अनुष्का शर्मा : फेमिनिझम जगणारी 
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर 
  • अनुष्का शर्मा
  • Sat , 02 December 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar अनुष्का शर्मा Anushka Sharma

मी 'एन एच 10' सिनेमा बघायला गेलेलो असताना घडलेला एक प्रसंग कायम आठवणीत राहील. त्या चित्रपटाच्या शेवटी मीरा (अनुष्का शर्मा) ज्यानं तिचा प्रचंड मानसिक छळ केलेला असतो आणि तिच्या नवऱ्याला मारलेलं असतं, त्या माणसाला प्रचंड त्वेषानं लोखंडी रॉडनं मारते असा एक प्रसंग आहे. त्यावेळेस थियेटरमध्ये टाचणी पडल्यावर आवाज होईल इतकी शांतता होती. पण मागच्याच लाईनमध्ये बसलेली एक मुलगी त्वेषानं ओरडली, 'मार, मार त्याला.' इतकी आक्रमक प्रतिक्रिया अपेक्षित नसल्यामुळे मी आश्चर्यानं मागे वळून पाहिलं तेव्हा ती अभिमानमिश्रित त्वेषानं स्क्रीनकडे बघत होती. ती बहुतेक तिची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असावी. किंवा पडद्यावर पुरुषी तुच्छतावादासोबत झगडणाऱ्या मीराला साकारत असलेल्या अनुष्का शर्मामध्ये ती आपणासारख्या अनेकांना पाहात असावी.

अनुष्का शर्माचं तिच्या कामावरून बरंच कौतुक होतं, कधी टीका होते, तर कधी विराट कोहलीची 'पनवती ' म्हणून ट्विटरवरचं पुरुषी जग तिच्यावर अस्थायी आणि असभ्य टीका करतं. पण अशा काही तिच्यापर्यंत पोहोचलेल्या आणि काही न पोहोचलेल्या प्रतिक्रिया तिला बळ देत असाव्यात. पुरुषी वर्चस्वाशी अनुष्का 'एन एच 10'मधल्या मीरासारखीच प्रत्यक्ष आयुष्यात लढत असते. आज तुम्ही भारतीय सिनेमा किंवा बॉलिवुडचा अभ्यास करत असाल तर अभिनेत्री आणि निर्माता असणाऱ्या अनुष्का शर्माला टाळून तुम्ही पुढं जाऊ शकत नाही. 

अनुष्काचा जन्म १९८८चा. तिचा जन्म अयोध्येमध्ये झाला. त्याच कालखंडात अयोध्येमुळेच अस्थिरतेचं वारं देशभरात फिरायला लागलं होतं. अनुष्काचे वडील लष्करात अधिकारी आहेत. लष्करी शिस्तीत अनुष्काचं बालपण गेलं. त्यामुळे तिनं सध्या बहुसंख्याच्या झुंडीविरुद्ध एखादं मत मांडलं की, ऑनलाईन ट्रोल्सच्या फौजा जेव्हा तिच्यावर धावून जातात आणि ‘तू देशासाठी काय केलं आहेस?’ असे तद्दन प्रश्न विचारायला लागतात, तेव्हा अनुष्का त्यांना टिच्चून सांगते – ‘माझे वडील लष्करी अधिकारी आहेत. तुमच्या घरात कोणी लष्करात आहे का?’ बहुतेक ट्रोल्सची बोलती तिथंच बंद होते.

अनुष्काला लहानपणापासूनच मॉडेलिंग किंवा पत्रकारितेमध्ये कारकीर्द करण्याची इच्छा होती. आपल्या आयुष्यातला पहिला रॅम्प वॉक अनुष्कानं केला, तेव्हा तिचं वय होतं अवघं पंधरा वर्ष. अनुष्काच्या कारकिर्दीचं अवलोकन केलं असता एक जाणवतं की, फार कमी वयात तिला महत्त्वाच्या संधी मिळाल्या आणि काही संधी तिनं निर्माण केल्या. आदित्य चोप्राचा शाहरुख खान सोबतचा 'रब ने बनाइ जोडी' हा पहिला सिनेमा तिनं केला, तेव्हा तिचं वय होत वीस वर्ष. 'एन एच 10' ची निर्मिती तिनं केली, तेव्हा तिचं वय होतं अवघ पंचवीस. माझ्यासकट आजूबाजूला तिशीत पण गोंधळलेल्या लोकांचा गोतावळा बघून इतक्या लहान वयातही अनुष्काला आयुष्याबद्दल इतकी क्लॅरिटी कशी काय आली असेल याचं आश्चर्य वाटतं.

याची मुळं बहुतेक लष्करी शिस्तीत गेलेल्या बालपणात असावीत. अनुष्का नेहमीच इंडस्ट्रीमधल्या कचकड्याच्या बाहुल्यांपेक्षा वेगळी होती. तिला वादविवादात अडकायला आवडत नाही, पण इंडस्ट्रीमध्ये ती स्पष्टवक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. यातूनच शाहरुख खानला तोंडावरच 'तू अभिनेता म्हणून ठीक आहेस, पण माणूस म्हणून जास्त चांगला आहेस.' हे सांगण्याचं धाडस तिच्यात आलं असावं. शाहरुख खान हा अनुष्काचा पहिल्या चित्रपटातला सहकलाकार. त्यासोबतच तो अनुष्काचा खूप चांगला मित्रही आहे. त्यालाही अनुष्काचा स्पष्टवक्तेपणा भावला असणार.

'रब ने  बना दी जोडी' हा अनुष्काचा पहिला चित्रपट तद्दन यशराजचा सिनेमा होता. तोच पंजाब, तीच पंजाबी ठेक्याची गाणी, अतर्क्य घटनांची रेलचेल, वास्तविकतेला फाट्यावर मारणारी पटकथा अशा सर्व गोष्टींची या सिनेमात रेलचेल होती. पण चित्रपटात शाहरुख होता. त्यामुळे तो हिट होणार होताच. तसा तो झालाही. पिवळ्या सूटमधल्या अनुष्का शर्माची पोस्टर्स देशभरात लागली. लोकांच्या मनात ही पिवळ्या सूटमधली सुंदर मुलगी बसली. खरं तर या चित्रपटासाठी अनेक सुंदर मुलींनी ऑडिशन दिली होती. अनुष्कापेक्षाही सुंदर मुली त्यात होत्या. पण आदित्य चोप्राला अनुष्कामध्ये भूमिकेसाठी लागणारा 'इट' फॅक्टर जाणवला. त्याने अनुष्काला साइन करताना सांगितलं, "तू कदाचित सगळ्यात सुंदर मुलगी नसशील, पण तुझ्या-वागण्या बोलण्यात एक प्रामाणिकपणा आहे. तो तसाच राहू दे." समोर शाहरुख खान असून अनुष्कानं चित्रपटात प्रेक्षकांना आपली नोंद घ्यायला लावली.

नंतर आलेले 'बदमाश कंपनी' आणि 'पटियाला हाऊस' सरासरीच होते. प्रेक्षकांनी  या चित्रपटांना  थंड प्रतिसाद दिला. पण 'बँड बाजा बारात' आला आणि अनुष्का किती चांगली अभिनेत्री आहे, हे जगासमोर आलं. दोन नवोदित वेडिंग प्लॅनरची आगळीवेगळी प्रेमकथा दाखवणाऱ्या या चित्रपटात अनुष्कानं श्रुती कक्कर या फायर ब्रँड दिल्लीच्या पोरीची भूमिका केली होती. अनेक बाबतीत श्रुती कक्करच प्रत्यक्षातल्या अनुष्काशी साधर्म्य होतं. श्रुती ही अनुष्काप्रमाणेच स्पष्टवक्ती, काहीशी फटकळ, मनात काही न ठेवणारी आणि आयुष्याबद्दल स्पष्टता असणारी होती. त्यामुळेच अनुष्कानं ही भूमिका चांगल्या प्रकारे वठवली असावी.

अनुष्काची 'पीके'मधली जगत जननीची भूमिकाही गाजली. या चित्रपटाच्या दणदणीत यशामुळे अनुष्का सध्या इंडस्ट्रीमधली एकमेव तीनशे करोड क्लबमधली अभिनेत्री आहे. पण याच काळात 'बॉम्बे वेल्वेट'चं डोंगराएवढं अपयश  तिन पचवलं. यश चोप्रांसोबत 'जब तक है जान' करण्याचं सौभाग्य तिला प्राप्त झालं. पण खरं सांगायचं तर तो चित्रपट अतिशय वाईट होता. 'सुलतान' हिट झाला असला तरी त्यात रेसलरच्या भूमिकेत ती मला तरी कन्विन्सिंग वाटली नव्हती. इम्तियाज अलीने 'रॉकस्टार' आणि 'तमाशा' पहिले तिला ऑफर केला होता. पण वेगवेगळ्या कारणांमुळे तिने ते नाकारले. दोन्ही चित्रपट चित्रपटरसिकांच्या एका विशिष्ट अभिरुची असणाऱ्या वर्गात लोकप्रिय आहेत. दुर्दैवानं इम्तियाज अलीसोबत काम करण्याचा मुहूर्त लागला तो 'हॅरी मेट सेजल'मध्ये. जो इम्तियाज अलीच्या सगळ्यात वाईट सिनेमा म्हणून ओळखला जातो.

मला स्वतःला अनुष्काचं अभिनेत्री असण्यापेक्षा निर्माता म्हणून जे योगदान आहे, ते जास्त भावतं. याबाबतीत अनुष्काचं जॉन अब्राहम या अभिनेत्याशी साधर्म्य आढळतं. अभिनयात माठ असणारा जॉन हा कथानकाचा उत्तम सेन्स असणारा निर्माता आहे. 'स्पर्म डोनेशन'सारख्या संवेदनशील विषयावर भाष्य करणारा 'विकी डोनर' आणि राजीव गांधी हत्येसारख्या राजकीय विषयावर 'मद्रास कॅफे' अशा चित्रपटांची निर्मिती त्यानं केली आहे.

अनुष्का ही अर्थातच जॉनपेक्षा हजार पटीनं चांगली अभिनेत्री आहे. पण अभिनेत्री म्हणून तिच्या कारकिर्दीत अनेक चढउतार आहेत. निर्माता म्हणून तिची विषयांची आणि कथानकांची निवड तिच्या बुद्धिमानता दाखवते. अनुष्कानं आतापर्यंत तिन्ही खान, अक्षय कुमार, रणबीर सिंग आणि जवळपास सर्व आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. राजकुमार हिराणी, करणं जोहर, चोप्रा पिता पुत्र, अनुराग कश्यप अशा आघाडीच्या दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. पण ही पुरुषप्रधान फिल्म इंडस्ट्री आहे आणि कितीही चांगला अभिनय करत असलो तरी पुरुष सुपरस्टारच्या तुलनेत आपलं दुय्यम स्थान आहे, हे अनुष्काला डाचत होतं.

इंडस्ट्रीमध्ये नायिकेला तुम्ही दुय्यम आहात हे दाखवून देण्याचे अनेक मार्ग असतात. जेव्हा शूटिंगसाठी आउटडोअरला गेलेलं युनिट एखाद्या हॉटेलमध्ये उतरतं, तेव्हा त्या हॉटेलमधला सर्वोत्कृष्ट सूट नायकासाठी रिजर्व असतो. नायिका कितीही लोकप्रिय असली तरी तिला ती रूम मिळत नाही. लोकेशनवर पण सगळं युनिट नायकाची बडदास्त ठेवण्यात गुंग असतं. शूट करताना नायकाला जास्त फुटेज मिळेल, हे बघितलं जातं. शिवाय नायिकाप्रधान कथानकांवर सिनेमा बनण्याचं प्रमाण एकदमच कमी असतं. अनुष्काला आयुष्यभरासाठी वेगवेगळ्या नायकांची सेकंड फिड्ल बनण्यात स्वारस्य नव्हतं. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपणच काहीतरी करायला पाहिजे असं अनुष्काला वाटलं.

त्याचवेळेस देशात निर्भया प्रकरणामुळे अस्वस्थता होती. स्त्रियांना आपल्या सुरक्षिततेबद्दलच्या शंका भेडसावत होत्या. एक स्त्री म्हणून अनुष्काला आपण यासाठी काहीतरी करावं असं तीव्रतेनं वाटत होतं. दिग्दर्शक नवदीप सिंग 'एन एच १०'ची स्क्रिप्ट घेऊन तिला अॅप्रोच झाला, तेव्हा आपल्याला वाटणारी अस्वस्थता आपण सिनेमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवू शकतो असं अनुष्काला वाटलं. 'एन एच 10'मधल्या मीराचा प्रतिगामी विचारसरणीवरच्या पुरुषांवरचा हल्लाबोल बघून अनेक स्त्रियांच्या भावनांचा निचरा झाला. अवघ्या तेरा कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या 'एन एच 10'ने तेहतीस कोटी कमावले.

.............................................................................................................................................

निवडक नरहर कुरुंदकर : खंड तीन (ग्रंथवेध) – संपादन – विनोद शिरसाठ,

देशमुख आणि कंपनी, पुणे, पाने – ३२०, मूल्य – ३२५ रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4291

.............................................................................................................................................

निर्माता म्हणून पुढचा सिनेमा हा एक अजून वेगळा प्रयोग होता. 'फिलौरी'मध्ये अनुष्कानं फ्रेंडली भुताचा रोल केला होता. एकवीस कोटींमध्ये बनलेल्या या सिनेमानंही चांगला धंदा केला. आता निर्माता म्हणून अनुष्काचा पुढचा सिनेमा आहे 'परी'. त्याचे काही स्टील्स इंटरनेटवर आले आहेत. बघितले नसतील तर गुगलवर शोधून बघा. त्यातला अनुष्काचा लूक हॉन्टिंग आहे. विझलेली नजर, डोळ्याखाली काळी वर्तुळं आणि बारीक कापलेले केस या बॉलिवुडच्या नायिकेला न शोभणाऱ्या अपरंपरागत लूकमध्ये अनुष्काला बघणं हा जबरी अनुभव आहे. एकूणच चित्रपटनिर्मितीमध्ये बॉलिवुडच्या अभिनेत्रींनी फार कमी ठसा उमटवला आहे. अनुष्का हा त्याला जोरदार अपवाद ठरत आहे. 

क्रिकेट आणि बॉलिवुड हे आपल्याकडचं डेडली कॉकटेल आहे. देशातला सध्याचा सगळ्यात लोकप्रिय क्रिकेटपटू असणारा विराट कोहली आणि सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असणारी अनुष्का शर्मा, हे नातेसंबंधात असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकू लागल्या आणि लगेच याची चुणूक कळली. विराट खेळत असणाऱ्या ज्या ज्या मॅचला अनुष्का उपस्थित असते, ती ती मॅच आपण हरतो, असा जावईशोध समाजमाध्यमांवरच्या स्वयंघोषित विचारवंतांनी लावला. आणि नशीब, पनौती, पांढऱ्या पायाची स्त्री अशा जुनाट कल्पनांना कवटाळून बसलेल्या लोकांनी अनुष्कावर अतिशय अश्लाघ्य आणि कंबरेखालची टीका सुरू केली. अनुष्का या रिकामटेकड्या आणि आयुष्यात काहीही भरीव न केलेल्या लोकांची टीका ऐकून घेणाऱ्यातली नव्हतीच. शेवटी लष्करात असणाऱ्या बापाची पोर. तिने ट्विटरवर या ट्रोल लोकांवर सणसणीत प्रतिहल्ला केला. विराट अनुष्काच्या मागे समर्थपणे उभा राहिला. अनुष्का असं सतत तिच्या गरिमेवर हल्ला करणाऱ्या लोकांशी सतत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे झगडत असते. पडद्यावर आणि पडद्याबाहेरही.

इंडस्ट्रीमध्ये अनुष्कापेक्षा टॅलेंटेड आणि सुंदर मुली आहेत. अनुष्का कदाचित कॅटरिना कैफ इतकी सुंदर नसेल. दीपिका पदुकोण इतके पैसे तिला मिळत नसतील. प्रियांका चोप्रासारखं ग्लोबल अपील तिला नसेल. आलिया इतका नैसर्गिक अभिनय तिचा नसेल. पण स्वतःचं स्थान निर्माण करण्याची उर्मी, स्पष्टवक्तेपणा, धोका पत्करण्याची तयारी, हे गुण अनुष्काला इतरांपासून वेगळे बनवतात. बॉलिवुडला अजून काही अनुष्का शर्मांची नितांत गरज आहे. 

.............................................................................................................................................

लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 04 December 2017

चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी कशासाठी करवून घेतली? असं करणं फेमिनिझमच्या तत्त्वांत बसतं का? मुळांत इथे फेमिनिझम आलाच कुठून ? असो. -गा.पै.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......