अजूनकाही
गुजरात विधानसभा निवडणूक सर्व बाजूंनी राष्ट्रीय आस्थेचा विषय बनली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसारमाध्यमांचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. गुजरातमध्ये नेमकी कुणाची सरशी होणार, का होणार, सध्याचं गुजरातमधील वातावरण कुणाला अनुकूल आहे, का आहे, अशा विविध प्रश्नांविषयी गुजरातमधील सर्वसामान्य जनतेपासून अभ्यासकांपर्यंत अनेकांशी प्रत्यक्ष बोलून निरीक्षणं मांडणारी ही खास लेखमालिका... फक्त ‘अक्षरनामा’वर.
..............................................................................................................................................
गुजरातच्या निवडणुकीचा वेध घेताना या राज्याच्या एकूण राजकारणाचा आवाका असणार्या भाष्यकाराचा शोध आम्ही सुरू केला. यात आम्हाला ‘टी.व्ही 9’साठी रिपोर्टिंग करणारा युवा पत्रकार भेटला. त्याच्याशी स्थुल चर्चा झाली. त्याने या वेळी गुजरातमध्ये तुल्यबळ स्पर्धा आहे, असं सांगितलं. त्याचं निरीक्षण महत्त्वाचं होतं, कारण तो जिथं भेटला तिथं साबरमती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवण्याचा आटापिटा अन संघर्ष सुरू होता. पक्षांतर्गत संघर्ष पाहताना काँग्रेसमध्ये चैतन्य आलेलं आहे असं वाटलं. सत्तेत नसलेल्या पक्षात तिकिटासाठी संघर्ष होतो, याचा साधा, सरळ अर्थ पक्ष स्पर्धेत आहे, कार्यकर्त्यांच्या मनात पक्षाबाबतचा विश्वास वाढतोय.
याच युवा पत्रकाराला आम्ही गुजरातचं राजकारण किंवा विकासाची भूमिका समजून घेण्यासाठी कुणाला भेटलं पाहिजे असं विचारलं. त्यानं डॉ. शिरीष कासेकर यांचं नाव सांगितलं. ते एका संस्थेत पत्रकारितेच्या विभागात मार्गदर्शक आहेत. काशीकर यांची संस्था अहमदाबादच्या सधन वस्तीत आहे. ही संस्था अतिशय भव्यदिव्य (आपल्याकडील मॉलसारखी) इमारतीत आणि एस.जी. हायवे या महत्त्वाच्या महामार्गावर आहे.
त्यांच्याकडे जात असताना लिफ्टमध्ये एक मध्यमवर्गीय महिला भेटल्या. त्या व्हॉटसअॅप बघत होत्या. त्यांना सहज विचारलं की, ‘सोशल मीडिया तुम्ही कशासाठी वापरता?’ त्यावर त्या म्हणाल्या, “आम्ही सोशल मीडियाचा वापर केवळ व्यवसायासाठी करतो. बाकी व्हॉटसअॅपवर येणार्या गोष्टी पाहायला आम्हाला वेळ नाही आणि त्यात रसही नाही.” आधुनिक माध्यमाबाबतचा हा गुजराती व्यावसायिक दृष्टिकोन आम्हाला विचारात पाडून गेला.
डॉ. शिरीष काशीकर मूळचे महाराष्ट्रातले असल्यानं त्यांच्यासोबतची चर्चा मराठीत सुरू झाली.. आम्हाला गुजरातचं एकूण राजकारण समजून घ्यायचं होतं. त्या अनुषंगानं प्रश्न विचारल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, “आज गुजरात विकासाच्या बाबतीत उंचीवर आहे. या विकासाचं श्रेय नरेंद्रभाईंना जातं. मात्र त्यांनी जो विकास केला, त्याची बरीच मुळं केशुभाई भाजपचे मुख्यमंत्री असताना रोवली गेली आहेत. केशुभाईंनी गुजरातमध्ये शेततळ्यांच्या माध्यमातून शेतीतील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काम सुरू केलं, त्यावेळी गुजरातच्या सौराष्ट्र व कच्छमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. १९८५ च्या दरम्यान गुजरातच्या काही भागात तर पाण्याचा प्रश्न इतका गंभीर होता की, अहमदाबादहून राजकोटला ट्रेननं पिण्यासाठी पाणी न्यावं लागत होतं. केशुभाईंनी सुरू केलेलं पाण्यासंदर्भातील काम पुढे नरेंद्रभाई पुन्हा सत्तेत आल्यानंतरदेखील पुढे नेलं. त्यामुळे १० जिल्ह्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. गुजरात मॉडेलचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्यं काय असेल तर शेतीसाठी पाणी. गुजरातमधील शेतीचं उत्पन्न वाढण्यात या कामाचं मोठं योगदान आहे.
“नरेंद्रभाईंचं दुसरं योगदान शेतीसाठी उपलब्ध करून दिलेली वीज. त्यांनी वीजेचा प्रश्न सोडवला आणि वीजचोरीचा प्रश्न मिटवला. वीजचोरीला आळा घालताना त्यांना नाराजीचा सामना करावा लागला, मात्र त्यांनी सर्वांना विश्वासात घेतलं. वीजचोरी टाळली तर त्यात सामान्यांचं काय हित आहे, हे पटवून दिलं. त्यामुळे वीजचोरी थांबून शेतकर्यांना उत्तम प्रकारे वीज मिळू लागली. परिणामी पाणी असताना केवळ विजेच्या अनियमिततेमुळे शेतीच्या उत्पन्नावर होणारा परिणाम टाळता आला. वीजेचा प्रश्न मार्गी लावताना नरेंद्रभाईंनी शेतकरी, छोटे व्यवसाय आणि मोठे व्यवसाय या सर्वांना अपेक्षित क्षमतेची वीज मिळेल, अशी व्यवस्था केली. त्याचा फायदा गुजरातच्या सर्वांगीण विकासाला झाला. नरेंद्रभाईंच्या पुढाकारानं गुजरातचा जो विकास झाला, तो मोठ्या अभ्यासाचा विषय आहे.”
कासेकरांच्या मांडणीतला दुसरा मुद्दा असा होता, “गुजरातच्या विकासाची आणि भाजपच्या गुजरातमधील वाढीची कथा संघर्षाची आहे. गुजरातमध्ये १९९५ नंतर फार मोठी राजकीय अस्थिरता होती. ९५ पासून जवळपास २००१ या काळात राज्यात अनेकदा राजकीय नेतृत्व बदल झाला. सत्तापालटाच्या काळात सामाजिक संघर्षांची तीव्रता वाढली होती. जातीयवाद मोठ्या प्रमाणात होता. काँग्रेसनं जी खाम थिअरी आणली, त्याचा काँग्रेसला तात्कालिक फायदा झाला, मात्र त्याचे दुष्परिणाम गुजरातची जनता भोगत होती. त्याच काळात राजकीय संघर्ष शिगेला पोहचला होता. त्यामुळे गुजरात हे दंगलीसाठी प्रसिद्ध राज्य बनत चाललं होतं. दर दहा दिवसाला इथं अनेक ठिकाणी कर्फ्यू लावावा लागत होता. धार्मिक संघर्ष विचित्र झालेला होता. समाजमन अस्वस्थ होतं. अशा काळात नरेंद्रभाईंनी सूत्रं हाती घेतली. राज्याच्या विकासाची घडी बसवताना त्यांच्या काळात सुरुवातीला गोध्रा घडलं. त्यामुळे नरेंद्रभाईंच्या राष्ट्रीय प्रतिमेला तडा गेला. मात्र त्या अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करत त्यांनी राज्याचा विकास सुरू ठेवला. खासकरून त्यांनी मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे काही अपवाद वगळले तर नरेंद्रभाईंच्या विकासाबाबत मुस्लिम समाजदेखील खूश आहे. मुस्लिमबहुल भागाचा विकास झाल्यानं मुस्लिमांचा भाजपला पाठिंबा वाढला. अलिकडे तर मुस्लिम समाज अंतर्गतदेखील भाजपची संघटना आहे.
“मोदींच्या विकासाच्या भूमिकेनं गुजरातच्या सगळ्याच भागात भाजप प्रभावी आहे. भाजपनं पाटीदार समाज असो किंवा दलित असो, किंवा अगदी शेतकरी... प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र व दाखवता येईल, असं काम केलेलं आहे. त्यामुळे भाजप आज गुजरातमध्ये सुस्थितीत आहे. नरेंद्रभाई प्रेरणादायी नेते आहेत. त्यांनी उद्योगाला प्राधान्य देण्यासाठी नोकरशाहीची तशी मानसिकता बनवली. उद्योगधंद्याला चालना देण्यासाठी ते उद्योगपतींना परदेशात घेऊन गेले. त्यामुळे तिकडचा विकासाचा दृष्टिकोन गुजरातमध्ये आला आणि गुजरात सुजलाम् सुफलाम् झाला.”
ही सगळी सकारात्मक बाजू मांडल्यानंतर काशीकरांनी गुजरातच्या प्रश्नावर भाष्य केलं. त्याविषयी बोलताना ते म्हणाले, “शिक्षणाचं खाजगीकरण ही गुजरात समोरची मोठी समस्या आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील प्रश्न अजूनही मोठ्या प्रमाणात आहेत. शेतीच्या हमीभावाचा प्रश्न आहे. या प्रश्नांचा सामना आगामी काळात गुजरातला करायचा आहे. भाजपचं नेतृत्व याचा सामना करू शकतं, कारण त्यांना गुजरातची पाळंमुळं माहीत आहेत. काँग्रेसला गुजरातमध्ये नेमकं कोणते प्रश्न आहेत, ते कळलेलं नाही. त्यांना अंतर्गत मतभेद मिटवता आलेले नाहीत. त्यामुळे गुजरातची काँग्रेस अस्तित्वाच्या संघर्षात आहे. या वेळी काँग्रेसला दमदार विरोधक होता आलं असतं, तर पुढच्या वेळी ते सत्तेचा दावा करू शकले असतं, मात्र काँग्रेस अजूनही राज्यातल्या प्रश्नावर गंभीर होण्याऐवजी जीएसटीच्या बुरख्यात अडकली आहे.”
शिरीश कासेकर भाजपची सकारात्मक बाजू जोरदार मांडत होते, आम्ही ऐकत होतो. त्यांचं ऐकताना राज्य सत्तेत असताना असे समर्थक अभ्यासक/ भाष्यकार तयार होणं, ही राज्याची गरज असते. ती भाजपनं घडवलेली आहे, हेही आमच्या सहजच लक्षात आलं. अलिशान इमारतीत बसणारे कासेकर गुजरातच्या शहरी- ग्रामीण, हिंदू–मुस्लिम, दलित–आदिवासी यांचा जो विकास मोदींनी घडवला, तो घडवताना त्यांनी नेहमी दीर्घकालीन पक्षहिताचं ध्येय समोर ठेवलेलं दिसतं. जे करतात त्यात सातत्य असतं.
ही विकासकथा कासेकरांकडून ऐकल्यानंतर लगेच काही गोष्टी लक्षात येत होत्या. कासेकरांच्या मांडणीत एकूणच सत्ताधारी प्रेम दिसत होतं. त्यांच्या मांडणीचा अंदाज घेतल्यावर त्यांच्याविषयी कुतूहल वाढलं. त्या उत्कंठतेत आम्ही त्यांच्याविषयी अधिकची माहिती घेतली, तर एवढंच कळलं की, ते ज्या संस्थेत आहेत, ती भाजपच्या महत्त्वाच्या संघटनेशी निगडित आहे.
या भाजपच्या बाजूच्या मांडणीनंतर आम्ही महाश्वेता जानी या राज्यशास्त्राच्या प्राध्यापक अभ्यासकांना भेटलो. महाश्वेता जानी या दिल्लीस्थित सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज या संस्थेसाठी गेलं दशकभर कार्यरत आहेत. त्यांचे पती पत्रकारितेत आहेत, तर वडील दलित चळवळीतील प्रसिद्ध नेते आहेत. त्याचबरोबर गुजरातमधील भ्रष्टाचाराचा लढा त्या काँग्रेस सत्तेत असल्यापासून देत आहेत. त्याशिवाय जानींच्या वडिलांनी जयप्रकाशांच्या नवनिर्माण आंदोलनातही सहभाग घेतला होता.
जानी यांची जडणघडण दलित चळवळीत झाली. त्यांना भेटताना भाजप सत्तेत येण्याच्या संधी जास्त आहेत, हे आमच्या मनात पक्कं व्हायला लागलं होतं, पण त्यांच्या मांडणीनं त्याला छेद दिला. गुजरात निवडणुकीचं सर्वेंक्षण गेल्या काही महिन्यांत जवळपास तीन वेळा झाल्यानं त्यांच्या म्हणण्याला वास्तवाची तात्कालिक किनार आहे. त्या म्हणाल्या, “एकतर भाजप एकतर्फी सत्तेत येईल असं मला आता वाटत नाही. कारण गेल्या दोन सर्व्हेत मोदींची गुजरातमधील लोकप्रियता जवळ १५ टक्यांनी कमी झालेली आहे. त्यातच यावेळी गुजरातमधील सामाजिक प्रश्नांना संघटित राजकीय भावनेचं स्वरूप आलेलं आहे. यावेळी आम्ही लोकांना तुमचं मत ठरवण्याचं प्रमुख कारण काय असेल असं विचारलं, तर त्यात बेरोजगारी हा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा असल्याचं सर्वाधिक तरुणांनी सांगितलं आहे. त्यामुळे ही निवडणूक तरुणांच्या हाती आहे.
“मोदीजी रोजगार देऊ शकतील याबाबत तरुणांच्या मनात विश्वास दिसत नाही. विशेषतः यावेळी अल्पेश ठाकूर हा फॅक्टर अधिक महत्त्वाचा राहिल, कारण ओबीसी व्होट बॅंक. त्याचबरोबर अल्पेशला काँग्रेसची पार्श्वभूमी आहे. त्याला राजकारण माहीत आहे. त्याला राजकारणाची पार्श्वभूमी आहे. त्याचबरोबर त्याने हाताळलेले प्रश्न सामाजिक आहेत. त्यात व्यापक समाजहिताचा जिव्हाळा आहे.”
याशिवाय यावेळी जनता परिवर्तनाच्या स्थितीत असल्यानं भाजपच्या अपक्षांना बळ देण्याच्या खेळीचा परिणाम फारसा होणार नाही. ‘केशुभाई पटेल फॅक्टर’ भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. मायावतीच्या बसपाला यावेळी जनता गांभीर्यानं घेईल असं वाटत नाही. त्यात आजवर कोळी पटेल या शेतकरी जातीचं मतदान भाजपला होत होतं, यावेळी शेतमालाचे भाव पडल्यानं तेही भाजपला आव्हान आहे. बनासकाठा आणि म्हैसाणा या जिल्ह्यांत भाजपवर जनता मोठ्या प्रमाणात नाराज आहे. बनासकाठा हा डेअरी उद्योगात आघाडीवर असलेला जिल्हा आहे. इथले शेतकरी शेती आणि त्यांच्या एकूण व्यावसायिक अडचणीमुळे भाजपवर नाराज आहेत. त्यातच बनासकाठामध्ये गेल्या वेळी आलेल्या पुराच्यावेळी भाजपला तो प्रश्न हाताळण्यात अपयश आलेलं आहे. ते प्रशासनाचं होतं, मात्र ते मोदींच्या अनुपस्थितीच्या काळातील आहे. त्यातच मोदी केंद्रात गेल्यापासून राज्य सरकार आत्मविश्वास गमावून बसलं आहे अशी जनभावना आहे. गेल्या तीन निवडणुकींमध्ये मोदी स्वतःसाठी मतं मागत होते, आता ते अपयशी ठरलेल्या विजय रुपानी आणि नितीन पटेल यांच्यासाठी मतं मागत आहेत. त्यामुळे या गोष्टीचा जनता विचार करेल, असं सर्वेक्षण आणि त्यातील अनुमानावरून सांगता येईल.
भाजपसाठी सकारात्मक गोष्ट ही आहे की, मोदींच्या राजवटीवर शहरी महिला खुश आहेत. तर उज्वला योजनेच्या लाभार्थी ग्रामीण भागातदेखील खूश आहेत. कारण या योजनेमुळे त्यांना गॅस मिळालेला आहे.
या निवडणुकीत काँग्रेसला जिंकण्याची थोडीशी संधी आहे. पण काँग्रेस जिंकेल की नाही, यापेक्षा या निवडणुकीच्या वातावरणाचा फायदा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत होईल. कारण काँग्रेसच्या जागा वाढतील. काँग्रेसची मतपेटी अधिक मजबूत होईल. त्यातून काँग्रेसला पुढचा प्लॅन करता येईल.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287
.............................................................................................................................................
या दोन्ही अभ्यासकाकडे महत्त्वाचे मुद्दे आहेत. पण तरीही एक बाजू घेऊन बोलत आहेत, असं वाटलं. मात्र त्यांच्या आपापल्या स्तरावर त्या योग्य आहेत. त्यांना दिसणार्या गोष्टींना भूमिकेची मात्र मर्यादा आहे.
काँग्रेस आणि भाजपसाठी ही महत्त्वाची निवडणूक आहे. भाजप जिंकण्यासाठी लढतोय, असं समारोपाच्या वेळी कासेकर सांगत होते, तर जानी म्हणत होत्या, काँग्रेस २०१९ ची भूमी आपल्यासाठी तयार करत आहे. यात भाजपची चर्चा आणि जनभावना पाहता भाजपला सत्ता मिळेल, हे आकलन मतांची आकडेवारी\टक्केवारी बदलू शकतं, या महाश्वेता यांच्या म्हणण्याला गांभीर्यानं घ्यावं लागतं.
त्यांचा सिंपल फंडा आहे. त्या म्हणतात, “गेल्या महिनाभरात मोदींची गुजरातमधील लोकप्रियता १५ टक्यांनी घसरली आहे. ती आणखी घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुजरातमधील गेल्या अनेक निवडणुकीत (२०१४ लोकसभा वगळून) भाजप-काँग्रेस यांच्यात १० टक्के अंतर राहिलेलं आहे. आता काँग्रेसबद्दल आशावाद आहे, तर भाजपबद्दल २२ वर्षांची अँटीइन्कबन्सी आहे. १० टक्के मते शेवटच्या टप्यात काँग्रेसकडे वळली, तरीही ती फार मोठी सकारात्मक बाजू ठरू शकेल. सध्याची गुजरातची मानसिकता पाहता ते आता शांत आहेत, मात्र ते जेव्हा मतपेटीकडे जातील, तेव्हा सत्ता येईल, अशी भावना त्यांच्या मनात ठसलेली असेल.”
जानी यांचा हा निष्कर्ष भाजपची चिकित्सा करणारा असला तरी त्यांच्या सर्वेक्षण व अभ्यासाचा आवाका आणि अनुभव पाहता त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. गुजरातमध्ये परिवर्तनाला काठावर संधी आहे, मात्र ती अनेकानेक जर-तर अवलंबून आहे.
.............................................................................................................................................
या मालिकेतल्या इतर लेखांसाठी पहा
.............................................................................................................................................
लेखक किशोर रक्ताटे ‘स्ट्रॅटेजी कन्सल्टन्ट’ या संस्थेचे संचालक आहेत.
kdraktate@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment