अजूनकाही
नुकताच आमीर खानची निर्मिती असणारा ‘सिक्रेट सुपरस्टार’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. नेहमीप्रमाणे आमीरनं वेगळा विषय आणला अशी चर्चा ऐकायला यायला लागली. हा सिनेमा गेल्या दहा वर्षांत आमीरनं जे इतर तीन महत्त्वाचे सिनेमे दिलेत, त्यांच्याशी नातं सांगणारा आहे. ते सिनेमे म्हणजे ‘तारे जमीं पर’, ‘थ्री इडियट्स’ आणि ‘दंगल’.
या चारही सिनेमांत एक गोष्ट सामाईक दिसते. ती म्हणजे व्यक्तीनं सकारात्मक राहायला हवं. सकारात्मक राहणं काळाची गरज आहे, असा संदेश हे सिनेमे देतात. त्याच्यासोबत स्वप्न बघणं वाईट नसतं, स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी भरपूर मेहनत घेणं आवश्यक आहे. आत्मविश्वास असला की, कुठलीही गोष्ट साध्य होऊ शकते. फक्त मनात आणण्याची खोटी. अशा सध्याच्या कळीच्या मुद्द्यांना कथानाकाद्वारे हात घालण्याचं काम हे सिनेमे करतात.
या सिनेमात असणारी सकारात्मकता नेमकी असते काय, असा प्रश्न पडतो. तो कोणत्या वर्गासाठी हे सिनेमे बनवलेले आहेत म्हणून. हा वर्ग कोण आहे, जो या सिनेमांना भरभरून प्रतिसाद देतो? आमीर खान यात कोणत्या तरी भूमिकेत आहे, अशी नुसती बातमी जरी आली तरी त्याला उत्साहाचं उधाण येतं. कधी एकदा सिनेमा जवळच्या थिएटरला लागतोय आणि आपण हजेरी लावतोय असं या वर्गाला होऊन जातं.
या वर्गाची काही ठळक वैशिष्ट्यं आहेत. ती अशी -
१) हा वर्ग मध्यमवर्गीय मानसिकतेचा असतो. मग आर्थिक स्तर कुठलाही असला तरी.
२) हा वर्ग जात-वंश-वर्ण-धर्म वगैरे गोष्टींना अतोनात मानतो. त्यामुळे त्याच्यासाठी आरक्षण हा कळीचा व जगण्याच्या केंद्रस्थानी असणारा मुद्दा असतो. त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी असते. कधी मोर्च्यांच्या तर कधी धरणं-आंदोलनांच्या रूपात. जर आरक्षणात नसेल तर ते मिळवण्यासाठी आणि आपल्या मागे पडलेल्या समाजाला पुढे कसं आणता येईल, याचे आडाखे तो बांधत असतो.
३) हा वर्ग मुलांना मराठी-इंग्रजी शाळेत घालतो. पुढे महाविद्यालयीन शिक्षणात तडजोड होणार नाही याची काळजी घेतो. त्यासाठी कर्ज काढणं, बदली करून घेणं किंवा स्थलांतर आनंदानं करतो.
४) हा वर्ग वर्षातले सर्व सणवार, उपासतापास, व्रतवैकल्यं नित्यनियमानं पाळतो. इतर धर्मियांच्या सणावारात सामील होऊन आपण सहिष्णू व भाईचारा पाळणारे आहोत असं दाखवतो.
५) हा वर्ग सून-जावई स्वजाती/धर्मातलेच करून घेतो. लग्न व त्यानंतरचे सर्व सोपस्कार विधिवत करण्यावर याचा कटाक्ष असतो.
६) हा वर्ग सतत तक्रार करत असतो. कधी याच्यात हे कमी आहे, तर कधी त्याच्यात ते कमी आहे. या सरकारमुळे असं झालं, तर त्या सरकारमुळे तसं झालं. रस्त्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत प्रत्येक गोष्टींवर अधिकारवाणीनं भाष्य करतो. आपण कधीच प्रगती करू शकणार नाहीत असं सतत बोलत असतो.
७) हा वर्ग जात-धर्मानंतर नोकरी, व्यवसाय या गोष्टींना इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा वरचा मानतो. नोकरीत कायमस्वरूपी होण्यासाठी तो पाण्यासारखा पैसा ओतायला तयार असतो. त्यासाठी सर्व परीक्षा द्यायला एका पायावर तयार असतो. वैध-अवैध मार्गानं व्यवसाय शाबूत राहण्यासाठी त्याच्या जीवाचा आटापिटा चालू असतो.
८) हा वर्ग सुलभ हप्त्यात सुई ते घर व्हाया कार/शेतजमीन घेणारा असतो. त्यासाठी वाट्टेल ती उलाढाल करायला तो मागेपुढे पाहत नाही. सरकारी कागदं काढायची असली की इतर वेळी भ्रष्टाचारावर तज्ञासारखा बोलणारा हा वर्ग हजार-दोन हजार खर्च झाले तरी हरकत नाही, पण काम व्हायला पाहिजे असं म्हणत सचोटीपूर्ण व्यवहार करतो.
९) या वर्गातल्या तरुणांचे आई-वडील वयोमानाप्रमाणे आजारी पडायला लागतात, तेव्हा हा शहरातल्या सर्वांत चांगल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांची काळजी घेतली जावी यासाठी प्रयत्न करतो. अशा वेळी तो श्रावण बाळाच्या भूमिकेत शिरतो. माझ्या आई-वडिलांनी मला मोठं करण्यासाठी खूप कष्ट केले, खस्ता खाल्ल्या; त्यामुळे त्यांच्या न फेडता येणाऱ्या उपकरातून आपण उतराई व्हायला हवं असं तो म्हणतो.
१०) हा वर्ग बद्रीनाथ, केदारनाथ, कैलास मानसरोवर, चारधाम ते अमेरिका-युरोपातली प्रेक्षणीय स्थळं पाहायला जातो. ते नाही जमलं तर परदेशस्थ नागरिक असणाऱ्या किंवा इतर राज्यात राहणाऱ्या आपल्या मुलाच्या/लेकीच्या बाळंतपणासाठी जातो. दरम्यान तिथली बघता येतील तितकी प्रेक्षणीय स्थळं बघून घेतो. आयुष्याचा आनंद लुटायला हवं हे याचं तत्त्वज्ञान असतं. आयुष्य हे आसू व हासूचं मिश्रण असतं असं तो म्हणतो.
११) हा वर्ग दररोजचा वर्तमानपत्र न चुकता वाचतो. संपादकीय वाचून ‘अर्थसाक्षर’ झाल्याचा याला साक्षात्कार होतो. मग पारंपरिक पोस्ट्स/बॅंकातल्या ठेवी व सोन्या-चांदीसोबतच म्युचुअल फंड्स ते शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला हवेत असं याला वाटायला लागतं. इलेक्ट्रॉनिक मीडियावरील चर्चा चवीनं बघतो. कामावरून थकून भागून आल्यावर संध्याकाळी सात ते रात्री अकरापर्यंतची मालिका बघतो. त्यातल्या पात्रांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना/ओढवणारी संकटं ही आपल्याही आयुष्यात घडणारी आहेत असं याला वाटतं. वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर्स चुकवत नाही.
१२) हा वर्ग कोणतं साहित्य वाचतो? कालसुसंगत नसणारं, जुन्या मध्यमवर्गीयांना रिझवणारं पुलं-वपुंचं साहित्य वाचतो, असं तो अभिमानानं सांगतो. अखिल भारतीय साहित्य संमेलनातील चव्हाट्यावर येणाऱ्या वादांचा मनापासून आनंद घेतो. नवीन काय वाचता म्हटल्यावर अच्युत गोडबोलेंची माहितीपर बेस्ट-सेलिंग पुस्तकं, वॉरन बफे, सेल्फ हेल्प, यशस्वी कसे व्हावे, ओरिसन स्वेट मार्टिन ते ‘मन में है विश्वास’, ‘द अल्केमिस्ट’ वाचतो असं सांगतो. सोबत प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या भाषणांचे व्हिडिओज बघतो असं म्हणतो. त्यामुळे सतत प्रेरणादायी, मोटिव्हेशनल, सकारात्मक, हॅप्पी थॉट्स मिळणारं काहीतरी त्याला हवं असतं.
१३) हा वर्ग शंकर-जयकिशन ते हनी सिंगचं संगीत कानसेन असल्यासारखा ऐकतो. सवाई गंधर्व ते दिवाळी पहाट कार्यक्रमांना हजेरी लावतो. अभिरुची जपणंही आयुष्य जगताना आवश्यक असतं, अशी छानशी मखलाशीही करतो. चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरू झाल्यावर याला सव्वीस जानेवारी व पंधरा ऑगस्ट नंतर तिसऱ्यांदा देशभक्त झाल्यासारखं वाटतं.
१४) हा वर्ग पुरुषी वर्चस्ववादाचा समर्थक असतो. व्यसनं करणं हा मर्दपणा आहे यावर याचा ठाम विश्वास असतो. समोरील व्यक्तीवर नेहमी कुरघोडी करणं, वर्चस्ववादीपणा करणे याला आवडतं. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांवर आपला धाक अबाधित राहिला पाहिजे, याची सतत काळजी घेत असतो.
१५) हा वर्ग हॉलिवुड सिनेमांत नेहमी अमेरिकेवरच प्राणघातक हल्ला करणाऱ्या परग्रहवासीयांसारखा वागतो. हे परग्रहवासी जसे पृथ्वीवर आले की, इथल्या मानवांपेक्षा वेगळे दिसतात, वागतात तसं हा वर्ग दिसण्यावागण्याचा सतत प्रयत्न करत असतो. आपण कुणीतरी वेगळे आहोत असं सतत ठसवत असतो. त्यासाठी पारंपरिक ते लेटेस्ट फॅशन्सचे कपडे, दागदागिने घालतो. आपण आपल्या आवडत्या नट- नट्यांसारखे दिसतो का नाही, याकडे बारीक लक्ष ठेवून असतो.
वरील ढोबळ वैशिष्ट्यं बघितली की लक्षात येतं की, हा वर्ग विचक्षण मानसिकतेचा आहे... याला काय करायचं आहे ते पक्कं माहिती आहे. तोंडानं म्हणत नसला तरी ‘आधी पोटोबा मग विठोबा’ यावर याचा विश्वास आहे. आर्थिक उदारीकरणाची गोड फळं कशी चाखायची हे तो जाणतो. तरीही हा वर्ग आम्हाला आमीर खानच्या या चार सिनेमांमधून सकारात्मकता मिळते, ऊर्जा मिळते, जगण्याचं बळ मिळतं, पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात, असं म्हणतो; तेव्हा खरंच ते मिळतं का असा प्रश्न पडतो.
या चारही सिनेमांच्या कथा बघितल्या तर लक्षात येतं त्या मेलोड्रॅमॅटिक आहेत. सिनेमाच्या शेवटी हमखास डोळ्यात पाणी यायला हवं, अशा पद्धतीनं कथानकाची चढत्या भाजणीत रचना केलेली आहे. कथेतल्या मुख्य पात्रांच्या आयुष्यात उद्भवणारी समस्या नाट्यमय घडामोडीनंतर शेवटाकडे चुटकीसरशी सोडवली जाते. अशा पद्धतीच्या कथा चातुर्मासातल्या पुस्तकातल्या आटपाट नगरात राहणाऱ्या गरीब ब्राह्मणाच्या आयुष्यासारख्या असतात. त्या गरीब ब्राह्मणाची अवस्था पालटण्याचं काम एक सत्यनारायणाची पूजा करतं. त्याला लगेच आर्थिक सुबत्ता मिळते. सुखसमृद्धी पायाशी लोळण घालतं. त्याची साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण होते. तसेच हे सिनेमे साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण असणारे आहेत. हे सिनेमे ज्येष्ठ दिवंगत साहित्यिक विलास सारंग म्हणतात तसं प्रश्न मांडणारे नाहीत. सिनेमा बघून बाहेर आल्यावर प्रेक्षकांना एकही प्रश्न पडत नाही किंवा तो विचारी झालाय असं दिसत नाही. कारण सिनेमातल्या कथेत उत्तरं दिलेली असतात. पोषणमूल्य नसणारे पदार्थ खात यांचा आस्वाद घेतलेला असतो. त्यामुळे विचारी होण्याचा किंवा प्रश्न पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही या सिनेमातनं या वर्गाला सकारात्मकता मिळते.
हा वर्ग सलमान खान-रोहित शेट्टीचे सिनेमे बघत नाही, कारण ते दोन घटका मनोरंजनाला वाहिलेले आहेत असं याचं म्हणणं आहे. दरवर्षी ईदला सिनेमा प्रदर्शित करून काही‘शे’ कोटी कमावणारा सलमान खान किंवा गाड्यांची नासधूस करून वेळेचा अपव्यय करणारा रोहित शेट्टी अभिरुची घालवतात असं या वर्गाला वाटतं. तर याच्या उलट दुसऱ्या ध्रुवावर असणाऱ्या कश्यप-भारद्वाजचे सिनेमे पण हा बघत नाही, कारण ते कलात्मक असतात असं याचं म्हणणं. खरं तर कश्यप-भारद्वाजचे सिनेमे गंभीर प्रकृतीचे असतात ना की कलात्मक. तरीही ते या वर्गाला पचत नाहीत, कारण ते विचार करायला भाग पाडतात. त्यातील पात्रं ही आपल्या आसपास असणाऱ्या लोकांसारखी असतात. जिवंत असतात. त्यामुळे हे सिनेमे बघितलं की, हा वर्ग गडबडून जातो कारण विचार करण्यासाठी सिनेमा समजून घेण्यासाठी मनात चलबिचलता व्हायला सुरुवात होते. यात आयती उत्तरं दिलेली नसतात. मेलोड्रामा नसतो. शेवटाकडे डोळ्यांना रुमाल लावायला भाग पाडलेलं नसतं. हे सिनेमे टीव्हीवर घरच्यांच्या उपस्थितीत एन्जॉय करता येत नाहीत.
सकारात्मकता असावयास हवी असं म्हणणारा हा वर्ग, ही सकारात्मकता जातीय-धार्मिक तेढ शिथिल करते का, असं विचारल्यास मूग गिळून गप्प बसतो. घरात असणाऱ्या ताणतणावांमुळे घरातलं वातावरण गढूळ झालंय, तेव्हा ही सकारात्मकता वापरास येते का यावर तो बोलत नाही. या वर्गाला नरेंद्र दाभोलकर ते गौरी लंकेश यांच्या हत्या का झाल्या हे समजून घ्यावंसं वाटत नाही. अखलाक ते नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार वर्षागणिक दलित अत्याचारात होणारी वाढ याला दिसत नाही. मात्र वरील चार सिनेमे याला सुवर्णमध्य साधल्याचा आनंद देतात. मुळात यातली सकारात्मकता बेगडी आहे. उथळ आहे. वास्तवाला जाणूनबुजून मोडीत काढून पेश केलेली आहे. ही सकारात्मकता समस्या सोडवत नाही, तर समस्या सोडवल्याचा आभास निर्माण करते.
हे असं का होतं? कारण हा पलायनवाद आहे. वास्तवाला काही क्षणांकरता बाजूला करून वाळूत तोंड खुपसण्याची सोय आहे यात. ही दांभिकता आहे. व्हिक्टोरियन मानसिकता आहे ही. मग यात जास्त दांभिक कोण हा वर्ग की, असे सिनेमे बनवणारा आमिर खान? आर्थिक उदारीकरणाच्या रसाळ फळांचा आस्वाद घेत जगणारा हा वर्ग जेव्हा सतत प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता पाहिजे, असं म्हणतो, तेव्हा तो कुठल्यातरी अनामिक भीतीनं ग्रासलाय का असं वाटतं. त्या भीतीला दाबून टाकण्यासाठी चटकन उत्तरं दिलेली असतील असे वाटणारे सिनेमे बघतो. ती भीती कशी घालवता येईल याचा सद्सद्विवेकबुद्धीनं विचार न करता चटकन मिळणाऱ्या उत्तराकडे आकर्षित होतो. अशानं समस्या सुटत नाही. भीती कमी होत नाही. तर ती तशीच दबून राहते. त्यामुळे या सुखवस्तू मास हिस्टेरियावर काही उपाय असेल तर तो तातडीनं अमलात आणणं गरजेचं आहे.
.............................................................................................................................................
नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक? - संपादन : राम जगताप
पाने - ११६, मूल्य – १२५ रुपये.
ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/323
.............................................................................................................................................
विवेक कुलकर्णी
genius_v@hotmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
manoj dholane
Mon , 18 December 2017
chhan lekh..
Mahesh Phanse
Sun , 10 December 2017
नुसते प्रश्न पडण्याला फार थोडा अर्थ आहे. ते सोडवण्याचा प्रयत्न करणे हे जास्त महत्त्वाचे आणि अर्थपूर्ण आहे.
Atul K
Sat , 09 December 2017
1) होय आम्ही मध्यमवर्गीय विचारसारणीचे आहेत. पण आम्ही कष्ट करून नौकरी करून पैसे मिळवतो. सरकारकडून मिळणारया अनुदानावर, कर्जमाफीवर, आरक्षणावर जगून इतरांवर भार बनत नाही. २) होय आम्ही आमच्या धर्माचे पालन करतो, सण साजरे करतो. कारण, त्यामुळे आमचे अस्तित्व कळते बाकिच्यांना. १९९२ च्या दंगली आम्ही पाहिल्या आहेत. १९९३च्या बाॅम्बस्फोटात आमचे लोक मारले गेले. तेव्हा आम्हाला कळले की स्वत:च्या धर्माचे रक्षण करणे हे जरूरी आहे, नाहीतर जिहादी लोक आपला खात्मा करतील ३) हो, आम्ही सून स्वजातीतील करतो. कारण गेली ७० वर्षे सरकार जर आरक्षण देताना व्यक्तिची जात बघत असेल, तर सून आणताना आम्ही जात बघितली व स्वजातीतील आणली तर काय बिघडले ? ४) होय आम्ही अमेरिका टूर करतो. कारण तेवढे पैसे आहेत आमच्याकडे. तुमच्याकडे नसतील पैसे तर कामधंदा करून कमवा, उगाच जळू नका इतरांवर. तसेच आमची मुले कष्ट करून (आरक्षण वगैरे नसताना) अमेरिकेला जातात, तुमची मुले तेवढी हुशार नसतील तर आमचा काय दोष ? ५) होय आम्ही पुल-वपु, अच्युत गोडबोले यांचीच पुस्तके वाचतो, कारण त्यांचा दर्जा, उत्तम आहे. भाषा सुरेख आहे. इतर अशुद्ध भाषेत लिहिलेली गावठी पुस्तके व सतत आपल्या समाजावर कसा अन्याय झाला वगैरे रडगाणी गाणारी पुस्तके वाचण्यात आम्हास रस नाही.