अजूनकाही
'फुकरे' शब्दाचा अर्थ ढोबळमानानं 'निरुपयोगी' असा लावता येतो. अर्थात पहिल्या चित्रपटात आणि अगदी या सीक्वेलमध्येही हा अर्थ पात्रांना लागू पडत असला तरी यावेळी हे विशेषण पात्रांपेक्षा जास्त चित्रपटाला लागू पडतं. म्हणजे हा चित्रपट अगदी वाईट नसला तरी पटकथेत पूर्वीच्या चित्रपटासारखी सहजता नसल्याने जरासा निरुपयोगी वाटतो.
चित्रपटात आधीच्याच 'फुकरे'मधील चूचा (वरुण शर्मा), हनी (पुलकित सम्राट), जफर (अली फझल) आणि लाली (मनजोत सिंह) ही चार पात्रं आहेत. गेल्या वेळी 'भोली पंजाबन'ला (रिचा चढ्ढा) या चौघांमुळे जेलमध्ये जावं लागलं होतं. ती जेलची हवा खात असल्याच्या काळात या सर्वांचं जीवन अगदी फार विशेष नसलं तरी सुरळीत चालू आहे.
पण आता ती बाबुलाल भाटिया (राजीव गुप्ता) या नेत्याच्या मदतीने 'बाहेर' आली आहे. पण त्यासाठी तिला त्याच्या काही अटी पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी अर्थातच तिला या चौघांची मदत होणार आहे. आणि मग हेच फुकरे 'चूचा'च्या 'स्पेशल पॉवर'च्या मदतीनं आणखी एक घोटाळा करण्याच्या तयारीत आहेत.
फुकरे रिटर्न्सच्या टायटल क्रेडिट्स दरम्यान येणाऱ्या एका गाण्यातून आधीच्या चित्रपटातील सर्व घटना जलदगतीनं दाखवण्यात आल्या आहेत. हा चित्रपट यापूर्वीचा चित्रपट जिथं संपतो, तिथूनच कथा पुढे नेत असल्यानं असं करण्याचा निर्णय उत्तम आहे हे सिद्ध होतं.
सुरुवातीपासूनच हा चित्रपट पटकथेवरील पकड घट्ट करत जातो. आणि हलक्याफुलक्या संवादातून एक उत्तम एंटरटेनर म्हणून आपल्याला आवडू लागतो. ही पकड अगदी मध्यांतराच्या पुढील काही वेळेपर्यंत अशीच मजबूत राहते. पण त्यानंतर मात्र पटकथेतील अतर्क्य घटना वाढत जातात. आणि याच अतर्क्य घटना आपल्या आणि चित्रपटाच्या आड येतात. त्यानंतर येणारा रहस्याचा अँगलही कंटाळा आणतो.
'फुकरे'मधील विनोद आणि अतर्क्य घटनांची मालिकेचं सहजरीत्या पडद्यावर दिसणं, हा त्याचा प्लस पॉइंट होता. पण इथं 'फुकरे रिटर्न्स'मध्ये नेमकी याच गोष्टीची उणीव भासते. कारण इथला विनोद आणि काही घटना ओढूनताणून निर्माण केल्यासारख्या भासतात. आणि इथंच हा सीक्वेल मार खातो. बॉलिवुडधील इतर अनेक सीक्वेल्सप्रमाणे आधीच्या चित्रपटाच्या यशाच्या ओझ्यानं, आणि त्यानं सेट केलेल्या बेंचमार्कच्या पातळीवर पोहोचण्याचा फक्त प्रयत्न करतो. हे सगळं असलं तरी 'फुकरे रिटर्न्स' बहुतांशी वेळा टाळ्या घेण्यात यश मिळवतो.
याचा बॅकग्राउंड स्कोअर मस्त आणि पटकथेला आणि पडद्यावर घडत असलेल्या घटनांना पूरक आहे. शिवाय तो कुठेही लाउड वाटत नाही. गाणी लक्षात राहतील अशी नाहीत. पहिल्या चित्रपटातील गाण्यांची सर नाही. शिवाय त्यातील 'अंबरसरिया'चा उल्लेख इथं बऱ्याचदा येतो. त्यामुळे यातील गाण्यांचं लक्षात न राहणं आणखी ठळकपणे समोर येतं.
पुलकित सम्राट आणि वरुण शर्मा यांच्यातील केमिस्ट्री उत्तम आहे. पण यातही जास्त भाव वरुण खातो. अली आणि मनजोत यांची पात्रं आणि काम ठीकच. पण विशाखा सिंह आणि प्रिया आनंद या फक्त शोभेच्या बाहुल्या बनून राहतात. परफॉर्मन्सबाबत रिचा चढ्ढा आणि पंकज त्रिपाठी हे कमाल ठरतात. त्यांची पात्रं तितकी उत्तम लिहिली आहेत, तितकीच सुंदररित्या पडद्यावर उभी केली आहेत. रिचा भोली पंजाबन म्हणून परफेक्ट आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.
राजीव गुप्ताचा खलनायक नेता प्रभावी आहे. याही कलाकाराला उत्तम दिग्दर्शक आणि कथा असलेली भूमिका मिळाली तर तो तिचं सोनं करेल, हा विचार यातील त्याची भूमिका पाहून मनात येतो.
.............................................................................................................................................
नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक? - संपादन : राम जगताप
पाने - ११६, मूल्य – १२५ रुपये.
ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/323
.............................................................................................................................................
शिवाय पंकजला अलीकडील चित्रपटांतील यशामुळे आता उत्तम आणि जास्त लांबीच्या भूमिका मिळत आहेत, हे पाहून छान वाटतं. यातही त्याचा पंडितजी टाळ्या मिळवतो. या चित्रपटात त्याच्या भूमिकेची लांबी वाढवली आहे. त्याची संवादफेक आणि रिचा किंवा वरुण व त्याच्या पंडितजीतील जुगलबंदी पडद्यावर फक्त पाहतच रहावी अशी आहे.
इतकं असूनही फक्त तीन चार लोकांच्या परफॉर्मन्सच्या जोरावर पूर्ण चित्रपट आणि त्याच्या पटकथेतील उणीवा दूर होत नाहीत की झाकल्या जात नाहीत. विशेषत: थर्ड अॅक्टमध्ये चित्रपट बराच रेंगाळतो. आणि पुढे काय होणार याची उत्सुकता कमी आणि समोर जे काही घडतंय ते कधी संपणार, याची वाट पाहायची वेळ येते.
थोडक्यात हा 'फुकरे रिटर्न्स' अगदी सर्वांनी पहायलाच हवा असा नसला तरी पंकज आणि रिचाच्या चाहत्यांनी पहावा. कारण 'मसान'मध्ये काही दृश्यांमध्ये एकत्र आलेली ही दोघं यात आपल्या अफलातून कॉमिक टायमिंगनं धमाल उडवतात.
शिवाय चित्रपट आधीच्या चित्रपटाइतका उत्तम नक्कीच नाही. त्यामुळे तुलनात्मक दृष्ट्या पाहणार असाल तर बऱ्याच उणीवा आढळतील. नसता चित्रपट मनोरंजक आहे इतकं तर नक्की आहे.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment