अजूनकाही
१. महामार्गावरील टोलनाके बंद करण्याचं धोरण चुकीचं आहे. हे नाके बंद केल्याचा ताण सरकारी तिजोरीवर पडत आहे, असं वक्तव्य केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. विरोधी पक्षात असताना टोलनाके बंद करण्यासंदर्भात घेतलेली भूमिका चुकीची होती. परंतु उभ्या आयुष्यात सत्तेत येणार नाही याची खात्री असल्यानं आम्ही विरोधात असताना अशी भूमिका घेत होतो, असं ते म्हणाले. आता टोल नाके बंद झाल्यानं राज्यावर प्रचंड ताण पडत आहे, असं गडकरी म्हणाले.
दिसतोच आहे तो ताण सर्वत्र. रस्ते त्या लायकीचे नसताना टोलनाके उभारण्याचा ताण, त्यांचं समर्थन करण्याचा ताण. रस्त्यांच्या आधी टोलनाके उभारण्याचा ताण. त्यांचा कारभार कधीही पारदर्शक न होऊ देण्याचा ताण. हजारो वाहनं धावत असलेल्या रस्त्यावरून दिवसाला शे-पन्नासच वाहनं धावत असल्याचं दाखवण्याचा ताण. टोलवसुली संपल्यानंतरही मुदतवाढ देण्याचा ताण. इतकं सगळं टोलावलंबी आहे, तर बाकीचे कर सरकार वसूल कशाला करतं?
.............................................................................................................................................
२. मी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सर्वांत मोठा समर्थक आहे, असं विधान पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी केलं आहे. लष्कर-ए-तोयबा संघटनेलाही मी आवडतो, असंही त्यांनी म्हटलं. लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावा संघटनांकडून काश्मीरमध्ये केल्या जाणाऱ्या कारवायांचंही त्यांनी समर्थन केलं. ‘हाफिज सईदचा काश्मीरमधील कारवायांमध्ये सहभाग आहे आणि मी त्या कारवायांचं समर्थन करतो,’ असं मुशर्रफ म्हणाले. हाफिज सईदची गेल्याच आठवड्यात पाकिस्ताननं नजरकैदेतून सुटका केली.
मियाँ मुशर्रफ यांनी यात नवीन काय सांगितलं? पाकिस्तानात असा कोण सत्ताधीश आणि लष्करशहा आहे ज्याला हाफीज आवडत नाही? हाफीज न आवडून त्याला सत्तेत राहता येईल का? हाफीज तुमच्याकडेच नाही, आमच्याकडेही अनेकांना आवडतो. उद्या त्याला पाकिस्ताननं फासावर वगैरे लटकवला, तर इथल्याइथेच कुचुकुचू करणारे इथले नवदेशभक्त शिरा ताणून बोलणार कुणाबद्दल आणि कशाबद्दल?
.............................................................................................................................................
३. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात महापालिकेच्या वतीनं विकासकामं करण्याच्या प्रस्तावावरून निर्माण झालेला वाद कायम (प्रकरण न्यायप्रविष्ट) असतानाच आता पुन्हा संघाशी संबंधित धंतोलीतील मोरोपंत पिंगळे गोरक्षण परिसर (गोरक्षण मंदिर) विकासाचा दोन कोटी १० लाख रुपये प्रस्ताव महापालिकेनं तयार केला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे. हितेश कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे येथील विकास कामाची जबाबदारी देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्या अडचणीत असलेल्या महापालिकेचे अलीकडच्या काळात उफाळून आलेले संघप्रेम पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडणारं ठरण्याची शक्यता आहे.
संघाचं एकंदर ‘इटलीप्रेम’ लक्षात घेता व्हॅटिकनच्या धर्तीवर नागपूरचंच नामांतर करून संघभूमी असं नाव देऊन तिथं स्वायत्त कारभाराची व्यवस्था करून टाकावी. म्हणजे हे रोजचे फुटकळ वाद तरी थांबतील आणि सर्व ठिकाणच्या भटक्या गायीगुरांना एकच मोठी गोशाळा लाभल्यानं उर्वरित देशातले बरेचसे ताप कमी होतील.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287
.............................................................................................................................................
४. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर काँग्रेस आणि विशिष्ट समाजांमधील तरुण नेत्यांचं आव्हान उभे राहिल्यानंतर आता भाजपने ‘मोदीछेने’ (ModiCheNe) हा नवा हॅशटॅग सुरू केला आहे. ‘मोदी आहेत ना, मग गुजरात सुरक्षित आहे,’ असा संदेश भाजपनं नव्या व्हिडिओमधून दिला आहे. याआधी भाजपने ‘मी आहे विकास, मी आहे गुजरात’ अशी जाहिरात करून काँग्रेसच्या टीकेला उत्तर दिलं होतं. ‘विकास वेडा झाला आहे,’ या काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनं ‘मी आहे विकास,’ ही जाहिरात तयार केली होती. यानंतर आता भाजपकडून नवी जाहिरात करण्यात आली आहे.
म्हणजे काय? नेमकं म्हणायचंय काय भाजपला? मोदी सत्तेत असले की, गुजरात सुरक्षित राहील, भाजप सत्तेतून पायउतार झाला की, गुजरात असुरक्षित होईल? म्हणजे दंगेखोर सत्तेत आले की दंगे थांबतात, याची देशभरातल्या जनतेला कल्पना आहे. पण, तशी थेट जाहिरात करायला हिंमत लागते.
.............................................................................................................................................
५. भारतात रामाशिवाय कोणतेही काम पूर्ण होऊ शकत नाही, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. ‘प्रभू राम आमच्या श्रद्धेचं प्रतीक आहेत. संपूर्ण देशाच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू प्रभू रामच आहेत,’ असंही आदित्यनाथ यांनी म्हटलं.
या सगळ्या मंडळींच्या धारिष्ट्याची दाद द्यायला हवी. जे जे आपल्याला वाटतं, ते ते देशातल्या प्रत्येकाला वाटलंच पाहिजे, इथून यांचा जो प्रवास सुरू झाला आहे, तो आता, आपल्याला जे वाटतं ते इतरांना वाटतंच आहे, इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. म्हणून सगळ्या देशाला गायीपासून श्रीरामापर्यंत सगळं काही कंपल्सरिली वंदनीय आहेच, असं ते इतक्यांदा रेटून सांगत असतात की, ते इतरांपेक्षा स्वत:लाच बजावतायत, असा भास होत असतो.
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Thu , 30 November 2017
टिक्कोजीराव, दंगेखोर सत्तेत आले की दंगे थांबतात, हे कोणी सांगितलं तुम्हाला ? तो अखिलेश यादम मागल्या वेळेस मुख्यमंत्री झाल्याबरोबर लगेच मुझफ्फरनगरच्या दंगली उसळल्या होत्या ते आम्हाला आठवतंय. आ.न., -गा.पै.