सायकोसिनेमॅटिक्स अर्थात सिनेमाचं मानसशास्त्र 
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर 
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 09 December 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर सिनेमाचं मानसशास्त्र सायकोसिनेमॅटिक्स Psychocinematics

सिनेमा आणि मानसशास्त्र यांचा जन्म एकाच कालखंडात झाला. एकोणविसाव्या शतकात. त्यामुळे या दोघांच्याही  सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक वारशांमध्ये अनेक साम्यं आहेत. सिनेमावर सुरुवातीच्या काळात जी टीका झाली, तशीच मानसशास्त्रावरही झाली. या दोन्हींना अनेक धार्मिक आणि सामाजिक मुखंडांचा विरोध होता. कारण सिनेमा व मानसशास्त्रानं प्रचलित आणि समाजाच्या मनाच्या मुळापर्यंत घट्ट रुतलेल्या संकल्पनांना प्रत्यक्ष आव्हान दिलं होतं.

सिनेमा या कलेचा आणि मानसशास्त्र या शास्त्राचा परस्परांवर पडलेला प्रभाव हा मोठा रोचक विषय आहे. सिनेमा बनवणं हा अनेक कलांचा समुच्चय असतो, तितकाच तो अनेक शास्त्रांचा संगम आहे. अनेक लेखक-दिग्दर्शक आणि सिनेमाशी संबंधित तंत्रज्ञ मानसशास्त्रातल्या  अनेक संकल्पनांचा उपयोग करताना दिसतात. मानसशास्त्रालाही सिनेमा आणि त्याचा लोकांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम या विषयात रस आहे. याचा अभ्यास करण्यासाठी मानसशास्त्राची एक वेगळी शाखा आहे. त्या शाखेचं नाव आहे- सायकोसिनेमॅटिक्स.

मी एकेकाळी मानसशास्त्राचा अभ्यास केलेला असला तरी मी काही त्या क्षेत्रातला तज्ज्ञ नाही. त्यामुळे 'सायकोसिनेमॅटिक्स'वर लिहिण्याची माझी प्राज्ञा नाही. पण सिनेमात मानसशास्त्रीय संकल्पनांचा वापर कसा केला जातो, याबद्दल लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो. भारतीय सिनेमात मानसशास्त्रीय संकल्पनांचा अनेकदा कळत-नकळत वापर झालेला दिसतो.

मानसशास्त्रात 'स्टॉकहोम सिंड्रोम' नावाची एक संकल्पना आहे. अपहरण झालेली व्यक्ती अपहरणकर्त्याकडेच आकर्षित होणं किंवा एखाद्या दुष्कृत्याला बळी पडलेली व्यक्ती त्या कृत्याच्या कर्त्याकडेच आकर्षित होणं, याला मानसशास्त्रात 'स्टॉकहोम सिंड्रोम' असं म्हणतात. स्टॉकहोम शहरात घडलेल्या अशाच एका सत्यघटनेवरून या सिंड्रोमला शहराचं नाव दिलं आहे. पण हे नाव तुलनेनं अलीकडे पडलं असलं तरी 'ब्युटी अँड द बीस्ट'सारख्या लोकप्रिय परीकथांमध्येही स्टॉकहोम सिंड्रोमच्या छटा दिसतात. आपल्याकडच्या जॅकी श्रॉफच्या 'हिरो'पिक्चरमध्येही तो दिसतो. किंवा इम्तियाजच्या 'हायवे'मध्येही. तमाशामधला वेद आपल्या दुष्ट आणि शोषण करणाऱ्या बॉसबद्दल प्रचंड आदर बाळगत असतो आणि त्याला आदर्श मानत असतो.

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात हा सिंड्रोम आढळतोच. शाळेत असताना माझ्या वर्गातला एक दांडगा पोरगा मला जाम पिडायचा, पण मला त्याच्याबद्दल भीतीयुक्त आदर वगैरे वाटायचा. माझी एक मैत्रीण होती. तिचा बॉयफ्रेंड तिला डेली बेसिसवर मारहाण करायचा. त्याला सोडत का नाहीस असं विचारल्यावर 'मुझसे प्यार करता है, इसलिये तो मारता है' असा काहीतरी अजब युक्तिवाद करायची.

आमच्या परभणीत महानगरपालिका निवडणुका होत्या. आज निकाल आले. एका जवळच्या मित्राचा फोन आला निकालानंतर. ज्या पक्षाला त्यानं आयुष्यातली वीस वर्षं तन-मन-धन अर्पिली होती, त्या पक्षाचा पराभव झाल्यावर अक्षरशः रडत होता. पक्षकार्याच्या नादाला लागून त्यानं घरावर तुळशीपत्र ठेवलं होत. ज्या नेत्यांसाठी तो राब राब राबला होता, त्या नेत्यांनी त्याला आयुष्यभर पोकळ आश्वासनाशिवाय काहीच दिलं नाही. हा लष्कराच्या भाकऱ्या भाजतो, हे माहीत असल्यानं कुणीही त्याला पोरगी दिली नाही. आयुष्यात एवढा मोठं शून्य असूनही हसतमुख राहणारा हा त्याचा पक्ष हरल्यावर मात्र उन्मळून पडला होता. त्याचं तोडकंमोडक सांत्वन करताना मला एकदम जाणवलं, 'स्टॉकहोम सिंड्रोम'ला एक राजकीय अंगही आहे तर. त्याचा पक्ष कुठला आहे, हे खरंच महत्त्वाचं आहे का?

भयपट आणि प्रेक्षक यांच्या नात्यात कायम 'स्टॉकहोम सिंड्रोम'च्या छटा आढळतात. म्हणजे असं की, चांगले भयपट (यात रामसे बंधू आणि भट्ट कंपनी यांचे चित्रपट अपेक्षित नाहीत हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलं असेलच!) प्रेक्षकाला घाबरवतात, चित्रपट संपल्यानंतरही झोपेतून दचकवून उठवतात आणि अनेक प्रकारे प्रेक्षकाचा मानसिक छळ करतात. पण चित्रपटगृहात चांगला भयपट लागला आहे, हे कळताच पुन्हा तोच भीतिदायक अनुभव घेण्यासाठी प्रेक्षकांची पावलं तिकडे हमखास वळतात. 

'नार्सिसिस्ट' (Narcissist) ही मानसशास्त्रातली महत्त्वाची संकल्पना आहे. तळ्यातल्या पाण्यात पडलेल्या स्वतःच्याच प्रतिबिंबाच्या प्रेमात पडलेल्या  नार्सिसिझम (Narcissism) या एक ग्रीक देखणा पुरुषापासून या संकल्पनेचा उगम झाला. हिंदी आणि बहुतेक प्रादेशिक सिनेमांमधले नायक-महानायक  हे 'नार्सिसम'ने पछाडलेले असतात. पडदा व्यापून पण दशांगुळे उरलेल्या भारतीय नायकाची व्यवच्छेदक लक्षणं काय असतात? एकतर तो प्रचंड स्वकेंद्री असतो. इतका स्वकेंद्री की, त्याचे बहुतांश संवाद हे 'मी, आय आणि मायसेल्फ'च्या पलीकडे जाताना दिसत नाहीत. तो नायिकेला कस्पटासमान वागणूक देतो. एकाच फटक्यात पाच दहा गुंडाना लोळवतो. सहनायकाची खिल्ली उडवतो. तथाकथित महान सामाजिक मूल्यांचं संरक्षण करण्याचा आव आणतो. भारतीय नायक काय करत नाही? तो घोड्यावर बसतो, तलवारबाजी करतो, गुंडांना लोळवतो, गाड्या हवेत उडवतो, नायिकेसोबत गाणी म्हणतो, नृत्य करतो.

ही यादी न संपणारी आहे. भारतात हिरो होणं ही सोपी गोष्ट नाहीये. भारतीय नायक हा 'नार्सिसम'चा एक मोठा चालता बोलता ब्रँड अॅम्बसेडर आहे. व्यक्तिपूजक असणाऱ्या भारतीय समाजात हा नायक रुजला, भरभराटीला आला यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीच. 

सिगमंड फ्रॉइड हा मानसशास्त्राचा उदगाता मानला जातो. त्याने ‘ओडिपस कॉम्प्लेक्स’ नावाची एक अतिशय खळबळजनक  आणि भारतीय परिप्रेक्ष्यात वादग्रस्त मानली जाणारी थिअरी मांडली होती. फ्रॉइडच्या मते लहान मुलांच्या आकर्षणाचं पहिलं केंद्र असतं त्याची आई. त्यामुळे नेणिवेत कुठंतरी मुलं आपल्या वडिलांना आपला प्रतिस्पर्धी समजत असतात. अजूनही बरंच आहे त्या थिअरीमध्ये. लहान मुलींबद्दल संदर्भ बदलून फ्रॉईडची अशीच अजून एक थिअरी आहे. फ्रॉईडची ही थिअरी खरी समजायची तर भारतीय सिनेमात ती अनेक वेळा दिसते. कारण पालक-पुत्र संबंध हा बॉलिवुडचा लाडका विषय आहे. सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे विशाल भारद्वाजचा 'हैदर' हा सिनेमा. भारतीय सिनेमात ओडिपस कॉम्प्लेक्स इतका प्रत्यक्षपणे दाखवल्याचं हे पहिलंच उदाहरण. याच श्रेय अर्थातच दिग्दर्शक विशाल भारद्वाजला. भारतीय प्रेक्षकांनीही ओडिपस कॉम्प्लेक्स इतका ढळढळीत दाखवणाऱ्या सिनेमाला इतका चांगला प्रतिसाद दिला. भारतीय प्रेक्षक मॅच्युर होत चालला आहे, याचंच निदर्शक आहे.

मानसशास्त्रात ‘औरंगजेब कॉम्प्लेक्स’ नावाची संकल्पना आहे. जो माणूस स्वतःला बाहेरून खूप कणखर खंबीर असल्याचं दाखवतो, पण आतून अतिशय घाबरलेला संशयी असतो, तो माणूस ‘औरंगजेब कॉम्प्लेक्स’नं ग्रस्त आहे असं मानसशास्त्र मानतं. या निकषावर पलायनवादी सिनेमा बनवणारी बहुतेक इंडस्ट्रीच ‘औरंगजेब कॉम्प्लेक्स’नं ग्रस्त आहे असं मानावं लागेल. बर्लिनची भिंत पडली तेव्हा आपण गुलछबू प्रेमळ सिनेमे बनवण्यात मग्न होतो. सोविएत युनियनचं विभाजन झालं आणि आखाती युद्ध झालं, तेव्हाही आपल्या सिनेमानं तिकडे दुर्लक्ष करणंच पसंत केलं. बाबरी मस्जिदच पडणं आणि मंडल आयोगाच्या शिफारशी लागू होणं, पण आपल्या इंडस्ट्रीला प्रेमकूजनातून बाहेर काढू शकलं नाही. आपण डोळे मिटून दूध प्यायलं म्हणजे जग बघणार नाही, अशा भ्रमात असणाऱ्या बोक्याची आठवण इंडस्ट्रीकडे बघून आहे. प्रत्यक्ष आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांकडे दुर्लक्ष करणारं अख्ख बॉलिवुडच ‘औरंगजेब कॉम्प्लेक्स’नं ग्रस्त असावं.

अर्थातच २००१ नंतर चित्रपटसृष्टीत अनेक बदल झाले. 'कार्तिक कॉलिंग कार्तिक'सारखे नायकाच्या गुंतागुंतीच्या मनोविश्वाचा वेध घेणारे चांगले चित्रपट तयार व्हायला लागले. अक्षय कुमारचा 'भुलभुलैय्या'ही चांगला प्रयोग होता. अजूनही आपल्याला मानसशास्त्रीय विषयांमध्ये मोठी मजल मारायची आहे हे नक्की. मानसशास्त्र म्हणजे वेड्यांवर उपचार करणारं शास्त्र, असा सर्वदूर समज असलेल्या देशात मानसशास्त्रालाच दूरचा पल्ला गाठायचा आहे, हा तितकाच महत्त्वाचा मुद्दा.

.............................................................................................................................................

नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक? - संपादन : राम जगताप

पाने - ११६, मूल्य – १२५ रुपये.

ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/323

.............................................................................................................................................

लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......