंतप्रधान मोदी यांनीच ‘मुघल’ राजवट कबरीतून उकरून काढल्याचा आरोप त्यांनी केला. गुजरातचा प्रचार विकासाच्या मुद्यावर होणं गरजेचं होतं. पण मोदींच्या भाषणातून विकासाचा मुद्दा गायब झाला आहे, असं ते म्हणाले. काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांच्या बाबत ‘नीच’ असा शब्द वापरल्यानंतर तो देशाचा नव्हे, तर गुजरातचा अपमान झाल्याचे मोदी सांगत सुटले आहेत. राष्ट्रीय बाणा वगैरे दाखवून विरोधकांना गप्प करणारे मोदी आता गुजराती अस्मितेत अडकले असल्याची टीकाही त्यांनी केली.
कार्यप्रमुख बोलतायत ते शंभर टक्के खरं आहे. प्रचारात शाहिस्तेखान, अफझुलखान वगैरे शाळकरी नाटकांमधली पात्रं आणण्यासाठी मोदी यांचा पक्ष म्हणजे काय शिवसेना आहे का निव्वळ अस्मिता एके अस्मिता करत मतं खेचणारी? बाकी शिवसेनेचा खऱ्याखुऱ्या अस्मितेशी जेवढा संबंध आहे, तेवढाच भाजपचा विकासाशी आहे, हे त्यांच्या लक्षात कसं येत नाही? असे मित्र पक्ष अस्तनीत असताना भाजपला विरोधकांची गरज नाही.
.............................................................................................................................................
२. पाकिस्तान गुजरात निवडणुकीत हस्तक्षेप करत असून काँग्रेस नेते अलीकडेच पाकिस्तानच्या नेत्यांना भेटले, याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील सभेला संबोधित करताना म्हटलं होतं. मोदींच्या या टीकेला उत्तर देताना, कोणत्या सरकारनं पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना हवाई दलाच्या पठाणकोट तळावर येण्याची परवानगी दिली, असा सवाल करत काँग्रेसनं पलटवार केला आहे.
मोदी यांच्या प्रचाराची पातळी, त्यांच्या स्टँडर्ड्सच्या संदर्भातही इतकी घसरत चालली आहे, याचं कारण काय असावं? मणिशंकर अय्यर यांनी ‘नीच वृत्ती’चा उल्लेख केलेला असताना, ते ‘नीच जाती’बद्दल बोलले, अशी थेट थाप मोदी मारतात. इंदिरा गांधी जसा प्रत्येक गोष्टीत परकीय हात शोधायच्या, तसा मोदी पाकिस्तानचा हात शोधतात. निवडून येण्याआधी पाकिस्तानबद्दल आग ओकणारे मोदी उधमपूर आणि गुरदासपूर या ठिकाणी दहशतवादी हल्ले झाल्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नातीच्या लग्नासाठी वाट वाकडी करून पाकिस्तानला गेले होते. त्याआधी ते अशाच प्रकारे अनियोजित पद्धतीनं शरीफ यांनाच भेटायला गेले होते. त्यांनी पाकिस्तानचा हात वगैरे म्हणावं, हे हास्यास्पद आहे.
.............................................................................................................................................
३. सांगलीतील पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेचे प्रकरण चर्चेत असताना देशात सर्वाधिक कोठडीत मृत्यू महाराष्ट्रातच होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे स्वतःकडे गृहखातं ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पोलिस खात्याकडे अधिक लक्ष देण्याची वेळ आली आहे, असं बोललं जात आहे. महाराष्ट्रानंतर गुजरात व मध्य प्रदेशात सर्वाधिक पोलिस कोठडीत मृत्यू झाले आहेत. देशाच्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा ‘क्राईम इन इंडिया २०१६’ चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. देशात २०१६ मध्ये ९२ जणांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक १६ मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत.
‘मी पोलिस कोठडीत मार खाऊन मेलो. माझं राज्य कोठडी मृत्यूमध्ये देशात सर्वांत आघाडीवर. हे यश राज्याच्या गृहमंत्र्यांचं. हे यश मुख्यमंत्र्यांचं. व्हय मी मोक्षार्थी, त्यामुळेच लाभार्थी. हे माझं सरकार...’ अशी जाहिरात छापून आल्याशिवाय या माहितीवर विश्वास ठेवता येणार नाही.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/206
.............................................................................................................................................
४. नोटाबंदीमुळे देशातील लाचखोरीला लगाम बसेल असं सांगण्यात येतं होतं. मात्र हा अंदाज साफ चुकीचा ठरला आहे. नोटाबंदीनंतरही गेल्या वर्षभरात ४५ टक्के लोकांनी लाच दिल्याचं उघड झालं आहे. त्याआधी देशातील ४३ टक्के लोकांनी लाचखोरी केल्याचं उघड झालं होतं. 'ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल' या संस्थेनं ११ राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली आहे. ३४ हजार ६९६ लोकांपैकी ३७ टक्के लोकांनी देशात वर्षभरात भ्रष्टाचार वाढल्याचं सांगितलं. तर १४ टक्के लोकांनी भ्रष्टाचार कमी झाल्याचं सांगितलं.
देश डिजिटल झाला, म्हणजे लाचखोरी कमी होईल, असं मानणं म्हणजे देशात कम्प्युटर आले म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली, असं मानण्याइतकंच भोळसटपणाचं आहे. कम्प्युटर आल्यावर आपल्या लोकांनी झटपट कुंडली काढण्याचं सॉफ्टवेअर विकसित केलं, हे विसरून चालणार नाही. नोटाबंदी करताना २००० रुपयांची नोट काढल्यामुळे लाचखोरी आणि काळा पैसा हे विषय सरकारच्या अजेंड्यावर खरोखरच आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहेच.
.............................................................................................................................................
५. लग्न समारंभात जीन्स घालणाऱ्या मुलींशी कोणत्याही मुलाला लग्न करावंसं वाटणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी केलं आहे. गोरखपूर येथील कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांसमोर मुक्ताफळं उधळली. एखादी व्यक्ती जीन्स घालून मंदिराचा महंत होण्याची भाषा करत असेल तर लोक त्याला स्वीकारतील का? ही गोष्ट लोकांच्या पचनी पडणार नाही. इतकंच काय एखादी मुलगी स्वत:च्या लग्नातील विधींच्या वेळी जीन्स घालून बसणार असेल, तर किती मुलांना अशा मुलीशी लग्न करावंसं वाटेल, असा सवाल सत्यपाल सिंह यांनी विचारला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आदित्यनाथही उपस्थित होते.
सत्यपाल यांचा संपूर्ण दोष नाही. त्यांचा फक्त तीस टक्के दोष आहे. उरलेल्यातला तीस टक्के परिणाम हा ते ज्या पक्षात आणि परिवारात वावरतात, त्याचा आहे आणि ४० टक्के परिणाम हा गोरखपूरमध्ये कार्यक्रम, शिवाय आदित्यनाथांची उपस्थिती यांचा आहे. आधुनिक जीवनशैलीच्या सगळ्या सुखसुविधांचा लाभ तर घ्यायचा आणि संधी मिळेल तिथं तिला नावं ठेवून परंपरांचे गोडवे गायचे, अशा दुटप्पी वृत्तीतून हे वक्तव्य आलेलं आहे. जीन्स परिधान करणारी कोणीही मुलगी मुळात कधी पारंपरिक विवाहसोहळ्यात तीच परिधान करण्याचा हट्ट धरणार नाही. तसा आग्रह असलेली मुलगी रजिस्टर्ड लग्नाचा पर्याय असताना पारंपरिक पद्धतीनं विवाहच कशाला करायला जाईल? उगाच वडाची साल पिंपळाला लावून पेरूचा भाव सांगण्यातला हा प्रकार आहे!
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment