प्रिय मित्र सचिन कुंडलकर...
संकीर्ण - वाद-संवाद
सुनील सुकथनकर
  • सचिन कुंडलकर यांच्या दै. लोकसत्ताच्या रविवार पुरवणीमधील सदराची काही कात्रणं
  • Fri , 08 December 2017
  • संकीर्ण वाद-संवाद सचिन कुंडलकर Sachin Kundalkar सुनील सुकथनकर Sunil Sukthankar लोकसत्ता Loksatta

दै. लोकसत्ताच्या रविवार पुरवणीमध्ये नाट्य-सिने दिग्दर्शक, लेखक, नाटककार सचिन कुंडलकर यांचं ‘करंट’ हे साप्ताहिक सदर गेलं वर्षभर प्रसिद्ध होत आहे. या सदरातील गेल्या दोनेक महिन्यांतील लेखांनी महाराष्ट्रातील अनेक सुजाणांना, तारतम्यपूर्ण विचार करणाऱ्यांना अस्वस्थ केलं. त्या अस्वस्थतेला ‘आवाज’ देणारा हा लेख. हा लेख सुकथनकर यांनी फेसबुकवरील त्यांच्या वॉलवर परवा प्रकाशित केला आहे. त्यांच्या पूर्वपरवानगीनं त्याचं इथं पुनर्प्रकाशन केलं आहे.

.............................................................................................................................................

प्रिय मित्र सचिन कुंडलकर,

होय, एकदा मित्र म्हटल्यावर मागे फिरता येत नाही!

बरं झालं गेले काही दिवस तुझं ‘लोकसत्ते’तलं सदर वाचत नव्हतो, पण कुणाच्या तरी बोलण्यात आलं म्हणून गेले तीन-चार लेख वाचले आणि तुला न आवडणाऱ्या पु. ल. देशपांडे यांच्या शब्दांमध्ये सांगायचं, तर ‘लेखणीला अतिसार झाल्याप्रमाणे तुला तिला कागदावर बसवायची घाई का झालीय?’, असा प्रश्न पडला. 

इतकं पुरुषी, प्रतिगामी, आततायी आणि सोयीस्कर एकांगी लिखाण करायला खूप लोक आहेत! तुझी विलक्षण बुद्धिमत्ता या कामी वापरण्याचं काय प्रयोजन? (हा संदर्भ लागण्यासाठी वाचकांनी कुंडलकरांचं ‘लोकसत्ते’तलं ‘करंट’ हे सदर वाचावं.)

तुझ्या अनुभवातल्या समाजाविषयी तू लिहितो आहेस (असा तुझा दावा आहे!). त्यात तू बाबा आढाव, अनिल अवचट, आनंद नाडकर्णी, सुमित्रा भावे, विद्या बाळ, शांता गोखले अशा काही व्यक्तींविषयी आणि स्त्रीवादी, समाजवादी, सामाजिक चळवळींशी संबंधित समूहांविषयी आणि आता रिकामटेकड्या गृहिणी नामक समूहाविषयी निंदानालस्तीपर लिहितो आहेस. एक चांगलं आहे की, या सर्वांविषयी प्रेम बाळगणारी माझ्यासारखी माणसं समंजस आहेत. कुणीच तुला मारायला येणार नाही किंवा भांडायलाही येणार नाही, तेव्हा तू निर्धास्त राहा. महाराष्ट्राचं खरं सांस्कृतिक नुकसान करणारे, इतिहासाला बदलू पाहणारे, दहशत पसरवणारे कोण कोण आहेत, हे न कळण्याइतका तू लहानही नाहीस आणि अज्ञानीही नाहीस, पण त्यांना धोपटून काढणं अंगाशी येईल हे तू जाणतोस...

मग तुझ्या लहानपणाच्या (ज्या सदाशिव पेठेला तू नावं ठेवतोस - त्यातून बाहेर पडून तू मुंबई- फ्रान्स - टर्की वगैरे ठिकाणी जाऊन ‘पुढे’ गेलायस असं तुला वाटतं!) त्या सदाशिव पेठेतल्या एका चिमुकल्या वर्गाच्या संदर्भांवर महाराष्ट्राच्या समाजाविषयी लिहिणं म्हणजे फक्त अलका थेटरचे सिनेमे पाहून भारतीय चित्रपटसृष्टीबद्दल ज्ञान पाजळण्यासारखं आहे. बरं एवढं कुठलं दुःख तुला किंवा तुझ्या महाराष्ट्राला या सर्वांनी दिलंय, याचा लेख वाचून काही उलगडा होत नाही. मग उरतो तो केवळ वैयक्तिक आकस. तो अगदी या सर्वांना प्रत्यक्ष भेटून सांगितलास, तरी ते ऐकून घेतील! ‘लोकसत्ता’ ही ती जागा नव्हे (म्हणून आज हे पत्र तुला जाहीर लिहावं लागतंय).

सामाजिक विश्लेषणाच्या आवरणाखाली आपल्याला (सध्या) न आवडणाऱ्या माणसांना हाणून घेणं ही संधिसाधू विकृती झाली. समाजातल्या, कलाजगतातल्या विसंगतींवर टीकाटिप्पणी करत (तुला न आवडणाऱ्या) पु. ल. किंवा जयवंत दळवी यांनी बुद्धिमान आणि कोपरखळ्या मारणारं लिखाण केलंय (खरं तर त्या वाचनावरच तू उभा आहेस!). पण त्यामागे त्यांच्या मनाचा अपार चांगुलपणा आणि एक निराळीच निरागसता होती. त्यांनी ज्यांची चेष्टा केली, तेही मोकळेपणानं तेव्हा हसले असतील.

माझ्या माहितीतल्या एकाही गृहिणीनं तिच्या कष्टाची जाहिरात माझ्याजवळ केलेली नाही. मग तुझ्या आसपास नेमक्या कोण गृहिण्या होत्या? बरं घडीभर धरू काही काही गृहिण्या तुझ्या मते कुचाळखोर, रिकामटेकड्या होत्या, पण मग बावळटपणे दारू पीत तेच तेच बडबडत बसलेले आणि पन्नाशीतदेखील शालेय बुद्धीने अश्लील जोक्स एकमेकांना सांगणारे पुरुष तुला कसे दिसले नाहीत? चेष्टाच करायची, तर ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांची करायला हवी! पण त्याला धाडस लागतं! 

बाबा आढाव रिक्षावाल्यांचे पुढारी म्हणून त्यांना गैरसोयीपोटी नावं ठेवणं हा किती जुनाट मध्यमवर्गीयपणा झाला! पायावर फरशी पडल्यामुळे अपंग झालेला मजूर आपण हमाल पंचायतीत जाऊन पाहिलेला नाही. त्यावरचं अनिल अवचटांनी केलेलं लिखाण वाचलं, तर आपल्याला अपराधी वाटतं म्हणून त्याचं अस्तित्वच नाकारायचं? आपण अर्धी चड्डी घालत होतात, तेव्हा अनिल अवचट हे आज बासरी वाजवणारे आणि लहान मुलांना ओरिगामी शिकवणारे आजोबा नामांतराच्या चळवळीत तुरुंगात जाणारे आणि जीव धोक्यात घालून बुवाबाजी आणि जातीय संघार्षांवर लिखाण करणारे तडफदार तरुण होते. शांता गोखले, सुमित्रा भावे या अज्ञानी, भांडकुदळ आज्या नव्हेत की, त्यांच्या रागावण्याविषयी लाडिक चेष्टा करावी. सुमित्रा भावेंच्या (तुला न आवडणाऱ्या) सामाजिक जाणिवेच्या चित्रपटांच्या मालिकेमधून सुरू झालेल्या परंपरेवर आजच्या मराठी चित्रपटसृष्टीतले कित्येक दिग्दर्शक उभे आहेत, हे बंगाली, केरळी, कन्नड समीक्षक जाणतात, पण त्यांच्या घरी झालेल्या स्त्रीवादी गप्पांची चेष्टा करण्यातच तुला धन्यता वाटावी?

तुझ्या भाषेत ‘तुझ्यासारख्या स्त्रीद्वेष्ट्या सापाला दूध घातलं जात होतं, तेव्हा तिथं सुनील सुकथनकर नावाचा स्त्रीवादाची ‘कावीळ’ झालेला पुरुषही होता, हे तू विसरणं हे अपेक्षितच आहे’. फक्त भीती ही की, तुझ्या लिखाणातल्या माझ्या अनुल्लेखामुळे मीही या स्त्री-द्वेष्ट्या विचारांचा समर्थक आहे, असा निष्कर्ष कुणी काढेल! साने गुरुजी, एसेम, नानासाहेब गोरे, दंडवते, प्रधान सर, हमीद दलवाई अशी राजकीय विचारवंत मंडळी; पु. ल., वसंत बापट, निळूभाऊ, प्रमिलाताई, सुधाताई वर्दे अशा अनेकांनी उभं केलेलं कलापथक; विद्या बाळ, स्त्री मासिक, नारी समता मंचसारख्या संघटना, अनिस... या सगळ्यांनी तयार केलेल्या विश्वातून माझ्यासारखा मध्यमवर्गीय तरुण नव्या जाणीवा शिकला. आज दुर्दैवानं तो प्रगल्भ विचार, ती सामाजिकता, निधर्मी सांस्कृतिकता उमजून पुढे नेण्यात पुढची पिढी (म्हणजे आपणच) कमी पडतो आहोत, याचं वाईट वाटतं; पण ते तर बाजूलाच राहिलं. त्यांची कुचेष्टा करून तू नेमकं कुणाला खूश करतो आहेस?

आणि त्या साऱ्या काळाचं विश्लेषणही करायला हरकत नाही, पण ते करायचं असेल, तर एक धारदार, नि:पक्षपाती, निर्भय, सर्वांगीण दृष्टी हवी. समाज म्हणजे सदाशिव पेठ नव्हे आणि खरं तर सदाशिव पेठही (जरी सगळ्यांनी चेष्टा केली तरी) तुला वाटते तेवढीच नाही. आपल्या संकुचित जाणिवेतून दुसऱ्याला हाणून आपणच छोटे ठरतो. आज अशा लिखाणाला मागणी आहे असं मानायचं म्हणजे मोठीच आत्मवंचना आहे रे! आपल्या भोवतालच्या घडामोडींबद्दल, माणसांबद्दल आपल्याला कधी कधी अनावश्यक राग येतो, पण त्याबद्दल गप्पा मारणं वेगळं आणि चक्क लेख वगैरे लिहिणं वेगळं!

एक विनम्र स्त्रीवादी पुरुष म्हणून मला वाटतं की, घरोघरच्या बायकांच्या कष्टांविषयी आदर बाळगणं, क्वचित त्यांच्यापैकी काहींकडून त्यांच्या अस्तित्वाचा अनाठायी गौरव केला गेला तरी तो मान्य करणं ही पुरुष म्हणून आपली जबाबदारी आहे आणि हे करण्याबद्दल अहंकारही बाळगण्याचं कारण नाही. आपल्या भोवतालची चार माणसं म्हणजे समाज नव्हे. असंख्य आर्थिक स्तर, सामाजिक स्तर, जातीय स्तर मिळून समाज बनत असतो. त्या विषयी लिहितो म्हणून तीन-चार लोकांना संदर्भ कळतील अशी आरडओरड करणं, याला लेखन म्हणणं अवघड आहे. आपल्या मैत्रिणी त्या थोर आणि बाकी ‘गृहिण्या’ पोरकट ही तर फारच सोयीस्कर पळवाट झाली! तर या निमित्तानं मी तुला सांगू इच्छितो की, तू ज्यांची चेष्टा केलीस ते सर्व काही मी आहे. समाजवादी आहे, स्त्रीवादी आहे; अनिल अवचट, सुमित्रा भावे, विद्या बाळ, बाबा आढाव (आणि हो, पु. ल.) आदींविषयी आदर-प्रेम बाळगणारा आहे. गृहिणी म्हणवून घेण्याइतपत एखाद्या कुटुंबासाठी मी काही केलं नाही. त्यामुळे गृहिणी आहे, असा दावा नाही करणार, पण असंख्य गृहिणींवर मनापासून प्रेम करणारा आहे. त्यामुळे या सगळ्यांची चेष्टा म्हणजे माझाही अपमान!! 
बघ, विचार कर! बाकी तुझा तू!

.............................................................................................................................................

सचिन कुंडलकर यांच्या ‘कोबाल्ट ब्लू’ या कादंबरीच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/2972

.............................................................................................................................................

लेखक सुनील सुकथनकर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहेत.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

sandeep kamble

Mon , 30 March 2020

होय ते प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांच्या कामाविषयी शंकाच नाही. आणी तुम्ही जर त्यांचे नाव ऐकले नाही तर तुम्ही खुप मागे आहात.


Ganesh Matkari

Sat , 09 December 2017

Atul, हे लेखक महाशय, म्हणजे सुनील सुकथनकर, हे खरोखरच सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. तुम्ही गुगल केल्यास कळू शकेल. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दोघांनी एकत्रितपणे अनेक पुरस्कारप्राप्त आणि दर्जेदार चित्रपट दिलेले आहेत. या वर्षी राष्ट्रीय पारितोषिकाचं सुवर्ण कमळ मिळालेला कासव हा चित्रपट त्यांचाच आहे. वर वास्तुपुरुष, देवराई, संहिता, अस्तु अशा अनेक चित्रपटांती नावं घेता येतील. उमेदवारीच्या काळात सचिन कुंडलकर आणि उमेश कुलकर्णी या दोघांनी( आणि नव्या फळीच्या इतर अनेक दिग्दर्शकांनी ) या दोघांच्या हाताखाली काम केलेलं आहे. मला बाजू घ्यायची नाही, आणि माझ्या मते सुकथनकरांनी उत्तर देण्याच्या फंदात न पडता लेखावर रिॲक्टच होण्याची गरज नव्हती, पण त्यांनी व्हावं का नाही हा संपूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे. पण व्हायचं असेल तर होण्याबद्दलच्या त्यांचा हक्क सचिन कुंडलकरही अमान्य करणार नाहीत.


Atul P

Fri , 08 December 2017

कोण आहेत हे लेखक महाशय ? प्रसिद्ध चित्रपट दिगदर्शक असे लिहीले आहे नावापुढे. पण यांचे नाव कधी एेकण्यात आले नाही. कदाचित त्यांच्या चाळीत ते प्रसिद्ध असतील. सचिन कुंडलकर या चांगल्या लेखक-दिग्दर्शकांवर हे लेखक महाशय टिका करतात यामागे त्यांचे प्रयोजन काय? पब्लिसिटी स्टंट आहे का हा ? म्हणजे प्रसिद्धीचा परिघ वाढविण्यासाठीचा ( म्हणजे चाळीपासून ते गल्लीपर्यंत) हा प्रयत्न आहे का ? काही कळत नाही बुवा. हा पण, जर या टिका करण्यातून एका गरजू लेखकाचा जर फायदा होणारं असेल, दोनचार पैसे मिळणार असतील त्याला कुंडलकरांवर टिका करणारा लेख लिहून, तर मात्र चालू शकेल. कदाचित, कुंडलकरपण आक्षेप घेणार नाहीत त्या टिकेवर मग.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......