अजूनकाही
गुजरातच्या राजकारणाचा आत्तापर्यंतचा वेध अभ्यासक, भाष्यकार अन् सामान्य जनता यांच्या अनुभव व दृष्टिकोनातून घेतल्यानंतर प्रमुख स्पर्धक असलेल्या काँग्रेस-भाजप या पक्षांच्या स्तरावर काय चाललं आहे, हे पाहण्याचं ठरवलं.
अहमदाबाद शहरात भाजपचं जिल्हा कार्यालय आहे. काँग्रेसचं मात्र प्रदेश कार्यालय अहमदाबादमध्ये आहे. अहमदाबादमधील काँग्रेसचं प्रदेश कार्यालय म्हणजे राजीव गांधी भवन. तिथं अपेक्षेप्रमाणे प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात कुठल्या तरी नेत्याची वाट पाहत होते. ही अतिशय भव्य इमारत आहे. प्रत्येक मजल्यावर कॉर्पोरेट पद्धतीची रचना. आणि त्याच पद्धतीनं काम चाललं आहे, असा समज तयार होतो.
त्या कार्यालयात सगळीकडे धावपळ सुरू होती. अपक्ष लढणाऱ्यांची नाराजी कोणी आणि कशी दूर करायची, याचा अभ्यास करणारे काही नेते होते. दिल्लीहून पक्षानं आणलेल्या संस्थांचे प्रतिनिधी लॅपटॉपवर विविध गोष्टींच्या शोध घेत होते. आम्ही कुणीतरी जाणकार नेता भेटतो का, या शोधात असताना आम्हाला एकानं ‘तिसर्या मजल्यावर काँग्रेसचे संजय बाफना आहेत. त्यांना भेटा’ असं सुचवलं.
त्यांच्याकडे गेलो. ते काँग्रेस विचार समजलेले अनुभवी नेते. त्यांचा विश्वास संपादन झाल्यावर ते बोलू लागले. त्यांनी स्वाभाविकपणे ‘आम्ही जिंकण्यासाठी लढत आहोत आणि यावेळी आम्ही जिंकू’ असाच विश्वास व्यक्त केला. त्यांच्या मांडणीतील शब्द विश्वास देणारे होते, मात्र अविर्भाव विश्वासाला पात्र मानावा असा नव्हता. त्यांना काँग्रेसच्या पक्षांतर्गत नाराजीबाबत विचारलं असता ते म्हणाले, “थोडीफार नाराजी सगळीकडे असते. नाराजी असणं म्हणजे पक्षात अपेक्षा ठेवणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यातच यावेळी राहुलजींनी स्वतंत्र सर्व्हे करून उमेदवारांची नावं निश्चित केल्यानं काही जुनी मंडळी नाराज झाली होती, पण आम्ही ती दूर केली आहे. त्यामुळे आत्ता आम्हाला फक्त गुजरातच्या सर्वांगीण विकासासाठी खर्या अर्थानं लढायचं आहे. आणि आम्ही उत्तम प्रकारे लढत आहोत. कारण गुजरात मागासलेलं राज्य राहण्याला भाजप जबाबदार आहे. त्यामुळे जनतेनं राज्य पुढे नेण्यासाठी कुणाला साथ द्यायची हे ठरवायचं आहे.”
बाफना यांच्या मांडणीत राहुल गांधी यांचे मेळावे, त्याला होणारी गर्दी, यावर अधिक भर होता. स्थानिक नेते आणि स्थानिक प्रश्न यावर भर नव्हता. सगळं काही राहुल गांधी हाच यावेळी काँग्रेसचा आशावाद आहे. राहुल गांधींवर काँग्रेस अवलंबून आहे, असा त्यांच्या म्हणण्याचा साधारण मथितार्थ होता.
याशिवाय बाफना यांच्या म्हणण्यानुसार, “राजस्थानचे माजी मुख्यमंत्री यावेळी गुजरातचे प्रभारी असल्यानं आमच्याकडे पक्षांतर्गत परिस्थिती अतिशय चांगली आहे. गेहलोतसाहेब, गुजरातसाठी प्रभारी आल्यानं पक्षाची मरगळ पूर्णपणे झटकता आली आहे. त्यांनी पक्षात चैतन्य आणलं आहे. त्याचबरोबर देशभरातून काँग्रेसचे छोटे-मोठे नेते प्रचारासाठी आले आहेत.
“आमचं यावेळचं धोरण राज्याच्या सर्वांगीण हिताचं आहे. सॅम पित्रोदा हे आमचं धोरण आखत आहेत. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचं धोरण हाती घेऊन ही लढाई आम्ही लढत आहोत. लोकशाही मार्गानं प्रत्येक नागरिकाच्या हक्काचं संरक्षण होणं गरजेचं आहे. जे गुजरातमध्ये भाजपच्या काळात होत नाही. ते आम्ही जनतेला देऊ शकतो, हा विश्वास देऊन आम्ही लढत आहोत.
“भाजपसारखा अपप्रचार करणं हा आमचा हेतू नाही. आम्ही क्वचित प्रसंगी वैयक्तिक टीका करतो, अन्यथा आमचा मुद्दा नेहमी व्यापक अन् विचारी असतो. आम्ही वैयक्तिक हल्ले करत नाही. या वेळीदेखील करणार नाही. पंतप्रधान असो किंवा आणखी कोणतेही घटनात्मक पद असो, त्या पदाचा आदर राखला गेला पाहिजे, ही आमची पक्ष म्हणून भूमिका आहे. ती आम्ही पाळणार आहोत. यावेळी खरं तर सगळ्या बाजूंनी आम्ही आघाडीवर आहोत. मात्र पैशानं आम्ही कमी आहोत. आमच्या पक्षावर भाजप सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप करत असतं, मात्र निवडणुकीत भाजप जास्त खर्च करतं अशी चर्चा असते. हा विरोधाभास आहे.
“तुम्ही लोकांना विचारा, भाजपच्या निवडणुकीत पैसे खर्च करण्याबाबात लोक तुम्हाला सांगतील. आमच्या लढाईचं पहिलं यश म्हणजे भाजपनं सगळे मंत्री प्रचारात आणले आहेत. ते सगळे एकट्या राहुल गांधींना घाबरले आहेत. त्यांची सगळ्यांची फौज फक्त राहुल गांधींवर तुटून पडते, यातच त्यांना पराभव दिसत आहे.
“आजवर एका राज्याच्या निवडणुकीत देशाच्या पंतप्रधान पदावरील व्यक्तीनं कधीही ५० सभा घेतल्या नाहीत. भाजपवर ही वेळ का आली याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. पंतप्रधान एका राज्यात अडकून पडणं, हे आपल्या देशासाठी खचितच अपमानजनक आहे. त्यातच पंतप्रधान जी भूमिका मांडत आहेत, ती त्या पदाला शोभून दिसत नाही. देशाचा पंतप्रधान स्वतःला गुजराती अस्मितेत अडकवतो, ही कोणती परंपरा मोदीजी निर्माण करत आहेत? देशात अनेक गंभीर प्रश्न असताना ते सोडवायचे सोडून ते गुजरातमध्ये अडकले आहेत, ही खेदजनक बाब आहे. राष्ट्रहिताचा विचार करणारी जनता या सर्व गोष्टींचा यावेळी निश्चित विचार करेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
यानंतर आम्ही भाजप कार्यालयात गेलो. हे कार्यालय अहमदाबादपुरतं मर्यादित होतं. कारण भाजपचं प्रदेश कार्यालय गांधीनगरला आहे. तर तिथं मतदार याद्यांवर काम सुरू होतं. पक्षाचे नेते मोदीजींच्या सभांच्या नियोजनात व्यस्त असल्यानं आम्हाला भाजपच्या मोठ्या नेत्यांना भेटता आलं नाही. सदर पक्ष कार्यालयात फारशी गर्दी नव्हती. पण भाजपचं काय चाललं आहे आणि कसं चाललं आहे, याचा अंदाज इथं बांधता येत होता. तिथं उपस्थित भाजप नेत्यांशी आम्ही सामूहिक संवाद साधला. ते कार्यकर्ते छोट्या स्तरावरच्या स्ट्रॅटेजी आखणारे होते. राज्यस्तरावर पक्षाचं काय चाललं आहे, याचाही त्यांना अंदाज होता.
भाजपच्या कार्यकर्त्यांचा सूर विकासकेंद्री मुद्दे असाच होता. त्यातच ‘आम्ही जिंकणार यात शंका नाहीच. मुद्दा फक्त १५० जागा मिळवण्यासाठी काय करता येईल, यावर आमचे नेते काम करत आहेत’. त्यातच एकानं सांगितलं- “आमच्या पक्षाचे गुजरातमध्ये १ कोटी ३ लाख अधिकृत फॉलोअर्स आहेत. त्या सगळ्यांनी किमान दोन मतं पक्षाला मिळवून दिली तरी आम्हाला एकूण मतदानातील ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळतील. त्याचबरोबर आमचं बुथ मॅनजमेंट तगडं आहे. यावेळी गुजरातमध्ये आम्ही मतदार यादीतील प्रत्येक पेजला प्रमुख व्यक्ती नेमलेली आहे. त्याला पेजप्रमुख असे म्हणतो. तो पेजप्रमुख त्याच्या यादीतील सर्वांचं मतदान कसं घडून येईल याची जबाबदारी व काळजी घेणार आहे. आमचं हे काम नियमित अपडेट होत आहे. त्याच्या फॉलोअपचं काम सुरू आहे. आमचं संघटन सजग आहे. अनुभवी आहे. आम्ही जिंकण्यासाठी लढत आहोत.
“गुजरातचा विकास या मुद्द्यावर आमचा पक्ष देशाची निवडणूक जिंकू शकतो. गुजरात हे तर आमच्यासाठी विकासाचं होमपिच आहे. आमच्या सरकारनं गेल्या दोन दशकांत समजातील सर्वच घटकांना न्याय मिळवून दिलेला असल्यानं आम्हाला लोकांना फार कन्व्हिन्स करायची गरज नाही. त्यातच गुजरातमध्ये अनेकांनी सर्व्हे केले. सगळ्यांना एकच कळलं- भाजप सत्तेत येणार आहे. त्यामुळे आत्ता जास्तीत जास्ते मतं आणि अमित शहांना अपेक्षित असलेला आकडा गाठणं. त्यासाठी आमचा जोर आमच्या समर्थकांचं मतदान घडवून आणण्यावर राहणार आहे.”
या चर्चेचा समारोप करताना एकजण म्हणाला, “मोदींजीच्या सभांनी सगळं वातावरण बदलत आहे. अजून मोदींच्या सभांचं बरंच चित्र बाकी आहे. मोदीजी काय-कसं बोलत आहेत, तुम्ही पहा. शेवटी शेवटी ही निवडणूक फक्त भाजपच्या हातात राहिलं. कारण आमच्या सरकारनं केलेला विकास खालच्या स्तरापर्यंत पोहचला आहे. शेतकरी, व्यापारी, कष्टकरी महिला हे सगळेच घटक आमच्या कामावर खूश आहेत. त्यामुळे विकासाचे लाभार्थी आमच्या नेत्याला व पक्षाला सोडून जाणार नाहीत याची खात्री आम्हाला आहे.”
दोन्ही पक्षाच्या कार्यालयातून अंदाज घेतल्यावर बाहेर प्रचार कसा चालला आहे, त्यात काय मुद्दे आहेत, त्याचा आढावा घेतला. तेव्हा असं लक्षात आलं की, प्रचाराच्या रणनीतीत भाजप सूक्ष्म नियोजन करण्यात पुढे आहे. याच संदर्भातील माहिती घेताना आम्हाला असं कळलं की, काँग्रेसचे गुजरातचे प्रभारी अशोक गहलोत यांनी नॉर्थ गुजरातला सुजलाम सुफलाम् या योजने अंतर्गत नर्मदा डॅमच्या माध्यमातून पाणी द्यायचं होतं. त्यावेळी राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून काही मुद्द्यांवर आधारित पूर्वी कधीतरी विरोध केल्याचं पत्र भाजपनं बाहेर काढलं आहे (या संदर्भात मोदींनी अशोक गेहलोतांनी त्यावेळी केलेला विरोध गुजराती जनता कधीही विसरणार नाही, असा मुद्दा एका भाषणात मांडला आहे). हे पत्र भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगसह राजकारणातील उपद्रवमूल्याचं नेमकेपणानं दर्शन घडवत आहे.
त्याशिवाय मोदीजींच्या सभांची ठिकाणं अतिशय अभ्यास करून ठरवलेली दिसतात. जिथं भाजप मतांच्या बाजूंनी सीमारेषेवर आहे, तिथं अधिक मेहनत घेऊन सभा यशस्वी केल्या जात आहेत. काँग्रेसच्या बाबतीत मात्र चित्र वेगळं आहे. मायक्रो प्लॅंनिंगचा अभाव आहेच. मात्र यावेळी शहरामध्ये नाराज घटकांना एकत्र घेऊन त्यांच्या हस्तीदंती मनोर्यातील बैठका काँग्रेस घेत आहे. मोजक्या पण परिणामकारक लोकांशी राहुल गांधी बोलत आहेत. त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. तिकडे मोदीजी सामान्यांच्या गर्दीला विकासाची साहसकथा रंगून सांगत आहेत.
एकीकडे मोजके लोक एकत्र करणं आणि त्यांना आश्वासन देणं सुरू आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य माणसांना तुमचं भल कोणी केलं? कसं केलं हे सांगितलं जात आहे. यात कोणती जनता परिणामकारक ठरेल, हे येणारा काळच ठरवेल.
गुजरातची निवडणूक दोन्ही बाजूंनी रंगलेली आहे. नरेंद्र मोदी राहुल गांधींना सिरिअसली घेण्याबरोबरच गांधी घराण्याच्या इतिहासापर्यंत जात आहेत. नुकत्याच एका सभेत त्यांनी इंदिरा गांधी गुजरातबाबत कशा तुच्छतेचा दृष्टिकोन ठेवत होत्या, यावरून साप्ताहिक ‘चित्रलेखा’तील छायाचित्राचा संदर्भ देत टीका केली. त्यामुळे गुजरातची ही लढाई नरेंद्र मोदी-राहुल गांधींसाठी अस्तित्वाची आहे. त्यांनी त्यासाठी सर्वार्थानं ताकद पणाला लावलेली दिसत आहे. दोघेही यावेळी नेमकं आणि तोडीस तोड बोलत आहेत. विकासाच्या भूमिकांवर बोलत आहेत. एका मर्यादेच्या पलीकडे चिखलफेक करत नाहीत. ही निवडणूक दोघांमध्ये आहे, असाच प्रयत्न दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात होतोय.
गुजरातमध्ये २२ वर्षांच्या सत्तेत मोदींइतका तुल्यबळ नेता भाजपमध्ये तयार झाला नाही. तसा तयार होऊ दिला नाही, असं म्हटलं जातं. याला काय म्हणायचं, किंबहुना याकडे कसं पाहावं, असा प्रश्न आहे. दुसर्या बाजूला २२ वर्षं विरोधात लढण्यात काँग्रेसची ताकद इतकी क्षीण झाली आहे की, त्यामुळे त्यांच्याकडे राहुल गांधींशिवाय दुसरा पर्याय नाही.
गुजरातच्या या निवडणुकीच्या निमित्तानं एक गोष्ट अधिक स्पष्ट होते. ती अशी की, प्रत्येक राजकीय पक्षाला एका मर्यादेनंतर श्रद्धेची जागा बनवावी लागते. ही श्रद्धेची जागा एक नेता व त्याचं वलय या भोवती निर्माण केल्याशिवाय पक्षात नेतृत्वाचा सर्वार्थानं दबदबा निर्माण होत नाही. जो दोन दशकाच्या सत्तेनंतर मोदींच्या रूपानं भाजपमध्ये निर्माण झाला आहे. मोदींचा दबदबा व त्यांच्याबद्दलची श्रद्धा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. इतर पक्षातदेखील असंच असतं. थोडेबहुत अंतर असतं श्रद्धा व दबदबा यामध्ये. काही ठिकाणी श्रद्धा स्पष्ट दिसतात, तर दबदबा अनामिक असतो. काही ठिकाणी श्रद्धा अनामिक असते, पण दबदबा स्पष्टपणे दिसतो. काही ठिकाणी या दोन्हींच्या एकोप्यातून व्यापक अर्थानं जे वलय नावाचं भांडवल निर्माण होतं, त्याचा सगळेच पक्ष आपापल्या राजकारणासाठी वापर करत असतात. आज मोदींबद्दल जे वलय निर्माण झालं आहे, ते काँग्रेसमध्ये गांधी घराण्यातील नेत्याबाबत सतत घडत आलेलं आहे.
.............................................................................................................................................
निवडक नरहर कुरुंदकर : खंड तीन (ग्रंथवेध) – संपादन – विनोद शिरसाठ,
देशमुख आणि कंपनी, पुणे, पाने – ३२०, मूल्य – ३२५ रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4291
.............................................................................................................................................
गुजरातच्या राजकारणाच्या बर्याच सुरसकथा सतत सांगितल्या जातात. त्या सगळ्या किती खर्या किती खोट्या माहीत नाही, पण महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेत्यांच्या हाती मोठ्या शैक्षणिक – सामाजिक संस्था आहेत. तरीही महाराष्ट्रातील काँग्रेस पहिल्यांदा सत्ता गेल्यावर किती दुबळी झाली आहे, हे आपण पाहत आहोत. गुजरातमध्ये मात्र तसं नाही. मोदींसारखं सर्वार्थानं ‘वलयंकित’ नेतृत्व २२ वर्षं असताना तिथं काँग्रेस पक्ष म्हणून टिकून आहे. विचार म्हणून लढा देत आला आहे. ही गोष्ट लोकशाहीसाठी प्रेरक आहे. भाजप विकासाचा मुद्दा हाताला धरून आपला विचार आदिवासींच्या पट्ट्यातदेखील पोहचवत आहे. काँग्रेस आपल्या पारंपरिक मतांच्या मोटेवर आपला विचार घेऊन लढत आहे.
या निवडणुकीत अनेक घटक जुळून आल्यानं काँग्रेसच्या लढाईला जिवंतपणा आलेला आहे, यात दुमत नाही. गुजरातमध्ये अंतिमतः काय होईल हे सांगणं अवघड असलं तरी एक मात्र निश्चित आहे. गुजरातमध्ये लोकशाहीचा आधुनिक काळातील उत्तम लढा पाहायला मिळत आहे. हा लढा व्यापक अर्थानं निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत किती आधुनिक राहतो, यावर जय-पराजयाची गणितं कमी-अधिक होणार आहेत. आधुनिक विचारांची स्पर्धा आधुनिकतेला साजेसा व्यवहार घडवेल हीच आशा..
.............................................................................................................................................
या मालिकेतल्या इतर लेखांसाठी पहा
.............................................................................................................................................
लेखक किशोर रक्ताटे ‘स्ट्रॅटेजी कन्सल्टन्ट’ या संस्थेचे संचालक आहेत.
kdraktate@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment