अजूनकाही
गुजरात विधानसभा निवडणूक सर्व बाजूंनी राष्ट्रीय आस्थेचा विषय बनली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसारमाध्यमांचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. गुजरातमध्ये नेमकी कुणाची सरशी होणार, का होणार, सध्याचं गुजरातमधील वातावरण कुणाला अनुकूल आहे, का आहे, अशा विविध प्रश्नांविषयी निरीक्षणं मांडणारी ही खास लेखमालिका आजपासून... फक्त ‘अक्षरनामा’वर.
..............................................................................................................................................
गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पाडलंय. दुसऱ्या टप्प्यासाठी १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. गुजराती माणसं यावेळी काय कौल देणार? या निवडणुकीत पुन्हा भाजप भारी की, आता काँग्रेसची बारी अशी चर्चा रंगात आहे. संपूर्ण देशाचं लक्ष गुजरातकडे लागलंय.
यावेळची गुजरात विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक आहे. या निवडणुकीत भाजप हरला तर ‘मोदी लाट’ संपली असा अर्थ काढला जाईल. आणि भाजपच्या केंद्रातील मोदींच्या नेतृत्वाखालील सत्तेचा ‘परतीचा प्रवास’ सुरू झाला असंही समजलं जाईल. समजा भाजपची हार नाही झाली आणि विधानसभेतल्या जागा कमी झाल्या तरी गुजरातवरची भाजपची पकड ढिली झाली असं म्हटलं जाईल.
कारण या निवडणुकीला सामोरं जाताना भाजपचा पंतप्रधान गुजराती आहे. भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष गुजराती आहे. राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी भाजपची पूर्ण बहुमताची सरकारं आहेत. काँग्रेस गुजरातमध्ये २२ वर्षं वनवासात आहे, तर भाजपकडे २२ वर्षांची एकहाती सत्ता आहे. या सत्तेच्या काळात काय केलं, काय राहिलं याचा जाब भाजपला द्यावा लागणार आहे. एका अर्थानं ही निवडणूक भाजप स्वत: विरोधातच लढतोय.
काँग्रेसकडे या निवडणुकीत गमावण्यासारखं खूप काही नाही. मात्र विजय झाला तर राहुल गांधींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल. २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस जोरात तयारीला लागेल. आपण जिंकू शकतो हा काँग्रेसचा गेलेला आत्मविश्वास पुन्हा परत येईल. ही निवडणूक जिंकणं ही काँग्रेससाठी ऐतिहासिक घटना ठरेल.
एकुणच गुजरात हा देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं टर्निंग पाँइंट ठरणार आहे. तसं हे राज्य काही खूप मोठं नाही. गुजरातची लोकसंख्या आहे जवळपास सहा कोटी चार लाखाच्या घरात. ३३ जिल्हे आणि एक लाख ९६ हजार किलोमीटरच्या क्षेत्रफळावर हे राज्य वसलंय. या राज्याची उत्तर-पश्चिम सीमा ही आंतरराष्ट्रीय सीमा आहे. त्यामुळे फाळणीच्या काळापासून गुजराती माणूस पाकिस्तानचा पराकोटीचा द्वेष करण्यात पुढे असतो.
गुजरात हा महाराष्ट्राचा लहान भाऊ. १ मे १९६० साली मुंबई प्रांताचे भाग असलेले विभाग भाषावर प्रांतरचनेच्या सूत्रानुसार वेगळे झाले. गुजरातमध्ये कच्छ, सौराष्ट्र, काठियावाड, हालार, पांचाल, गोहिलवाड, झालावाड हे सांस्कृतिक विभाग आहेत. विशाल समुद्र किनारा या राज्याला लाभला. त्यामुळे व्यापाराची हजारो वर्षांची परंपरा या राज्याला आहे. व्यापारासाठी परदेशातल्या विविध भागांत जाणं आणि विविध परदेशी विभागातले लोक इथं येणं हे हजारो वर्षांपासून घडत आलंय. अनेक विदेशी मानवसमूह या राज्यात समुद्रमार्गे येऊन स्थायिक झाल्याचं दिसतं. व्यापाराच्या हजारो वर्षांच्या संस्कृती-परंपरेमुळे गुजराती माणूस व्यापारात पुढे राहत आलाय. त्याच्या स्वभावात व्यापार आहे असं म्हटलं जातं.
१२व्या शतकात गुजरात गुर्जरांचं साम्राज्य म्हणून ख्यात झाला. तसा गुजरातला इ.स.पू. दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. त्याही पूर्वी कृष्णाशी गुजरातचं नाव जोडलं जातं. भगवान श्रीकृष्ण मथुरा सोडून सौराष्ट्रात पश्चिम समुद्र किनाऱ्यावर द्वारकेला आले. तेव्हापासून द्वारका आणि कृष्ण ही गुजरातची ओळख झाली. मौर्य, गुप्त, गुर्जर या राजवंशांनी या प्रदेशावर राज्य केलं. गुर्जर चालुक्य (सोळंकी) या राजांच्या काळात गुजरातमध्ये व्यापार, शेती भरभराटीस आली आणि हा प्रदेश समृद्ध झाला, असं मानलं जातं.
कापूस, तंबाखू, भुईमूग ही इथल्या शेतीतली व्यापारी पिकं आहेत. कापड, तेल आणि साबण उद्योगांना कच्चा माल इथला शेतकरी पुरवतो. तांदूळ, गहू, बाजरी या अन्नधान्याचं मोठं उत्पादन इथल्या शेतीत होतं. वनांमध्ये साग, खैर, बांबू मिळतो. रसायन, पेट्रोरसायन, खतं, इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स हे उद्योग गुजरातमध्ये विकसित आहेत. हिऱ्याचा व कपड्यांचा व्यापारही मोठा आहे.
शेती, उद्योग, व्यापारात पुढारलेला गुजराती माणूस वैष्णव पंथाला पसंती देतो. शैवमताचे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. शिव-कृष्ण ही गुजरातची दोन दैवतं. द्वारका आणि सोरटी सोमनाथ या दोन देवभूमी. पंधराव्या शतकात संत नरसी मेहतांनी आणि १६व्या शतकात राजपुत राजकुमारी मिराबाईंनी गुजराती समाजाला भक्तीपंथात आणलं. त्यातून ‘वैष्णव जन तो तेणे कहिए, पिड पराई जाने रे’ हे नरसी मेहतांचं भजन गुजराती माणसांचा जीवनमंत्र बनलं. अहिंसा आणि शाकाहार ही गुजराती माणसांची जीवनशैली बनली. शिव, कृष्ण, दयानंद सरस्वती, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, महाराजा सयाजीराव गायकवाड, सुप्रसिद्ध क्रिकेटपटू रणजी हे गुजरात माणूस स्वत:च्या गौरवाचा विषय मानत आलाय.
गुजरातनं देशाला चार राष्ट्रीय नेते दिले. त्यापैकी दोन पंतप्रधान दिले. याबद्दल गुजराती माणसाला अभिमान वाटतो. या नेत्यांमध्ये सरदार पटेल, मोरारजी देसाई, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा समावेश केला जातो. दोन पंतप्रधानांमध्ये मोरारजी देसाई आणि नरेंद्र मोदी यांना गणतात. तिसरा पंतप्रधानही सरदार पटेलांच्या रूपानं गुजरातच्या इतिहासाला लाभला असता, पण नेहरू व काँग्रेसनं ते होऊ दिलं नाही, याबद्दल गुजराती माणसाला आजही राग आहे.
महमूद गजनी आणि सोरटी सोमनाथाचं मंदिर हा विषय गुजराती माणसांच्या दृष्टीनं खूप संवेदनशील आहे. गजनीनं स्वाऱ्या करून सोमनाथ मंदिर अनेकदा लुटलं, त्याचा विध्वंस केला. पण आम्ही पुन्हा पुन्हा ते कसं बांधलं आणि आक्रमकांना कसं पुरून उरलो, हे गुजराती माणूस आजही विसरलेला नाही. तो या इतिहासाला घेऊन आजही जगतोय. सोमनाथ ते अयोध्या ही राममंदिर उभारणीसाठी निघालेली देशव्यापी रथयात्रा लालकृष्ण अडवाणींनी गुजरातच्या सोमनाथ मंदिरापासून सुरू केली होती, हे गुजराती माणसाला मनोमन आजही सुखावतं. रथयात्रेला गुजरातमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला होता. विश्व हिंदू परिषद या संघटनेनं रथयात्रा काढण्यात पुढाकार घेतला होता. बजरंग दल यात्रेच्या संयोजनात पुढे होतं. या दोन्ही संघटनांची पाळंमुळं या राज्यातल्या गावागावात रुजलेली आहेत.
२००२च्या गुजरात दंगलीत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा होता. या दंगलीत मुसलमानांना कसा धडा शिकवला, त्यानंतर ते कसे गप्प बसले आणि आजपर्यंत गुजरातमध्ये कसा दंगा होत नाही, हे गुजराती माणसाला महत्त्वाचं वाटतं. हे सांगताना अनेक गुजरात्यांची छाती आजही भरून येते. अभिमानानं फुगताना दिसते.
अहिंसा, शाकाहार ही जीवनशैली असणाऱ्या गुजराती माणसांत मुस्लिम द्वेष, परधर्म द्वेष कसा रुजला असेल? पाकिस्तानचा किनारा, गजनीच्या आक्रमणाची आठवण आणि धर्मांध विचारांची प्रयोगशाळा, याचा यात किती वाटा असेल, असे प्रश्न मनात घोंगावत राहतात. शेती, उद्योग, व्यापारात पुढारलेला हा समाज शिक्षणात मात्र कुठेतरी कमी पडताना दिसतो का? तिथल्या शाळा, महाविद्यालयं, शिक्षक यांची दैना पाहताना हे मनात येतं.
एकमात्र दिसतं, हा समाज प्रचंड हिशेबी आणि उत्सवी आहे. व्यापार, पैसा यासाठी वाट्टेल ते करण्याचा गुजराती माणसाचा स्वभाव दिसतो. मग फावला वेळ तो गरबा, दांडिया, नवरात्र, मकरसंक्रांती, डांगी दरबार, शामलाजी मेळे यात घालवतो.
गुजराती आणि हिंदी या दोन भाषा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात. गुजराती ही राज्यभाषा आहे. समुद्रमार्गे गुजराती लोकांचा फारसी, अरबी, तुर्की, पोर्तुगीज आणि इंग्रजी या भाषांशी संपर्क आला. या भाषांतील शब्द गुजरातीमध्ये मिसळलेले जाणवतात. संत नरसी मेहता यांच्या भजनानंतर गुजराती साहित्यात म. गांधींची पुस्तकं महत्त्वाची मानली जातात. आधुनिक गुजराती गद्यावर गांधींचा मोठा प्रभाव आहे असं साहित्य-समीक्षक मानतात. १८व्या शतकात कवी, लेखक प्रेमानंद होऊन गेला. त्यानं आधुनिक गुजराती गद्याचा पाया घातला, असं मानलं जातं.
अहिंसा आणि शाकाहार गुजराती माणसाला शिकवला जैन धर्मानं. पण तो जैन धर्म आज गुजरातमधून प्रभावहीन झालाय. गुजरात ही हिंदुत्ववादी विचाराची, रा.स्व.संघाची प्रयोगशाळा बनली आहे. त्यानंतर इतर धर्म अडगळीत गेले, असं इथले अभ्यासक मानतात. एकेकाळी जैन धर्माचा गुजरातवर खूप प्रभाव होता, मग आताच तो अडगळीत कसा गेला? इतका की जैन लोक स्वत:ची ओळख ‘हिंदुत्ववादी’ अशी सांगू लागले.
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे जैन आहेत. पण ते टीव्ही चॅनेलवर मी चार-पाच पिढ्यांपासून ‘हिंदुत्ववादी’ असल्याचं दरडावून सांगतात. इतर जैनधर्मीय भाजप नेतेही चतुरपणे स्वत:ची धार्मिक ओळख लपवतात आणि ‘हिंदुत्ववादी’ असल्याचा गर्व मिरवतात. हे कसं घडलं असावं याबद्दल मनातलं कुतूहल गुजरातमध्ये फिरताना जागं होत राहतं.
.............................................................................................................................................
नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक? - संपादन : राम जगताप
ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/323
.............................................................................................................................................
आदिवासी समूह हा गुजरातमधील मोठा जनसमूह आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत मोठ्या विभागात आदिवासी पट्टा आहे. या विभागात रा.स्व.संघाच्या वनवासी कल्याण आश्रमानं स्वातंत्र्यानंतर काम सुरू केलं. १९९०नंतर ते काम वाढलं. आज गावागावात वनवासी कल्याण आश्रमाच्या शाखा आहे. संघानं आदिवासींना तुम्ही आदिवासी नसून वनवासी आहात, हे शिकवलं. आदिवासींची मूळ देवदेवतं दूर करून राम, शबरी यांना तिथं प्रस्थापित केलं. आज गुजराती आदिवासी संघविचाराशी जोडला गेलेला दिसतो.
हा असा ऐतिहासिक वारसा बाळगत गुजराती माणूस वाटचाल करत आहे. या वाटचालीतून आपल्याला त्याच्या राजकीय वर्तनाचं व्याकरण समजून घेता येऊ शकतं. या निवडणुकीत गुजराती माणसं कुणाला कौल देऊ शकतात, याचा अंदाज त्यातून लावता येतो.
.............................................................................................................................................
लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 11 December 2017
राजा कांदळकर, फाळणीमुळे गुजराती माणूस पाकिस्तानचा द्वेष करतो हे तुम्हांस कोणी सांगितलं? पंजाबप्रमाणे गुजरातची फाळणी झालेली नाही. कच्छसौराष्ट्र व सिंध यांमधील सीमेवर वाळवंटामुळे तुरळक वस्ती आहे. पंजाबसारखी घनदाट नाही. गुजरातेत मुस्लिमांच्या विरोधी दंगली चालवायची इंडस्ट्री होती. महिनोनमहिने दंगली चालंत असंत. मोदींनी २००२ साली ही बंद पाडली. या इंडस्ट्रीचा पाकिस्तानशी कसलाही संबंध नाही. गुजरात ही हिंदुत्वाची प्रयोगशाळा असल्याचं सिद्ध करण्यासाठी तुमचा खटाटोप चाललाय. संघाने आदिवासींना वनवासी बनवलं हा तुमचा आरोप केविलवाणा दिसतो आहे. आधी अभिनिवेश आवरा. मग मुद्द्याचं बोलू. आपला नम्र, -गामा पैलवान