छकुली आणि मी
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Thu , 07 December 2017
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar नितीन आगे Nitin Aage कोपर्डी Kopardi खर्डा Kharda उज्ज्वल निकम Ujjwal Nikam

अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात त्या दिवशी प्रचंड गर्दी होती. स्त्री-पुरुष, तरुण मुलं-मुली. शिवाय हवशे-नवशे-गवशे सगळेच. पोलिसपण होतेच.

मीपण त्या त्या गर्दीत होते. शरीरानं की मनानं सांगता यायचं नाही. कशीही असली तरी होतेच मी. एकटीच होते. एवढ्या गर्दीत कुणी मला ओळखायची शक्यता नव्हती, की मी हरवायची. छेडछाड तर त्या दिवशी हद्दपारच झाली होती. कारण सगळे पुरुषच भैनीला, लेकीला, समाजाच्या पोरीला काय न्याय मिळतो, हे ऐकायला जमले होते.

हो, मी कोपर्डीबदद्लच बोलतेय. निकालाच्या दिवशीचं वातावरण सांगतेय. जमलेल्यांच्या डोळ्यात अशी आग दिसत होती की, समजा खटल्याफिटल्याचं झेंगट नसतं तर त्यांनी तिघांना फाशी नाय, खिमाच केला असता. म्हणजे तसं म्हटलं तर वातावरणच तसं होतं की, लोक जज काय म्हणतोय ते ऐकायला आले नव्हते, तर आपल्या मनात जे आहे ते जज सांगतोय काय हे तपासायला आलेते.

बाकी टीव्हीवर बोलायला मिळतंय म्हटल्यावर जो तो चिडून, हमसून, कायदेकानून शिकवत, कायदे उडवून लावत बोलत होता. शाळा-कॉलेजातल्या पोरीपण चौकात फाशी द्या असं म्हणत होत्या. ते बघून मला जरा बरं वाटलं. म्हणजे इथून पुढे कुणी यांना बोट लावलं तरी या गप्प बसणार नाहीत की, मुळूमुळू रडत घरी जाणार नाहीत. तिथले पुरुष, तरुणी पोरं बघून मला वाटलं, आता हे आया-बहिणींचीच इज्जत इतर मुलांना देणार. अगदी बायकोलासुद्धा. ज्या आया-बाया आणि बाप जमले होते, ते यापुढे मुलगी येऊन रडू लागली किंवा वयात आली तर शाळा बंद करून तिचं तिला न विचारता लग्न लावणार नाहीत. तिला शिकवून डॉक्टर नाही तर निकमसाहेबांसारखा वकील बनवतील. छकुलीच्या आईसोबत एक वकीलबाईपण दिसल्या. समाजाची लेक होती म्हणत होत्या. डोळे पुसत होत्या.

जे ऐकायला मैलो न मैल तुडवत, सकाळीच गाडीघोडं करून पायी चालत आले होते, तो निकाल जजसाहेबांनी पाच मिनिटांत चार ओळीत वाचला. खेळ खल्लास. मग टीव्हीवाल्यांनी निकमसाहेबांना गराडा घातला. त्यांनी मग जज असल्यासारखं निकालवाचन केलं. ते मीपण ऐकलं. तेच तर मी ऐकायला आले होते. तिघांना फाशी. मरेपर्यंत फाशी. सर्वांप्रमाणे मलाही वाटलं, छकुलीला न्याय मिळाला. सगळेच छकुली म्हणत होते, म्हणून मी छकुली म्हणतेय. गाव कळलं दुनियेला, पण नाव शेजाऱ्यालापण नाही कळलं.

प्रसंग दु:खाचा होता म्हणून नाहीतर निकाल ऐकून गर्दीत असा आनंद, उत्साह पसरला होता की, फटाकेच वाजले असते. तरी गर्दीतून जाताना एक तरणाबांड दुसऱ्याला म्हणत होता- ‘ज्या दिवशी भडव्यांना फासावर लटकवतील, त्या दिवशी दोन हजाराची माळ लावतो की नाय बघ.’

शिक्षा सांगितल्यावर सगळ्यांना घाई झाली होती की, यांना फासावर कधी लटकवणार? ‘हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती दयेचा अर्ज, त्याच्यावर पुन्हारिट पिटिशन… काय माहिती अजून किती वर्षं सरकारच्या पैशावर जगवतात भाडखाऊंना!’ एक माझ्या वडिलांसारखा माणूस चिडून म्हणाला. त्यावर तो मघाचा तरणाबांड त्या घोळक्यात घुसून म्हणाला, ‘साल्यांना तुरुंगातच जाऊन तुकडे करून गटारात टाकायला पाहिजे.’ माझ्या अंगावर काटा आला. घरी भावानं नाहीतर वडिलांनी, कधीतरी आईनं मुस्काट फोडलं तरी मला ताप भरतो. इथं तर हा तुकडे करायचं बोलत होता.

मला छुकलीच्या आईला भेटायचं होतं. पण टीव्हीवाल्यांनी तिला घेरलं होतं. ती बोलता बोलता रडत होती. रडता रडता बोलत होती. त्या वकीलबाईंच्या खांद्यावर पडत होती. मला लोकांचा, टीव्हीवाल्यांचा खूप राग आला. जीव पिळवटून रडणारी बाई, खरं तर आई कुणाला आणि कशाला दाखवताय?

एक आठवलं ते सांगते. तसं आमच्या घरचं वातावरण कडक शिस्तीचं, पण माझ्यात थोडा वांडपणा होता. आता निवला तो. तर आमच्या तालुक्यात एका शेतकऱ्यानं सुसाईड, आत्महत्या केली. तर टीव्हीवाले आले होते. मयताची बायको धाय मोकलून, मांडीवर पितं पोर ठेवून कपड्यालत्त्याचा विचार न करता जोरजोरात रडत होती. आणि टीव्हीवाले तिचं तोंड फिरेल तिकडे माईक धरत होता. हा काय विचारत होता, ती काय बोलत होती, काही कळत नव्हतं. तरी माईक आणि ती बाई  यांचा नाग-पुंगासारखा खेळ चालू होता. मी १२-१३ वर्षांची होते. मला जाम राग आला. तो आटपून निघाला तेव्हा त्याला अडविला. म्हणलं, ‘कॅमेरा देता का जरा?’ तो लगेच हावरटपणाने म्हणाला, ‘का? का? तू त्या घरातली आहेस? तू ओळखायचीस, तू बघितलंस मरताना?’ म्हटलं, ‘नाही. तुमचंच शूटिंग करायचं होतं.’ तो हसून म्हणाला, ‘माझं? जा, तिकडे, घरचा नायतर शाळेच रस्ता पकड.’ मी तिथून निघताना ओरडून त्याला म्हटलं, ‘घरी जाऊन भोकाड पसर आणि तुझ्या बायकोला तुझं शुटिंग घ्यायला लाव आणि बघ कसा दिसतोस?’

माझी हुशारी घरी कळली. पुन्हा मुस्काटात खाल्ली. त्या आठवणीनं पण मला भूक लागली. एसटी स्टँडवरचं कँटिन बरं असतं. तिथं एकट्या पोरीनं खाल्लं तरी कुणाला फार काही पडत नाही. मी मिसळ पाव आणि चहा घेतला. जीवात जीव आला. अंधार पडायच्या आत घर गाठायचं तर आत्ताच गाडी पकडलेली बरी. वाचवून ठेवलेले पैसे पाहिजे तसे खर्च करू शकतो, पण वेळेचं तसं नसतं. त्यात आम्हा पोरींना, त्यातून गावाकडच्या पोरींना तर वेळ आखून, ठरवूनच दिलेला असतो. गावाकडे जाणाऱ्या एसटीच्या फलाटाकडे गेले नि तिथल्या सिमेंटच्या कठड्यावर बसले. तर तिथं लोक छकुली, रेप नि फाशी याबद्दल बोलत होते. मधूनच जातीवरून शिव्या घालत होते. आमची जात तशी मला माहीत होती, पण भाऊ त्या लाखाच्या मोर्चात जायचा तेव्ही नीट कळली.

शिवाजी महाराज आमच्याच जातीचे, म्हणजे हे मला कारण काढून वही मागणाऱ्या, चार घरं पलिकडे राहणाऱ्या वर्गातल्या मंगेशनं सांगितलं होतं. त्याच्या वहीवरचा स्टिकर दाखवत. मला पण मग जातीचा अभिमान वाटला. तसाच आता या चार-पाच पोरांत दिसत होता. तीही निकाल ऐकायला आली होती. नंतर गाडीला उशीर होता म्हणून स्टँडवर चक्कर मारली, तर तसे बरेच दिसले. काहींच्या डोक्यावर टिळे होते, सॅकवर स्टिक होते. बरेच जण वेगवेगळ्या मोर्चात जाऊन आलेले दिसले. कारण त्यातला एक म्हणत होता, ‘आज नगरमध्ये मेणबत्ती मोर्चा काढायला पाहिजे होता. पाच लाख लोक ईजीली जमले असते.’ मला पुन्हा उगाचच भीती वाटली. पाच लाखांच्या गर्दीत घरी परतायला टाईमात एसटी मिळाली असती? आणि मेन म्हणजे छकुलीच्या आईला बघता आलं असतं? तिचे वडील, भाऊ सगळ्यांना बघितलं. आणि मला पण रडायला आलं होतं. आतापण डोळे भरून आले. तेवढ्यात गाडी लागली. गर्दी होतीच. पण आज दरवेळी असतात तशी छातीजवळ येऊन नाहीसे होणारे हात, मागून वाढता दाब यातलं काहीच नव्हतं. उलट काळजी घेतली जात होती. कदाचित कोर्टाच्या गर्दीत मला बघितलं असेल. छकुलीच्या निकालाचा एवढा लगेच परिणाम? खिडकीपण मिळाली? आईएवड्या बाईनं मुद्दाम बोलवून दिली. तिच्या डोळ्यात अपार माया दिसली. ही पण कोर्टात होती?

छकुलीमुळे बदललेला समाज बघून मला खूप शांत वाटायला लागलं. फक्त हा बदललेला समाज बघायला छकुली नव्हती!

छकुली तशी माझी कुणीच लागत नव्हती. तरीही तिला क्रूरपणे मारणाऱ्यांना फाशी झाली हे ऐकून मला उगाचच समाधान वाटलं.

मी घरी पोहचले. घरी एक अजब सन्नाटा होता. पण त्या सन्नाटलेल्या वातावरणातही लपलेला आनंद मला जाणवला. तोंडातल्या तोंडात भाऊ काहीतरी पुटपुटला. कुणीही मी कुठं गेले होते विचारलं नाही.

तशी मी वेळेतच घरी पोहचले होते. पण घरच्यांना मात्र मी घरातच दिसत होते. आजच नाही तर काल, परवा. नीट मोजलं तर दोन-अडीच वर्षं. पण मी तर रोज बाहेर पडत होते. आज पडले तशी. छकुलीशी काहीही संबंध नसताना, पार कोर्टात जाऊन निकाल ऐकून आले. खरं तर त्या गर्दीत मला हंबरडा फोडावासा वाटत होता. अगदी मोठ्यानं. छाती फुटली असती इतक्या जोरात.

छकुलीसाठी नाही. माझ्यासाठीच. छकुलीचं नाव कळलं नाही, तसं माझंही नाव कुणाला माहीत नाही. छकुलीला रेप करून मारणारांची नावं जशी कळली, तसंच माझ्यावर प्रेम करून जीवानिशी गेलेल्या त्या माझ्या प्रियकराचं नावंही तुम्हाला माहीत आहे. नितीन आगे!

छकुलीला न्याय मिळाला. नितीनला मात्र नाही. छकुलीला कुठल्या अंधारात कुणी नेमकं काय केलं, काय घडलं कुणालाच माहीत नाही. बघणारं कुणीच नव्हतं! तरीही छकुलीला न्याय मिळाला.

नितीनला भर वर्गातून खेचत बाहेर नेला होता. आणि आमची काही रात्रशाळा नव्हती! भाऊराव पाटलांनी सुरू केलेल्या रयतची आमची शाळा. पण तिथले शिक्षक, मुख्याध्यापक काही करू शकले नाहीत, तर शिपायांचं काय घ्या!

आजच्य गर्दीत जसे म्हणत होते, चौकात फासावर लटकवा किंवा तुरुंगात घुसून तुकडे करा. तसंच वर्गात घुसून, बाहेर काढून, तुकडे न करता फासावर लटकवला त्याला, पण चौकात नाही तर गावाबाहेर झाडाला. बाकी शिव्या त्याच!

छकुलीचं काय झालं ते तुम्हाला कळलं, मारेकऱ्यांचं काय झालं हे कळलं. नितीनचं काय झालं हे कळलं. माझं काय झालं कळलं?

मला छकुलीच्या आईला, तिच्या वकिलांना, मोर्चे काढणाऱ्यांना फक्त एकच विचारायचं होतं- इथं आरोपी बलात्कारीऐवजी प्रेमी असता तर?

तो असाच खालच्या जातीचा असता तर? मग दोघांना जिवंत ठेवलं असतं? का माझ्यासारखं एकाला?

बलात्कार, हत्या हा गुन्हा आहे. पण प्रेम करणं? नितीननं माझ्यावर प्रेम केलं होतं, बलात्कार नाही. त्यानं माझी छेडछाड केली नव्हती, तर हे प्रेम दोघांचं एकमेकांवर होतं. त्याच्या प्रेमानं मी मोहरले, तेव्हा ना मला त्याची जात दिसली, ना माझी!

तिथं कुणीतरी म्हणत होतं- बलात्कारात जात नसते. पण शिव्या तर जातीवरूनच देत होते. मोर्चात तर फुले-शाहू-आंबेडकर होते!

छकुली कोपर्डी, कर्जत, माझ्या शेजारच्या तालुक्यातली तर आमचा खर्डा कर्जत शेजारच्या जामखेड तालुक्यातला!  पण कोर्टात आणि न्यायात जमीन-अस्मानाचं अंतर!

नितीनच्या बापानं दोन-अडीच वर्षं वाट पाहिली. मीही. साक्षीदार उलटले. आरोपी सुटले. नुसतेच नाही, निर्दोष सुटले.

मीही मध्ये जीव द्यायचा विचार केला होता. पण थांबवला. कारण नितीन माझ्यात आहे. घाबरू नका. तसा नाही. रोमारोमात. परवा सगळे सुटले. घरी आले. पण एकाचीही माझ्या नजरेला नजर द्यायची हिंमत झाली नाही. त्यांनी काय केलंय, हे त्यांना माझ्या डोळ्यात स्पष्ट दिसलं असतं ना.

मी आज कुठे आहे? काय करते? का नितीन गेल्यावर मी हसत खेळत लग्न केलं? का तिथंच आहे? का माझी रवानगी कुठे केलीय?

जिथं मरूनही नितीनला न्याय मिळाला नाही, तो मला जिवंतपणी मिळेल?

.............................................................................................................................................

संजय पवार यांच्या ‘चोख्याच्या पायरीवरून’ या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4203

.............................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Alka Gadgil

Thu , 07 December 2017

Sanjay, apratim mhanaychii pan laj watte, Court tat hee, jat advi yete


Alka Gadgil

Thu , 07 December 2017

Sanjay, apratim mhanaychii pan laj watte,


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......