अजूनकाही
आज बालदिन. लहानग्यांचा दिवस! १४ नोव्हेंबरला भारतात तर २० नोव्हेंबरला युरोपात साजरा केला जातो. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या तारखा असल्याने जागतिक बालदिन एकाच दिवशी यावा, असं व्हॅलेंटाईन किंवा मैत्री दिनाचं भाग्य त्याला नाही. तरीही मुलांसाठी एक दिवस मात्र साजरा करतात...
म्हणजे बाकीचे ३६३ दिवस कोणाचे असतात? तरुण दिन, प्रौढ दिन, म्हातारा दिन का नसतो? की सर्व दिवस यांचेच आणि एक दिवसापुरता विचारबिचार करायला बालदिन असतो?
जगभरात सुदैवाने बहुतेकदा बालदिनी सुट्टीत येत असल्याने मुलं आनंदात असतात. शाळेच्या दिवशी बालदिन असता तर आपल्या शिक्षकांनी मुलांनाच बालदिनावर निबंध किंवा भाषण करायला सांगितलं असतं. केवळ १४ नोव्हेंबरलाच नाही तर बाकीच्या दिवशीही मुलं आनंदात असू शकली असती, पण मोठ्यांच्या जगात ते कधीच घडत नाही आणि घडणारही नाही. कारण आपला देश तरुणांचा आहे, प्रौढांचा आहे, म्हाताऱ्यांचा आहे. तुम्हीच पहा. आपल्या साऱ्या व्यवस्था मोठ्यांसाठी असतात.
सुरुवात आपल्याच घरापासून करू. आपल्या घरातील बेड, चादरी, किचन ओटा, वॉटर प्युरिफायर, डायनिंग टेबल, खुर्ची, चमचे, ग्लास, कमोड, फ्रिज, स्विच बोर्ड, कम्प्युटर, लॅपटॉप, कपाट इत्यादी प्रौढांच्या उंचीनुसार डिझाईन होते.
हाच प्रकार मुलांसाठी असणाऱ्या शाळांमध्येही पाहायला मिळतो. घरातून बाहेर निघाल्यावर गरजेच्या असणाऱ्या गाड्या, वाहनं, रेल्वे इत्यादी वाहतुकीची साधनं आणि तिकीट खिडक्या, गाडीच्या खिडक्या व सीट्सदेखील मोठ्यांसाठी डिझाईन केलेली असतात. आजही गावी घोडा सायकलच्या मधल्या त्रिकोणी भागात पायाची कैची करत लहान मुलं सायकल पळवताना पाहिली पाहायला मिळतात. थोड्याच वर्षांत मोठा होईल, मग छोटी सायकल पडून राहील, असा प्रॅक्टिकल विचार त्यामागे असतो.
घरातून, शाळेतून बाहेर मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊ. मॉलमध्ये फक्त मोठ्यांसाठीच दुकानं भरलेली असतात. मुलांसाठी फक्त फूडकोर्ट!
खेळाची मैदानं कमी, पण आजी-आजोबा बगीचे जास्त!
आपल्या मुलांनी वाचलं पाहिजे म्हणणारे पालक त्यांना मुलांसाठी असणारं एखादं वर्तमानपत्र सुचवू शकतील का? आठवड्यातील एखाद दिवशी एखाद पानभर मजकूर मुलांसाठी असतो. दूरदर्शन वाहिनीवर एकही कार्टूनमालिका असू नये? किंवा मुलांसाठी मजेशीर कार्यक्रम असू नये? कार्टूनचंही तसंच! बाहेरची कार्टून बघत आपण मोठे होतो. आणि मोठ्यांचे सिनेमे मुलं आपला मानून बघतात. आणि तसेही सिनेमे कमी असल्याने त्या बघण्याला महत्त्व मिळत नाही. पालक आपल्या मुलांना आवडीने सिनेमाला नेतात आणि कमी वयात त्यांची निरागसता कमी करतात. ‘शाळा’, ‘बालक पालक’, ‘फँड्री’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘सैराट’ हे मराठी सिनेमा मोठ्यांचे आहेत. त्यांत लहान मुलांचं चित्रण असलं तरी त्यांचा विषय व आशय मोठ्यांचाच आहे. ते आपल्याला तटस्थ बघताना आनंद देतात. ‘मिस्टर इंडिया’, ‘मकडी’, ‘जम्बो’, ‘चिंटू’ इत्यादी हे मुलांचे सिनेमे आहेत. पण अशी उदाहरणं हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच! त्याउलट हॉलिवूडपटात खूप अनिमेशनपट लहान मुलांसाठीच बनवले जातात. ‘होम अलोन’सारखे सिनेमा त्यांनाच सुचू शकतो.
पायदान आणि फलाटातील अंतर वाढल्यावर जो त्रास उंच व्यक्तीला होतो, तसाच त्रास लहान मुलांना प्रत्येक वेळी होत असतो. पण मुकी बिचारी सांगणार कोणाला! अपवादाला शहरातील काही मॉलमध्ये परदेशी कंपनीच्या 'केवळ मुलांसाठीच' तयार होणाऱ्या वस्तू, खेळणी, मिळतात, तर परदेशी पुस्तक विक्रेते मुलांसाठीचा म्हणून एक खण राखीव ठेवतात.
मुलांच्या गोष्टीतील अवकाश शहराचा असतो किंवा शहरी मुलांना नजरेसमोर ठेवून केलेला असतो. गोष्टीच काय पण त्यांचे लेखक, वक्तेदेखील शहरी मुलांसाठी बोलतात. शहरी मुलांच्या समस्येवर बोलतात. मुलांची गाणी, कार्टून, सिनेमातलं वातावरण मुंबई-पुण्याच्या शहरी मुलांसाठीच असते. त्यांची खेळणी बनवताना गावातील वातावरणाचा विचार नसतो. अपवादाला काही शिक्षण संस्था, तज्ज्ञ व्यक्ती गावातील मुलांच्या परिसराची जाणीव ठेवून मत मांडतात.
जास्त संख्येनं असणाऱ्या मुलांचा विचार सोडून केवळ शहरातील मुलांचा विचार करत निर्मितीमागचं साधं कारण म्हणजे त्यांच्याकडे ते विकत घेण्याची क्षमता आहे. जाहिरातीच्या माऱ्याला भुलून जाणाऱ्यांत प्रामुख्याने आधी श्रीमंत, चिकित्सक पालक, शाळा येतात आणि मग त्यांचं अनुकरण करत मध्यम-गरीब शाळा व पालक ग्राहकाच्या भूमिकेत जातात. आणि चांगलेच गिऱ्हाईक बनतात. एकुणात केवळ पैसे मिळतात म्हणून मुलांचा विचार होतो.
पण या मुलांचा सिरिअसली विचार करण्याची गरज का असावी? त्यांच्या स्वातंत्र्याला, मताला इतकी किंमत का द्यावी? जे इतक्या पिढ्या होत आलाय आणि चाललंय ते बरं चाललंय! कायदेशीर सज्ञान नसलेल्या मुलांना कशाला हवंय स्वातंत्र्य? या उत्तरासाठी आपल्याला त्यांच्यावर लादलेल्या जीवनशैलीकडे पाहावं लागेल. आणि इथं शहर, निमशहरी - गाव - खेडीपाडी असा विचार करावा लागेल.
प्रथम शहरातील दिनचर्या पाहू. शाळेच्या वेळा आणि ठिकाण हे राहत्या घरापासून दूर असतं. कारण पालकांना अमुक एका शाळेची आस असते. त्यासाठी मूल फार लवकर उठतं आणि प्रवास करतं. उशिरा शाळा असेल तर झोपेतून उठल्यावर आई-वडील कामाला गेलेले असतात. मग मूल स्वतःची तयारी आवरत क्लास किंवा शाळेला पळतं किंवा शाळा सुटल्यावर क्लास करून घरी येतं. या ठिकाणी त्याला फक्त मधल्या सुटीत किंवा ऑफ तासाला त्याच्या मनाप्रमाणे वागता येतं. या दोन्ही वेळा शहराl व्यस्त रहदारीच्या असतात. अशा वेळी दोन ठिकाणच्या वह्या-पुस्तकं असलेलं दप्तराचं ओझं, दोन-तीन डबे, पाण्याच्या बाटल्या, वागवत त्याचा दिवस जातो. थकून घरी आल्यावर पालक त्याला होमवर्क किंवा अधिक अभ्यासाचं सुचवतात...आणि हातातील स्मार्ट फोन काढून घेतात. मुलगी असेल तर आईला थोडीफार मदत करते. म्हणून निबंधात, कवितेत, भाषणात कितीही शाळेचं कौतुक होत असलं तरी 'शाळेला उद्या सुट्टी'सारखी नोटीस आल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो.
या शहरी मुलांकडे वेळ नसतो. कौशल्य विकसित करायचा वेळ क्लास- अति गृहपाठात जातो. अवांतर वाचनाचा, कार्टून पाहण्याचा वेळ इंग्रजी माध्यमातून आलेली माहिती पाठ करण्यात जातो. त्यामुळे जी काही चमक दाखवायची ती शाळेच्या विषयात किंवा खेळाच्या तासाला! किंवा हक्काच्या शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी एखादा अभ्यासेतर कार्यशाळा करत असाल तर! अशा शारीरिकरीत्या थकलेल्या व मानसिकरीत्या व्यस्त असलेल्या मुलांची सारी शक्ती विरून जाते. अपवाद वगळता नवा- वेगळा विचार थंडावतो. सर्व गोष्टी वरवर पहिल्या जातात. पेशन्स संपलेला असतो. इतर समाज उपयोगी कामं करण्याचं आपसूक घडत नाही. झटपट चमको वृत्ती वाढीस लागते.
आणि आजच्यासारख्या समाज तयार होतो!
अशी जीवनशैली सध्या समाजाची मानसिक स्थिती काय आहे? तिचे प्रश्न काय आहेत? फेसबुकवरच्या कुठल्या मुद्द्यावर पिसाळते? कुठल्या कामात अनुत्साह दाखवते? काम करवून घेताना कुठले मार्ग अवलंबले जातात? हे उत्तर समाधानकारक आले तर ठीक, पण असमाधानकारक उत्तर असेल तर त्याची जबाबदारी त्या वेळच्या पालकांनी, शिक्षकांनी, शाळांनी घेतली पाहिजे!
आता ग्रामीण भागात जाऊयात.
इथंही घरापासून सुरुवात करूयात. इथे मुलं उठतं लवकर, पण कुठल्याही घाईनं नाही.
पाणी वगैरे भरण्याची घरातील कामं करून, नाश्ता- जेवणाला मदत करून ते स्वतः आवरतं! यावेळी घरात कोणी ना कोणी असतंच. मग जवळच्याच प्राथमिक शाळेत चालत-सायकलवर जातं. तिथं ठरवून दिलेली शाळेची कामं होतात. म्हणजे शाळेच्या मडक्यात पाणी भरणं, झाडू मारणं, सडा-सारवण, मध्यान्ह भोजनासाठी असणाऱ्या मावशींना मदत करणं, मग शाळा सुरू होते. महत्त्वाचं शिकवून झाल्यावर मुलांना फार जुंपलं जात नाही. गृहपाठ फार नसतो. मुलं घरी लवकर पोहचतात. क्लास नसल्याने खूप वेळ मिळतो. तो शेती, गुरं, स्वयंपाक, खेळ, क्वचित टीव्हीवरील सिनेमा, वाचन साहित्य मर्यादित असल्याने मिळेल ते वाचणं (स्मार्ट फोन नाहीच), या गोष्टींत जातो. त्यामुळे मुलांचा कौशल्य विकास, एकत्रित काम करण्याची वृत्ती, संदेश देवाणघेवाण, एका गोष्टीचा विचार, परिसराचा उपयोग, निरीक्षण क्षमता या बाबी वाढीस लागतात. आणि म्हणून कल्पक किंवा नवा विचार येण्याचे चान्सेस जास्त असतात. परंतु हायस्कुल मात्र पुन्हा शहरी शाळांसारख्या असल्याने वैयक्तिक उत्कर्षाला कमी महत्त्व मिळतं.
(सरकारी पातळीवर मुलांबद्दल अनास्था असते. शैक्षणिक धोरण उभ्या उभ्या ठरवलं जातं. त्यात पुन्हा कलात्मक, क्रीडात्मक कौशल्याला शून्य महत्त्व असतं. त्यामुळे शाळादेखील कमी महत्त्व देते, मग पालक दुर्लक्ष करतात की, मुलांना इच्छा असूनही यात सहभागी होता येत नाही. चिल्ड्रन फिल्म फेस्टिवल, नाट्य शिबिर, साप्ताहिक, मासिकं, वर्तमानपत्रं, प्रकाशन संस्था असतात, पण हाताच्या बोटावर मोजण्याइतकी. ना त्यांना लोकाश्रय, ना सरकारी मदत, ना सामाजिक पाठिंबा! केवळ श्रीमंत आणि जाणकार पालक त्यात दिसून येतो. सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचणारे उपक्रम राबवले जात नाहीत आणि केले तरी योग्य राबवणारे भेटत नाहीत. याचं नुकतंच घडलेलं एक उदाहरण पाहू.
‘म्युझियम ऑन व्हील्स’ हा उपक्रम प्रामुख्याने मुंबईबाहेरील - ज्यांना म्युझियमपर्यंत जाता येत नाही- शाळांसाठी तयार केला होता. पण ती बस पश्चिम मुंबईच्या आलिशान मॉलमध्ये प्रदर्शन मांडते. यामागे काय स्पष्टीकरण आहे ते त्यांनाच ठाऊक! या उलट मुंबईतील चिल्ड्रेन टॉय फाउंडेशनचे नितीन चारी इथली जुनी खेळणी स्वखर्चाने खेड्यातील मुलांपर्यंत मोफत पोहचवतात.)
या दोन्ही भिन्न जीवनशैलीतील मुलांचा 'समान' विचार करण्याची गरज आहे. कारण केवळ ते उद्याचे उज्ज्वल वगैरे भविष्य आहेत म्हणून नाही! तर सध्याच ती तुमच्यापेक्षा स्मार्ट आहेत. आपला देश सध्या तरुणांचा देश असला तरी येत्या काही वर्षांत बालकांची संख्या वाढणार आहे. आणि सद्यस्थितीलाच त्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता व शक्ती आहे. ही शक्ती शारीरिक तर आहेच, पण त्याचबरोबर ती नव विचारांची, संघटनेची, मानसिक आणि बौद्धिकही आहे. जी आजच्या तुम्हाआम्हा तरुण-प्रौढ-म्हाताऱ्यांपेक्षा कमालीची जास्त आहे.
हीच शक्ती आपले सध्याचं व पुढचं जीवन सहज करू शकते. जुन्या प्रश्नांची नवी उत्तरं देऊ शकते. हा विचार करूनच बहुदा आपल्या पंतप्रधानांनी शालेय मुलांना सिरिअसली घेत त्यांना ‘मन कि बात' ऐकवलं. त्यांच्याशी गप्पा मारल्या. यासाठीच एपीजे अब्दुल कलाम मुलांना पत्रं लिहिण्याला वेळ देत. आइन्स्टाइनसुद्धा सहा ते सात वर्षीय मुलाच्या वैचारिक स्पष्टतेचा-सरलतेचा दाखला देत. हे पटत नसेल तर, आपल्या सोसायटीतल्या मुलांना व मोठ्यांना वेगवेगळं बोलावून टेरेस शेतीसारखा उपक्रम मांडा आणि गंमत पहा, तुमच्या प्रश्नाला सिरिअसली कोण घेतं? तुमच्या उपक्रमाला फाटे कोण फोडतं? तुमचा उपक्रम पुढील आठवडात डोक्यात कोण ठेवतं? शाळेशी संबंधधित असणाऱ्यांनी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांचे दोन गट करावेत.....यात कोण अधिक थांबतय यातून उत्तर मिळेल.
आपल्याला याची चुणूक दिसते ती लहान मुलांच्या स्पर्धा शोमध्ये, मालिका - सिनेमात काम करणाऱ्या, खेळांत चमकणाऱ्या मुलांना पाहिल्यावर! पण आपल्या घरातील मुलांची शक्तिस्थानं आपल्याला माहीत नसतात. उलट आहेत ती न्यूनगंडाने नेस्तनाबूत करण्यात मराठी मध्यमवर्ग आघाडीवर आहे. सोबतीला साने गुरुजी छापाचे संस्कार आहेतच.
या बालशक्तीला ओळखण्यात भारतीय पालक, समाज कमी पडतोय का? बाळगणेश, बाळकृष्ण इत्यादी कथांतून दाखवलेली शक्ती यांना दिसत नाही का?
मूल म्हणजे नको तिथं रागवायचं, नको तिथं लाडवायचं, उगाच खुशालीत ठेवायची बाहुली नाही.
मूल म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे घडणारे मातीचे गोळे नाहीत.
नाळ तुटल्यापासून ते जिवंत आणि स्वतंत्र असतं!
लेखक चित्रकार आहेत.
chitrapatang@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment