‘जो राम के काम ना आये, वो बेकार जवानी है...’
पडघम - बाबरी पतन @ २५
धीरेंद्र के. झा.
  • ‘शॅडो आर्मीज्’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Wed , 06 December 2017
  • पडघम बाबरी पतन @ २५ अयोध्या Ayodhya लालकृष्ण अडवाणी Lal Krishna Advani राममंदिर Ram Mandir राम जन्मभूमी Ram Janmabhoomi बाबरी मशीद Babri Masjid रथयात्रा Ratha Yatra

‘Shadow Armies : Fringe Organizations and Foot Soldiers of Hindutva’ या  Dhirendra K. Jha. यांच्या पुस्तकाचा मुग्धा व धनंजय कर्णिक यांनी ‘शॅडो आर्मीज् : काठावरच्या संघटना आणि हिंदुत्वाचे पायदळ’ या नावानं मराठी अनुवाद केला आहे. मधुश्री पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

विश्व हिंदू परिषदेने १९८४मध्ये जेव्हा लढाऊ युवकांची शाखा म्हणून बजरंग दलाची स्थापना केली, तेव्हा त्यांची उद्दिष्टे वेगळी होती. अयोध्येच्या आंदोलनासाठी हिंदूंना रस्त्यावर आणणे हे त्यांचे मूळ उद्दिष्ट होते. विहिंपने अयोध्या आंदोलनात उतरण्याचा नुकताच निर्णय घेतला होता. रामाच्या बाजूने युद्धात उतरणाऱ्या हनुमानाचे एक नाव आहे बजरंग, म्हणून बजरंग दल. शक्तीचे प्रदर्शन नावातच असल्यामुळे या दलाचे सदस्य शारीरिक बळाचा वापर करणार हे आपोआप स्पष्ट होत होते.

‘बजरंग दल केवळ अयोध्येत बाबरी मशीदीच्या जागेवर राम मंदिर उभे करण्यासाठी कटिबद्ध असल्यामुळे १९८० पासून रा.स्व.संघाचे प्रचारक असलेले विनय कटियार यांना त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते,’ अयोध्येतील एक साधू, फैझाबादच्या विहिंपचे जिल्हा निमंत्रक असलेले युगल किशोर शरण शास्त्री सांगत होते. ही युवा संघटना स्थापन करण्याची जी मसलत चालली होती त्यात हे सहभागी होते. १९७७मध्ये अयोध्येत राहाणारा हा तरुण साधू रा.स्व.संघाबरोबर जोडला गेला आणि मग १९८१मध्ये त्यांचा प्रचारक झाला. दोन वर्षांनंतर त्याला विहिंपमध्ये हलवण्यात आले आणि फैझाबाद जिल्ह्याचा अध्यक्ष केले गेले.

‘बजरंग दलाच्या निर्मितीआधीच्या काही आठवड्यांत विहिंपने अलाहाबादच्या किडगंज येथे बैठक घेतली होती. या बैठकीला विहिंपचे गिरीराज किशोर, अशोक सिंघल, ठाकूर गुंजन सिंग आणि महेश नारायणसिंग यांच्याबरोबरच विहिंपचे आणि रा.स्व.संघाचे उत्तर प्रदेशचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मी विहिंपच्या फैझाबादच्या शिष्टमंडळाचा भाग होतो,’ शास्त्री सांगतात.

‘विनय कटियार यांचे नाव निश्चित करण्याआधी नव्या संघटनेच्या नावावरही चर्चा झाली. सिंघल म्हणाले, त्याला बजरंग सेना म्हणावे. विहिंपचे उत्तर प्रदेशचे संघटक सचिव असलेले महेश नारायण सिंग यांना ते पटले नाही. ‘सेना’ म्हटल्यास शासनाला रुचणार नाही, हे कुणीतरी खोडसाळ लोक आहेत असे वाटू शकेल- असे त्यांचे मत पडले. ते म्हणाले त्यापेक्षा बजरंग दल म्हणा. मग हे नाव सर्वांनीच मान्य केले.’

शास्त्री विहिंपमध्ये फार काळ टिकले नाहीत. १९८६मध्ये त्यांनी संघपरिवाराशी असलेले सर्व संबंध तोडले, कारण त्यांना वाटू लागले की विहिंप आणि बजरंग दलाला राममंदिराच्या उभारणीत रस उरलेला नाही. भाजपसाठी या प्रश्नाचा फायदा मिळवून देण्यातच केवळ त्यांना रस आहे असे त्यांचे मत झाले. त्यानंतर ते भारतभर भ्रमण करून भाषणे देत आहेत, जातीय सौहार्दाचे महत्त्व सांगणे आणि जातीय राजकारणावर हल्ला करणे हेच त्यांचे सूत्र आहे. ‘हे समजून चुकलेला मी एकटाच नव्हतो,’ ते म्हणतात, ‘अयोध्येचे अनेक साधू विहिंप आणि बजरंग दलासमवेत आले होते. आणि त्या सर्वांनाच हे दिसू लागले की राममंदिर बांधण्याचे काम रखडवले जात आहे, या साऱ्यामागील खरा हेतू त्यांनाही कळत गेला.’

यामुळेच, बजरंग दलाचा अध्यक्ष अयोध्येचा रहिवासी असूनही, आणि त्याची स्थापना राममंदिराच्या उभारणीसाठीच झाली असल्याचे सांगितले जाऊनही अयोध्येच्या स्थानिक साधूंनी सुरुवातीस त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही. डच मानववंशशास्त्रज्ञ पीटर व्हॅन डेर दीअर याने नोंद केली आहे की, त्या साधूंनी बिहारच्या सीतामढीहून गाजावाजा करत आलेल्या विहिंप आणि बजरंग दलाच्या राममंदिर मुक्ती यात्रेचे ज्या रीतीने स्वागत केले त्यावरून हे स्पष्ट होते.

बजरंग दलाने राम जन्मभूमीच्या प्रश्नावर हिंदू जागृती करण्यासाठी प्रथमच जी मोठी यात्रा काढली, तिचं नाव होतं राम-जानकी रथ यात्रा. ती यात्रा अयोध्येत ६ ऑक्टोबर १९८४ रोजी संध्याकाळी पोहोचली. दुसऱ्याच दिवशी या यात्रेच्या स्वागताची सभा आयोजित करण्यात आली होती, पण स्थानिक साधूसंप्रदाय मात्र अलिप्त राहिला. वॅन डेर दीअर लिहितात, ‘मी तरी पाहिलं की त्यातली भाषणं ऐकायला पाच-सात हजार लोक आले होते. ही संख्या काही पुरेशी समाधानकारक नव्हती. पण हिंदी वृत्तपत्रांनी तो आकडा फुगवून पन्नास हजार असा छापला. काही वृत्तपत्रांनी तर तो लाखापर्यंत नेला. हेच आकडे राष्ट्रीय पातळीवरच्या वृत्तपत्रांनी उचलले.’

एक दिवस अयोध्या मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी ही यात्रा लखनौकडे निघाली. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना त्यांना निवेदन द्यायचे होते. या यात्रेत अयोध्येतील काही साधू सहभागी झाले होते, आणि परतल्यावर त्यांनी सांगितले, की अयोध्येच्या मानाने इतरत्र त्यांना अधिक प्रतिसाद मिळाला, लखनौमध्ये तर खूपच मिळाला.

अयोध्येतला मिळमिळीत प्रतिसाद सोडल्यास, बजरंग दलाची लोकप्रियता उत्तर प्रदेश आणि इतर शेजारी राज्यांत भराभर वाढू लागली. १९८०च्या अखेरीस भाजप, विहिंप आणि रा.स्व.संघाच्या राजकारणाला गती येऊ लागली. भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेत या नव्या संघटनेची भूमिका फार महत्त्वाची ठरली. सप्टेंबर १९९०मध्ये गुजरातमधील सोमनाथ मंदिरापासून (ऑटो)रथात बसून ही यात्रा निघाली आणि पश्चिम, उत्तर भारतात दहा हजार किलोमीटर प्रवास करून ती अयोध्येला पोहोचणार होती. बजरंग दलाच्या स्वयंसेवकांनी आपल्या निष्ठेचे प्रतीक म्हणून त्यांना एका पेल्यात स्वतःचे रक्त सादर केले.  आणि मग ते सतत त्यांच्यासोबत फिरले. अनेकदा त्यांनी त्यांच्या कपाळावर रक्ताचा टिळा लावून त्यांचे स्वागत केले. हे कार्यकर्ते अर्थातच या यात्रेची सजावट करण्यासोबतच सांप्रदायिक द्वेषप्रचाराचे, दुहीचे काम पार पाडत होते.

रथयात्रा अयोध्येला पोहोचू शकली नाही. बिहारमधील जनता दलाच्या सरकारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या आदेशावरून लालकृष्ण अडवाणींना २३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. पण तोवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास एवढा वाढला होता की, ३० ऑक्टोबर रोजी त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी सशस्त्र पहारा असलेल्या बाबरी मशीदीवर हल्ला चढवला आणि तिच्या घुमटावर भगवा झेंडा फडकावला. हजारो कारसेवक आणि स्थानिक पोलीस यांच्यात झडलेल्या चकमकीत अनेक जण मृत्यूमुखी पडले.

१९९१मध्ये भाजपने उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन केले, तेव्हा बजरंग दलानेच अयोध्या प्रश्न पेटवायला, बारीकसारीक दंगे करायला सुरुवात केली. त्याच वेळी बाकीचे संघ परिवाराचे घटक- रा.स्व.संघ, भाजप आणि अगदी विहिंपसुद्धा या विषयावर जाहीर बोलणे टाळत होते. ही अर्थातच विचारपूर्वक आखलेली धोरणात्मक खेळी होती. उतरंडीतील अगदी खालची संघटना उड्या मारून विषय धगधगत ठेवत होती- ज्याचा उपयोग वेळ येताच करून घेता येणार होता. बाकीच्या महत्त्वाच्या संघटना मात्र भाजप सरकार अडचणीत येऊ नये म्हणून मौन राखत होत्या.

कारसेवेसाठी शहरी तरुणांना आकर्षित करण्याचे काम संघाच्या वतीने बजरंग दलाने १९९२मध्येही केले, १९९०प्रमाणेच. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद तोडण्याच्या घटनेत बजरंग दलाचे कार्यकर्ते आघाडीवर होते.

बाबरी विध्वंसाने देश हादरला, परंतु पी.व्ही नरसिंहराव यांचा या घटनेबाबतच दृष्टीकोन मात्र सारेच संदिग्ध ठेवणारा होता. चार दिवसांनंतर, १० डिसेंबर १९९२ रोजी, त्यांच्या सरकारने बजरंग दल, विहिंप आणि रा.स्व.संघावर बंदी घालणारा आदेश जारी केला. पण या संघटनांशी बोलणी करताना त्यांचा सूर मवाळ, पडते घेणारा असाच होता- आणि ताब्यात घेतलेल्या लोकांची संख्या अगदीच कमी होती. त्यांच्या कळीच्या शिलेदारांना आरामात लपण्याची संधी मिळाली होती. ४ जून १९९३ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. के. बाहरी यांच्या अध्यक्षतेखालील ट्रिब्यूनलने बजरंग दल आणि रा.स्व.संघावरील बंदी घालणारा आदेश रद्द ठरवला, पण विहिंपवरील बंदी ग्राह्य धरली.

अयोध्या आंदोलन आणि बाबरी मशिदीचा विध्वंस यामुळे हिंदुत्ववादी शक्तींमध्ये बजरंग दलाचे वजन वाढले होते. त्याची सदस्यसंख्या फुगू लागली आणि त्यांची ‘जो राम के काम ना आये, वो बेकार जवानी है...’ ही घोषणा समाजाच्या काही स्तरांत फारच आदराने घोकली जाऊ लागली. १६ डिसेंबर १९९२ रोजी रा.स्व.संघाशी संबंधित, भोपालमधील हिंदी दैनिक ‘स्वदेश’मध्ये धर्मेंद्रसिंग गुर्जर या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची मुलाखत छापण्यात आली. तो असलेल्या शंभर जणांच्या तुकडीला बाबरी मशीद पाडण्यासाठी कसे प्रशिक्षण मिळाले, हे त्यात त्याने तपशीलवार सांगितले. अशाच प्रकारची माहिती इतर वृत्तपत्रांतूनही प्रसिद्ध होऊ लागली.

या नंतर थोड्याच काळात, त्यांच्यावरची बंदी उठल्यावर, रा.स्व.संघाने बजरंग दलावर संरचनात्मक आणि विचारप्रणालीचेही संस्कार करायला सुरुवात केली. तोपर्यंत ही संघटना तशी ढिलीढाली होती. तिचे सदस्य त्यांच्या डोक्यावरच्या राम लिहिलेल्या भगवी पट्टीवरून ओळखता येत. आता बजरंग दल अखिल भारतीय शिस्तबद्ध संघटना व्हावी म्हणून प्रयत्न सुरू झाले. प्रथमच त्यांना गणवेष दिला गेला. निळ्या शॉर्ट्स, पांढरा शर्ट आणि भगवा स्कार्फ असा तो गणवेष होता.

दुसरं म्हणजे संघ प्रशिक्षित स्वयंसेवकांना या हिंसक वृत्तीच्या संघटनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमले गेले. आणि तिसरं म्हणजे, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसाठी फार मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण शिबिरे आयोजित होऊ लागली. एकट्या १९९३मध्ये ३५०हून अधिक शिबिरे आयोजित केली गेली.

यात भरीला कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण करणारांसाठी एक मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यात आली. तिच्या प्रस्तावनेत, ज्येष्ठ विहिंप नेते आचार्य गिरीराज किशोर यांनी ६ डिसेंबर १९९२च्या घटनेतील बजरंग दलाच्या कामगिरीची स्तुती केली- ‘त्या दिवशी युवाशक्ती नेत्यांचा शब्द न मानता, त्यांच्या अडवण्याला झिडकारून, आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी धडाडीने पुढे गेली- एक लज्जास्पद असा व्रण (बाबरी मशीद) मिटवण्याचे ते उद्दिष्ट होते.’  किशोर यांनी नंतर शिस्तीचे महत्त्वही सविस्तर सांगितले, ‘व्यक्ती असो वा देश, संपूर्ण समाज असो वा एकादी संघटना, शिस्तीने वर्तन करणारालाच यश मिळू शकते, ज्ञान आणि प्रावीण्य मिळू शकते. शिस्तीशिवाय यश नाही. आणि शिस्त ही प्रशिक्षणातून, सारवातून येते. शिस्तप्रिय माणूस शूर असेल तर मग आणखी काय हवं?’

बजरंग दलाचे कार्यकर्ते मात्र अजूनही शिस्तीबाबत फार काही सुधारणा घडल्याचे दर्शवत नाहीत. रा.स्व.संघाप्रमाणे त्यांच्याकडे नियमित अशा शाखा नाहीत. प्रशिक्षण शिबिरे अनेकदा आयोजित केली जातात, पण त्यातही फारशी नियमितता नाही आणि त्यांचा हेतू केवळ उतू जाणारी गुंडगिरी थोपवून धरण्याचा, तात्पुरता आर घालण्याचाच दिसतो. कोणताही ठोस विचारप्रणालीचा पाया नसल्यामुळे, शारीरिक मेहनतीलाही शिस्त नसल्यामुळे आणि रा.स्व.संघाप्रमाणे कार्यक्रमाचे वेळापत्रकही नसल्यामुळे बजरंग दल म्हणजे संघ परिवाराच्या आंदोलनांत वापरली जाणारी राखीव कुमक एवढेच त्यांचे स्वरूप राहिले आहे.

अर्थात तरीही या संघटनेच्या कार्यक्रमांचा विस्तार झाला आहेच. पण जे काही बदल झाले आहेत ते असूनही या संघटनेच्या शक्तीचे समीकरण केवळ जोरजबरदस्ती, धाकदपटशा, आक्रमक हल्लेखोरी, दंगेखोरी आणि दहशत याचबरोबर आहे. पॉल ब्रास म्हणतात तसे ‘यांचे काम मुख्य संघटनेची ढाल बनणाऱ्या टोळीचे आहे- कीव यावे असेच ते काम असले तरी तेही धोकादायकच आहे- स्टॉर्मट्रूपर्स किंवा ब्राउनशर्ट म्हणून ओळखली जाणारी नाझी एस ए ही जी संघटना होती, तिच्याच जातकुळीची ही संघटना आहे.

शिवाय, बजरंग दलाचे कार्यकर्ते अशिक्षित, अप्रशिक्षित असल्यामुळे काहीही बेशिस्त किंवा हिंसक कृती झाल्या तर रा.स्व.संघाच्या सोज्वळ, सुशिक्षित, जबाबदार कार्यकर्त्यांना थेट जबाबदारी नाकारणे सोपे जाते. या ‘हिंसक आणि बेशिस्त’ कारवायांशी आपला संबंध नसल्याचे सहज सांगता येते.

बजरंग दलात सहभागी होणाऱ्या लोकांबाबत हेतूपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचाही संघ परिवाराचा हेतू असावा. रा.स्व.संघ, विहिंप आणि बजरंग दलाच्या ज्या ज्या नेत्यांशी मी बोललो, त्या सर्व नेत्यांनी बजरंग दलामध्ये मागासवर्गीय जातींतील लोक असल्याचे सांगितले. ही गोष्ट सुरुवातीला खरी नसेलही. मात्र ख्रिस्तोफर जॅफ्रेलॉट यांनी १९९० च्या सुरुवातीला आणि मध्यावर जो अभ्यास हाती घेतला होता, त्यात त्यांना हे चित्र स्पष्टच दिसले होते. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या स्तरातील, पण वरच्या वा मधल्या जातींतील लोकांचा भरणा जास्त होता, आणि बाबरीवरील हल्ल्यामध्ये हेच लोक हिरीरीने सहभागी झाले होते.

जॅफ्रेलॉट यांनी मंडल आयोगाच्या शिफारसींवर जो विरोध व्यक्त झाला होता, त्या संदर्भात या घटनाक्रमाचे विश्लेषण करतात. घटनेतील मार्गदर्शक तत्वांनुसार मागासवर्गीयांना, ओबीसींना शासकीय नोकऱ्यांत अधिक आरक्षण द्यावे असा प्रस्ताव होता. ऑगस्ट-सप्टेंबर १९९०मध्ये विश्वनाथ प्रताप सिंग सरकारच्या मंडल आयोगाच्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या घोषणेनंतर अनेक वरच्या किंवा मधल्या जातींतील गरीब स्तरांतील तरुण या विरोधात रस्त्यावर आले. या आरक्षणामुळे आपल्याला नोकऱ्या मिळणे अशक्य होईल, असे त्यांच्या मनात पक्के झाले होते. जुन्या सामाजिक रचनेला धक्का बसेल असेही वाटत होते. ‘अनेक ठिकाणी असे दिसले की, हेच तरुण दोन्ही आंदोलनांत सहभागी होत होते- मंडलविरोधी आंदोलनाबरोबरच अयोध्या आंदोलनातही.’ भाजपचा जात्याधारित आरक्षणाला विरोध होता आणि १९९०च्या ऑगस्टमध्ये त्यांनी आर्थिक निकषांवर आरक्षण या मागणीसाठी पाठिंबा दर्शवला होता. असं म्हटलं जातं की, अडवाणींची रथयात्रा ओबीसींच्या आरक्षणाच्या मागणीतील हवा काढून घेण्यासाठीच निघाली होती.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4296

.............................................................................................................................................

मुग्धा कर्णिक यांची ‘अॅटलास श्रग्ड’, ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ इत्यादी अनुवादित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, धनंजय कर्णिक हे पत्रकार आहेत.

mugdhadkarnik@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......