अजूनकाही
१. एकही गुजराती माणूस रोजगारासाठी बाहेरच्या राज्यात जात नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ‘गुजराती माणसाला रोजगाराच्या शोधासाठी राज्याबाहेर जावं लागत नाही. उलट गुजरातमध्ये बाहेरील लोक रोजगाराच्या शोधासाठी येतात. त्यामुळे गुजरातमधील अनेक भागांमध्ये ‘लघु भारत’ पाहायला मिळतो,’ असं मोदी म्हणाले. मोदींच्या गुजरातमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे तरुण बेरोजगार झाले आहेत, अशी टीका वारंवार काँग्रेसकडून केली जाते. काँग्रेसच्या या टीकेला मोदींनी हे उत्तर दिलं. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा आणि तिथं एकतरी गुजराती माणूस रोजगाराच्या शोधात आला आहे का, असं विचारा. त्या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल. तुम्हाला एकही गुजराती व्यक्ती तिथं सापडणार नाही, असं मोदींनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं.
देशाच्या नाही जगाच्या कानाकोपऱ्यात गुजराती माणसं गेली आहेत, ती पोटापाण्यासाठी नाही, तर जगाच्या उद्धारासाठी, शाकाहाराच्या प्रसारासाठी आणि ढोकळा आदी पदार्थांचा, गरब्यासारख्या सांस्कृतिक उत्सवांची जगाला ओळख करून देण्यासाठीच. बरं हे व्रत त्यांनी इतक्या प्रखर निष्ठेनं घेतलं आहे की, गुजरातेत मोदींनी सोन्याच्या ताटात चांदीच्या चमच्यानं अत्तरदिव्यांच्या उजेडात सर्वांना जेवता येईल, अशी व्यवस्था केल्यानंतरही ते गुजरातेत काही परतत नाहीत; जगाच्या उद्धारासाठी जिथं गेले तिथून निघायचं नावच घेत नाहीत.
.............................................................................................................................................
२. गुजराती लोकांनी माझ्या सवयी बिघडवल्या असून माझ्या जेवणात आता गुजराती पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळं माझं वजनही वाढत आहे, असं मिश्किल सूचक वक्तव्य काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचाराच्या काळात केलं. ते म्हणाले, काल माझी बहीण घरी आली. ती म्हणाली की, तुझ्या तर स्वंयपाक खोलीत सर्व गुजरातीच आहे. गुजराती खाकरा, गुजराती लोणचं, गुजराती शेंगा. तुम्ही लोकांनी माझ्या सवयी बिघडवल्या आहेत. त्यांच्या या सूचक वक्तव्यानंतर सभेत एकच हंशा पिकला.
मैं बचपन से ही खाकरे का दिवाना था. गुजराती अचार मुझे बहुत भाता था. हम तो ननिहाल में पिझा भी बनाते है, तो उपर ढोकले की तरह सेव डालकर पपीते के चटनी के साथ ही खाते है. मेरी माँ के हाथ के उंधियो का स्वाद पूरी इटली में फेमस है... हेही एकदा बोलून टाका म्हणजे जानवं सार्थकी लागेल.
.............................................................................................................................................
३. अरबी समुद्रात निर्माण झालेलं ओखी चक्रीवादळ ताशी २१ किलोमीटर या वेगानं गुजरातकडे सरकल्यामुळे मुंबईवर चक्रीवादळाचा विपरित परिणाम झाला नाही. मात्र, मंगळवारी दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या पावसामुळे मुंबईचा वेग संथ झाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतल्या शाळा बंद ठेवण्यात आल्या असतानाच उर्वरित दैनंदिन व्यवहारही धीम्या गतीनं सुरू होते.
अरे अरे अरे, एक चक्रीवादळ मुंबईत यायला निघालं होतं, पण तेही गुजरातला पळवून नेलं, ही प्रतिक्रिया कानावर आली. पण, आम्ही करून दाखवलं, दळभद्री चक्रीवादळ आदरणीय बाळासाहेबांच्या पवित्र भूमीवरून अफझलखानाच्या पापस्थानाकडे पळवून लावलं, असं जोशपूर्ण काही अजून कानी आलेलं नाही. चक्रीवादळाचा धोका टळला असला तरी ‘माझ्या डोक्यावर घोंघावणारं वादळ माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पिटाळून लावलं गेलं. माझं डोकं सुरक्षित राहिलं. मी लाभार्थी, हे माझं सरकार’ ही जाहिरात येण्याचा धोका अजून टळलेला नाही.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4296
.............................................................................................................................................
४. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहंकाराची बाधा तर झाली नाही ना, याची शहानिशा करायला पाहिजे, असा टोला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी लगावला. मोदी यांना, तसंच पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांना आपण आतापर्यंत ३० पत्रं लिहिली. पण त्यांचं उत्तर मिळालं नाही, अशी तक्रार करत त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात २३ मार्च रोजी दिल्लीत आंदोलन उभारणार असल्याचं जाहीर केलं. पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याचा निर्धार केला होता, पण प्रत्यक्षात त्यांनी भ्रष्टाचारविरोधी कायदा कमकुवत करण्याचं काम केलं आहे. त्यांनी प्रत्येक राज्यात लोकायुक्त नियुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ते पूर्ण केलेलं नाही. लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यात खासदार, सरकारी कर्मचारी यांची संपत्ती जाहीर करण्याचं कलम होतं. ते मोदी सरकारनं काढून टाकलं. भ्रष्टाचाराला आळा घालणारी पाच विधेयकं संसदेत प्रलंबित आहेत, पण त्यांना पारित करण्याचा कोणताही प्रयत्न मोदी सरकारनं केला नसल्याची टीका अण्णा हजारे यांनी केली.
पंतप्रधानांनी किंवा त्यांच्या कार्यालयातील व्यक्तींनी अण्णा हजारेंचं पत्र येताच तात्काळ त्याला उत्तर लिहिलं पाहिजे, अशी अपेक्षा हेही अहंकाराचंच एक रूप झालं. पंतप्रधानांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या संदर्भात केलेल्या भ्रमनिरासाबद्दल इतकंच म्हणता येईल की, गरिबीतून आल्याचं सांगत दिवसाला लाखो रुपयांची उधळण स्वत:वर आणि आपल्या सरकारची टिमकी वाजवण्यावर करणाऱ्या आणि मर्जीतल्या उद्योगपतींना सोबत घेऊन सरकारी दौरे करणाऱ्या पंतप्रधानांच्या संदर्भात इतर फार कोणी असे भ्रम जोपासले नसावेत, त्यामुळे भ्रमनिरासातही अण्णा एकटेच आहेत.
.............................................................................................................................................
५. घराच्या भिंतीवर 'हिंदुस्तान जिंदाबाद' असं लिहिणाऱ्या २० वर्षांच्या पाकिस्तानी तरुणाला अटक करण्यात आली आहे. साजिद शाह असं त्याचं नाव आहे. हरिपूर परिसरातील माखन कॉलनीतील घरातून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. गुन्हा सिद्ध झाल्यास साजिदला सात वर्षं तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते, असं वृत्त पाकिस्तानातील 'द डॉन'नं दिलं आहे.
अरे वा, ‘पाकिस्तान भेज दो’ या भारतातील एकतर्फी योजनेचं रूपांतर आता ‘हिंदुस्थान भेज दो’ची जोड मिळाल्यामुळे दुतर्फी योजनेत होऊ शकेल. सांस्कृतिक देवाणघेवाणीचे अनेक कार्यक्रम शेजारी देशांमध्ये होत असतात. भारत आता वेगानं पाकिस्तानी संस्कृती आत्मसात करत चालला आहेच, त्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी साजिदला भारतात पाठवून द्यावं. पाकिस्तानात रोज पाठवल्या जाणाऱ्या पुरोगामी देशद्रोह्यांची संख्या पाहता, पाकिस्तानात थोडी जागाही व्हायला हवी ना त्यांच्यासाठी?
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment