मागच्या आठवड्यात National Crime Records Bureauचा अहवाल जाहीर झाला. त्यात असे म्हटले आहे की, भारतात दर तासाला चार मुलांचं लैंगिक शोषण होतं. हा अतिशय भीषण, क्रूर आणि संतापजनक प्रकार आहे. या अहवालाच्या निमित्ताने हा विशेष लेख.
.............................................................................................................................................
माझ्या मनोविकार तज्ज्ञ बायकोकडे येणाऱ्या १० मुलांमागे (मुलगा-मुलगी दोघेही) साधारण चार जणांचं लैंगिक शोषण झालेलं असतं. ही अत्यंत भयानक आकडेवारी आहे. आणि ही भारत सरकारच्या आकडेवारीशी जुळते. १९९८, २००६ आणि २००७ ला UNICEF आणि स्त्रिया व बाल कल्याण मंत्रालय, भारत सरकारनं केलेल्या सर्व्हेक्षणातून असं समोर आलं की, भारतात ४० ते ५३ टक्के मुलं ही लैंगिक शोषणाचे बळी आहेत. (१९९८ पूर्वी असला कुठला सर्व्हे भारतात झालेलाच नाही. १९९८ मध्ये हे प्रमाण ४० टक्के, २००६ मध्ये ४२ टक्के आणि २००७ मध्ये ५३ टक्के होतं.) भारतामध्ये ही आकडेवारी जवळपास महामारीच्या स्वरूपाला येऊन पोहोचलेली आहे. आशिया खंडात हे प्रमाण १२ टक्के आहे.
खंड\प्रदेश |
मुली |
मुलं |
---|---|---|
आफ्रिका |
२०.२ टक्के |
१९.३ टक्के |
आशिया |
११.३ टक्के |
४.१ टक्के |
ऑस्ट्रेलिया |
२१.५ टक्के |
७.४ टक्के |
युरोप |
१३.५ टक्के |
५.६ टक्के |
द. अमेरिका |
१३.४ टक्के |
१३.८ टक्के |
युनायटेड किंगडम |
२०.१ टक्के |
८ टक्के |
मुलांच्या लैंगिक शोषणाची जगातल्या निरनिराळ्या खंडातली आकडेवारी
पालकांमध्ये असलेला लैंगिक शिक्षणाबाबतच्या जागृतीचा अभाव, हे यामागचं एक प्रमुख कारण आहे. कोणत्या गोष्टीला लैंगिक शोषण म्हणायचं हेच अनेकदा पालकांना माहीत नसतं. आधी आपल्या मुलाच्या बाबतीत असं काही होऊ शकतं, हे मान्य करायचं नाही आणि असं काही झालंच तर ते लपवून, दाबून ठेवायचं. यामुळे अशा गोष्टींत मुलांना न्याय सोडा, साधं संरक्षणही मिळत नाही. शिवाय पालक आणि मुलं यांच्यात असलेला सुसंवादाचा अभाव आहेच. यामुळे गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या, नैराश्य, वैफल्य आणि इतर मानसिक प्रश्न निर्माण झाले की, मग मानसोपचार तज्ज्ञाकडे धाव घेतली जाते, तीसुद्धा शहरात. आणि त्यातही काहीच पालक असं करतात. एरवी वर्षानुवर्षं चालत आलेले देव-देव, नवससायास, व्रत-वैकल्य असलेच उपाय केले जातात.
मुलांच्या शिक्षणासंबंधानं बोलताना बहुधा सगळ्यात कमी चर्चिला जाणारा विषय त्यांचं लैंगिक शिक्षण हा आहे (कमीत कमी भारतात तरी). मुळात लैंगिक भावना आणि क्रियाकलाप यांचा आणि शिक्षणासारख्या पवित्र (!) गोष्टींचा एकत्र मेळ घालणं हेच अनेकांना पाप (?) वाटतं.
एकीकडे वरची आकडेवारी पाहता मुलांना लहान वयातच लैंगिक अत्याचाराच्या खाईत लोटलं जात आहे. आणि तरीही आपण पालक लोक अंगावर पडलेली पाल झटकावी तितक्या सहजतेनं आणि कदाचित त्यापेक्षा अधिक शिसारी आल्यासारखी हा विषय झटकून टाकत आहोत. वयात आलेल्या, येऊ घातलेल्या, तुमच्या आमच्या मुलांच्या जगण्याशी, जोडलेला हा विषय आहे. त्यापासून इतकं घाबरून, फटकून राहण्यानं चालणार नाही.
मुळात लैंगिकता ही निसर्गतःच लहरी, तर्काच्या चौकटीत न बसणारी व मनाचा संपूर्ण ताबा घेणारी असते. लैंगिकता किंवा लैंगिक प्रेरणा माणसाची सहज प्रेरणा असल्यानं ती टाळता येणं, थांबवता येणं, काही काळ लांबवता येणं अशक्यप्राय, अनैसर्गिक तर असतंच, शिवाय अनेक समस्या निर्माण करणारीही ठरू शकते, नव्हे ठरतेच. (स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना हल्ली वाढलेल्या दिसतात. त्याचं खापर पाश्चात्य संस्कृती, मुलींचे तोकडे कपडे, रात्री उशीरा फिरणं, नोकरी करणं असल्या गोष्टीवर फोडणारे महाभाग मुलांना न मिळणारं वा अपूर्ण, विकृत लैंगिक शिक्षण, हे त्याचं प्रमुख कारण असू शकतं, हे विसरतात.)
या विषयावर सरकारचं धोरण पुरेसं स्पष्ट नाही. पण आपणच फक्त अशी बोटचेपी भूमिका घेतो, असं नाही तर अमेरिकेसारख्या देशातही सरकारच्या धोरणाची याबाबत संदिग्धताच दिसून येते. अमेरिकन संघराज्याच्या ५२ राज्यांपैकी फक्त २२ राज्यांमध्ये मुलांना लैंगिक शिक्षण देणं अनिवार्य आहे. त्यापैकी फक्त १३ राज्यांत ते वैद्यकीयदृष्ट्या अचूक असावं असा सरकारी निर्देश आहे. मुळात हा असा आग्रह कसा धरला जाऊ शकतो? म्हणजे गणित शिकवताना ते अचूक शिकवलं जावं, असा आग्रह धरण्याइतकं हे हास्यास्पद आहे, पण तरीही असा आग्रह ५२ पैकी फक्त १३ राज्यंच धरतात. म्हणजे उरल्या ठिकाणी अंधारच आहे. त्यामानानं भारत सरकारचं एक बरं आहे. अशी कोणतीही संदिग्धता आपल्या सरकारी धोरणात नाही. कारण आपल्याकडे तसं काही धोरणच नाही, मग संदिग्धता कशी असेल!
२००७ मध्ये भारत सरकारनं शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षण समाविष्ट करण्याचं ठरवलं. त्यावेळी त्याचा मुख्य हेतू एड्ससारख्या रोगांचा फैलाव आणि प्रतिबंधात्मक उपाय या दृष्टीनं मुलांना जागरूक करणं एवढाच मर्यादित (मुख्यत्वे करून) होता. तरी अपेक्षेप्रमाणे विविध राजकीय, धार्मिक नेते, संघटना, संस्था यांनी त्याला कडाडून विरोध केला.
यातली धक्कादायक आणि दु:खद बाब म्हणजे उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षक संघानं, तर शालेय पुस्तकांची होळी करण्याची धमकी दिली. जवळपास सगळ्या राज्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला आणि कठोर संघर्ष करायचे संकेत दिले. वानगीदाखल त्या काळी आलेल्या काही वर्तमानपत्रांतल्या बातम्या -
http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/6949714.stm
http://archive.indianexpress.com/news/sex-education-course-too-hot-for-vhp-/29953/
http://archive.indianexpress.com/news/madhya-pradesh-bans-sex-education/25871/
भारत सरकारचं शिक्षणविषयक राष्ट्रीय धोरण हेच मुळात स्वातंत्र्यानंतर तब्बल ४० वर्षांनी ठरलं. १९८६ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्यात आलं आणि ९२ मध्ये त्यात सुधारणा करण्यात आल्या. या सुधारणांनाही आता पंचवीस वर्षं उलटली आहेत. दोन वर्षापूर्वी म्हणजे जानेवारी २०१५ मध्ये सरकारनं शैक्षणिक धोरणाच्या पुनर्विचाराची प्रक्रिया सुरू केली होती. पण त्यामध्ये मुलांच्या लैंगिक शिक्षणासंदर्भात नक्की काय विचार केला गेला, हे अजून तरी गुलदस्त्यातच आहे. शालेय शिक्षणासाठी विचारविनिमयार्थ १३ विषय निवडण्यात आले. त्यात मुलांचं आरोग्य हा विषय होता, पण लैंगिक शिक्षण हा विषय त्यात येतो की, नाही हे मात्र सरकारनं स्पष्ट केलेलं नव्हतं. परंतु तत्पूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी जून २०१४ शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या लैंगिक शिक्षणावर बंदी घातली जावी, असं मत व्यक्त केलं होतं. तेव्हा एकंदरीत फारसं आशादायक काही नसावं.
लैंगिक शिक्षण हा एक राष्ट्रीय अजेंडा असून, तो एखाद्या पक्षाचा, राजकीय, धार्मिक किंवा इतर विचारप्रणालीच्या प्रसाराचा अजेंडा नव्हे. अधिक दु:खद बाब अशी की, या निमित्तानं विविध वाहिन्या आणि वृत्तपत्रांनी ‘शाळेतील मुलांच्या लैंगिक शिक्षणावर बंदी घालणं योग्य की अयोग्य?’ अशा प्रकारच्या ज्या मतचाचण्या घेतल्या, त्यात साधारण ५१ ते ६० टक्के लोकांनी बंदी घालणंच योग्य, असा निर्वाळा दिला. म्हणजे आम्ही घरी या विषयावर मुलांशी बोलणार नाही, शाळेत शिकू देणार नाही, मग मुलांनी करायचं काय?
शाळेत लैंगिक शिक्षण का द्यावं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मुलांना या विषयावर बऱ्याच शंका असतात. त्यातल्या काही वेडगळ वाटाव्या अशा, काही अत्यंत गंभीर, तर काही अंतर्मुख करायला लावणाऱ्या असतात. एक गोष्ट नक्की की, या सगळ्या शंकांचे समाधान अत्यंत समर्पक, शांत आणि समजूतदारपणे दिलेल्या उत्तरानंच होणं शक्य आहे. पण वर सांगितल्याप्रमाणे या विषयावर मुलांशी बोलायची पालकांची पुरेशी मानसिक आणि बौद्धिक तयारी नसते, हे तर आहेच, त्याहून वाईट गोष्ट म्हणजे तशी त्यांची इच्छाही नसते.
फार विसंगत दृष्टिकोन आहे. म्हणजे आपल्या कुणाचीही आपल्या मुलाला खेळताना पडून लागावं अशी इच्छा नसते, तरीही मूल कधी धडपडेल किंवा आजारी पडेल आणि त्या वेळी डॉक्टरकडे लगेच जाणं शक्य होईल का, हे काही सांगता येत नाही म्हणून घरात वेळ पडली तर उपचार करण्याचे जुजबी सामान, औषधं वगैरे आपण ठेवतोच. पण झपाट्यानं वाढत जाणाऱ्या मुलाशी विश्वासाचं आणि सुसंवादाचे नातं, जे सुरुवातीला असतं, ते टिकवून ठेवावं, वृद्धिंगत व्हावं म्हणून मात्र फारसा प्रयत्न होत नाही. यामुळे मूल त्याच्या मनात उद्भवणाऱ्या लैंगिक शंका, प्रश्न, जिज्ञासा आपल्या पालकांसमोर मोकळेपणानं व्यक्त करत नाही. तेव्हा आपण पालकांनी हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ही आपली गरज आहे, तसंच ती आपल्या मुलांचीही अगदी निकडीची गरज आहे.
मुलांना पडणाऱ्या प्रश्नांपैकी काही वानगी दाखले :
- ब्ल्यू फिल्म्स पाहून मला गर्भधारणा होईल का?
- हस्तमैथून केल्यामुळे शक्तिपात, एखादा रोग होतो का?
- हस्तमैथून ही एक मनोविकृती आहे का?
- हस्तमैथून केल्यामुळे मला कमी मार्क पडतील किंवा मी नापास होईल का?
- हस्तमैथून पाप आहे का?
- मुली हस्तमैथून करतात का? असल्यास कसं?
- हस्तमैथूनात बाहेर पडणारं वीर्य तोंडाला लावलं तर तोंडावरच्या पिटिका कमी होतात, हे खरं आहे का?
- समलैंगिक असणं ही विकृती आहे का?
- वीर्य प्राशन केल्यामुळे गर्भधारणा होते का?
- चुंबन घेतल्यानं मी गर्भवती होईल का?
- टूथ पेस्ट गर्भनिरोधक म्हणून वापरता येते, हे खरं आहे का?
- मुलगा-मुलगी एकत्र झोपले तर ती मुलगी गर्भवती होईल का?
- एड्स झालेल्या मुलाचं/मुलीचं चुंबन घेतलं तर मलासुद्धा एड्स होईल का?
- मला ही सगळी (लैंगिक ज्ञान) माहिती घेणं जरुरी आहे का आणि मला ते जमेल का?
प्रत्यक्षात या प्रश्नांची यादी प्रचंड मोठी आहे. ही आणि अशी प्रश्नावली पाहिली की, जाणवतं ते हे की, मुलांच्या मनात या विषयासंदर्भानं शंकांचं काहूर उठलेलं असतं आणि यातील सगळ्या शंकांचं योग्य प्रकारे, शास्त्रीय माहितीच्या आधारेच निराकरण करणं जरुरीचं आहे. कोणताही धार्मिक, सांस्कृतिक किंवा इतर अभिनिवेश अंगी न बाळगता. (‘अभ्यास करा, एक थोतरीत ठेवून देईन, असले प्रश्न पुन्हा विचारशील तर!’... अशा प्रतिक्रिया न देता . पण बहुतेक वेळा अशाच प्रतिक्रियाच दिल्या जातात.) पण तसं होताना दिसत नाही. अनेक पालकांना यातील अनेक प्रश्नांचं योग्य उत्तर कसं द्यायचं हेही माहिती नसतं. तेही एक वेळ क्षम्य मानता येईल, पण म्हणून मग ती माहिती घेऊन मुलांना योग्य प्रकारे सांगायची गरजही पालकांना पटलेली दिसत नाही, ही मात्र गंभीर बाब आहे.
या संबंधाने पालकांचे दृष्टिकोन कसे आहेत किंवा त्यांचे आक्षेप काय आहेत?
१. लैंगिक शिक्षणाची आमच्या मुलांना गरज नाही. ती अत्यंत सालस, निरागस(?) आहेत. त्यांच्या डोक्यात नाही त्या गोष्टी भरवून देऊ नका.
२. लैंगिक शिक्षणामुळे ज्या मुलांच्या मनात यासंबंधी काही शंका विचार अजून आलेले नाहीत, त्यांनाही उगाच या विषयावर विचार करायला, शंका विचारायला उद्युक्त केलं जातं.
३. ही पाश्चात्यांची थेरं आहेत. आपल्यासारख्या सांस्कृतिक, आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत समाजाला त्याची गरज नाही.
४. मुलांना लैंगिक शिक्षणाची गरजच नाही. हे ज्ञान आपोआप होतं, आम्ही नाही शिकलो? झालं ना सगळं व्यवस्थित!
५. या विषयावर मुलांशी बोलणं अत्यंत अवघड आहे. आम्हाला शरम वाटतं. मुलांनी काही अडचणीचे प्रश्न विचारले तर?
६. लैंगिक शिक्षण मोठ्या (म्हणजे?) मुलांना द्यावं. शाळेत जाणाऱ्या मुलांना नको.
७. शाळेत जे शिक्षक हे शिक्षण देणार आहेत, ते पुरेसे माहितगार, किमान अर्हताप्राप्त तरी आहेत का? (ही शंका/ आक्षेप मात्र खरोखर योग्य आहे.)
या शेवटच्या शंकेचा धागा पकडून काही जण असं म्हणतात की, आपण जरी मुलांच्या लैंगिक शिक्षणाची अपरिहार्यता मान्य केली, तरी शाळा, (खाजगी, शासकीय, अनुदानित, विना अनुदानित सर्व) शासन आणि शिक्षक या आघाडीवर पुरेशी सिद्धता होत नाही, तोपर्यंत तरी शाळेत लैंगिक शिक्षण अनिवार्य करण्यात काही अर्थ नाही. उलट त्यातून अनर्थ होण्याचीच शक्यता जास्त. मतमतांतराच्या गदारोळात ही एक शंका किंवा आक्षेप खरोखरच काही गांभीर्य बाळगून आहे. पण त्यावर उपाय तोपर्यंत मुलांचं (शाळेतील तरी) लैंगिक शिक्षण लांबणीवर टाकणं कसं योग्य ठरू शकेल? भारतासारख्या देशात तरी आता हा विषय पालकांनी शाळेच्या आणि शासनाच्या, तसंच शासनानं पालकांच्या सद्सदविवेक बुद्धीच्या हवाली (तसंच इतर मतदार गटांच्या मर्जीवर) सोडणं बंद केलं पाहिजे. का? कारण काय? दै. ‘सकाळ’मध्ये ४ ऑक्टोबर २०१५ रोजी आलेल्या लेखातील हा भाग पहा -
“मुंबई महानगर पालिकेच्या इस्पितळातल्या सन २०१४-१५ या एका वर्षांतील नोंदीनुसार १५ वर्षांखालच्या मुलींच्या गर्भपातामध्ये ६७ टक्के वाढ झाली असल्याचे आढळून आले आहे. पालिकेतर्फे माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार या वर्षांत ३१ हजार महिलांनी गर्भपात केला. त्यात १६०० मुली या १९ वर्षांखालील आहेत. पालिकेने खासगी गर्भपात केंद्रांकडून घेतलेल्या माहितीप्रमाणे २०१३-१४ मध्ये १५ वर्षांखालील १११ मुलींनी गर्भपात केला, तर २०१४-१५मध्ये गर्भपाताची संख्या आणखी १८५ ने वाढली आहे. म्हणजे १५ ते १९ वयोगटातील मुलींचे गर्भपाताचे प्रमाण दोन वर्षांत तब्बल ४७ टक्क्यांनी वाढले असल्याचे म्हटले आहे.
गर्भपाताच्या या आकडेवारीनुसार महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्पष्ट आहे. कुठे लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केले जात आहेत. कुठे मुलींचेच नव्हे तर मुलांचेही लैंगिक शोषण होत आहे. त्यामुळे लैंगिकतेविषयीचे शास्त्रीय ज्ञान शालेय अभ्यासक्रमात मिळणे ही काळाची गरज आहेच. शिवाय मुलांचा तो अधिकार आहे. बालपणापासून लैंगिक शिक्षण मिळाल्यास त्याच्याकडे अश्लील म्हणून नव्हे तर जीवनविषयक आवश्यक ज्ञान म्हणून पाहण्याची सकारात्मक दृष्टी प्रत्येक नागरिकांत विकसित होईल. इंटरनेटसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या माध्यमांमुळे सध्या सर्वांना सर्व प्रकारचे ज्ञान खुले झाले आहे. मात्र त्याबाबतची परिपूर्ण आणि सर्व शंका निरसन करणारी माहिती शालेय अभ्यासक्रमातूनच मिळू शकते.”
भारतात मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांपैकी ५३ टक्के अत्याचार हे ५ ते १२ वर्षे वयोगटातल्या मुलांवर होतात. किशोर/पौगंडावस्थेतील मुलींच्या गर्भधारणेचे प्रमाण हजारी ६२ इतकं प्रचंड आहे. भ्रष्ट आणि वाह्यात म्हणून हिणवल्या जाणाऱ्या पाश्चात्य देशांच्या पेक्षा कितीतरी पट अधिक हे प्रमाण आहेच, पण आशिया आणि मध्य पूर्वेकडच्या देशांपेक्षाही आपण या बाबत बराच वरचा नंबर पटकावून आहोत. (अर्थात भारतात बालविवाहांचं प्रमाण अजूनही खूप जास्त आहे. म्हणून ही आकडेवारी अशी जास्त दिसते, पण त्यामुळे याचं गांभीर्य अधिकच वाढतं.) म्हणजे आपली लहानगी, शाळेत जाणारी मुलं अजिबात सुरक्षित नाहीत. हा भस्मासूर आपल्या अगदी दाराशी येऊन ठेपलेला आहे. पण आपण अनभिज्ञ (कि बेदरकार?) आहोत. याबाबत शासन काही करेल न करेल, तोपर्यंत वाट पाहत राहणं महागात पडू शकतं. स्वत:च्या मुलांसाठी तरी आपल्याला आता ही गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही. मुलांच्या शास्त्रशुद्ध लैंगिक शिक्षणासाठी वैयक्तिक/ कौटुंबिक पातळीवर, तसंच शासनावर/शाळांवर दबाव आणण्यासाठी सुज्ञ पालकांनी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत.
.............................................................................................................................................
निवडक नरहर कुरुंदकर : खंड तीन (ग्रंथवेध) – संपादन – विनोद शिरसाठ, देशमुख आणि कंपनी, पुणे, पाने – ३२०, मूल्य – ३२५ रुपये. या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4291
.............................................................................................................................................
वैयक्तिक पातळीवर आई-बाबा दोघांनीही आपल्या मुलांशी या विषयावर मोकळेपणानं बोललं पाहिजे. मुलं आपल्याशी मोकळेपणे बोलती झाली पाहिजेत. हे लगेच होणार नाही, पण संयम आणि तितिक्षा हे मोठे प्रभावशाली गुण आहेत. सतत प्रामाणिक प्रयत्न केल्यावर यश नक्की मिळेल. एकदा मुलात आणि आपल्यात विश्वासाचं, सुसंवादाचे नातं तयार झालं की, निम्मी लढाई जिंकल्यातच जमा आहे.
लैंगिक शिक्षणात दोन भाग महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे शरीरशास्त्र. म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरातले मूलभूत फरक, वयानुसार होत जाणारे बदल आणि त्याचे शारीरिक-मानसिक परिणाम- मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसुती, एचआयव्ही, एड्स, गुप्तरोग याबद्दलची माहिती या शिक्षणातून देता येईल. नऊ ते दहा हे अशा प्रकारचं शिक्षण देण्यासाठी योग्य वय असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
दुसरा भाग म्हणजे लैंगिकतेला धरून असलेली सामाजिक, सांस्कृतिक, अशी अनेक परिमाणं. भिन्नलिंगी व्यक्तीला माणूस म्हणून वागवण्याची दृष्टी आधी स्वतःची लैंगिकता समजून घेतल्याशिवाय येणार नाही. याशिवाय चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखायचा इथून सुरुवात असेल तर शालेय वय हे त्यासाठी सर्वांत उत्तम आहे. खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचे पालक किमान शैक्षणिक पातळीवरचे तरी आहेत असं गृहीत धरायला हरकत नाही. किशोरवयातील या मुलांना या लैंगिक शिक्षणाची माहिती शास्त्रीयदृष्ट्या दिल्यास प्रगत समाजासाठी एक चांगलं पाऊल ठरेल. आणि ही माहिती विविध पुस्तक, युट्यूब वरील डॉक्युमेंटरीज अशा निरनिराळ्या प्रकारे उपलब्ध आहे.
मला नेटवर या विषयी सुंदर अशी पाच भागांची डॉक्युमेंटरी सापडली. आपल्या भारतीय लोकांनी काम केलेली आणि Durex आणि Y-Filmsनं बनवलेली. आपल्या लाडक्या सचिननं यात काम केलं आहे. या बाबतीत त्याचं खरंच कौतुक केलं पाहिजे. काही लिंक्स -
https://www.youtube.com/watch?v=M2Aa16laoE8&t=36s
https://www.youtube.com/watch?v=cUMGUyWfeno&t=23s
https://www.youtube.com/watch?v=wC47UsW_44U
https://www.youtube.com/watch?v=MH0J294EalY
https://www.youtube.com/watch?v=xCY9G33w3LE
मूल जन्माला आलं की, आपणही आई-बाप म्हणून पुन्हा एकदा जन्माला येतोच. पण मूल ज्या प्रमाणात (खरं तर झपाट्यानं) नवनवीन गोष्टी शिकतं, त्या प्रमाणात आपण काही शिकतो का, हा कळीचा प्रश्न आहे. आपणही त्यांच्याबरोबरच काही गोष्टी शिकलो, स्वत:ला बदललं तर आपण जबाबदार पालक बनू शकू.
संदर्भ :
१. Everything You Always Wanted to Know About Sex - David Reuben
२. Against our will - Men Women and Rape - Susan Brownmiller
३. युट्यूबवरील Documentaries, articles, मराठी लेख, फेसबुकवरील बातम्या, पोस्ट आणि त्यांवरच्या प्रतिक्रिया.
४. This week tonight या HBO वरील मालिकेचा एक भाग. ही मालिका युट्यूबवर उपलब्ध आहे. लिंक-
.............................................................................................................................................
लेखक आदित्य कोरडे टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.
aditya.korde@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
ADITYA KORDE
Sun , 17 December 2017
हेही बघा ...किती अंधार आहे आणि किती अंतर कापायचे आहे २१व्या शतकातल्या भारतातल्या तरुणांना / तरुणींना https://www.youtube.com/watch?v=hZZncI0CA9A&feature=share
Alka Gadgil
Tue , 05 December 2017
Shocking akdewari, yes palkanna suddha laingik shikshan denyachi zaruri ahe