बाबरी पतनाच्या पंचवीस वर्षात काय गमावलं?
पडघम - बाबरी पतन @ २५
कलीम अजीम
  • बाबरी पतनाचा निषेध करणाऱ्या पुण्यातील आजच्या सभेचे एक छायाचित्र
  • Wed , 06 December 2017
  • पडघम बाबरी पतन @ २५ अयोध्या Ayodhya लालकृष्ण अडवाणी Lal Krishna Advani राममंदिर Ram Mandir राम जन्मभूमी Ram Janmabhoomi बाबरी मशीद Babri Masjid रथयात्रा Ratha Yatra

आज बाबरी मस्जिद विध्वंसाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत. आयोध्येत ६ डिसेंबर १९९२ला केवळ वादग्रस्त इमारतच पाडली नव्हती, तर भारताच्या गंगा-जमुनी संस्कृतीतील हिंदू-मुस्लीम एकात्मतेवर जबरी प्रहार करण्यात आला होता. या एका घटनेतून भारतातील सहिष्णू समाजरचनेला बाधा पोहचवण्यात आली. परिणामी दोन समाजात निर्माण झालेली दुही आजतागायत कायम आहे. आज पंचवीस वर्षानंतरही बाबरी पतनाचे मळभ मनात खोलवर रुतलेलं आहे. बाबरी जमीनदोस्त झाल्याच्या २५ वर्षानंतर मागे वळून बघताना बरंच काही निसटून गेल्याचं दिसून येतं. ही निसटून जाण्याची प्रक्रिया असुरक्षिततेच्या वातावरणामुळे त्यावेळी कळाली नाही. पण आज त्याचं दाहक स्वरूप स्पर्धात्मक अजगराच्या रूपानं पुढे आलं आहे.

१९९२ पासून ते २०१७च्या मॉब लिचिंगपर्यंत देशातील मुस्लीम समाजानं बरंच काही गमावलं आहे. कमावल्याच्या तुलनेत गमावल्याचं मोजमाप कदापि शक्य नाही. पण एक सकारात्मक बदल समाजात घडला, तो म्हणजे मुस्लिमांच्या राजकीय जाणीवा व महत्त्वाकांक्षा कमालीच्या वाढल्या आहेत. या मध्यल्या काळात घडलेल्या मुंबई दंगल, गुजरात हत्यांकाड, कंधमालचं शिरकाण, कोक्राझारचा धार्मिक उन्माद आणि मुजफ्फरनगरचा हिंसाचारामुळे मुस्लीम समाज अस्वस्थ व असुरक्षित झाला होता. मुस्लीम समाजाला मागे टाकण्यासाठी केलेल्या या दंगली राजकीय कृती होत्या. पण यातून समाज सावरला आहे. धर्मांध शक्तीच्या कट-कारस्थानाला सहज बळी पडण्याइतका तो निर्बुद्ध नाही, त्याला हवी तेवढी राजकीय समज आलेली आहे. परंतु भारतातील धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या व सेक्युलर म्हणवणाऱ्या कथित राजकीय पक्षांची कटशाही समजण्याइतका तो अजून प्रगल्भ झालेला नाही. तसंच समाजात वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या धर्मसंस्थानिकाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी तो आपल्या सदविवेकबुद्धीचा वापर करू पाहत नाही.

या दोन घटकांमुळे भारतीय मुस्लीम राजकारण सामाजिक अवचेतनेतून जात आहे.

६ डिसेंबर लक्षात का ठेवावा, मला पडलेला पहिला प्रश्न, कारण याच दिवशी देशाच्या अखंडतेला व सार्वभौमत्वाला धक्का देणारी घटना देशात घडली होती. आणि दुसरं बाबासाहेबांचं जाणं. या दोन्ही घटना तशा दु:खदच आहेत. घटनेतील क्रमवारी जरी सारखी नसली तरी या घटना एकाच दिवशी म्हणजे 6 डिसेंबर रोजी घडल्याचे साधर्म्य आहे. या रोजी दलिताकडून मुंबईत चैत्यभूमीवर विविध पक्ष-संघटनांकडून अभिवादन सभा आयोजित केली जाते तर मुस्लिमांकडून निषेध सभांमधून काळ्या पट्ट्या लावून ‘इसाले सवाब’ अर्पीत केलं जातं. तसेच प्रथेप्रमाणे बहुसंख्याक व अल्पसंख्याक समाजाकडून या दिवशी बाबरी पाडल्याच्या कथा ऐकवल्या व सुनावल्या जात असतात.

माझा जन्मच ऐंशीच्या दशकाचा. त्यामुळे ‘बाबरी पतन’ आणि त्यानंतर घडलेली घटनाक्रम मला बर्‍यापैकी आठवतो. त्यावेळी जरी लहान असलो तरी मला हे सर्व न कळण्यासारखं नव्हतं. या घटनेनंतर आमच्या मोहल्ल्यातही अस्वस्थतेचं वातावरण होतं. अल्लाहकडे ‘आनेवाली बला’पासून संरक्षण मागण्यासाठी मस्जिदीमध्ये गर्दी सुरू झाली होती. सामुहिक नमाज पठन करून ‘दुआ की गुजारीश’ म्हणलं जात होतं. अशातच मुंबईमध्ये दंगली उसळल्याच्या बातम्या येऊ लागल्या. शहरात शांतता कमिट्यांच्या बैठका सुरू झाल्या. मस्जिदीत प्रार्थनांचा ओघ वाढू लागला. शहरात दंगलीचे लोण पसरू नये म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न मोहल्ल्यातील बडी मंडळी करत असल्याचं मी बघत होतो. त्यामुळे सुदैवानं आमच्या अंबाजोगाई शहरात कसल्याच दंगली त्यावेळी घडल्या नाहीत. तर दुसरीकडे शनिवारची शाळा करून गल्लीतील माझे समवयस्क दलित शाळकरी मित्र आपल्यापेक्षा वयानं मोठ्यांसोबत मुंबईकडे चैत्यभूमीला रवाना झाली होती. हे सगळे घटनाक्रम लेखाच्या निमित्तानं विस्मृतीत ठेवल्यानं परत आठवावं लागलं. असो. पण हे सगळं भयाण होतं. यानिमित्तानं आजीकडून ‘पोलिस अ‍ॅक्शन’च्या कथा परत ऐकण्याचा योग आला होता. आज या संदर्भात माहिती ज्या वेळी मी वाचतो, बघतो, ऐकतो, त्यावेळची भीतीची भीषणता लक्षात येते.

बाबरीनंतर घडलेल्या मुंबई दंगलीत मारले गेलेल्यांच्या संबधितांना वापरून प्रतिक्रिया म्हणून मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्यात आले. हे स्फोट घडवून त्यांच्या आयुष्याची दैना करण्यात आली. देशद्रोहाचा डाग घेऊन तुरुंगात तरुण खितपत पडले आहेत. यांना वापरणारे आजही मोकाट फिरत आहेत. बाबरी पतनानंतर घडलेल्या स्फोटातील जेमतेम सर्व आरोपींना पकडून त्यांना शिक्षा करण्यात आली. पण बाबरी पाडणारे व त्यानंतर दंगली घडवून हजारो निष्पापांचे बळी घेणारे आजही मोकाट आहेत. नुकतंच बाबरी विध्वंसाचा तपास करणाऱ्या लिब्राहन आयोगाचे अध्यक्ष न्या. मनमोहन लिब्रहान यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की, ‘बाबरीच्या वादग्रस्त जागेवर सुनावणी होण्यापूर्वी आधी ज्यांनी बाबरी पाडली, अशा आरोपींविरोधात खटला चालवा, मग बाबरीच्या जमिनीचा वाद सोडवा’. न्या. लिब्राहन यांची प्रतिक्रिया बोलकी आहे.

दोन महिन्यांपूर्वी १९९३ च्या मुंबई दंगलीचा शेवटचा निकाल लागला. सर्व आरोपींना न्यायालयानं कठोर शिक्षा सुनावली. पण ज्यांनी मुंबई दंगल घडवून हजारो मुस्लिमांच्या कत्तली केल्या, लाखोंना बेघर केलं असा आरोपींना शिक्षा कदी मिळणार? दंगलीचा तपास करणाऱ्या श्रीकृष्ण आयोगानं स्पष्टपणे आरोपींची नावं दिली आहेत. ज्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं सुद्धा नाव होतं. १९९३ नंतर किती सरकारं महाराष्ट्रात बदलली, पण कोणीच श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाची दखल घेतली नाही. २५ वर्षानंतर आजही दंगलपीडित न्यायाच्या अपेक्षेत जगत आहेत. १९८४च्या शीखविरोधी दंगलीत अनेकांना नुकसान भरपाई मिळाली, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेत या दंगलीबद्दल माफीही मागितली, पण मुंबई व गुजरात दंगलीवर कुठलीच नुकसान भरपाई नाही. माफीची अपेक्षा तर सोडाच.

बाबरी पतनाच्या २५ वर्षानंतरही मुस्लीम समुदाय देशद्रोहाचा डाग झेलत, जगण्याचा प्रत्न करत आहे. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही शिक्षण, रोजगार व मूलभूत सुविधांसाठी खेटा माराव्या लागत आहे. आजही सामाजिक अवहेलना झेलत ती दंगलग्रस्त कुटुंबं कशीबशी दिवस ढकलत आहेत. त्यांना आर्थिक व सामाजिक स्थैर्य अजूनही लाभलेलं नाही. त्यामुळे दंगली, विध्वंस, वाईट घटना लक्षात ठेवून काहीच साध्य होत नसतं. या आठवणीनं केवळ वर्तमानच खराब होत नाही, तर भविष्यकाळावरदेखील याचा परिणाम होतो. पण भूतकाळातील घटना कशामुळे घडल्या याची कारणमीमांसा करून त्या दुरुस्त करता येतील का, यासाठी प्रयत्न केला जातोय. दंगल, विध्वंस आठवणं म्हणजे द्वेष व सूड या भावना पोक्त करणं होय.  

बाबरी विध्वंसानंतर देशभरात अनेक दंगली घडल्या आहेत. ओरिसा वगळता प्रत्येक दंगलीत मुस्लिम समाजाला टार्गेट करून मारण्यात आलं. त्यामुळे मुस्लिमांचं सामाजिक आर्थिक, शैक्षिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. प्रत्येक दंगल मुस्लिमांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कितीतरी वर्षं मागं घेऊन जाते. दंगली रोखण्यामागं सुरक्षा यंत्रणा फोल ठरली आहे. दंगल घडताना पोलिस मुस्लिमांना कसलीच मदत पुरवत नाहीत. अशा वेळी सामान्य मुस्लिमांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे. हा वेगळा न्याय का, असा जाब दंगलग्रस्त भागातील नागरिक सरकारला विचारत आहेत.

अलिकडच्या काळात फक्त उच्चशिक्षित मुस्लिम तरुणांच नव्हे तर दलित तरुणांना दहशतवाद व नक्षलवादच्या खोट्या आरोपाखाली अडकवण्याचे षडयंत्र सुरू आहे. दोन-तीन वर्षं तपासाच्या नावाखाली तुरुंगात ठेवायचं आणि बाहेर सोडायचं, त्याचे शैक्षणिक व सामाजिक आयुष्य संपवण्याचे षडयंत्र सुरू आहे. अशा वेळी मुस्लिम व दलित तरुणांची जबाबदारी वाढली आहे. आर्थिक व शैक्षिक सक्षमता प्राप्त करण्यासाठी त्यांना नव्या संधीचा विचार करण्याची गरज आहे.   

गेल्या चार दिवसांपासून ‘आमच्या’ तथाकथित कंपू गटातून यादिवशी ‘काळा दिन’ (पलिकडच्या गटातून ‘भगवा दिवस’) पाळण्याचे मॅसेजस ‘व्हॉटसअॅप’ आणि ‘सोशल माध्यमा’तून सडा पडल्यासारखे पडत आहेत. ‘प्रोफाईल्स पिक’ काळ्या करणारी अवाहनं करण्यात येत आहेत. दरवर्षीप्रमाणे बाबरी पुन्हा उभी राहावी यासाठी मुस्लिमांतील उजव्या गटातून ‘दुआ’ रिलीज केली जात आहे. प्रत्येक मॅसेजिंग सर्व्हिसवर स्वंयसेवक अ‍ॅक्टिव्हतेनं मॅसेज पाठवण्याचं काम करत आहेत. म्हणजे परत एकदा सामाजिक व धार्मिक ठेकेदार मंडळीकडून सर्वसामान्य मुस्लीम तरुणांची डोकी भडकवण्याचं काम सुरू आहे. तर पलिकडे बहुसंख्याकाकडून ‘विजय दिवस’ साजरा करण्याच्या कवायती सुरू असतात.

अल्पसंख्याकांच्या निषेधातही मी सहभागी आहे, त्याचप्रमाणे बहुसंख्याकांच्या ‘विजय दिवसात’ही माझा सहभाग असेलच. आज बहुतांश ‘पोस्ट मॉडर्नायझेशन’नंतरची नवतरुणं पिढी, १९९२ साली घडलेल्या ‘बाबरी पतन’ संदर्भातल्या ‘कॉन्सपिरन्सी’वर सोयीचे विचार ऐकून मारणं-मरण्याची भाषा करत आहेत. वेगवेगळे गैरसमज ज्यांना ते सत्य समजून (या ‘अ’सत्याचं ओझं वाहण्यापलिकडे ते काहीच करू शकले नाहीत.) स्वत:चीच फसगत करत आहेत. इतिहासाची नीट जाण नसलेल्या पिढीकडून विखारी कृत्य घडवण्याचं कारस्थान काही ‘विषारी’ मंडळींकडून केलं जात आहे, आणि तरुणदेखील स्वत:ला इतरांच्या हवाली करून मोकळे झाले आहेत. अशा तरुणांची मला कीव येते.

देशात सत्ताधिश असलेली मंडळी गेल्या २५ वर्षांपासून ‘मंदिर वही बनायेंगे’ म्हणत सामान्य मतदारांच्या भावनेशी खेळत आहे. यालाच समातंर असा मुस्लिमांत एमआयएम हा कडवा पक्ष महाराष्ट्रात उदयास आला आहे. ‘बाबरी की एक इंच भी जमीन नही देंगे’ म्हणत त्यांचं राजकारण सुरू आहे. मुस्लीम तरुणांचा एकत मोठा गट या भुलथापांना बळी पडत आहे. दोहोंकडून असा विकारी राजकीय प्रवृत्तींना आहारी जाणार्‍यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

सात वर्षांपूर्वी म्हणजे ३० सप्टेंबर २०१०ला अलाहाबाद उच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय देऊन वादग्रस्त जागेचे तीन तुकडे केले. पहिला भाग सुन्नी वफ्क बोर्ड, दुसरा निर्मोही आखाडा आणि तिसरा तुकडा रामलल्ला अशा तीन भागांत जागेची विभागणी केली. सर्वच राजकीय पक्षातून या निर्णयाचं स्वागत झाल. मात्र, सुन्नी वफ्क बोर्डानं यावर आक्षेप नोंदवत सर्वोच्च न्यायलयात अपील करण्याची भूमिका घेतली. या पाठोपाठ विंहिंप व इतर संघटनांनीही वादग्रस्त जागेवर पूर्ण हक्क सांगितला. त्यानंतर आजपर्यंत हा वाद हिंदू-मुस्लीम समुदायात एक राजकीय मुद्दा म्हणून सतत पेटवला.

सात वर्षानंतर मंगळवारी, ५ डिसेंबर रोजी या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीला सुरुवात झाली. उच्च न्यायालयानं सुनावणीपूर्वीच हे स्पष्ट केलं की, कुठल्याही परिस्थिती सुनावणी पुढे ढकलण्यात येणार नाही. पण पहिल्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी ८ फेब्रुवारीपर्यत स्थगित केली आहे. सात वर्षांपासून प्रलंबित या प्रकरणात आत्तापर्यंत २० याचिका आणि ९० हजार पानांचे साक्षी-पुरावे दाखल झाले आहेत. या काळात सात मुख्य न्यायमूर्ती बदलण्यात आले. या २० याचिका ऑगस्ट २०१७मध्ये निर्गमित करण्यात आल्या. पाली, पर्शियन, संस्कृत, उर्दू आणि अरबी अशा सात भाषांत नऊ हजार पानांत असलेली ही कागदपत्रं भाषांतरीत करणं एक आव्हान होतं. हे दस्ताऐवज भाषांतरीत करायला न्यायालयानं १२ आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानुसार मंगळवारी पाच डिसेंबरला सुनावणी सुरू झाली, पण साक्षी-पुराव्याच्या अनुवादाचं काम पूर्ण न झाल्यानं पुन्हा कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे.

प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यावर मत मांडणं बेकायदेशीर आहे. पण भाजपकडून ‘राम मंदिर निर्मिती’चा राजकीय लाभ घेणं सुरूच आहे. मार्चमध्ये झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपच्या जाहीरनाम्यात राम मंदिर उभारण्याचा संकल्प करण्यात आला होता. यापूर्वी म्हणजे २०१४ पासून भाजपनं सत्तेत आल्यानंतर ‘मुस्लिमांनी या जागेवरचा अधिकार सोडावा’ यासाठी विनंती व सार्वमत जमा करण्याचं काम सुरू केलं आहे. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुस्लीम विंग ते सामान्य अशिक्षित लोकांना रस्त्यावर आणून मुस्लीम समुदायात ‘रामजन्मभूमी समर्थना’ची मोहीम राबवण्याचं काम सुरू केलं आहे.

राम मंदिर उभारणीसाठी मुस्लिमांचं समर्थन मिळत असल्याचा खोटा दावाही संघानं मधल्या काळात सुरू केला होता. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंदिर उभारणीला पाठिंबा देणारे अनेक मुस्लीम चेहरे असलेलं पोस्टर झळकलं. या पोस्टरवर विनापरवानगी फोटो वापरून बदनामी केल्याचा आरोप करत एक तक्रारही पुण्यात दाखल झाली होती. या घटनेवर सविस्तर प्रकाश टाकणारा एक लेख ‘अक्षरनामा’वरच प्रकाशित झालेला आहे. एकूण काय तर मुस्लिमांचा पाठिंबा मिळत असल्याचा खोटा दावा संघाकडून गेल्या तीन वर्षांत सुरू आहे. प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना भाजप व हिंदुत्वादी संघटनांचे पदाधिकारी जाहीरपणे राम मंदिराची भूमिका मांडत फिरत आहेत. 

बाबरी पतनाच्या पंचवीस वर्षानंतर आज बर्‍याच जखमा कोरड्या झाल्या आहेत. लेख लिहून आणि वाचून क्रांती घडेल अशी कोणतीच शक्यता नाही. पण तरीही या लेखाचं प्रयोजन असं की, विवादित जागेसाठी आम्ही किती दिवस भांडत राहणार? त्यातून निष्पन्न काहीच होणार नाही, याची कल्पना देशातील सर्व नागरिकांना आहे. उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय दोन्ही उभयपक्षाच्या आस्थेला अमान्य असल्यानं ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. दोन्ही गटाकडून तेवढाच जोर असल्यानं विवादित जागेवर येत्या पन्नास वर्षांत तरी भौगोलिक बदल घडणार नाही. यातून फलस्वरूप समाधान न येता नवा वाद उभा राहणार आहे.

काहींना हा वाद सतत पेटत ठेवायचा आहे. पण माझ्या मते वादग्रस्त जागेवर देशातील प्रत्येक नागरिकास उपयोगी पडेल असं जागतिक दर्जाचं ग्रंथालय उभारलं जावं. त्यात विज्ञान, सामाजिक शास्त्र व राज्यशास्त्रावर अभ्यास व संशोधन केलं जावं. अत्यल्प खर्चात जागतिक दर्जाचं शिक्षण मिळेल अशी सोय तिथं करण्यात यावी. जेणेकरून देशातील प्रत्येक जाति-धर्माच्या नागरिकांना याचा लाभ मिळेल. तसंच मंदिर व मस्जिद उभारणीसाठी शहरात इतर ठिकाणी दोघांना समान अशी जागा वाटप करून आंतरराष्ट्रीय शांतीचं प्रतीक म्हणून अयोध्या नगरीचा विकास केला जावा. वादग्रस्त जागेवर तोडगा काढण्यासाठी ‘आस्थेला’ बाजूला ठेवून निर्णय घ्यावे लागतील. धर्मगुरू, सेवाभावी संस्था, बुद्धिजीवी वर्ग, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, धर्मगुरू इतरांच्या उपस्थितीत सल्ला-मसलत करून योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा विवादित परिसरात पडलेला ‘फुफाटा’ नव्या दंगली घडवून आणण्यास कारणीभूत ठरेल. कवी इंद्रजित भालेरावांची एक कविता आहे -

रामानंतर बाबरही गेला

थडग्यांना आला

भाव आता.

मढे उकरून जगती जे-जे

पुरले पाहिजे

त्यांना आधी.

 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4296

.............................................................................................................................................

लेखक कलीम अजीम ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत. 

kalimazim2@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 07 December 2017

कलीम अजीम, गैरमुस्लीम प्रार्थनास्थळी मशीद उभारणं हा इस्लामचा घोर अपमान आहे ना? राम जन्मभूमीच्या जागी जुनं मंदिर होतं हे उत्खननात सिद्ध झालेलं आहे. मग बाबरी मशीदीच्या नावाने बोंबाबोंब का केली जातेय? इस्लामचा अपमान करायला बाबर मूर्ख होता का? शरीयानुसार बाबरी मशीद अॅक्शन कमिटीच्या सभासदांना देहदंडाची शिक्षा द्यायला हवी ना? पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ! आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......