अजूनकाही
१. भाजपकडे ज्योतिषांची संख्या जास्त आहे. अशा ज्योतिषांच्या सल्ल्यामुळेच कदाचित मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त लांबला असावा, अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. राणे यांनी पक्षबांधणीसाठी पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केला असून सांगलीत वार्ताहरांच्या बैठकीत ते म्हणाले की, आजपर्यंत मला मिळालेली पदं ही गुणवत्तेवर मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला जाईल, असा विश्वास आहे. आपल्या प्रवेशाला विरोध करण्याइतकी शिवसेनेची ताकद उरलेली नाही. गुजरात निवडणुकीनंतर संधी दिली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेसह सर्वच पक्षांची सहभागी होण्याची आमंत्रणं आपल्याला होती, असा दावा त्यांनी केला.
आमच्या कोकणसम्राट दादांनी नेमका कोणत्या गुरवानं सांगितलेल्या मुहूर्तावर काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला, कुणास ठाऊक! अर्थात, तशी शंका त्यांच्या बऱ्याच निर्णयांविषयी यायला जागा आहे. मिळालेल्या संधी या आपल्या गुणांनी मिळाल्याची खात्री असेल, तर हुकलेल्या संधींनाही ‘गुण’च कारण असणार, अशी एक शक्यता त्यांच्या मनाला कधी चाटून गेली असेल का?
.............................................................................................................................................
२. ‘मुंबै बँके’चे अध्यक्ष व भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी, तसंच बँकेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी केलेल्या १२३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागानं गुन्हा दाखल करून दोन वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी तपासाचं काम सुरूही झालेलं नाही. मुंबई भाजपचे सचिव अॅडव्होकेट विवेकानंद गुप्ता यांनी हा गुन्हा दाखल करूनही पोलिसांनी आजपर्यंत दरेकर यांना अटक करणं तर सोडाच, परंतु साधी चौकशी करून त्यांच्यावर आरोपपत्रही दाखल केले नाही. विरोधी पक्षात असताना ‘मुंबै बँके’तील घोटाळ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, तसंच विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते व विद्यमान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. तावडे यांनी तर प्रवीण दरेकर व शिवाजी नलावडे यांच्या घोटाळ्यांचा पाढा वाचून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कारवाईसाठी पत्र लिहिलं होतं. तेव्हा मनसेत असलेले प्रवीण दरेकर यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांना आमदारकीही बहाल करण्यात आली.
अरे, या वार्ताहरांना कोणीतरी भारतीय जनता पक्षाच्या ‘वाल्या-वाल्मिकी अभयदान’ योजनेची माहिती द्या रे. उगाच वेडपटासारखे कोणावरही आरोप करत सुटतात. १४३ कोटींचा घोटाळा म्हणे! सारदा घोटाळा कितीशे कोटींचा आहे, काही कल्पना आहे का? त्यातल्या मुकुल रॉय यांच्यावरही कारवाई करा म्हणून मागणी कराल पुढे. तुमच्या जिभेला काही हाड?
.............................................................................................................................................
३. इस्लामिक स्टेट अर्थात आयसिससाठी लढणाऱ्या ब्रिटिश नागरिकांना शोधून त्यांचा खात्मा केला पाहिजे, असं वक्तव्य ब्रिटनचे नवे संरक्षण मंत्री गेविन विलियम्सन यांनी केलं आहे. आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी दुसऱ्या देशांत गेलेल्यांना ब्रिटनमध्ये परतण्यास बंदी घालण्याची गरज असल्याचंही विलियम्सन म्हणाले. दहशतवादी मारले गेल्यानं ब्रिटनला कोणताही त्रास होणार नसल्याचं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. दहशतवादाचा वाढता धोका लक्षात घेऊन दहशतवाद्यांना संपवण्यासाठी जे जे काही करता येईल, ते सर्व आपण करायला हवे, असं मत विल्यम्सन यांनी व्यक्त केलं.
ब्रिटनचं सरकार ‘ब्रिटिश नागरिकां’च्या हितरक्षणासाठी कर्तव्य कठोरपणे ही पावलं उचलत असताना आणि दहशतवाद्यांचा बिमोड करत असताना डोनाल्ड ट्रम्प किंवा किम जोंग ऊन यांच्यापैकी कोणताही एक माथेफिरू जागतिक अण्वस्त्रयुद्धाची कळ काढून मोकळा झाला तर विल्यम्सन काय करणार आहेत, कोण जाणे? पण, अशा प्रश्नांच्या फंदात ते पडणार नाहीत.
नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक? - संपादन : राम जगताप
ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/323
.............................................................................................................................................
४. भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले यांनी साक्षात पंतप्रधानांना लक्ष्य करून पद सोडलं असतानाच, भाजपचे काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी थेट मुख्यमंत्र्यांना घेरलं आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करूनदेखील परिणामकारक बदल झालेले नाहीत. शेतकरी सुखी नाही. तरुणांना रोजगार नाही. कायदा सुव्यवस्था अधिकच बिघडली, असं देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. मेट्रो रेल्वे, समृद्धी महामार्ग थांबवा आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, अशी सूचनाही देशमुखांनी केली आहे.
देशमुख यांनी खरं तर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचं काही कारणच नाही. त्यांनी स्वत:च म्हटलेलं आहे की, मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केल्यानंतरही शेतकरी सुखी नाही आणि तरुणांना रोजगार नाही. यात तरुणांची आणि शेतकऱ्यांची चूक आहे, हे उघडपणे दिसतंय. मुख्यमंत्र्यांनी त्यांना काल्पनिक गाजरं दिल्यानंतरही ते काल्पनिक गाजर हलवा, काल्पनिक पुलाव वगैरे बनवून सुखी राहू शकत नसतील, तर त्याला मुख्यमंत्री काय करू शकतील, अध्यक्षमहोदय?
.............................................................................................................................................
५. गुजरातमधील निवडणुकीत भाजपचे नेते काँग्रेसवर तुटून पडले असताना गुजरातच्या एका मंत्र्यानं चक्क राहुल गांधींची बाजू घेत स्वपक्षालाच खडसावलं आहे. काँग्रेस इतरांच्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबूड करत नाही. त्यामुळे भाजपनंही काँग्रेसवर दादागिरी करू नये, असं गुजरातचे मत्स्यपालन मंत्री पुरुषोत्तम सोलंकी यांनी म्हटलं आहे. भाजप काँग्रेसवर नेहमीच घराणेशाहीचा आरोप करते. हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्यानं भाजपनं यात हस्तक्षेप करू नये, असं त्यांनी म्हटलं आहे. भाजपमध्ये कोणाला तिकीट दिलं जावं किंवा नाही याबद्दल राहुल गांधींनी आक्षेप घेतला नसेल, तर मग तुम्ही असं का करता, अशा शब्दांत त्यांनी भाजपला खडसावलं. आपण माझ्याकडेच पाहा; जो ताकदवान आहे त्याला भाजप हातदेखील लावत नाही. मात्र, जो कमजोर आहे, लढू शकत नाही त्याच्यावर दादागिरी केली जाते, असा आरोपही त्यांनी केला . घोघा विधानसभा मतदारसंघातून १९९८पासून सलग जिंकत आलेले आमदार सोलंकी म्हणाले, ‘पाच वर्षांनंतर मी माझ्या मुलाला ११० टक्के राजकारणात लॉन्च करणार आहे. त्यावेळी भाजपला त्याला समर्थन द्यावेच लागेल. भाजपला भावनगरमधील नऊ जागा जिंकायच्या असतील, तर त्यांना माझ्या मुलाला तिकीट द्यावेच लागेल अन्यथा मी निवडणूक प्रचार करणार नाही,’ अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
सोलंकी शेठ, थोडं थंड घ्या. उगाच घरच्या गोष्टी चव्हाट्यावर टांगू नका. जो ताकदवान आहे, त्याला भाजप हात लावत नाही, बाहेरच्या पक्षातल्या ताकदवानांनाही आत बोलावून घेते. सगळ्या ताकदवानांच्या मुलांची पक्षात कशी काळजी घेतली जाते, ते मोटाभायकडे पाहून कळत नाही का तुम्हाला? तुमच्या मुलाला त्याच्या ‘कर्तबगारीच्या बळा’वर तिकीट मिळाल्याशिवाय राहणार नाही, याबद्दल निश्चिंत राहा.
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment