अजूनकाही
१. आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आपल्यासोबत कधीही कॅश बाळगत नाहीत. तसंच त्यांनी आयुष्यात कधी कार्डचा देखील वापर केलेला नाही. स्वत: मुकेश अंबानी यांनीच एका कार्यक्रमात हे सांगितलं की, आपण बालपणापासून ते आतापर्यंत कधीही कॅश किंवा कार्ड सोबत ठेवलेलं नाही. कारण म्हणजे आपल्याला कधीही क्रेडिट कार्ड किंवा पैशांची गरजच भासली नाही. माझ्यावर कुठे खर्च करण्याची वेळ आली, तेव्हा माझ्यासोबत कुणी ना कुणी असायचंच. माझ्यासाठी तेच पेमेंट करत असत. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी हे महिन्याभरापूर्वी आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ‘फोर्ब्स’द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या रियल टाइम बिलिनियर्सच्या यादीत ४२.१ अरब डॉलर्स इतक्या संपतीसह अंबानी यांनी चीनच्या हुइ का यान यांना मागे सारत हे स्थान मिळवलं आहे.
अंबानी यांच्यासाठी वेळोवेळी खर्च करणाऱ्या मंडळींचा पगार किती आहे, हे त्यांना कुणी विचारलेलं दिसत नाही. हे अपरिग्रहाचं व्रत करणाऱ्या मंडळींसारखंच झालं. तेही खिशातून एकही पैसा खर्च करत नाहीत. तो खर्च करण्यासाठी सोबत पगारी नोकर नेमलेले असतात. अंबानींकडेही त्यांच्या ऐपतीमुळे असं चालतं-बोलतं पाकीट आहे, एवढाच याचा अर्थ.
.............................................................................................................................................
२. आजचे कलाकार पैशांसाठी काहीही करायला तयार असतात. सध्या बॉलिवुडचं भाजी मार्केट झालं आहे, अशी टीका अभिनेते धर्मेंद्र यांनी केली आहे. भाजी मार्केटमध्ये जशी भाज्यांची खरेदी-विक्री होते, त्याचप्रमाणे आजचे कलाकार पैशांसाठी कुठेही नाचतात, कुठेही गातात. भाज्यांप्रमाणे ते अगदी स्वत:ला विकायलाही तयार होतात,’ असं ते म्हणाले. आमच्या वेळी मात्र परिस्थिती अशी नव्हती. आमच्या काळी कलाकार पैशासाठी नव्हे, तर आवड म्हणून काम करत. आता चित्रपटसृष्टीत दिखाऊपणाच जास्त चालतो,’ असं ते म्हणाले.
मान्यवर धर्मेंद्र हे आजच्या काळातल्या परिस्थितीबद्दल जे काही बोलतात, ते खरं असेलही; पण, त्यांच्या काळात ते फक्त आवड म्हणूनच काम करत होते, ही अतिशयोक्ती झाली. ‘पर डे’ नावाची, दिवसाला लाखभर रुपयांहून अधिक मेहनताना घेऊन करायची रोजंदारी मुख्य नायकांमध्ये रुजू करणाऱ्यांत त्यांचा समावेश होतो. कोणत्याही सिनेमात असलो तरी ठरीव क्रुद्ध चेहरा करून ‘कुत्ते, कमीने, मैं तेरा खून पी जाऊँगा’ हा एकच डायलॉग आपण डोळे वटारून ओरडत होतो, ते कलेची सेवा म्हणून, असं ते सांगतायत का?
.............................................................................................................................................
३. विदर्भातील शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी होऊन सरकारविरोधात निषेध आंदोलन करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना पोलिसांनी अकोला इथं अटक केली. या प्रकरणी सिन्हा यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला आहे. दरम्यान, मंगळवारी संध्याकाळपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास खासदार वरुण गांधी, भाजपचे जेष्ठ नेते अरुण शौरी, खासदार शत्रुघ्न सिन्हा हेदेखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. मुख्य मागणीशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचंही खासदार नाना पटोले यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री या आंदोलकांशी बोलायला तयार झाले असते, तर तीच खरं तर बातमी होऊ शकली असती, ते बोलणार नाहीत, हे उघडच आहे. मात्र, ही भाजपच्या असंतुष्टांची मांदियाळी एकदम एकत्र एकाच आंदोलनात उतरली आहे, ती समारंभपूर्वक युवराजांच्या राज्याभिषेकाची खास भेट म्हणून प्रतिपक्षाला जाऊन मिळायच्या तयारीत आहे की काय? की हे आतूनच लढणार?
.............................................................................................................................................
निवडक नरहर कुरुंदकर : खंड तीन (ग्रंथवेध) – संपादन – विनोद शिरसाठ, देशमुख आणि कंपनी, पुणे, पाने – ३२०, मूल्य – ३२५ रुपये. या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4291
.............................................................................................................................................
४. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवरील फॉलोअर्स ५२ टक्क्यांनी वाढले असल्याचं समोर आलं आहे. #YearOnTwitter2017च्या अहवालात जाहीर करण्यात आलेल्या विश्लेषणातून ही माहिती उघड झाली आहे. जागतिक स्तरावर थेट व सामूहिक संवादासाठीच्या या व्यासपीठावर ४ डिसेंबरपर्यंतचे सर्वाधिक रिट्विट्स केलेले ट्विट्स, घडामोडी, ट्रेंड्स, विविध हॅशटॅग तसेच सर्वाधिक ट्विट्समध्ये वापरात आलेले ट्विटर हँडल यांची माहिती जाहीर करण्यात आली. त्यानुसार मोदींच्या ट्विटर फॉलोअर्सच्या संख्येत २०१६च्या तुलनेत २०१७मध्ये ५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर अमिताभ बच्चन यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हे ट्विटरवाले मोठे मजेशीर आहेत. आधी ही आकडेवारी जाहीर करून टीआरपी खेचतात. नंतर कोणाचे किती फॉलोअर बोगस आहेत, हे सांगून डबल टीआरपी खेचतात. ट्विटरवर कमी फॉलोअर असूनही राहुल गांधींच्या रिट्वीट्सची संख्या आणि प्रभाव जास्त आहे, ही बातमी गेल्या आठवड्यात आली होती. त्यानंतर ही बातमी येणं अपेक्षित होतंच. आता फुगा फुगवला आहेच, तो ट्विटरवाले फोडतात कधी ते पाहायचं.
.............................................................................................................................................
५. दिल्लीतील वायू प्रदूषणानं किती धोकादायक पातळी गाठली आहे, याचा प्रत्यय रविवारी भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामनादरम्यान आला. तिसऱ्या दिवशी उपहारानंतरचा खेळ सुरू झाल्यानंतर श्रीलंकेचा गोलंदाज लाहिरू गमागे प्रदूषणामुळे त्रास जाणवू लागला. त्याला गोलंदाजी करताना धाप लागत होती. यादरम्यान श्रीलंकेच्या अनेक खेळाडूंनी तोंडावर मास्क घातले. मात्र, लाहिरू गमागेला सातत्यानं त्रास होऊ लागल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमल यानं पंचांकडे खेळ थांबवण्याची मागणी केली.
श्रीलंकेच्या खेळाडूंना खरोखरच त्रास होऊ लागला की, त्यांनी डावपेचांचा एक भाग म्हणून किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की करण्याची संधी म्हणून हा प्रकार केला, हे सांगणं कठीण आहे. मात्र, तोंडावर मास्क घातलेले खेळाडू हे आपल्या देशाला लाज आणणारं चित्र आहे. सामन्याचा निकाल काहीही लागो, देशाच्या राजधानीची अशी अब्रू निघेल, याचा विचार न करता तिथं सामना ठेवणाऱ्यांनी नकळत एक मोठी हार आपल्या पदरात आधीच घातली आहे.
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment