द टेस्टफुल एट्थ : शंभर नंबरी व्हिंटेज टॅरँटिनो, टॅरँटिनोचा आठवा सिनेमा
सदर - न-क्लासिक
चिंतामणी भिडे
  • ‘द टेस्टफुल एट्थ’चं एक पोस्टर
  • Mon , 11 December 2017
  • इंग्रजी सिनेमा English Movie न-क्लासिक चिंतामणी भिडे Chintamani Bhide द टेस्टफुल एट्थ The Hateful Eight क्वेंटिन टॅरँटिनो Quentin Tarantino

आसमंतात कडाक्याची थंडी भरून राहिली आहे. हाडं गोठवणारी की काय म्हणतात ना, तशी. सोबत बोचरा वाराही घोंघावतोय. सर्वत्र बर्फाचं आच्छादन आहे. दूरवर नजर जाईल तिथवर फक्त पांढऱ्याचं साम्राज्य. घरं, रस्ते, शेती, नद्या, डोंगर सर्व काही पांढऱ्या रंगाला शरण गेलेलं. दुसरा कुठलाच रंग नाही. शांततेचा हा रंग आहे, मात्र कमालीचा फसवा. कारण माणसाच्या मनातल्या हिंसक खळबळीचं प्रतिबिंब त्यात पडत नाही. याच खळबळीचा स्फोट घडवण्यासाठी आतूर असलेले नऊ जण एका घरात एकत्र आलेत. बाहेर संवेदना गोठवणारी थंडी आहे, पण यांच्या आत मात्र द्वेष, हिंसा, अभिमान, गर्व, प्रौढी, भीती, कटुता अशा सर्वच संवेदनांचा लाव्हा उसळी मारमारून वर यायला हपापलेला. दूरवरून बर्फाचं वादळ पाठलाग करत त्यांच्याच दिशेनं येतंय. त्यामुळे नाईलाजानं ते या घराच्या आसऱ्याला आलेत.

मात्र, ते सगळे एकत्र नाहीत. मेजर मार्क्विस वॉरन (सॅम्युअल एल जॅक्सन), जॉन रुथ (कर्ट रसेल), डेझी डॉमर्ग्यू (जेनिफर जेसन ली), ख्रिस मॅनिक्स (वॉल्टन गॉगिन्स) आणि त्यांच्या रथाचा सारथी ओबी (जेम्स पार्क्स) हे पाचजण एकत्र त्या घरात येतात खरे, पण रुथ आणि डेझी वगळता बाकी कोणाचा एकमेकांशी संबंध नाही. ते घरात येतात त्यावेळी तिथं आधीपासूनच ओस्वाल्डो मोब्री (टिम रॉथ), जनरल सँडी स्मिथर्स (ब्रूस डर्न), जो गेज (मायकल मॅडसन) आणि त्या घराचा कारभार पाहणारा बॉब (डेमियन बिचिर) हे चौघे उपस्थित आहेत. त्यांच्या संभाषणातून त्यांचाही एकमेकांशी संबंध नाही, हे कळतं. आणि तरीही हे नऊ जण एकत्र येतात, त्यावेळी एक अजब तणाव निर्माण होतो. अमेरिकन सिव्हिल वॉर संपून पाच-सहा वर्षं उलटलीत... कदाचित १०-१२. काळ्यांना (निग्रो) गुलाम बनवून ठेवण्याची प्रथा सुरू ठेवायची की नाही, यावरून उत्तर आणि दक्षिणेकडील राज्यं परस्परांच्या विरोधात उभी ठाकलेली. अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन गुलामगिरीच्या कट्टर विरोधात. दक्षिणेकडील काही राज्यांनी एकत्र येऊन कन्फेडरेटची स्थापना केली. अमेरिकेपासून फुटून निघत स्वातंत्र्य घोषित केलं. त्याला अर्थातच आंतरराष्ट्रीय समुदायानं मान्यता दिली नव्हती. पण या राज्यांची आणि उत्तरेकडील राज्यांची जुंपली. सशस्त्र संघर्ष उफाळून आला. लिंकन यांच्या नेतृत्वाखाली उत्तरेकडील राज्यांनी दक्षिणकेडील या कन्फेडरेटचा पराभव केला. कन्फेडरेटनं बिनशर्त शरणागती पत्करली आणि अमेरिकेची फाळणी टळली. ‘फाळणी टाळणारा महापुरुष’ म्हणून लिंकन नावारूपाला आला.

पण सिव्हिल वॉर संपलं तरी कटुता संपली नव्हती. निग्रोंची अवहेलना सुरूच होती. गोऱ्यांच्या मनात वांशिक श्रेष्ठत्वाची विषवल्ली पूर्वीसारखीच फोफावलेली होती. अशा सगळ्या वातावरणात कडाक्याच्या थंडीत वायोमिंगमधल्या त्या घरात एकत्र आलेल्या नऊजणांमध्ये मेजर मार्क्विस वॉरेन हा एकमेव निग्रो आहे, जो अर्थातच सिव्हिल वॉरमध्ये गुलामगिरी संपवण्याच्या बाजूनं लढलाय आणि त्याच नऊ जणांमध्ये कन्फेडरेटच्या बाजूनं लढलेला एक कमांडर (जनरल सँडी स्मिथर्स) देखील आहे. हे दोघे समोरासमोर येतात, तेव्हा अर्थातच ठिणग्या उडतात. कमांडरच्या मनात आजही काळ्यांविषयी कमालीची नफरत आहे... इतकी की तो मार्क्विसशी थेट बोलणंही पसंत करत नाही. सुरुवातीला ओस्वाल्डोच्या माध्यमातून तो बोलतो. पण मग त्याच्याही नकळत तो थेट मार्क्विसशी बोलू लागतो. तिखटजाळ संभाषणाच्या माध्यमातून परस्परांची हेटाळणी करून झाल्यावर मामला अधिक गंभीर होतो, ज्यावेळी स्मिथर्सच्या मुलाला आपणच मारल्याचं मार्क्विस सांगतो... तेदेखील अतिशय रंगवून रंगवून, कसा छळ करून आपण त्याला मारलं, याचं रसभरित वर्णन तो करतो. मॅनिक्स स्मिथर्सला समजवायचा प्रयत्न करतो, ‘मार्क्विस तुला उसकवतोय, त्याच्याकडे दुर्लक्ष कर, तो खोटं बोलतोय’.

आणि हीच ‘द हेटफुल एट’ची गंमत आहे. त्या नऊ व्यक्तिरेखा आपापली जी गोष्ट सांगतात, ती किती खरी आणि किती खोटी याचा अंदाज कोणालाच येत नाही, अगदी प्रेक्षक म्हणून आपणही शेवटपर्यंत चाचपडतच असतो. म्हणजे मॅनिक्सनं रुथला त्याच्या घोडागाडीत घेण्याची विनंती करताना सांगितलेलं असतं की, रुथ जिथं निघालाय त्या रेड रॉक या गावचा तो नवा शेरीफ आहे. पण हे सिद्ध करण्यासाठी निदान त्या क्षणी तरी त्याच्याकडे काही नसतं. पण रुथ तिथं जातोय ते डॉमेर्ग्यूला तिथल्या शेरीफच्या हवाली करून तिच्या डोक्यावर असलेलं १० हजार डॉलरचं बक्षीस मिळवण्यासाठी. मॅनिक्स त्याला म्हणतो, ‘तू मला घोडागाडीत घेतलं नाहीस आणि मी इथं बर्फात गोठून मेलो तर तुला बक्षीस कोण देणार? उलट शेरीफला लिफ्ट न दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं खापर तुझ्या डोक्यावर येईल आणि तुला शिक्षा होईल.’ त्यामुळे नाईलाजानं रुथ मॅनिक्सला घोडागाडीत घेतो. पण तरीही त्यामुळे मॅनिक्स हा खरोखरंच शेरीफ आहे, हे सिद्ध होत नाहीच.

थोड्याच वेळात कुठल्याशा कारणावरून रुथला शंका येते की, मॅनिक्स आणि मार्क्विस हे दोघेही खरं म्हणजे एकमेकांना ओळखतात, ते मिळालेले आहेत आणि डॉमेर्ग्यूला सोडवण्यासाठी त्यांनी हे नाटक केलंय. पण पुन्हा दोघे त्याची खात्री पटवतात. अर्थात तरीही दोघे खरंच बोलत आहेत, हे सिद्ध होत नाहीच. पण मुळात रुथ हा चांगला आहे आणि तो खरोखरच गुन्हेगार असलेल्या डॉमेर्ग्यूला कायद्याच्या हवाली करायला निघालाय, याला तरी कुठे पुरावा आहे?

तर अशी ही सगळी गंमत आहे. हे गोंधळ उडवणारं आहे हे खरंय, पण त्याला नाईलाज आहे. मूळ गोष्ट अगदी सोपी आहे. ती अशी की, डॉमेर्ग्यू ही एका मोठ्या गँगची सदस्य आहे. तिला रुथनं खरोखरच पकडलंय आणि तो तिला शेरीफच्या हवाली करून तिच्या डोक्यावर असलेलं बक्षीस मिळवण्यासाठी रेड रॉक या गावी निघालाय. वाटेत तो मिनी मिंक आणि स्वीट डेव यांच्या घर कम हॉटेलमध्ये निश्चितपणे थांबणार, हे हेरून त्या गँगचा लीडर आणि डॉमेर्ग्यूचा भाऊ जोडी (चॅनिंग टॅटम) आपल्या साथीदारासह तिथं सापळा रचतो. त्या सापळ्यात रुथ, मार्क्विस आणि मॅनिक्स अलगद अडकतात.

एका वाक्यात सांगायचं तर हा रिव्हेंज ड्रामा आहे. पण साधारणपणे रिव्हेंज ड्रामामध्ये जो रिव्हेंज घेऊ पाहातोय, तो प्रामाणिक असतो, त्याच्यावर काहीतरी अन्याय झालेला असतो. इथं तसं काही नाही. हा क्वेंटिन टॅरँटिनोचा चित्रपट आहे. त्यामुळे इथं कोणीच फक्त चांगलं किंवा फक्त वाईट नाही. रिव्हेंज घेणारा तर अट्टल गुन्हेगार आहे. टॅरँटिनोच्या प्रथेनुसार कथेचा जीवही लहान आहे, पण भरपूर ऐतिहासिक व सामाजिक संदर्भ, टॅरँटिनोच्या खास शैलीतली ट्रीटमेंट आणि ‘पॅनाव्हिजन अल्ट्रा ७०’ या व्हिंटेज कॅमेऱ्याच्या ७० एमएम तंत्राची जोड देत टॅरँटिनो भव्यदिव्य कलाकृती सादर करतो.

अर्थात ही भव्यता व्हिज्युअल्स पुरती मर्यादित आहे. आशयाच्या पातळीवर सिनेमाला फारशी खोली नाही. पण तो आरोप तर टॅरँटिनोवर नेहमीच होत असतो. त्यामुळे ‘द हेटफुल एट’च्या बाबतीत तरी त्यानं अपवाद का करावा? टॅरँटिनोचे सिनेमे नेहमीच त्याच्या एकत्रित परिणामाऐवजी सादरीकरणातल्या किकअॅस मोमेंट्ससाठी आणि पंचलाइन्ससाठी ओळखले जातात. त्याच्या फॅन्सनाही कथेपेक्षा सादरीकरणात जास्त रस असतो. निरर्थक संवादांनी शब्दबंबाळ झालेले भलेमोठे प्रसंग हेही टॅटँटिनोच्या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य. गंमत म्हणजे या प्रसंगांचा किंवा त्यातल्या संवादांचा कथेशी फारसा संबंध असेलच असं नाही, पण तरीही हे प्रसंग क्षणभरासाठीही कंटाळवाणे होत नाहीत. प्रेक्षक त्यांची मजा घेत घेत पुढे जातो.

‘द हेटफुल एट’मध्येही अशा प्रसंगांची रेलचेल आहे. त्यातले अनेक प्रसंग नसते तरी फारसा फरक पडला नसता. अनेक प्रसंगांची लांबी सहज कमी करता आली असती. तब्बल पावणेतीन तासांचा हा चित्रपट सहजपणे दोन-सव्वा दोन तासांत संपवता आला असता. पण मग एक नुसताच वेगवान थरारपट बघितल्याचा फील आला असता. संवादांमधली खुमारी अनुभवता आली नसती, टॅरँटिनो ज्या पद्धतीने खेळवत खेळवत संवादांमधून प्रसंगाचा विस्तार करतो, त्या खेळातली गंमत लुटता आली नसती. कथेचा सुमार आहे १९व्या शतकातला. त्या काळातला संथपणा टॅरँटिनोनं पटकथेतून पकडण्याचा प्रयत्न केलाय.

‘जँगो अनचेन्ड’नंतर त्याचीच गोष्ट पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न टॅरँटिनोला करायचा होता. पण ‘द हेटफुल एट’ लिहीत असतानाच ते शक्य नसल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं नाद सोडला. म्हणायला हा ‘जँगो अनचेन्ड’सारखाच वेस्टर्नपट आहे, पण म्हणायलाच. वेस्टर्नपट ज्या काळात घडतात आणि ज्या भूमीत घडतात, तो काळ आणि ती भूमी या चित्रपटात आहेत, साधारण तशाच रासवट व्यक्तिरेखादेखील आहेत. अगदी ‘डॉलर ट्रायालॉजी’वाला लीजंडरी संगीतकार एन्निओ मोर्रिकोनं याच्याकडून टॅरँटिनोनं संगीत करून घेतलं. मोर्रिकोनेला त्याचं पहिलं ऑस्कर या सिनेमानं मिळवून दिलं. पण तरीही हा निव्वळ वेस्टर्नपट नाही.

टॅरँटिनोला ७० एमएमचा भव्यदिव्य एपिक ड्रामा सादर करायचा होता. त्यासाठी त्यानं ‘बेन हर’, ‘हाऊ द वेस्ट वॉज वन’, ‘फॉल ऑफ द रोमन एम्पायर’ यांसारख्या अतिभव्य सिनेमांसाठी वापरलेला, पण आता क्वचितच वापरला जाणारा पॅनाव्हिजन अल्ट्रा ७० सारखा कॅमेरा निवडला. २.७६ : १ इतक्या टोकाच्या आस्पेक्ट रेश्योमध्ये (म्हणजे दृश्यचौकटीच्या उंचीच्या तुलनेत लांबी २.७६ पट जास्त) सिनेमा चित्रित केला. त्याचा नेमका परिणाम पडद्यावर दिसतो. इतकं सगळं केल्यावर सिनेमाची पहिली ३७ मिनिटं वगळता, पुढचा जवळपास अख्खा सिनेमा एका बंदिस्त घरात तो घडवतो. हे म्हणजे महेंद्र सिंग धोणीनं पुढे सरसावत यावं आणि चेंडू हलकासा टोलवून केवळ एक धाव घ्यावी, असं झालं. पण ७० एमएम कॅमेऱ्यामुळे जी विस्तीर्ण दृश्यचौकट मिळते, त्यामुळे एका बंदिस्त घरात सिनेमा घडूनही त्यातली भव्यता कशी दिसत राहाते, त्याची एक छोटीशी झलक खालील छायाचित्रातून दिसेल.

टॅरँटिनोच्या सिनेमांच्या बाबतीत दोन टोकाची मतं असू शकतात. त्याच्या शैलीच्या प्रेमात असलेले अनेक जण आहेत; त्याच वेळी केवळ शैलीच्या आहारी जात आशयाकडे दुर्लक्ष करण्याच्या त्याच्या खाक्यावर टीका करणारेही बरेच आहेत. अनेकांना त्याच्या सिनेमातली हिंसा अनावश्यक वाटते. हिंसेचं उदात्तीकरण करत असल्याचा आक्षेपही त्याच्यावर घेतला जातो. पण या मतमतांतराच्या गलबल्यात टॅरँटिनोचा सिनेमा त्याचा स्वत:चा असतो. ‘द हेटफुल एट’ त्याचा आठवा सिनेमा आहे (यात ‘फोर रूम्स’ आणि ‘ग्राइंड हाऊस’ धरलेले नाहीत, कारण त्यातला केवळ एकेक सेगमेंटच त्याचा होता) आणि आठपैकी आठही चित्रपटांनी ठसा उमटवणं किंवा इम्पॅक्ट सोडणं हे येरागबाळ्याचं काम नाही. यू लव्ह हिम, यू हेट हिम, बट यू कॅन नॉट इग्नोर हिम!

‘द हेटफुल एट’नं टॅरँटिनोच्या अन्य चित्रपटांइतका म्हणजे रिझर्व्हायर डॉग्ज, पल्प फिक्शन, किल बिल यांच्याइतका हंगामा केला नाही. बॉक्स ऑफिसवरही त्यानं बक्कळ कमाई केली अशातला भाग नाही. पण हा शंभर नंबरी व्हिंटेज टॅरँटिनो आहे. टॅरँटिनोचा हा आठवा सिनेमा ‘द टेस्टफुल एट्थ’ आहे.

नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक? - संपादन : राम जगताप

ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/323

.............................................................................................................................................

लेखक चिंतामणी भिडे मुक्त पत्रकार आहेत.

chintamani.bhide@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......