अजूनकाही
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असताना, काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुप्रतिक्षित असलेला राहुल गांधी यांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. २८ डिसेंबर १८८५ रोजी स्थापन झालेल्या म्हणजे १३२ वर्षांची परंपरा असलेला काँग्रेसचा विचार, या विचारानं या देशाला दिलेलं राजकीय मॉडेल, हा मूळ पक्ष फुटल्यावर १९६९ साली झालेल्या काँग्रेस (आय किंवा इंदिरा) पक्ष आणि या पक्षानं देशावर सत्ता राबवताना जे काही चांगले-वाईटही पायंडे पाडलेले आहेत, ते भलं-बुरं संचित घेऊन या पदावर राहुल गांधी आले आहेत. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि देशाची जी काही प्रगती आज झालेली दिसते आहे, त्यात नेहरू-गांधी घराणं आणि काँग्रेसचं योगदान मोठं आहे. राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांनी तर या देशासाठी प्राणाचं मोल दिलेलं आहे. ते कधीच न शमणारं दु:ख उरी बाळगत राहुल गांधी एक मोठी राजकीय इनिंग्ज खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत.
हिंदुत्वाचा एकांगी विचार करणारांनी या देशात गांधी आणि नेहरू यांची अवहेलना व द्वेष करण्याची निर्माण केलेली एक दीर्घ तिरस्करणीय परंपरा आहे. गांधी आणि नेहरूंच्या व्यक्तिगत चारित्र्यावर असभ्य पद्धतीनं शिंतोडे उडवले जाण्याचा एक अत्यंत असंस्कृत विखार त्या परंपरेत आहे. तो विखार आणि तो द्वेष राहुल गांधी यांच्याही वाट्याला आला, यापुढेही येणार आहे. पप्पू, शहजादापासून ते न झालेल्या किंवा न केलेल्या विवाह-व्यसनांपर्यंत या प्रचाराचा विस्तार आहे. सर्वधर्मसमभाव हा पाया असलेल्या या देशाच्या लोकशाहीत राहुल यांची जात आणि धर्मही प्रचाराच्या ऐरणीवर आणण्याचा अशिष्टाचार आता केला गेलेला आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आधी आजी इंदिरा, नंतर पिता राजीव यांना गमावल्यावर स्वत:ची ओळख लपवून बालपण आणि तरुणपण, कायम अत्यंत असुरक्षित वातावरणात व्यतीत करावं लागण्याची आणि पोरकेपणाची भळभळती भावअवस्था राहुल यांच्या वाट्याला आलेली आहे. चहा विकणारा पंतप्रधान झाल्याची चर्चा ‘गर्व के साथ’ करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांत ती भावअवस्था समजून घेण्याइतकी सहिष्णुता नाही.
अर्थात दोष केवळ विरोधकांना देऊन चालणार नाही. काँग्रेसमध्येही दिग्विजयसिंह, माणिशंकर अय्यर असे एक से एक वरचढ वाचाळवीर आहेत (हा मजकूर लिहित असतानाच जीभेनं केलेल्या गुस्ताखीबद्दल अय्यर यांना पक्षातून निलंबित करण्यात आलंय.) शिवाय अजून न आलेला राजकीय समंजसपणा व प्रगल्भता, यामुळे राहुल यांनीही विरोधकांच्या हाती अनेकदा कोलीत दिलेलं आहे. देशाच्या पंतप्रधानांची जाहीर अवहेलना करण्याची असभ्य पातळी त्यांनी गाठलेली होती, हे विसरता येणार नाही. असं असलं तरी , गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेत येवो वा न येवो राहुल आणि काँग्रेसनं नरेंद्र मोदी-अमित शहा दुक्कलीला संत्रस्त करून सोडलेलं आहे, यावरून अलिकडच्या काळात (संघात शॉर्ट घातलेल्या मुली दिसत नाहीत, हा अपवाद वगळता) राहुल यांच्यात बरीच सुधारणा दिसते आहे. नेतृत्व स्वीकारायचं किंवा नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य म्हणा की, तो असला-नसला अधिकार वापरण्याची मोकळीक, सत्तेसाठी हपापलेल्या बहुसंख्य काँग्रेस नेत्यांनी आधी राजीव, मग सोनिया आणि आता राहुल गांधी यांना मिळू दिलेली नाहीये. कारण ‘गांधी’ नावाचं नेतृत्व ही या काँग्रेसची अगतिक अपरिहार्यता आहे. सत्ताप्राप्तीसाठी कोणा-न-कोणा गांधीला नेता म्हणून स्वीकारणं, ही सर्व वयोगटातील काँग्रेसजनांची मजबुरी कशी आहे, हे समजून घेण्याचा उमदेपणा आपणही दाखवायला हवा!
१९ जून १९७०ला नवी दिल्लीत जन्मलेल्या राहुल यांनी राजकारणात प्रवेश करून आता सुमारे दीड दशक उलटलं आहे. पक्षाचं उपाध्यक्षपद त्यांनी स्वीकारण्याला येत्या जानेवारीत चार वर्ष पूर्ण होतील. (राहुल यांच्या त्या नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या ‘राज्याभिषेकाचा’ प्रस्तुत भाष्यकार एक पत्रकार म्हणून साक्षीदार आहे!) अलिकडच्या काही वर्षांत काँग्रेसचा सतत संकोच होत आलेला आहे. देशावर आघात करणारा आणीबाणीसारखा निर्णय घेतल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी व संजय गांधी यांच्यासकट अनेक दिग्गजांचा पराभव झाला तरी काँग्रेसला साडेचौतीस टक्के मतं मिळालेली होती. सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारल्यावर तर काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तारूढ झाला. उपाध्यक्ष म्हणून नेतृत्वाची इनिंग राहुल गांधी यांनी सुरू केल्यावर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जेमतेम १९ टक्क्यांपेक्षा किंचित जास्त मतं आणि केवळ ४४ जागा मिळाल्या. त्यामुळे लोकसभेतील विरोधीपक्ष नेतेपदही गमवावं लागलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीत तर काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला. महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह अन्य काही विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संघांच्या निवडणुकांतही काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. कर्नाटकसारखं एकमेव राज्य वगळता एकाही मोठ्या राज्याची सत्ता हाती नाही. गोव्याची हाती आलेली सत्ता (दिग्विजयसिंह यांच्या) गाफिलपणामुळे गमवावी लागलेली आहे...
इतक्या व्यापक विपरित परिस्थितीत आणि नैराशाच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे राहुल हे पहिलेच नेते आणि ‘गांधी’ आहेत. काँग्रेसची अशी दुर्दशा होण्याला केवळ राहुल गांधी यांना जबाबदार धरणं बेजबाबदारपणा आहे. अलिकडे झालेल्या निवडणुकांत जनतेनं काँग्रेसला नाकारण्यामागे बेसुमार भ्रष्टाचार, नेत्यांमध्ये आलेली अक्षम्य मग्रुरी, पक्षात कार्यकर्त्याला मिळालेली दुय्यम वागणूक यासह अनेक कारणं आहेत. कारणांच्या त्या चक्रव्यूहाचा भेद करण्याचं आव्हान राहुल गांधी यांच्यासमोर आहे. काँग्रेसचा संकोच झाला ही वस्तुस्थिती असली तरी कोणी काहीही वल्गना करो, एक राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसची पक्ष पाळंमुळं अजून देशव्यापी आणि घट्ट आहेत. नजिकच्या भविष्यात तरी ती उखडून फेकल्या जाण्याची सुतराम शक्यता नाही. गरज आहे ती, त्या पाळंमुळांचं काळजीपूर्वक संगोपन करण्याची, ती जबाबदारी आता राहुल यांच्यावर आलेली आहे.
प्रत्यक्षात राहुल गांधी यांच्या समोरील आव्हानं विरोधी पक्षांपेक्षा वैयक्तिक आणि पक्षांतर्गत जास्त आहेत. politics is a serious and full time business, हे न विसरता यापुढे स्वत:तील राजकीय क्षमता, नेतृत्वगुण, संघटन कौशल्य आणि प्रशासकीय पकड सिद्ध करण्यासोबतच निवडणुका जिंकून देण्याइतका स्वत:च्या नेतृत्वाचा करिष्मा राहुल गांधी यांना निर्माण करावा लागणार आहे. या सर्व गुणांचा कस आजवर लागलेलाच नव्हता. प्रशासकीय कौशल्य आत्मसात करण्याची मनमोहनसिंग यांच्याकडून शिकण्याची संधी राहुल यांनी विनाकारण गमावलेली आहे. वैयक्तिक पातळीवरचं हे आव्हान राहुल गांधी कसं पेलतात हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
दुसरा भाग आहे तो पक्षांतर्गत. काँग्रेस पक्ष हा जाती-धर्म-भाषा-प्रांत अशा विविध पातळ्यांवर अनेक गट, उपगट , उप-उप-गटांत विभागलेला आहे. हे एवढ्यापुरतंच मर्यादित नाही तर हा पक्ष बहुसंख्येनं बेरक्या, सत्तालोलुप, संधिसाधू आणि महत्त्वाकांक्षी लोकांचा एक कळप झालेला आहे. परत एकदा सांगतो, दिल्ली दरबारचं पाणी चोवीस तास पिण्याच्या संस्कृतीत आकंठ बुडालेल्या एका बुझुर्गानं त्यांच्या एका ‘पठ्ठ्या’ला जे हिंदीत सांगितलं ते असं- “नये है, शहजादे अभी भी काँग्रेस पार्टी में”. मग एक दीर्घ पॉझ.
मग पुढे त्यांनी विचारलं, “काँग्रेस मानो पिझ्झा हैं, समझे? पिझ्झा खाते हों ना?”
त्यावर त्या पित्तूनं मान डोलावली.
नेते पुढे म्हणाले , “पिझ्झा का डिब्बा चौकोनी आवत हैं. हैं क्या नही?”
पुन्हा त्या पित्तूनं मान डोलावली आणि बुझुर्ग नेते पुढे म्हणाले, “पिझ्झा का डिब्बा चौकोनी आवत हैं, पर पिझ्झा होता हैं गोल और उसे खाते हैं त्रिकोन में. समझ गये? ठीकसें सुनो भय्या, ये अपनी काँग्रेस पार्टी हैं ना, पिझ्झे जैसी है. सबके जल्दी समज में नाही आवत हैं. हमरे बाल सफेद हुए राजनीती में. शहजादे (पक्षी : राहुल गांधी!) को ये नहीं मालूम...” काँग्रेसमधले बुझुर्ग किती इरसाल, बेरके आणि तय्यारीचे आहेत याचं हे दर्शन आहे. अशाच बहुसंख्याशी राहुल यांचा सामना आहे. या बेरक्या, इरसाल काँग्रेसजनांना सत्तेची चटक लागलेली आहे आणि ती चटक पूर्ण करणारा गांधी त्यांचा कायम प्रिय असतो. त्याच गांधीला हे बहुसंख्य संधिसाधू डोक्यावर घेतात. या अशा बेरक्यांपासून राहुल यांना कठोरपणे सावध राहावं लागणार आहे.
काँग्रेसमधल्या केवळ सत्तेची पदं उबवणाऱ्या बहुसंख्य ज्येष्ठांना बाजूला करणं हे राहुल यांच्यासमोरचं एक महत्त्वाचं आव्हान असेल. राहुल यांच्यासारख्या तरुण नेत्याकडून काही ऐकावं किंवा त्यानं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मानसिकता असणारे, तसंच केवळ पक्षहिताचा विचार करणारे आणि गांधी घराण्यावर अव्यभिचारी निष्ठा असणारे मनमोहनसिंग, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अशोक गहलोत, जयराम रमेश, सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, राजीव सातव यांच्यासारखे नेते पक्षात कमी आहेत. अशा कोणाच्या विरोधामुळे आपल्याला अध्यक्षपद मिळण्यास विलंब लागलेला आहे, हे एव्हाना राहुल यांच्या लक्षात आलेलं असेलच. विद्यमान काळात हे असं पदं उबवणारं वृद्ध नेतृत्व पक्षवाढीसाठी फारसं उपयोगाचं नाही, हे लक्षात घेऊन अशा सर्वांना निवृत्तीचा नारळ देण्याचा धाडसीपणा राहुल यांना दाखवावा लागणार आहे. (तपशीलासाठी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, लालजी टंडन यांचा मोदी-शहा या दुकलीनं कसा ‘चिवडा’ केला, त्याचा अभ्यास राहुल यांनी करावा.)
अशा आणि पंतप्रधानपदावर डोळा ठेवलेल्या, वाचाळवीरांची संख्या पक्षात बरीच आहे. सर्वोच्च नेत्याच्या किचन कॅबिनेटमध्ये असणाऱ्या आणि ‘हाय कमांड’ नावाखाली या सर्वांच्या दुकानदाऱ्या आहेत. या दुकानांच्या देशभर शाखाही आहेत. दिल्ली ते गल्ली असा विस्तार असलेली ही सर्व दुकानं बंद करून पक्षात तरुणांचा भरणा करण्यावर राहुल यांना भर द्यावा लागणार आहे. अहमद पटेल, मोतीलाल व्होरा यांच्यापासून ही सुरुवात होते आणि चिदंबरम, दिग्विजयसिंह, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद, माणिशंकर अय्यर अशी ही यादी भली मोठी आहे. ही सर्व मंडळी केवळ सुगीच्या म्हणजे, सत्ता असण्याच्या दिवसात महत्त्वाची पदं उबवत सक्रिय असणारी, अन्यथा हातावर हात ठेवून गप्प बसणारी आहेत. २०१४मध्ये पक्ष पराभूत झाल्यावर पक्षासाठी काम करण्याऐवजी आपापल्या कामधंद्यात कोणकोण मग्न झालेलं आहे, याची माहिती घेतली तर, अशा सर्वांची नावं सहज कळतील.
अशा ‘मनसबदारां’मुळेच कार्यकर्ता दुरावला आहे. या मनसबदारांना बाजूला सारत कार्यकर्त्याला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचं जे आश्वासन राहुल यांनी उपाध्यक्षपद स्वीकारताना तालकटोरा स्टेडियमवर दिलं होतं, ते पूर्ण करण्याची वेळ आता आलेली आहे. त्यातच पक्षाच्या वाढीची बीजं आहेत. नैराश्य आणि मरगळ यातून काँग्रेस पक्षाला उभारी देण्याची, जनमताचा पाठिंबा पुन्हा मिळवत एक राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसच्या वाढीची सुरुवात राहुल यांना पक्षातूनच करावी लागणार आहे.
अलिकडच्या काळात आणि गुजरात निवडणुकीच्या निमित्तानं राहुल यांनी सुरुवात तर चांगली केलेली दिसते आहे. काँग्रेस सबळ होणं म्हणजे लगेच काही भाजप सत्तेतून पायउतार होईल असा ‘भक्ती’य विचार मुळीच नाही. सबळ विरोधी पक्ष असल्यावर सत्ताधारी पक्षाच्या मनमानीवर अंकुश राहतो. सत्ताधाऱ्यांची जबाबदारीची जाणीव वाढते. म्हणून आधी एक जबाबदार विरोधी पक्ष आणि नजीकच्या भविष्यातला सत्ताधारी पक्ष म्हणून काँग्रेसची उभारणी करण्यासाठी राहुल गांधी यांना मन:पूर्वक शुभेच्छा!
.............................................................................................................................................
नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक? - संपादन : राम जगताप
पाने - ११६, मूल्य – १२५ रुपये.
ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/323
.............................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
ADITYA KORDE
Mon , 11 December 2017
>>Praveen Bardapurkar...प्रतिसादाची दाखल घेतल्याबद्दल खरेच धन्यवाद . तुम्ही सांगितलेली दिवाळी अंकातली मुलाखत वाचली ...बहुतांशी पटली. काही मुद्दे नाही पटले त्यावर सविस्तर लिहीन...पण एकंदरीत उत्तर पेशवाईत जसा सावळा गोंधळ मजला होता आणि त्याचा एक परिपाक म्हणून दुसर्या बाजीरावासाराखा नादान माणूस सत्तेवर आला हे प्रसंगोचीतच झाले . आता मराठी राज्याच्या र्हासाचे सगळे खापर दुसर्या बाजीरावावर फोडायचे कि नाही तर हो ही आणि नाही ही. किंवा मोगल घराण्याच्या( हे जास्त सयुक्तिक वाटते )शेवटी जशी अनागोंदी माजली होती तशीच अवस्था कॉंग्रेस मध्ये माजली आहे ... वाटत नाही ह्यातून काही चांगले होईल...आजच बातम्या बघताना अहमद पटेलना गुजरातचा मुख्यमंत्री बनवण्याचे षडयंत्र पाकिस्तानी राजादुताबरोबर झालेल्या बैठकीत शिजले असे स्वत: मोदिना म्हणताना ऐकले . म्हणजे त्यांनाकाय म्हणायचे आहे पहा . आणि बहुसंख्य हिंदू असलेल्या गुजराती जनतेलाही तो तसाच कळतो जसा मोदीना अभिप्रेत आहे .हिंदू आजपर्यंत भारतात हिंदू धर्माच्या नावाखाली एक आलेले नव्हते आता जर ते आले तर ती भारताचा(हळूहळू) पाकिस्तान बनण्याची सुरुवात असेल ... हिंदुंच्या चांगुलपणावर आणि सदसद्विवेकावर माझा विश्वास आहे. (दुसरे करू काय शकतो म्हणा ....)
Praveen Bardapurkar
Sun , 10 December 2017
>> ADITYA KORDE... कितीही प्रतिकूल असलं तरी समोरच्याने केलेल्या प्रतिवादाची दखल मी घेतोच कारण समोरच्याला एक मत असतं , त्याला प्रतिवादाचा हक्क असतो हे मला मान्य आहे . अर्थात , समोरच्याचं प्रतिपादन स्वीकारायचं किंवा नाही हा माझा हक्क मात्र शाबूत आहे ! या संदर्भातील सविस्तर विवेचनासाठी गावकरी या दैनिकाच्या दिवाळी अंकाला दिलेल्या मुलाखतीचा https://goo.gl/NjJvj6 या लिंकवरील मजकूर बघावा. लिंक वरील मजकूर वाचा एकदा , मग बोलू यात आपण नक्की . माझा संपर्क क्रमांक दिलेला आहेच !
Krunali S
Sat , 09 December 2017
अहो इतरांची दुकानदारी बंद करायचे असेल तर ती बंद करणारया माणसाचा रेकॉर्ड क्लिंन असायला हवा व त्यांच्यात ती पात्रता हवी. इथे गांधी कुटूंबानेच खांग्रेसमध्ये दुकानदारी केली, हाजीहाजी करणारयांना मोठी पदे दिली, बोफोर्स, 3G, Coalgate सारखे घोटाळे केले. स्वत: पप्पूचे जर वर्णन करायचे झाले तर पप्पूच्या पणजोबाला लोकांनी बाजारात चांगले चालणारे एक खांग्रेसनामक दुकान चालवायला दिले होते. जे पणजोबांच्या मृत्यूनंतर पप्पूच्या आजीने वारसाहक्क सांगून बळकावले. नंतर, आजीच्या निधनानंतर पप्पूच्या वडिलांनी दुकानाचा गल्ला काबिज केला. पप्पूच्या वडिलांच्या निधनानंतर काही वर्षांनी पप्पूची आईने दुकानात घुसून दुकानाचा बळजबरीने ताबा मिळवला. आता आईने इतर कोणी दुकानाचा ताबा घ्यायच्या आतच पप्पूच्या हाती दुकानाच्या चाव्या सोपावल्या. आता पप्पूने सांगायला सुरूवात केली आहे की दुकान पणजोबाने आणि त्याच्या आजीनेच बांधले व टिकवले. त्यामुळे त्याची मालकी माझीच व मी इतरांची दुकाने बंद करणार. हे पप्पूचे वागणे हास्यास्पद आहे.
ADITYA KORDE
Sat , 09 December 2017
काही मुद्दे मला उगीच नोंदवावेसे वाटत आहेत ( म्हणजे कोणी दाखल घेणार नाही हे माहिती आहे तरी ...) १."हिंदुत्वाचा एकांगी विचार करणारांनी या देशात गांधी आणि नेहरू यांची अवहेलना व द्वेष करण्याची निर्माण केलेली एक दीर्घ तिरस्करणीय परंपरा आहे...." ह्यातले गांधी म्हणजे महात्मा गांधी असे असावे किंवा जर गांधी म्हणजे राहुल आणि त्याचे वडील आजी वगैरे असेल तर ते चूक नाही पण उगाच घोळ होतोय २.१३२ वर्षांची परंपरा असलेला कॉंग्रेस आणि इंदिरा कॉंग्रेस हे वेग वेगळे आहेत हे पहिल्या परिच्छेदात लिहून लेखक स्वत:च लगेच ते विसरले आहेत असे वाटते. ३. "राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांनी तर या देशासाठी प्राणाचं मोल दिलेलं आहे." हे अत्यंत वादग्रस्त वाक्य आहे. स्वत: उभे केलेले भस्मासुर त्याला ते स्वत: बळी पडले हे देशासाठी केलेले प्राणार्पण? मग १९८४च्या शीख दंगलीत मारले गेलेले लोक देशाचे दुष्मनच कि .... अर्थात राहुल गांधी त्यांच्या वैयक्तिक दु:खाचे भांडवल करत असतील तर ते लज्जास्पद नाही का ... ४."सर्वधर्मसमभाव हा पाया असलेल्या या देशाच्या लोकशाहीत ..." ह्या देशात सर्वधर्म संमभाव कधीच नव्हता आणि लोकाशाही सध्यातरी नाही .... मुख्य म्हणजे सर्वधर्म समभाव सर्व धर्मियांनी मिळून सांभाळायची गोष्ट असते फक्त बहुसंख्य लोकांनी नाही ५." काँग्रेसची अशी दुर्दशा होण्याला केवळ राहुल गांधी यांना जबाबदार धरणं बेजबाबदारपणा आहे."... कालो वा कारणं राज्ञा, राजा वा काल कारणंI इति ते संशयो माभूते, राजा कालस्य कारणंII भावार्थ: एखाद्या देशाच्या, समाजाच्या अभ्युदयाला किंवा अवनतीला जबाबदार कोण? राजा( सरकार), तो समाज, कि काळ? असा प्रश्न मनात उभा राहील तेव्हा मनात अजिबात संदेह येऊ देऊ नका. राजा हाच त्याला कारणी भूत असतो. आधुनिक लोकसत्ताक भारतात, भारतीय जनता हीच राजा आहे आणि राजाने आपले कर्तव्य निष्ठेने पार पडायचे असते नाही का?