अजूनकाही
६ डिसेंबर १९९२ या दिवशी मी कारसेवक म्हणून अयोध्येत होतो. मशीद पाडणाऱ्यांतही सहभागी झालो. पण नंतर भारतभर उसळलेल्या हिंदू –मुस्लीम दंगलींनी मला अस्वस्थ केलं. याच अस्वस्थतेतून वाचत, विचार करत पुढे कट्टर हिंदुत्ववादी ते एक मुक्त, धर्मातीत माणूस असा आंतरिक प्रवास केला. आतल्या अस्वस्थतेतूनच ‘एक होता कारसेवक’ हे छोटेखानी पुस्तकही लिहिलं. त्याच्या आजवर चार आवृत्त्या आल्या. माझं हे पुस्तक या पंचवीस वर्षांत खरं तर अप्रस्तुत ठरायला हवं होतं, पण तसे होताना दिसत नाही, याची एक नागरिक म्हणून काळजी वाटते.
……………………………………………………………………………………………
१९८९-९० चा तो काळ. मंडल आयोगानं देशभरातलं वातावरण ढवळून निघालं होतं. शहाबानो केस गाजत होती. अस्थिर सरकारांचं युग सुरू झालं होतं. देश राजकीय व आर्थिक संकटातून जात होता. आणि याच वेळी अयोध्या प्रश्नही तापायला सुरुवात झाली होती.
घरी संघाचं वातावरण होतं. वडील संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते. आई आणि काका १९९०च्या कारसेवेत सहभागी होऊन अटकेत राहून लाठ्या खाऊन आले होते. मुलायमसिंग सरकारनं कारसेवकांवर केलेल्या लाठीमाराचे व्हिडिओज देशभर गल्लोगल्ली दाखवून संघ परिवारानं त्याचं भांडवल करायला सुरुवात केली होती. मी त्या वेळी जेमतेम १९ वर्षांचा होतो. मराठवाड्यात परभणीत एका संघशाखेचा कार्यवाह होतो. संघ बैठकींना नियमित जात होतो. विश्व हिंदू परिषदेच्या विविध सभांना गर्दी गोळा करण्याची जबाबदारी माझ्यासारख्या अनेक संघ कार्यकर्त्यांवर होती. त्याच वेळी शाखेत एक खेळ नव्यानं सुरू करण्यात आला होता - एका गटाच्या हातात रूमाल बांधलेली काठी, ती त्यानं कसोशीनं वाचवायची नि दुसऱ्या गटानं त्यावर हल्ला करून ती काठी पळवायची. हा मंदिर-मशिदीचाच खेळ होता. आक्रमकपणाची व्यवस्थित पेरणी चालू होती. संघ कार्यर्त्यांचं जाळं पसरत होतं नि त्या प्रमाणात समाजातून हिंदुत्ववादी विचारांना पाठबळ मिळत असल्याचं मी पाहत होतो.
अयोध्या प्रश्नाचं भांडवल करून हिंदुत्ववादाचं संभाषित पेरलं जात होतं. तरारून उगवतही होतं.
"पाचशे वर्षांपूर्वी बाबर नामक मुस्लीम आक्रमकानं अयोध्येतील रामजन्मभूमी स्थान उद्ध्वस्त करून तिथं मशीद बांधली. हीच ती बाबरी मशीद. ही मशीद म्हणजे हिंदू अस्मितेवरील कलंक आहे. ती बघून तुमचं पित्त खवळत नाही काय? बाबराची औलाद आज समाजातही आहे नि सरकारातही. ती वेळीच ओळखली पाहिजे. ठेचली पाहिजे. हिंदू बहुसंख्य असूनही त्यांचा पदोपदी अपमान करणारं सरकार मुसलमानांचं मात्र लांगुलचालन करत आहे. मुसलमानांच्या एकगठ्ठा वोटबॅंकेवर त्यांचा डोळा आहे. त्यामुळे अयोध्या प्रश्न सरकारी चर्चांच्या गुऱ्हाळानं सुटणार नाही. रामजन्मभूमी हा श्रद्धेचा विषय आहे. अयोध्या ही रामाची जन्मभूमी आहे, ही कोट्यवधी हिंदूंची परमश्रद्धा आहे. जगातलं कुठलंही न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. हा आमच्या भावनांचा विषय आहे. हिंदूंच्या भावनांशी सरकार खेळत आहे. आम्ही जगात सर्वाधिक सहिष्णू आहोत. पण त्याचाच गैरफायदा घेत मुस्लिमांनी आमच्यावर सातत्यानं आक्रमण केलं. अन्याय केला. स्वातंत्र्यानंतरचं सरकारही मुस्लिमधार्जिणंच राहिलं आहे. हिंदूंवर अजूनही प्रत्येक बाबतीत अन्याय होतो आहे. हिंदूचेतना आता जागी झाली आहे. मागून मिळत नसेल तर संघर्ष करून आम्ही हिंदू न्याय मिळवूच. हे धर्मयुद्ध आहे. इथं आता हार नाही. विजय ही विजय है. अयोध्या तो झांकी है... काशी-मथुरा बाकी है... गर्व से कहो हम हिंदू है... कहो... जय श्रीराम...!"
आसमंत दणाणून टाकणारा उन्माद पद्धतशीरपणे पसरवला जात होता. कार्यकर्ते घरोघरी जाऊन, प्रत्यक्ष भेटून लोकांना हे पटवून देत होते. आक्रमकपणे ठसवत होते. या पार्श्वभूमीवर १९९२ च्या कारसेवेची घोषणा केली गेली. संघ परिवारानं आता दुप्पट जोमानं तयारी करून लाखो लोक अयोध्येत जमा केले - त्यात मीही एक होतो.
संघाच्या 'हिंदुत्ववाद म्हणजेच ‘राष्ट्रवाद' या विचारांचा पगडाच इतका होता की, माझं अयोध्येला जाणं जणू स्वाभाविकच होतं. माझ्यासारखे संघविचारांमध्ये घोळवलेले लोक होतेच. पण ज्यांचा संघाशी, संघविचारांशी थेट संबंध नाही, असेही कितीतरी लोक होते. किंबहुना तेच बहुसंख्य होते. त्यांच्या दृष्टीने हा श्रद्धेचा प्रश्न होता. धर्मयुद्ध होतं. त्यांत त्यांना खारीचा वाटा उचलायचा होता. तरुण पोरं होती. म्हातारेकोतारे होते. राज्याराज्यांतले, नानाविध जातीजमातींचे लोक होते. हिंदुत्ववादाच्या छत्राखाली तमाम हिंदू एकवटला आहे, असं बृहदचित्र उभं राहिलं होतं खरं, पण त्याला ठळकपणे मुस्लीमविद्वेषाची किनार होती. ध्रुवीकरणाचं नेपथ्य तयार झालं होतं.
एक डिसेंबरच्या मध्यरात्रीच एका भल्या मोठ्या गटासह मी अयोध्येला पोहोचलो. देशभरातून असे जत्थेच्या जत्थे अयोध्येत येऊन दाखल होत होते. वेगवेगळ्या घाटांवर तात्पुरत्या छावण्या उभारून त्यांची राहण्याची सोय केली गेली होती. अयोध्येत छोटी मोठी अशी कैक मंदिरं, घाट व कुंड आहेत. ते सारं पाहत शेवटी आम्ही बाबरी मशीदीच्या त्या वादग्रस्त वास्तूत शिरलो. खूप जुनी पण भव्य वास्तू. निव्वळ तीन घुमट. त्यातल्या एका घुमटात रामललाच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. टप्प्याटप्प्यानं कारसेवकांचे जत्थे आणून त्यांना रामललाचं दर्शन करवलं जात होतं. सगळं काही शिस्तीत चाललं होतं. तिथून फार तर एखाद-दीड किलोमीटर अंतरावर विश्व हिंदू परिषद व रामजन्मभूमी न्यास यांची कार्यालयं होती. तिथं देशभरातून कारसेवेसाठी आणलेल्या विटांचे ढीगच्या ढीग होते. जवळच खांबासाठीचे कोरीव दगड ठेवलेले होते. राममंदिरासाठीची ही पूर्वतयारी आहे, असं कारसेवकांना आवर्जून सांगितलं जात होतं. हजारोंच्या संख्येनं रस्त्यारस्त्यांतून फिरणारे हे कारसेवक परस्परांना ‘जय श्रीराम.. !’च्या घोषणांनी अभिवादन करत होते. वातावरणात मग अधिकच त्वेष चढत होता. तीन, चार, पाच डिसेंबर या तारखांना विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांचे अनेक नेते, तमाम साधू-संत अयोध्येत दाखल होऊ लागले होते. मशीद परिसरातच भव्य मैदानात स्टेज उभारलेलं होतं. तिथं कारसेवकांसाठी भजन कीर्तन, नेत्यांची ज्वलज्जहाल भाषणं होत होती. क्रमाक्रमानं ज्वर वाढत होता. फोफावत होता.
सहा डिसेंबर १९९२. सकाळी आठ वाजल्यापासूनच लाखो कारसेवक त्या मैदानात जमले होते. डाव्या बाजूला मशीदीच्या दिशेनं रोख असलेले भलं मोठं स्टेज. तिथं भजन संकीर्तन सुरू झालं होतं. उजव्या बाजूला मशिदीचे तीनही घुमट ठळकपणे दिसत होते. मधला सगळा परिसर लाखो कारसेवकांनी फुलून गेला होता. मग दहाच्या सुमारास विविध नेते मंचावर यायला सुरुवात झाली. त्यात लालकृष्ण अडवाणी, अशोक सिंघल, उमा भारती, प्रमोद महाजन, विनय कटियार, मुरली मनोहर जोशी, साध्वी ऋतुंभरा, आचार्य धर्मेंद्रजी, आचार्य गिरीराज किशोर... आणि कैक. मंचावरून त्यांची ज्वलंत भाषणं सुरू झाली. त्या सर्वांचा साधारण आशय असा - "बाबरी मशीद हा आपल्या हिंदू अस्मितेवरील एक कलंक आहे... परिंदा भीं पर मार नहीं सकता- असे म्हणणाऱ्या मुल्ला मुलायमला धडा शिकवायलाच हवा... हिंदू आता गप्प बसणार नाहीत... रामजन्मभूमी लेकर ही रहेंगे..." ही भाषणं चालू असतानाच मधून मधून घोषणा दिल्या जात होत्या. "तेल लगाओ डाबर का, नाम मिटाओ बाबर का... अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है... गर्व से कहो, हम हिंदू है.. जय श्रीराम...!" या प्रकारच्या घोषणा देण्यात सर्वाधिक पुढे होते आचार्य धर्मेंद्रजी, विनय कटियार, उमा भारती... आणि सर्वाधिक चिथावणीखोर भाषणंही त्यांचीच होती. लाखोंच्या संख्येनं जमलेले कारसेवक आणि परिसर दुमदुमवून टाकणाऱ्या त्यांच्या घोषणा...
दुपारी पावणेबाराच्या आसपास काहीतरी गदारोळ सुरू झाला. स्टेजवरची भाषणं जराशी गडबडली. नक्की काय झालं, सुरुवातीला काहीच कळेना. मग कुणीतरी ओरडलं, मशिदीवर कारसेवक चढले आहेत आणि घुमटावर भगवा झेंडा फडकवत आहेत... संपूर्ण वातावरणात उन्मादाची एकच लाट उसळली. मग कारसेवकांतूनच वरीलप्रमाणे घोषणांच्या लाटांवर लाटा उसळत राहिल्या. "कृपया, शांती बनायें रखे..." असं व्यासपीठावरून नाममात्र आवाहन एक-दोनदा केलं गेलं. अर्थातच, ते जुमानण्याच्या मन:स्थितीत आता कुणी नव्हतं. मंचावरचे काही नेते आता निघून गेले होते. हा गोंधळ, उन्माद सलग दहा-पंधरा मिनिटं तरी टिकला. उत्स्फूर्त घोषणाबाजी चालूच होती. तोवर लक्षात आलं, आता चार-दोनच नाही, तर अनेक कारसेवक कुंपण भेदून, झाडांवर चढून मशिद परिसरात शिरले होते. त्यांच्या हातातला भगवा झेंडा दुरूनही ठळकपणे जिसत होता. आता तर मंचावरूनही घोषणा सुरू झाल्या, "एक धक्का और दो, बाबरी मसजिद तोड दो.., "कृपया, शांती बनायें रखे..."चं कोरडं आवाहन करून अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी मंचावरून निघून गेले. आणि मंचाचा ताबा विनय कटियार, आचार्य धर्मेंद्रजी व उमा भारती आदींनी घेतला. या घोषणाबाजीनंतर जो तो उन्मादानं भारून त्या प्रचंड गर्दीतही मशिदीच्या दिशेनं सरकू लागला. तिथपर्यंत जाण्यासाठी धडपडू लागला. थोड्या वेळानं मंचावरचे आवाजही विरले. मंच ओस पडला. आणि कारसेवकांचे जत्थे पुढे पुढे सरकत राहिले.
या गर्दीतून मार्ग काढत मी व माझ्या तुकडीतले लोक दोन वाजण्याच्या सुमारास मशिदीच्या कुंपणाशी पोहोचलो. त्यावेळेस "कृपया, यहां भीड न करे... शांतीसे काम करने दे..." असं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते कुंपणाशी कारसेवकांना ओरडून सांगत होते. सर्वांनाच आत जाऊ देत नव्हते. मी तिथं बराच वेळ रेंगाळलो. दुपारी साडेतीन–चारच्या सुमारास कुंपणाशी परत गेलो. खरं तर, कुंपण असं काही आता शिल्लक राहिलंच नव्हतं. आता मात्र माझ्या तुकडीला आत प्रवेश मिळाला. आत जाईतो, तिथं काय चालू आहे, याचा सपशेल अंदाज येत नव्हता. आत मात्र व्यवस्थित, शिस्तबद्ध रीतीनं काम चालू होतं. कुदळ-फावडे घेऊन एक जत्था मशिदीच्या भिंतींवर घाव घालत होता. दुसरा गट घमेल्यांतून तो मलबा दूर करण्याचं काम करत होता. रांगेत उभं राहून "जय श्रीराम...!"च्या घोषणाबाजीत घमेली पुढे सरकवली जात होती. एखाद्या भव्य इमारतीचं बांधकाम ज्या शिस्तीत व समन्वयानं चालतं, त्याच शिस्तीत हेही सारं चालू होतं. तसा समन्वय राखण्याचं काम बजरंग दलाचे कार्यकर्ते करत होते. फरक इतकाच होता, इथं बांधकाम पाडले जात होते. रात्रीपर्यंत मशीद भुईसपाट झाली.
दरम्यान उत्तर प्रदेशचं कल्याणसिंग सरकार बरखास्त करण्यात आलं होतं. अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती. अयोध्येत अर्थातच या संचारबंदीला अर्थ नव्हता. मध्यरात्री अडीच वाजताच उठवून कारसेवकांना पुन्हा मशीद स्थानाकडे नेण्यात आलं. तिथं आता रामजन्मभूमीचे पुरावेच आढळले आहेत, असं सांगितले गेलं. सकाळपासून पुन्हा जत्थ्याजत्थ्यानं या कुंपण परिसरातला मलबा खणून घमेल्यांनी माती दूर करण्याचं काम अर्थात कारसेवा चालूच राहिली. तोवर हळूहळू सैन्यदलाच्या तुकड्यांनी अयोध्येचा ताबा घ्यायला सुरुवात केली आणि कारसेवकांना तिथून पिटाळून लावलं. विशेष रेल्वेगाड्यांनी कारसेवकांना अयोध्येतून बाहेर काढलं जाऊ लागलं.
जे घडलं ते अविश्वसनीय होतं. या उन्मादी आनंदातच मीही गावी परतलो. पण तोवर बाहेरच्या बातम्या येऊ लागल्या. देशभर तणावाचं वातावरण होतं. अनेक ठिकाणी संचारबंदी होती. स्टेशनांवर शुकशुकाट होता. दंगली उसळल्याच्या बातम्या येत होत्या. त्या सगळ्यानं क्रमश: पण अस्वस्थ होत गेलो. आणि कारसेवेचा सगळाच माज खाडकन उतरला. माझ्या कारसेवक असण्याच्या उन्मादाची माझी मलाच चीड आली. हिंदू असण्याच्या गर्व पोकळ वाटू लागला. मी एक मोठाच सामाजिक गुन्हा केलाय, या जाणिवेनं मला ग्रासलं. आणि मग मी कारसेवक अथवा हिंदू राहिलो नाही. विचारांनी आणि विचारान्ती बदलत गेलो.
बाबरी मशीद पाडली जाणं, हे केवळ एक वास्तूचं उद्ध्वस्त होणं नव्हतं. मुस्लीम धर्मावर केलेला तो प्रतीकात्मक हल्ला तर होताच, पण भारतीय धर्मनिरपेक्षतेवरचाही तो हल्ला होता. हिंदूंनी स्वत:च्याच सहिष्णूतेला उद्ध्वस्त केलं होतं. हिंदू विरुद्ध मुस्लीम, मंदिर विरुद्ध मशीद, एवढ्याच मर्यादित परिघातला हा प्रश्न नाहीच. त्याचा आवाका त्याहून खूपच मोठा आहे. या प्रश्नाला ठळकपणेच चार पक्ष आहेत : रामजन्मभूमीचा मुद्दा हिंदू अस्मितेच्या केंद्रस्थानी आणून धर्माचं राजकारण करणारे कट्टर हिंदुत्ववादी हा त्याचा पहिला पक्ष. बाबरी मशीद ही जणू आपल्या अस्तिवाचीच लढाई असल्याचं भासवून अडाणी-निरक्षर-गरीब मुस्लिमांना मूळ प्रश्नांपासून विचलित करणारे मुस्लीम कट्टरपंथीय हा त्याचा दुसरा पक्ष. हिंदूंनांही गोंजारायचं आणि मुस्लिमांचंही लांगुलचालन करत त्यांना वोटबॅंक म्हणून वापरणारे नि धर्मनिरपेक्षतेकडे केवळ एक राजकीय सोय म्हणून बघणारं सरकार हा त्याचा तिसरा पक्ष. आणि चौथा पक्ष म्हणजे खुद्द तत्कालीन परिस्थितीत गोंधळलेला भारतीय समाज.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4296
.............................................................................................................................................
मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर समाजाचं जातीय व राजकीय ध्रुवीकरण वेगानं झालं होतं. आर्थिक प्रश्न देशाला भेडसावत होते. मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांना जनतेनं नाकारल्यानं प्रादेशिक पक्षांच्या आशा-आकांक्षांना धुमारे फुटत होते. वैचारिक सामजिक चळवळी क्षीण झाल्या होत्या. विचारबळांच्या अभावी असणारा सैरभैरपणा समाजात सार्वत्रिक होता. असा हा गोंधळलेला, भग्न, शतखंडीत, तणावग्रस्त समाज- हा या प्रश्नाचा चौथा पक्ष. याच परिस्थितीतून रामजन्मभूमी बाबरी मशीद अशा नॉन इश्यूला बळ मिळालं होतं. महत्त्वाचे, तातडीचे प्रश्न मागे पडले होते.
आज बाबरी मशीद पाडली गेली, या घटनेला तब्बल पंचवीस वर्षं पूर्ण झाली. दरम्यान जागतिकीकरण व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकीय चित्र पार बदललं आहे. स्वत:ला अभिमानानं हिंदुत्ववादी म्हणवणारी संकुचित आचार-विचारांची सरकारं राज्याराज्यांत व केंद्रात विराजमान आहेत. गुजरात दंगल घडवणारेच आता पंतप्रधान होऊन बसले आहेत. लव्ह-जिहाद, गो-वंशरक्षण, असे कृतक मुद्दे उपस्थित करत तणाव पेरला जात आहेच. ‘मंदिर वही बनायेंगे’च्या घोषणा नव्यानं दिल्या जाताहेत. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित असला तरी त्याचं राजकीयीकरण सर्वच पक्षांकडून केलं जात आहे. निवडणुका जवळ आल्या की, पुन्हा एकदा या मुद्यावर वातावरण तापवलं जाईल.
"साधो, देखो जग बौराना!
सांची कहौ तो मारन धावे, झुठे जग पतियाना..
हिंदू कहत है राम हमारा, मुसलमान रहिमाना..
आपस मे दोऊ लडे मरत है, मरम कोई नही जाना..."
शेकडो वर्षांपूर्वी, कबीरानं लिहून ठेवलेलं पुन्हापुन्हा प्रस्तुत ठरावं, ही भारतीय समाजकारणाची शोकांतिकाच आहे.
……………………………………………………………………………………………
लेखक अभिजित देशपांडे प्रभात चित्र मंडळाच्या ‘वास्तव रूपवाणी’ या त्रैमासिकाचे संपादक आहेत.
abhimedh@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment