अजूनकाही
१. पाचशे-हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाने काळाबाजार करणारे, करचोरी करणारे आणि भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमवलेल्यांना त्रास होणारच. पण तुम्ही (राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, मुलायमसिंह यादव) त्यास का विरोध करत आहात, तुम्ही काळ्या पैशाच्या बाजूने आहात की विरोधात, दहशतवादी कारवायांना होणाऱ्या वित्तपुरवठ्याच्या विरोधात आहात की बाजूने, याबाबत तुमची भूमिका एकदा स्पष्ट करा : अमित शाह
अमितुद्दीन मियाँ, जो नोटाबदलीचा टीकाकार तो काळ्या पैशाचा पुरस्कर्ता, ही आयडिया जो सरकारच्या विरोधात, तो देशद्रोही याइतकीच भंपक आहे. या तुघलकी पद्धतीने अंमलात आलेल्या निर्णयाच्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ने काळा पैसावाल्यांच्या आधी देशातली हातावर पोट असणारी सामान्य जनता घायाळ झाली आहे. तिच्या वेदनेवर फुंकर घालता येत नसेल, तर मीठ तरी नका चोळू.
..........
२. देशभरात आता मीठटंचाईची अफवा, १४-१५ रुपये किलोचं मीठ दोनशे ते चारशे रुपये किलोनं विकत घेण्यासाठी गर्दी
या अफवा पसरवून मीठ विकणारे जुन्या चलनात नोटा स्वीकारत असतील काय? म्हणजे पाचशेची जुनी नोट तीसेक रुपयांत खिशात घालण्याचीच आयडिया. तिचं नव्या चलनात रूपांतर करायला आणखी दीड महिना आहेच. अहा रे काळ्या पैशांवरचा स्ट्राइक.
..........
३. राहुल गांधींनीही रांगेत उभं राहून नोटा बदलून घेतल्या, स्टंटबाजी केल्याची भाजपची टीका
यावर, म्हणजे ही स्टंटबाजी असल्यावर विश्वास ठेवणं कठीण जातंय, कारण, एकाही भाजप नेत्याने ती का बरं केली नाही? पंतप्रधान मोदी जपानहून परत येऊन दोन हजाराच्या नोटेसोबत सेल्फी कधी काढतायत, याची वाट पाहत असणार. त्यांच्याआधी सेल्फी काढला तर फाऊल धरत असतील ना पक्षात?
..........
४. नोटांच्या आकारानुसार तांत्रिक बदल करावे लागणार असल्याने एटीएम पूर्ववत व्हायला आणखी दोन ते तीन आठवडे लागतील : अर्थमंत्री अरुण जेटली
म्हणजे आणखी तीन आठवडे बँकांपुढे रांगा, मनुष्यतासांचा चुराडा, व्यापारात खोट, देशाच्या उलाढालीला ब्रेक. नोटा बदलण्यासाठी नव्या नोटा छापण्याची आणि जुन्या नष्ट करण्याची किंमत वेगळीच. या सगळ्याच्या टोटलइतका तरी काळा पैसा बाहेर येईल का या उपद्व्यापातून?
..........
५. काळ्या पैशावर ३० डिसेंबरनंतर आणखी एक सर्जिकल स्ट्राइक : पंतप्रधान नरेंद्र मोदी
काळापैसेवाले हसत असतील गालातल्या गालात. त्यांनी सगळी परम्युटेशन-कॉम्बिनेशन करून बांधबंदिस्ती करून टाकली असणार. आता ही बातमी वाचल्यावर धडकी भरणार ती हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांना, छोट्या व्यापाऱ्यांना, नोकरदारांना आणि शेतकऱ्यांना. दिवाळीतला बाण कधीकधी उलटी बाटली कलंडून वेडावाकडा शिरतो वस्तीत, तसला प्रकार झाला हा!
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment